जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी – ७
३ जानेवारी २०२५ ते १२ जानेवारी २०२५ पर्यंत सावित्री ते जिजाऊ दशरात्रोत्सव अंतर्गत १० कर्तृत्ववान महिलांच्या यशोगाथा…यामध्ये आज डॅा. उर्मिला शिंदे यांच्या कार्याचा परिचय…ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, संपादक, प्रकाशक
अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणे
मो. 9823627244
आळंदी ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या डॅा. उर्मिला शिंदे यांनी आळंदीत येऊन रुग्णालयाचा जो कायापालट केला त्यामुळे राज्यशासनाचा आरोग्य क्षेत्रातील मानाचा ‘कायाकल्प’ हा पुरस्कार आळंदी ग्रामीण रूग्णालयाला त्यांनी मिळवून दिला. येथील एकूण परिस्थिती व कामकाज पध्दती पाहाता डॅा. शिंदे यांनी सुमारे १२-१२ तास काम करून येथे आजवर कधीही न झालेल्या सीझर व कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया सुरु केल्या. आज येथील रूग्णांची संख्या सुमारे ५०० च्यावर पोहोचली आहे. आजवर आळंदीचे नाव तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध होते, आता सरकारी रुग्णालय सुध्दा नावारूपास आले आहे.
डॅा. उर्मिला यांची आज यशस्वी कारकीर्द दिसत असली तरीही यामागे त्यांचे अपार कष्ट आहेत. त्यांचे जन्मगाव सांगोला. दिगंबर व लक्ष्मीबाई आहिरे यांच्या नऊ माणसांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात सहा भावंडातील त्या एक. आई जि. प. शाळेत शिक्षिका व मुख्याध्यापिका म्हणून रिटायर झाल्या. वडील पोस्टमास्तर होते. दोघेही नोकरी करत असल्यामुळे सर्व बहिणींना सारे घरकाम करून शाळेला जावे लागे. ‘घरातील शिळं अन्न संपवल्याशिवाय आम्हांला ताजे अन्न दिले जाणार नाही असा आईचा कडक शिरस्ता होता. परिस्थितीने आम्हाला घडविले त्यामुळे आजही काटकसरीचे महत्व पुरेपूर जाणून पुढच्या पिढीला शिकविण्याचा प्रयत्न मी करत असते.’ असे त्या सांगतात.
कायमच मोठ्या बहिणीचे कपडे, पुस्तके वापरून दहावीत मागासवर्गीय यादीत बोर्डात पाचवी आलेली ही उर्मिला तिच्या कुटुंबात, गावांत व तालुक्यातील पहिली महिला डॅाक्टर झाली. त्यांचे शिक्षक रस्त्यात आईला भेटल्यास थांबून सांगत की तुमच्या मुलीने खूप सुंदर निबंध लिहिला आहे, वाचून पहा पण शिक्षक असलेल्या आईला मात्र नऊ जणांचा संसाराचा गाडा हाकण्याची चिंता असायची त्यामुळे आईने अभ्यासाकडे विशेष लक्ष दिले नाही. त्यावेळी जातवास्तव भयानक होते. ताई सांगू लागल्या, ‘आम्ही चर्मकार असल्याने आमच्याशी कोणी जवळीक साधत नसत. आईने शाळेत शिक्षिकेची नोकरी करताना याचे खूप दुःखद अनुभव घेतले होते. तिला जातीवरून हिणवले जात होते. दहावीला बोर्डात आले तेव्हा बीकॉम फर्स्ट इअर वर्गात जाऊन जवळजवळ १५-२० दिवस बसले होते, ते पाहून शाळेचे सर्व शिक्षक आमच्या घरी येऊन माझे आई वडील आणि आजोबा बापू गोविंद खडतरे यांना भेटले. आमच्या घरी येऊन चहा पिले आणि माझ्या आईवडिलांना मला पुढील शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवावे अशी चर्चा करून ते यशस्वी झाले होते.
तेव्हा आईला मी बोर्डात आले होते या गोष्टीपेक्षा तिला जातीवरून हिणवणाऱ्या सर्वांचे पाय आमच्या घराला लागले या गोष्टीचा आनंद जास्त झाला होता. तिचे डोळे आनंदाने भरून आले होते. पुढील शिक्षणासाठी सोलापूरला जाण्याची परवानगी मिळून सात रस्त्याच्या संगमेश्वर कॉलेजमध्ये ११ वी चे ॲडमिशन झाले. १२ वीला त्यावेळच्या PCB ग्रुपला ९३% मार्क्स मिळवून सोलापूरच्या वैशंपायन मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळाली. तिथे MBBS ची पदवी घेऊन त्यानंतर भूलशास्त्रात पोस्टग्रॅज्युएशन मिळाले पण ते अर्धवट झाल्याने पुढे preventive and social medicine मध्ये मी मुंबई येथे पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले.’ अशा परिस्थितीत एम.बी.बी.एस. डीपीएच. झालेल्या उर्मिलाची मोठी स्वप्न व दिशा नव्हती. पण डॅाक्टर झाल्याचे पूर्ण श्रेय आई वडीलांचे आहे असे डॅा. उर्मिला म्हणतात. शिक्षण झाले की लग्न हे ठरलेले..!
त्यांना जीवनाचा सहचर मिळाला तोही अठरा विश्व दारिद्र्यातून वाटचाल करत डॅाक्टर झालेला डॅा. नामदेव शिंदे. परिस्थिती नसल्याने त्यांनी स्वतंत्र प्रॅक्टिस करायचा विचार न करता सरकारी नोकरी स्वीकारली. त्यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून पहिली नेमणूक नगर जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वर या गावात झाली. उभयतांचे सहजीवन याच गावात सुरू झाले. पूर्णतः दुर्लक्षित अशा या रुग्णालयात दोघांनी जीव ओतला. ३० वर्षांपूर्वी कोणी फिरकत नसलेल्या या रुग्णालयात सिझर आणि इतर जोखमीच्या शस्त्रक्रिया सुरु केल्या. या कामाची पावती म्हणून ‘बेस्ट मेडिकल ॲाफिसर’ चा पुरस्कार डॅा. उर्मिलांना मिळाला.
शासकीय सेवेत बदली ही होतच असते. त्यांची दुसरी इनिंग श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय अहमदनगर येथे सुरु झाली. येथे शासकीय सेवेसोबत त्यांनी खाजगी प्रॅक्टिसही सुरू केली. यश मिळत गेले परंतु गेली ३० वर्ष अनेक संकटांचा सामनाही त्यांना करावा लागला. त्यांनी हजारो रुग्ण पाहिले, सेवा केली, हजारो बाळंतपणे, शस्त्रक्रिया केल्या. ‘रूग्णांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून श्रमपरिहार झाल्याचा आनंद आजवरचा कठीण प्रवास सुकर झाला.’ असे डॅा. उर्मिला सांगतात.
अंगात भिनलेली कष्टाळू वृत्ती, चालू असलेली रूग्णसेवा, मुलांसह छोटासा सुखी संसार..सारं सुरळीत चालू असताना अचानक एके दिवशी नियतीने घाला घातला व स्त्रीरोग तज्ञ डॅा. नामदेव शिंदे यांचा २०१९ मधे हार्टॲटॅकने दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हा डॅा. उर्मिला यांचेवर दुःखाचा डोंगर कोसळला. मुलींचे अमेरिकेतील अर्धे झालेले उच्चशिक्षण, मुलाची १२ वीची परीक्षा, घरासाठी घेतलेले मोठे कर्ज आणि त्यांच्या नसानसात साठलेले आभाळाएवढे दुःख..! डॅा. उर्मिला डॅाक्टर असल्या तरीही त्यांचा मुलांसह एकटीचा प्रवास हा जीवघेणा, अवघड व संघर्षमय सुरु झाला. महिला कुणीही असो, कितीही शिकलेली सक्षम असो तिला सामाजिक रूढी परंपरांना, अंधश्रद्धांना सामोरे जावे लागते. त्यांनाही ‘विधवा’ म्हणून घरात व समाजात विविध गोष्टींचा सामना करावा लागला.
समाजाच्या दाहक नजरा, बोचणारे सल्ले, बदललेल्या दूषित नजरा, जवळचे म्हणवून घेणाऱ्यांचा बदललेला ॲटिट्यूड, स्वतःला व मुलांना सावरताना विस्कटलेली घडी पुन्हा बसवताना मला अग्निदिव्य पार करावे लागले. मुलांकडे बघू की स्वतःला सावरू की परिस्थिती सावरू हे समजत नव्हतं. एखाद्या क्षणी सारं संपवावं असंही वाटून जायचं.’ असं डॅाक्टरांना जाऊन पाच वर्षं झाली तरी डॅा. उर्मिला दुःखातिशयाने सांगत होत्या.
दरम्यान २०२० ला आईचा आणि २०२१ ला वडिलांचा असे एका पाठोपाठ एक जवळचे मृत्यू झाल्याने डॅा. उर्मिला उन्मळून पडल्या होत्या. आजवर प्रत्येक वाटचालीत पतीची साथ मिळाली होती, ते आणि आई वडील गेल्याने त्या एकाकी, अनाथ झाल्या. जगाचे खरे रूप दिसू लागले. सलग दोन तीन वर्षं अविरत झरणारे डोळे, प्रिय पतीच्या विरहाचं दुःख बाजूला सारून यंत्रवत बाहुली बनून तारेवरची कसरत करत कामात स्वतःला १२-१२ तास बुडवून टाकणे हा उत्तम पर्याय त्यांनी स्वीकारला. सगळं सहन करत मुलांसाठी त्या सारं विसरून पुढे जात होत्या. दरम्यान मुलींचे शिक्षण पूर्ण झाले. मुलगा IIT झाला. मुलं सक्षम व स्वावलंबी झाली. पतीचे स्वप्न पूर्ण झालं होतं. आज त्यांना डॅाक्टर असल्याचा अत्यंत अभिमान आहे असे सांगतानाच ‘जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत दिवंगत पती डॅा. नामदेव शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवून अविरत, निःस्वार्थी रूग्णसेवा करणं आणि सतत कार्यरत रहाणं हेच माझ्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे.’ असे डॅा. उर्मिला सांगतात.
‘विभक्त कुटुंबामुळे आई वडील दोघेही नोकरीत असल्याने एकाकी पडणारी मुलं ड्रग्स, व्यसनांच्या विळख्यात सापडतात आणि इझी मनीच्या मागे लागून नसत्या चक्रव्यूहात अडकतात. वेळेतच योग्य दिशेने यांना सावरले नाही तर काहींची आयुष्यं कशी बरबाद होऊ शकतात हे मी २-३ वर्षे येरवडा मनोरुग्णालयात काम करताना तेथे खूप केसेस अभ्यासल्या आहेत त्यामुळे अशा मुलांना आधार देण्याचा, त्यांच्यासाठी भविष्यात काम करण्याचा माझा मानस आहे. देशाची उगवती, उमलती पिढी योग्य मार्गक्रमण करण्यास, माझ्या मेडिकल ज्ञानाचा गरजूंसाठी उपयोग करणे यापेक्षा वेगळे समाजकार्य काय असू शकते ?’ अशा शब्दांत त्या व्यक्त होतात.
रूग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानणाऱ्या, उर्वरित आयुष्य तरूणाईसाठी देण्याचे स्वप्न पहाणाऱ्या, अतिशय कष्टाने, जिद्दीने, प्रामाणिकपणे, ग्रामीण रुग्णालयांचा दर्जा वाढवून सेवा देणाऱ्या या जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकीला मानाचा मुजरा..!!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.