March 29, 2024
The dangers of using mobile phones in childhood are serious!
Home » बालवयात मोबाईल वापरण्याचे धोके गंभीर !
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

बालवयात मोबाईल वापरण्याचे धोके गंभीर !

एकेकाळी काही घरांमध्येच असलेल्या दूरध्वनीचे रूपांतर मोबाईल मध्ये होऊन आता प्रत्येक व्यक्तीच्या हातात  मोबाईल आला आहे. एका बाजूला तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने  झाला असला तरी  त्याचे प्रतिकूल परिणाम व्यक्तिमध्ये तसेच समाजावर जाणवू लागले आहेत.  बालवयामध्ये हातात मोबाईल देणे हे केवळ अयोग्यच नव्हे तर त्यामुळे एकाग्रता जाणे, एकटे पणाची भावना निर्माण होणे, मन स्थिर न रहाणे व अनैतिक गोष्टींकडे कल रहाणे असे अनेक गंभीर धोके निर्माण होत आहेत. एका जागतिक पहाणी अहवालातून आपत्या समोर उभ्या ठाकत असलेल्या संकटांचा हा वेध. 

प्रा. नंदकुमार काकिर्डे

मोबाईल फोन किंवा वायरलेस उपकरणांचा होत असलेला वाढता वापर यामुळे केवळ व्यक्तिगत पातळीवरच नाहीत तर संपूर्ण समाजावर खूप प्रतिकूल परिणाम होत असून त्यातून नवनवीन संकटे आपल्यासमोर उभी ठाकत आहेत. याबाबत एक जागतिक अहवाल प्रसिद्ध झाला असून त्यामध्ये याबाबतच्या संकटांची जाणीव करून देण्यात आली आहे. केवळ  भारतातच नव्हे तर सर्व देशांमध्ये लहान मुलांना मुलांच्या हातात मोबाईल देण्यामुळे निर्माण झालेल्या धोक्यांची माहिती या अहवालात देण्यातआली आहे. मोबाईल तंत्रज्ञान अगदी बालवयामध्ये हाताशी आल्याने मुलांमध्ये सामाजिक तसेच संज्ञानात्मक (Cognitive) म्हणजे आकलन विषयक  समस्या निर्माण होत आहेत. 

कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या काळानंतर च्या कालावधीत लहान मुले व तरुण पिढी मोबाईलचा  तसेच तत्सम वायरलेस उपकरणांचा अतिरेकी वापर करत असून संपूर्ण पिढीवर त्याचे दुष्परिणाम जाणवत आहेत. अनेक वेळा आई-वडिलांचे मोबाईल लहान मुलं हट्ट करून मागून घेतात आणि सातत्याने त्याच्याशी खेळत बसतात. पालकच याबाबत खूप संभ्रमात असून लहान वयात मुलांच्या हातात मोबाईल द्यावा किंवा कसे याची त्यांना मुळात कल्पना येत नाही. काही वेळा आपला लहानगा किती कार्यक्षमपणे मोबाईलची बटने दाबतो, त्याच्यावरची गाणी ऐकतो किंवा त्यावरच्या विविध व्हिडिओ पाहत राहतो, विविध खेळ सफाईने खेळतो याचेच कौतुक आई-बाबांना जास्त असते. अनेक वेळा लहान मुलांचे खाणे पिणे व्यवस्थित व्हावे म्हणून किंवा आणखी कुठलातरी हट्ट पुरवण्यासाठी आई बाबा त्यांच्या हातात  मोबाईल देतात. काही वेळा अभ्यासाच्या नावाखाली मुलांच्या हातात मोबाईल जातो तर काही वेळा शाळेत किंवा क्लासला जाणाऱ्या मुलांवर ‘पाळत’ किंवा ‘लक्ष’ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आई-बाबा मुलांच्या हातात मोबाईल सोपवतात.

त्यामुळे अत्यंत लहान वयामध्ये तंत्रज्ञानाशी ओळख झाल्यामुळे किंवा ते हाताळता आल्याने त्यामुळे उद्भवणारे प्रकार हे चिंता वाढवणारे आहेत.  या पाहणीत असे लक्षात आले आहे की खुद्द पालकांनाच या मोबाईल हाताळण्याच्या धोक्यांची अजिबात कल्पनाच  नसते. मोबाईल मध्ये असलेल्या व्हॉट्सअप, विविध गेम्स किंवा युट्युब सारख्या गोष्टींमुळे लहान  मुलांचा मानसिक बळी दिला जात आहे. त्यातूनच सामाजिक माध्यमांशी होणारी अतिरेकी जवळीक, सायबर गुंडगिरी व त्यांच्या वयाला अयोग्य, अनुचित असणारी माहिती व चित्रे अशी सामग्री यांच्या जंजाळात बालमन आणि तरुण वर्ग गुरफटून व भरकटत जात आहे. काही पालकांना याची जाणीव आहे तर काही पालकांनी अपरिहार्यते पोटी हा मोबाईलचा भस्मासुर त्यांच्या हातात सोपवलेला आहे. या अहवालात तरुण वयात किंवा लहानपणी मोबाईल हाताळल्यामुळे निर्माण होत असलेल्या काही गोष्टी प्रकर्षाने नमूद केल्या आहेत. शालेय  वयात किंवा 18 ते 24 या वयोगटातील मोबाईल वापरकर्त्यांची मानसिकता किती बिघडत चालली आहे हेही त्यातून स्पष्ट होत आहे. भारतासह अनेक देशांमध्ये अगदी सहा ते दहा वर्षे वयाच्या मुलांना मुला-मुलींमध्ये सढळपणे मोबाईल दिला जातो असेही लक्षात आले आहे. त्यामुळे या मुलांच्या मनामध्ये आत्महत्या बाबतचे विचार, आक्रमकपणा, कोणाविषयी ममता किंवा प्रेम नसणे, अत्यंत तुटकपणे व्यवहार करणे व भ्रामक कल्पना यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.

अर्थात जास्त वयाच्या म्हणजे प्रौढ महिला व पुरुष यांच्यातही मोबाईलचे असलेले ” वेड” चिंताजनक असले तरी त्यांच्यावर  तरुणांइतका प्रतिकूल प्रभाव झालेला जाणवत नाही. मात्र तरुण वर्गामध्ये नकारात्मक मानसिक आरोग्य, नैराश्य, आत्यंतिक चिंता, नकारात्मक आत्मसन्मान व स्वतःच्या शारीरिक लक्षणांबद्दल अति काळजी वाटू लागते.  ही लक्षणे सोमॅटिक सिम्प्टम डिसऑर्डर ( एसएसडी) सारख्या समस्या निर्माण झाल्याची  आहेत. तरीही कोणते तरी “गेम” खेळून त्यातून पैसा कमवण्याचा किंवा शेअर बाजारातील काही सट्टारूपी व्यवहारांची भुरळ सर्व वयोगटांमध्ये आढळली आहे. लहान मुले व तरुण पिढी या तंत्रज्ञाना बरोबर काय करीत आहेत याचा अभ्यास करणे हे महत्त्वपूर्ण ठरत आहे. स्मार्टफोनचा वापर हा पूर्णपणे बंद करता येणार नाही असे जरी असले तरी या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व तंत्रज्ञान समृद्ध जागतिक बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्यांची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची पण मारक ठरत आहे. गुगल, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम किंवा व्हॉट्सअप यांचा सर्रासपणे वापर वाढत आहे.

खुद्द फेसबुकने याबाबत स्वतः च केलेल्या संशोधनात इन्स्टाग्रामच्या वापरामुळे तरुण मुलींमध्ये मानसिक आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्याचे मान्य केले आहे. दुर्दैवाने कोणतीही तंत्रज्ञान कंपनी तरुण पिढीच्या सुरक्षित वापराबद्दल कोणत्याही प्रकारची काळजी घेत नाही किंबहुना त्यांना त्याबाबत मार्गदर्शन करत नाही व त्यांच्याकडे कोणतीही  संरक्षण यंत्रणा, संरक्षक मार्गदर्शक तत्वे उपलब्ध नाहीत असे या अहवालामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. तरुण पिढीमध्ये व बाल वयामध्ये मोबाईल वापरामुळे निद्रा नाश होत असल्याचे व त्यामुळे शारीरिक स्वास्थ्य बिघडत असल्याचे लक्षात आले आहे. अंधारात मोबाईलचा वापर केल्याचा परिणाम दृष्टीवर तसेच शांत झोप येण्यावरही होत असल्याचे आढळले आहे. दरम्यान मोबाईल मध्ये वापरल्या जाणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सी चा मानसिक आरोग्यावर काही परिणाम होतो किंवा कसे याचा कोणताही ठोस पुरावा मिळाला नसून तसा निष्कर्षही काढण्यात आलेला नाही. मात्र सातत्याने मोबाईलवर नजर राहिल्याने मुलांच्या दृष्टीवरही परिणाम होत असून डोळे चुरचुरणे, त्यातून सातत्याने पाणी येणे असे प्रकार वाढत आहेत. त्यातूनच मानसिक ताणतणाव वाढत असून त्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. 

या जागतिक पाहणीत असेही लक्षात आले आहे की भारतामध्ये तरुण मुलांच्या म्हणजे दहा ते चौदा वयोगटातील मुलांच्या हातात मोबाईल असण्याचे प्रमाण अन्य देशांच्या किंवा आंतरराष्ट्रीय सरासरीच्यापेक्षा जवळ जवळ ७ टक्के जास्त आहे. त्यामुळे या एकूणच सर्वांचा विचार केवळ पालकांनी न करता सर्व स्तरांवर म्हणजे अगदी शासनाने ही याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. भारतीय राज्यघटनेने भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरी बहाल केलेले असले तरी या मोबाईलच्या माध्यमातून उभी टाकणारी संकटे ही संपूर्ण समाजाला उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत इतकी गंभीर स्थिती लहान वयामध्ये किंवा तरुणांमध्ये मोबाईल वापरामुळे निर्माण झालेली आहे. सर्व शाळांमध्ये मुलांमध्ये शिस्त नसणे, अभ्यासाबाबत आवड नसणे, तसेच आई-वडील शिक्षक किंवा अन्य ज्येष्ठ व्यक्तींबाबत कोणत्याही प्रकारची आदराची किंवा त्याना मान देण्याची भावना नसणे असे चिंताजनक वर्तन  लक्षात आलेले आहे.

बहुतेक सर्व शाळामध्ये समुपदेशकांच्या कडे मुलांची रीघ लागलेली असते. शाळांमध्ये मोबाईल वापरावर विद्यार्थ्यांना बंदी असली तरीसुद्धा शाळा व महाविद्यालयांमध्ये मुले सर्रास मोबाईल वापरतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक वर्गही त्यांच्यासमोर वर्गमध्येच  त्याचा वापर करताना आढळतात. प्रत्येक घरामध्ये नोकरी, व्यवसाय करणारे किंवा केवळ घरकाम करणारे आई, वडील किंवा ज्येष्ठ नागरिक हे सुद्धा मोबाईल अपरिहार्यपणे वापरत असतात.  त्यांचाच नेमका हा आदर्श तरुण पिढी पुढे निर्माण होत असल्यामुळे या मोबाईलच्या वेडातून तरुण पिढीला कसे बाहेर काढावयाचे याबाबत सामाजिक शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन महत्त्वाची भूमिका बजावण्याची गरज  वाटत आहे हे निश्चित.

(लेखक पुणेस्थित अर्थविषयक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

Related posts

स्वरुपाची ओळख होण्यासाठीच समर्पण

अग्रणी उत्कृष्ठ साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे पुरस्कार जाहीर

Leave a Comment