सद्गुरू सुद्धा गुरूभक्तच आहेत. तेही या त्यांच्या गुरूंची साधना करत असतात. खरा गुरूभक्त हा सूर्यासारखा असतो. तेजस्वी असतो. त्यांच्यातून तेज ओसंडून वाहत असते. यामुळेच अनेकांच्या जीवनात प्रकाश पडतो. तेजस्वी गुरूभक्ताच्या तेजाने आपल्यालाही जीवन प्रकाशमान करून घ्यायला शिकता आलं पाहिजे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
आतां गुरूभक्तांचे नांव घेणे । तेणे वाचे प्रायश्चित्त देवो ।
गुरूसेवका नांव पहा हो । सूर्य जैसा ।।६७४।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा
ओवीचा अर्थ – म्हणून आतां गुरूच्या भक्ताचें नामस्मरण करूं व त्या योगानें वाचेस प्रायश्चित्त देऊं. गुरुभक्ताचें नाव म्हणजे जणू काय सूर्यच आहे, असे समजा.
मानवाच्या स्वभावानुसार भक्तांचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. काहींचा स्वभाव सज्जन असतो. काहींचा कपटी असतो. मानवाचा स्वभाव केव्हा बदलेल, त्यांच्या मनात कोणता विचार येईल, हे काही सांगता येत नाही. सद्गुरूंना मात्र त्यांच्या भक्तांचे सर्व गुण माहीत असतात. ते सर्व जाणत असतात. ते मनकवडे असतात. भक्तांच्या चुकांकडे ते कानाडोळा करत असतात. असेच काही भक्त सद्गुरूंचा वापर चुकीच्या पद्धतीने करून घेत असतात. सद्गुरूंच्या अशा स्वभावाचा ते फायदा करून घेत असतात. विद्या घेऊन त्यांच्यावरच उलटतात, असा माज त्या भक्तांना असतो. अशा अज्ञानी भक्तांची लक्षणेही जाणून घेणे गरजेचे आहे.
तसे अशा भक्तांविषयी बोलणे म्हणजे वाचेस प्रायचित्त करण्यासारखे आहे. आंबलेले, नासलेले पदार्थ खाल्ल्यानंतर जशी तोंडाची चव जाते तशी या अज्ञानी भक्तांच्या विचारांनी स्थिती होते; पण याचाही अनुभव, माहिती असणे गरजेचे आहे. कारण अज्ञानी लक्षणे जाणता आली तर आपल्या होणाऱ्या चुका आपल्या लक्षात येतील. चुका जाणून घेणे व त्या सुधारणे हा सुद्धा ज्ञानी होण्याचा मार्गच आहे. चुकातूनच प्रगती साधली जात असते. यासाठी आपल्या चुकांकडे सद्गुरू कानाडोळा करत असतात. एक दिवस हा सुधारेल, ही भावना त्यांच्या मनात असते. असेच समजून ते आपणाला मदत करत असतात. प्रेम देत असतात. ज्ञानाचा वर्षाव करत असतात.
काही चुका या मानवी स्वभावामुळे होत असतात. या चुका सुधारण्यासाठी मानवी स्वभावात योग्य ते बदल घडवून आणण्याची गरज आहे. स्वभाव बदलायला हवा. सद्गुरू सुद्धा गुरूभक्तच आहेत. तेही या त्यांच्या गुरूंची साधना करत असतात. खरा गुरूभक्त हा सूर्यासारखा असतो. तेजस्वी असतो. त्यांच्यातून तेज ओसंडून वाहत असते. यामुळेच अनेकांच्या जीवनात प्रकाश पडतो. तेजस्वी गुरूभक्ताच्या तेजाने आपल्यालाही जीवन प्रकाशमान करून घ्यायला शिकता आलं पाहिजे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.