“साखर कंपन्याच्या शेअर्समधील गुंतवणुकीबाबतचा” प्रा. नंदकुमार काकिर्डे यांचा विशेष लेख…
भारतीय शेअर बाजारांमध्ये गेल्या वर्षभरात खूप हेलकावे पूर्ण वातावरण राहिले. २०२२ या वर्षांमध्ये मुंबई शेअर निर्देशांक किंवा निफ्टी यांच्यात केलेल्या गुंतवणुकीवर जेमतेम चार टक्के परतावा मिळाला होता. याच काळात साखर उद्योगातील काही कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर वर्षभरात त्यापेक्षा जास्त म्हणजे साधारणपणे २० टक्के परतावा मिळाला. या पार्श्वभूमीवर २०२३ या वर्षात साखर क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी किंवा कसे याबाबत घेतलेला हा आढावा.
देशातील साखर उद्योग हा एक मोठा कृषी आधारित उद्योग असून अनेक राज्यांतून उसाचे नगदी पीक घेतले जाते. त्याचबरोबर अनेक राज्यांमध्ये साखर उत्पादनाचे कारखाने उभारण्यात आलेले आहेत. हे कारखाने खासगी तसेच सहकार क्षेत्रातील असून उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, व तामिळनाडू व अन्य काही राज्यात त्यांचा विस्तार झालेला आहे. साखर उत्पादनाचे वर्ष आणि त्याच्या विक्रीचे वर्ष हे वेगवेगळे धरले जाते. प्रत्येक वर्षातील ऑक्टोबर पासून पुढील वर्षाच्या सप्टेंबर पर्यंत साखरेचे वर्ष धरले जाते. ऑक्टोबर २०२१ ते सप्टेंबर २०२२ या वर्षात देशात जवळजवळ ३९४ लाख टन साखरेचे उत्पादन झालेले होते. त्यापैकी ११२ लाख टन साखर निर्यात करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिलेली होती. तसेच एकूण उत्पादनापैकी ३४ लाख टन साखर ही इथेनॉलच्या उत्पादनासाठी वळवण्यात आली होती. आणि उर्वरित देशांतर्गत बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या वर्षात साधारणपणे ४०० लाख टन साखरेचे उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादनात दोन टक्के वाढ अपेक्षित धरण्यात आलेली आहे. यापैकी साधारणपणे ४५ लाख टन साखर इथेनॉलच्या उत्पादनासाठी वळवण्यात येईल असा अंदाज आहे. तसेच देशातील स्थानिक बाजारासाठी त्यातील २७५ टन साखर उपलब्ध करून दिली जाईल असा अंदाज आहे,. त्यामुळे साखर कारखान्यांच्या इंडियन शुगर मिल्स असोसिएशन या संघटनेने केंद्र सरकारकडे या वर्षात किमान ८० लाख टन साखर निर्यातीसाठी उपलब्ध करून द्यावी अशी आग्रहाची विनंती केली आहे. त्याबाबतचा निर्णय केंद्र सरकार घेईल अशी शक्यता आहे. यामुळे साखर कारखान्यांना त्यांची साखर निर्यात करता येईल व इथेनॉलच्या निर्मितीसाठी सुद्धा त्यांचा वापर करता येईल. याचा अनुकूल परिणाम साखर कारखान्यांच्या आर्थिक परिस्थितीवर नक्की होऊ शकतो. प्रत्यक्षात ही उत्पादनाची आकडेवारी जास्त झाली व इथेनॉल साठी साखर जास्त देता आली किंवा निर्यात जास्त करता आली तर खाजगी साखर कारखान्यांची नफा क्षमता वाढून भारतीय शेअर बाजारात त्यांच्या शेअर्समध्ये चांगली मागणी येऊ शकते असा अंदाज आहे.
२०२१-२२ या वर्षात काही खाजगी कंपन्यांचे शेअर्सचे भाव चांगलेच वधारले होते.यामध्ये द्वारिकेश शुगर, श्री रेणुका शुगर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये उत्तम वाढ. उगार शुगर कंपनीमध्ये गेल्या वर्षात उत्तम भाव वाढ झाली. त्याच्या जोडीला उत्तम शुगर मिल्स च्या शेअरमध्येही 50 टक्के भाव वाढ वर्षभरात झाली. २०२१ व २०२२ या वर्षात अनेक कंपन्यांनी शेअर बाजारात दैदिप्यमान कामगिरी केली होती. सध्याची उत्पादनाची आकडेवारी, निर्यातीची संधी लक्षात घेता काही कंपन्यांची २०२३ वर्षात चांगली कामगिरी होण्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे या कंपन्यांवर गुंतवणूकदारांनी निश्चित लक्ष ठेवावे. त्या दृष्टिकोनातून वरील कंपन्यांबरोबरच त्रिवेणी इंजीनियरिंग, ईआयडी पॅरी, बलरामपुर चिनी, अवध शुगर, इंडिया सुक्रोज, रावळगाव शुगर, राजश्री शुगर व पॉनी शुगर यांच्याकडे लक्ष ठेवायला हरकत नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की २०२२ मध्ये एकूण ३० ते ३५ कंपन्यांपैकी निम्म्या कंपन्यांची कामगिरी प्रतिकूल झाली तर तेवढ्याच कंपन्यांचे शेअर्सचे भाव चांगले वर गेलेले होते.
आपल्याकडील साखरेचे दर निर्यातीवरच्या अडचणी ,सरकारची धोरणे याचा परिणाम साखर कंपन्यांच्या आर्थिक प्रगतीवर होतो,. त्यामुळे अत्यंत बारकाईने या कंपन्यांचा अभ्यास करून तसेच प्रत्येक कंपनीची गेल्या वर्षभरातील उच्चांकी व निचांकी भाव पातळी लक्षात घेऊन गुंतवणूक करणे हे जास्त श्रेयस्कर ठरेल. यामध्ये प्रत्येक कंपनीची एकूण गाळप व उत्पादन क्षमता, निर्यातीचा आकडा व इथेनॉल साठी उपलब्ध करून दिलेली साखर यांचा एकूण हिशोब लक्षात घेऊन व त्याचा आर्थिक परिणाम लक्षात घेऊन कंपनीची नफा क्षमता किती वाढत आहे किंवा कमी होत आहे हे लक्षात घेऊन अत्यंत जोखमीने विचारपूर्वक गुंतवणूक करावी.
गुंतवणूकदार नेहमी विविध क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असतात यामध्ये साखर उद्योगातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी किंवा कसे याबाबत आणखी काही घडामोडींचा विचार केला तर असे लक्षात येते की पुढील काही वर्षांमध्ये साखर कंपन्यांच्या शेअर्सची गोडी जास्त चांगली वाढत राहणार आहे. त्यामुळे निश्चितच काही कंपन्यांचा विचार करायला हरकत नाही याचे प्रमुख कारण म्हणजे 2022 मध्ये केंद्र सरकारच्या जीएसटी कौन्सिलने साखरेवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आणला आहे. या उद्योगाला हातभार लावणारी ही चांगली आर्थिक घटना आहे.
त्याचप्रमाणे देशातील इंधन क्षेत्रामध्ये आयात करणाऱ्या कच्च्या तेलाच्या वापरात वापर कमी व्हावा म्हणून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करण्याची सरकारची कल्पना आहे सध्या केंद्र सरकारने दहा टक्क्यांपर्यंत इथेनॉल वापरण्याची परवानगी दिलेली आहे मात्र नवीन सुरू झालेल्या 2023 मध्ये ही टक्केवारी 18 ते 20 टक्क्यापर्यंत नेण्याचा केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. या निर्णयाचा खूप मोठा आर्थिक लाभ देशातील अनेक साखर उद्योगांना होणार आहे. बहुतेक सर्व खाजगी साखर उत्पादक कंपन्या व सहकारी कारखाने जोडधंदा म्हणून इथेनॉल चे उत्पादन घेतात. साखरेच्या भावातील चढ-उतार व निर्यातीतील काही निर्बंध हे लक्षात घेता साखर कारखान्यांनी काही प्रमाणात त्यांची साखर इथेनॉलच्या उत्पादनाकडे वळवली त्यांना तर त्यांना भरपूर आर्थिक फायदा होऊ शकतो हे लक्षात आलेले आहे. त्यामुळे अनेक कंपन्या चालू हंगामामध्ये इथेनॉलच्या निर्मितीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहेत. त्याचा भरीव फायदा कंपन्यांच्या नफा क्षमतेवर होणार आहे त्यामुळेच गेल्या काही दिवसात भारतीय शेअर बाजार वरील अनेक साखर कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांचा रस वाढलेला दिसतो.
अगदी अगदी उदाहरण सांगायचे झाले तर श्री रेणुका शुगर्स, द्वारकेश शुगर या कंपन्यांमध्ये मागणी वाढत असून त्याचे भावही वर जाताना दिसत आहेत. जेव्हा बाजारात एखाद्या कंपनीच्या शेअर्सचा भाव एका ठराविक टक्क्यांपेक्षा जास्त जातो तेव्हा त्याला अप्पर सर्किट लागते. काही कंपन्यांचा भाव तर वीस टक्के पेक्षा जास्त वर गेल्यामुळे त्यांना अप्पर सर्किट लागण्याचे गेल्या आठवड्यामध्ये लक्षात आले. जीएसटी 18 टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आल्यामुळे अनेक कंपन्यांना त्यांचा विक्री व्यवसाय जास्त वाढून नफा जास्त मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने इथेनॉल मिश्रण करण्यासाठी जास्त परवानगी दिल्यामुळे अनेक कंपन्या दीर्घकाळ योजनेनुसार इथेनॉलचा उत्पादन जास्त करतील अशी शक्यता आहे याचा फायदा निश्चितच खाजगी उद्योग क्षेत्रांना होईल या शंका नाही.
काही प्रतिकूल घडामोडींमुळे किंवा जागतिक पातळीवरील व्याजदर वाढीमुळे शेअर बाजार नवीन वर्षाच्या पहिल्या सप्ताहात खाली गेलेले होते. मात्र साखर उद्योगाला असणारी या वर्षातील संधी लक्षात घेऊन जेव्हा जेव्हा साखर उद्योगाचे शेअर्स खाली जातील तेव्हा तेव्हा त्यांची खरेदी करायला एक चांगली संधी गुंतवणूकदारांना मिळत आहे असे नक्की वाटते. जरी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत असल्या तरी इथेनॉलचा इंधनांमध्ये जास्त मिश्रण करण्याकडे खाजगी कंपन्यांचा प्रयत्न राहील असे वाटते कारण त्यांना इथेनॉलनिर्मिती व विक्रीमध्ये जास्त नफा मिळत मिळणार आहे.
( लेखक पुणे स्थित जेष्ठ अर्थविषयक पत्रकार आहेत)
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.