मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने….
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळो न मिळो पण मराठीला अमरत्व देण्याचे कार्य आपण सुरु ठेवायला हवे. मराठीतील आत्मज्ञानाचे तत्त्वज्ञान मराठीत नित्य नुतन साहित्याची निर्मिती करणारे असे आहे. हे तत्त्वज्ञान चिरकाळ टिकवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मराठी साहित्यात आत्मज्ञानाचा प्रसार, प्रचार अन् परंपरा नित्य होत राहील्यास भाषेचे अस्तित्व कायम राहील. भक्ती चळवळीच्या माध्यमातून सर्व मराठी संताच्या साहित्याचा कार्याचा प्रसार, प्रचार करून ब्रह्मज्ञानाचा मराठीचा डंका विश्वभर वाजवायला हवा.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
तेंचि मऱ्हाटेनि विन्यासें । मिया उन्मेषें ठसें ठोंबसें ।
जाणें नेणें तैसें । निरोपिलें ।। ५९३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा
ओवीचा अर्थ – तेंच मी मराठी भाषेच्या रचनेने ओबडधोबड ज्ञानाने, मला कळलें न कळलें तसें सांगितले.
मराठी भाषेत ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञानेश्वरांनी बाराव्या शतकात लिहीला. कोणतीही भाषा टिकायची असेल तर ती ज्ञान भाषा व्हायला हवी. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मराठी भाषा खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा झाली. ज्ञानेश्वरीमुळे तिला अमरत्व प्राप्त झाले आहे. आत्मज्ञानाचा जागर करून ज्ञानेश्वरांनी मराठी नगरीत ब्रह्मविद्येचा सुकाळ करण्याचे स्वप्न ज्ञानेश्वरांनी पाहीले होते. इतकेच नव्हे तर हे विश्वची माझे घर असे म्हणून त्यांनी विश्वाला एका कुटूंबाची उपमाही दिली आहे. कुटूंबातील सर्व सदस्यांची काळजी एकमेक घेत असतात. यातून परस्परातील सहकाराने आनंदी जीवन जगण्याचा, जगाला प्रेम अर्पण करत जगण्याचा संदेश दिला. यातूनच मराठी जगभर पोहोचवण्याचे काम त्यांनी केले आहे. आजही मराठी भाषेचा जागर ज्ञानेश्वरी पारायणाच्या माध्यमातून होत आहे. खेडोपाड्यात ज्ञानेश्वरीची पारायणे होतात. ज्ञानाच्या जागरातून मराठीचा प्रसार, प्रचारही होतो आहे.
सर्व धर्मांना सामावून घेण्याची आपली भारतीय संस्कृती असल्यामुळे अनेक परकीय भाषाही येथे आल्या. पण परकियांनी त्यांच्या धर्माच्या प्रसारासाठी मराठीत साहित्याची निर्मिती केली. अशातून त्यांनी मराठीला एकप्रकारे संजिवनीच देण्याचे काम केले आहे. भाषांतरातून मराठीचे सौंदर्य अधिकच फुलले. अशातून मराठीतील साहित्यही अन्य भाषात जाऊन मराठीला सातासमुद्रापार नेण्याचेही काम साहित्यिकांनी केले आहे. तत्कालिन राजे राजवाड्यांनीही, सत्ताधिशांनी अन्य भाषा शिकुन स्वतःचे साम्राज्य वाढविण्याचा प्रयत्न केला. यातून मराठीचा प्रसार, प्रचारच होत राहीला. स्वराज्यसंकल्पना मांडणारे शहाजीराजे यांनाही सुमारे चौदा भाषा अवगत होत्या असे उल्लेख आढळतात. उदाहरणच द्यायचे झाल्यास तंजावरी भोसले हे मराठी भाषिक राजे घराण्यातील व्यक्तींना मराठी व्यतिरिक्त संस्कृत, इंग्रजी, हिंदी, तेलगु व तामिळ भाषा येत होत्या. त्यांनी या सर्व भाषात साहित्याची निर्मिती केली पण त्याबरोबरच मातृभाषेतही त्यांनी विपुल साहित्य निर्मिती केली आहे. महाराष्ट्राबाहेर परक्या मुलुखात मराठीचा जागर यातून या घराण्याने केला. इतर भाषांचा द्वेष करण्यापेक्षा त्या भाषा शिकूण त्या भाषांत मराठी भाषेचा प्रसार, प्रचार करण्यावर भर दिल्यास मराठीलाच संजिवनी मिळेल हे विचारात घ्यायला हवे.
प्राचीनता, श्रेष्ठता, स्वयंभूपणा आणि सलगता यावर अभिजात भाषेचा दर्जा ठरतो. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी ज्येष्ठ अभ्यासक रंगनाथ पठारे यांनी अनेक पुरावेही सादर केले आहेत. अठराव्या शतकात राजारामशास्त्री भागवत यांनी मराठी भाषेचा उगम संस्कृतपासून नव्हे तर ती पूर्ववैदिक बोलीतून तयार झाली असल्याचे संशोधन केले आहे. संस्कृत भाषा तयार होण्याआधी वैदिक भाषा अस्तित्वात होती. या सुत्राने मराठी भाषेचे वय हे दोन हजारपेक्षा जास्त असल्याचे सिद्ध होते. डॉ. सुधीर देवरे यांच्यामते मराठी व्याकरणाचे नियम दुसऱ्या शतकातील वररूचीचे व्याकरण या ग्रथांत मांडले आहेत. याचाच अर्थ दुसऱ्या शतकात मराठी भाषा अस्तित्वात होती हे सिद्ध होते. अडीच हजार वर्षापूर्वीच्या विनयपिटक या पाली भाषेतील ग्रंथात महारठ्ठ असा उल्लेख आढळतो. हे भाषेच्या अस्तित्वाचे प्रमाण असल्याचेही मत देवरे यांनी मांडले आहे. श्रीलंकेच्या सिंहली भाषेतील दिपवंश ग्रंथात महारठ्ठ, महाराष्ट्र शब्द आढळतात. यावरून ही भाषा आणि हा प्रदेश त्याकाळी अस्तित्वात होते हे सिद्ध होते.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळो न मिळो पण मराठीला अमरत्व देण्याचे कार्य आपण सुरु ठेवायला हवे. मराठीतील आत्मज्ञानाचे तत्त्वज्ञान मराठीत नित्य नुतन साहित्याची निर्मिती करणारे असे आहे. हे तत्त्वज्ञान चिरकाळ टिकवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मराठी साहित्यात आत्मज्ञानाचा प्रसार, प्रचार अन् परंपरा नित्य होत राहील्यास भाषेचे अस्तित्व कायम राहील. भक्ती चळवळीच्या माध्यमातून सर्व मराठी संताच्या साहित्याचा कार्याचा प्रसार, प्रचार करून ब्रह्मज्ञानाचा मराठीचा डंका विश्वभर वाजवायला हवा. मराठी भाषेबद्दल मला जे समजले, वाटले, जे कळले ते गुरुकृपेतून मी आज तुमच्या समोर मांडले. ज्ञानेश्वरांनीही अनुभवातून, अनुभुतीतून ज्ञानेश्वरी लिहीली आहे. अनुभवलेले शास्त्र, अनुभुती मिळालेले शास्त्र जसे समजले तसे ते त्यांनी मराठीत ज्ञानेश्वरीच्या रुपाने मांडले आहे. हे अनुभवशास्त्र आत्मसात करून विश्व ब्रह्मसंपन्न करण्याचे स्वप्न त्यांनी पाहीले आहे. आज विश्वाला या ज्ञानाची खऱ्या अर्थाने गरज आहे. धकाधकीच्या जीवनात हे शास्त्र नित्य उपयुक्त ठरणारे आहे. मार्गदर्शक ठरणारे आहे. यासाठी याचे महत्त्व जाणून कार्यरत व्हायला हवे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.