October 18, 2024
Monsoon behavior so far and rainfall in October
Home » Privacy Policy » मान्सूनचे आतापर्यंतचे वर्तन अन् ऑक्टोबरमधील होणारा पाऊस
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मान्सूनचे आतापर्यंतचे वर्तन अन् ऑक्टोबरमधील होणारा पाऊस

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२

ऑक्टोबर मधील पावसाच्या उघडीपीतील बदल –

आतापर्यंत महाराष्ट्रात शनिवारी ( दि.१२ ऑक्टोबर)  दसऱ्या पर्यन्त पावसाच्या उघडीपीची शक्यता वर्तवलेली आहे. परंतु आता ही शक्यता मंगळवार (दि. ८ ऑक्टोबर ) पर्यंतच मर्यादित राहू शकते.

ऑक्टोबरच्या (९ ते १३) दरम्यानच्या आवर्तनात पावसाची शक्यता –

बुधवार दि.९ ते शुक्रवार दि. ११ ऑक्टोबर पर्यंतच्या ३ दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वीजा व गडगडाटी सह किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. पावसाची तीव्रता त्यानंतरही दोन दिवस असु शकते.

विशेषतः सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर व संपूर्ण मराठवाडा अश्या १३ जिल्ह्यात मात्र मध्यम स्वरूपाच्या वळीव पावसाची शक्यता ह्या ३ दिवसात अधिक जाणवते.

शेतकामे उरकण्याची संधी –

संपूर्ण महाराष्ट्रात मंगळवार ( दि. ८ ऑक्टोबर ) पर्यन्त खरीप पीक-काढणी, रब्बी लागवडीसाठीची मशागत, सोयाबीनचे खळे, हरभरा पेर, नवीन उन्हाळ कांदा रोप-टाकणी, आगाप लाल कांदा काढणी, ऊस लागवड, रोप जर उपलब्ध असेल तर आगाप रांगडा-लाल कांदा लागवड, तर टप्प्या-टप्प्यातील द्राक्षे बाग-छाटणी  इत्यादि शेतकामे, शेतकऱ्यांनी उरकण्याचा प्रयत्न करावा,असे वाटते.

इशारा दिला जाईल

ह्यातही वातावरणात जर एकाकी काही बदल जाणवलाच तर शेतकऱ्यांना २ ते ३ दिवस अगोदरच सूचित करता येईल, असे वाटते. तरी पण उर्वरित २३ जिल्ह्यात शेतकऱ्यांनी न घाबरता शेत कामावर झडपच घालावी, असे वाटते.

ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यातील वातावरणीय घडामोडी –

कोजागिरी पौर्णिमा ते नरक चतुर्दशी (बुधवार दि.१५ ते गुरुवार दि.३१ ऑक्टोबर) दरम्यानच्या दुसऱ्या पंधरवड्यातील पावसाळी वातावरण हे ‘ला-निना’ विकसन किंवा अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात, घसरणाऱ्या हवेच्या दाबांतून कदाचित चक्रीवादळाची बीज रोवणी किंवा  ५ ते २० डिग्री उत्तर अक्षवृत्त दरम्यान  पूर्वेकडून वाहणाऱ्या मजबूत आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे, संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात म्हणजे कोजागिरी पौर्णिमा ते नरक चतुर्दशी(बुधवार दि.१५ ते गुरुवार दि.३१ ऑक्टोबर) दरम्यान मध्यम पावसाची शक्यता जाणवते.

ऑक्टोबर पहिल्या पंधरवड्यात पावसाची गतिविधीता कमी का झाली ?

सहसा जेंव्हा आसामकडील म्हणजे पूर्वोत्तर  ७ राज्यात व हिमालयाच्या पायथ्याशी म्हणजे सिक्कीम हिमालयीन पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशाचा हिमालयीन भाग येथे जेंव्हा अति जोरदार पाऊस होतो. तेंव्हा महाराष्ट्रासहित संपूर्ण मध्य भारतात म्हणजे म. प्र., छ.गड, भागात कमी पाऊस होतो.म्हणजेच तयार झालेले कमी दाब क्षेत्राची सर्व ऊर्जा पूर्वोत्तर  ७ राज्यात व हिमालयाच्या पायथ्याशी खेचली जात आहे. म्हणूनच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आपल्याकडे पावसाची शक्यता मावळली आहे.परंतु ९ ते १३ ऑक्टोबर  मधील आवर्तनाच्या पावसाची शक्यता आता जाणवत आहे.

एम.जे.ओ, ची स्थिती-

गुरुवार दि. ३ ऑक्टोबर पासून एम.जे.ओ, भारत वि्षुववृत्तीय महासागरीय परिक्षेत्रात संचारित झाला आहे. परंतु त्याचा ‘एम्प्लिटुड’ (वर्तुळ त्रिज्येसमान वर खाली होणारी कक्षा) एक पेक्षा कमी आहे. त्यामुळे ऑक्टोबर मध्ये सध्या व दुसऱ्या पंधरवड्यात देशात तसेच महाराष्ट्रात जो काही पाऊस पडणार आहे, त्यास ह्या एमजेओ मुळे मदतच होणार आहे.

ला- निना ‘-                    

गेल्या वर्षी २०२३च्या पावसाळी हंगामापासून पावसास अटकाव करणारा एल- निनो कार्यरत होता तो ह्या वर्षी २०२४ चा पावसाळी हंगामात तो तटस्थच राहिला व हंगाम संपला तरी  एन्सो अजुनही तटस्थच आहे. आता ऑक्टोबर महिन्यात ला- निना ‘ अवतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे घडले तर ऑक्टोबर ते डिसेंबर ह्या ईशान्य मान्सून च्या काळात दक्षिणेकडील तामिळनाडू केरळ राज्यात  पावसाचे प्रमाण कदाचित कमी राहून महाराष्ट्रासहित मध्य भारतात चांगला पाऊस असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘ आयओडी ‘

सुरवातीला आयओडी धन होता परंतु संपूर्ण पावसाळी हंगामात तटस्थच राहिला. त्यामुळे पावसाला अटकाव झाला नाही. तो अजुन तसाच आहे. परंतु ऑक्टोबर ते डिसेंबर ह्या ईशान्य मान्सून च्या काळात दक्षिणेकडील चार राज्यात चांगला पाऊस होणेसाठी ऋण होणे गरजेचे आहे. म्हणजेच बंगाल उपसागाराचे तापमान हे अरबी समुद्रापेक्षा अधिक असावयास हवे. सध्या तो तटस्थ असल्यामुळे दक्षिणेकडील ४ राज्यात येत्या ३ महिन्यात म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये पडणाऱ्या  पावसावर त्याचा नकारात्मक परिणाम होणार नाही.
           

ऑक्टोबर महिन्याचा पावसाचा मासिक अंदाज –

संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तो सरासरीच्या ११५% पेक्षा अधिक पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यातसरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.तो सरासरीच्या ११२% पेक्षा अधिक पडण्याची शक्यता आहे. त्यातही कोकण व घाटमाथ्यावर ही शक्यता अधिक आहे.                   –
       
कमाल तापमान-

ऑक्टोबर महिन्यात दुपारी ३ चे कमाल तापमान कोकण व मध्य महाराष्ट्रात सरासरी इतके तर विदर्भात सरासरी पेक्षा कमी तर मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. म्हणून मराठवाड्यात ऑक्टोबर महिन्यात दिवसाचे वातावरणक अधिक जाचक ठरण्याची शक्यता जाणवते .                        

किमान तापमान

संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात पहाटे ५ चे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता असल्यामुळे ऊबदार रात्री जाणवतील तर भल्या पहाटे दव (बादड) पडण्याचे प्रमाण कमी जाणवेल.

मान्सून चे निर्गमन व परतीच्या पावसाची स्थिती –

सध्या मान्सून राजस्थानमधून जरी परत फिरलेला असला व वायव्यकडून वारे जरी वाहत असले तरी ज्या पद्धतीने तेथे उत्तर भारतात उच्चं दाब क्षेत्रे व त्याची पोळ व दक्षिण द्विपकल्पात म्हणजे दक्षिणेकडील ४ राज्यात कमी दाबाचा ट्रफ तयार होत नाही, तो पर्यन्त परतीचा पाऊस महाराष्ट्राकडे झेप घेणार नाही, असे वाटते. शिवाय अजूनही बं. उपसागरात बळकट कमी दाब क्षेत्रे तयार होवून देशाच्या वायव्य भागाकडे कूच करत असल्यामुळे परतीच्या पावसाचे वाऱ्यांना आग्नेय दिशेने रेटा बसत असल्यामुळे परतीच्या पावसाचे मान्सून वारे आठवडाभर उत्तर भारतातच अडकले होते. परंतु परतीचा पाऊस गुरुवार दि. ३ ऑक्टोबर पासून काहीशी प्रगती साधली आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर म्हणजे १६ ऑक्टोबर नंतर मान्सून केंव्हाही निरोप घेऊ शकतो.  अर्थात मान्सून निघून गेला तरी चक्रीवादळाचा सीझन चालु होत असल्यामुळे ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

परतीचा पाऊस –

 जून ते सप्टेंबर ह्या ४ महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्रातून मोसमी(मान्सून) १०० ते ११० दिवसात म्हणजे त्याच्या सरासरी निसर्गाने ठरवून दिलेल्या कालावधीत मोसमी पावसाने हजेरी लावून निघून जाणे आवश्यक असते. असे झाले तर मान्सूनचे वर्तन हे नैसर्गिक व सुयोग्य समजावे.व त्यामुळेच त्या वर्षभरातील पुढील परंपरेने चालत आलेल्या वातावरणीय घटना पार मार्च – एप्रिल पर्यन्त घडत असतात.  ह्या घटना म्हणजे योग्य आवश्यक(मार्चच्या मध्यपर्यन्त)थंडी, परतीचा पाऊस,  बं.उपसागरात अधिक व अरबी समुद्रात कमी अशी होणारे चक्रीवादळे व त्यांची सरासरी वारंवारेतील संख्या, कमी गारपीट व माफक धुक्याचे प्रमाण व थंडीतील भू-दवीकरण व भू-स्फटिकिकरण असे सुयोग्य वातावरणीय बदल निसर्गात शेतीसाठी घडून येतात. उष्णतेत वाढ होते. जमीन तापते पण त्याबरोबरच पूर्णपणे ढगविरहित निरभ्र आकाश असल्यामुळे रात्री जमिनीत दिवसभरात साठवलेली लंबलहरी उष्णताऊर्जा प्रकाशलहरीच्या वेगाने अवकाशात होणाऱ्या उत्सर्जनामुळे पहाटेपर्यन्त थंडावते. म्हणून किमान तापमानात चांगलीच घट होते. त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर काळात वि्षुववृत्तदरम्यान उत्तरेकडे म्हणजेच आपल्याही बं उपसागरात अतितीव्र अशी चक्रीवादळे ह्या काळात तयार होतात. व महाराष्ट्रतही पाऊस देतात.

परतीच्या पावसासंबंधीची गफलत –

ऑक्टोबर ३ ते १३ दरम्यान महाराष्ट्रात पडणारा पाऊस परतीचा पाऊस असतो. कारण ३ ऑक्टोबर दरम्यान मान्सून परतत असतांना ३ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात प्रवेशतो व १३ ऑक्टोबर दरम्यान दरवर्षी सरासरी तारखेप्रमाणे महाराष्ट्राच्या बाहेर पडतो.परंतु संपूर्ण सप्टेंबरमध्ये पडणाऱ्या पावसालाच परतीचा पाऊस समजतात.

खरं तर ह्या सर्व तारखात राजस्थान मधून मोसमी पाऊस परत फिरण्याची सुरवात होणारी व संपूर्ण देशातून मोसमी पाऊस निघून पण फक्त ता. नाडू मध्ये वेगळं नांव धारण करून तेथे पाऊस सुरु होण्याची तारीख ह्या दोनच तारखा महत्वाच्या आहेत. कारण महाराष्ट्रातील ह्या दोन व देशाच्या दोन तारखा ह्यामध्ये विशेष असा काही जास्त दिवसांचा फरक नसतो.

चार महिन्याचा अंदाज व पूर्वालोकन –

भारतीय हवामान खात्याने जून ते सप्टेंबर चार महिन्याचा देश पातळीवरील एकत्रित सरासरीइतका दिलेला अंदाज तसेच प्रत्येक महिन्याचा सुरवातीला दिलेला त्या-त्या महिन्याचा मासिक अंदाज हे सर्व सांख्यकीं अंकानुसार अगदी बरोबर व हुबेहूब उतरले. असे असले तरी झालेल्या पावसाच्या असमान वितरणातून मात्र शेतकऱ्यांना खरीप हंगाम जोरदार पावसाचा वाटला नाही.

भारतीय हवामान खात्याने जून ते सप्टेंबर चार महिन्याचा देश पातळीवरील एकत्रित सरासरीइतका दिलेला अंदाज तसेच प्रत्येक महिन्याचा सुरवातीला दिलेला त्या-त्या महिन्याचा मासिक अंदाज हे सर्व सांख्यकीं अंकानुसार अगदी बरोबर व हुबेहूब उतरले आहे.

२०२४ च्या मान्सून अंदाज सरासरी इतका म्हणजे ९६ ते १०४% होता व पाऊस १०८% झाला. संपूर्ण देशात  पावसाळी जून ते सप्टेंबर च्या ४ महिन्यात सरासरी ८७ सेमी. पाऊस होतो. ह्यावर्षी तो ९३.५ सेमी. म्हणजे १०८% पाऊस झाला.

महाराष्ट्र देशाच्या ज्या विभागात येतो त्या मध्य भारतात तर तो ११९% पाऊस झाला आहे. ह्यावर्षी मान्सून ३१ मे ला कमी अधिक ४ दिवसाचा फरकाने दाखल होण्याचा अंदाज व्यक्त होता व तो मान्सून ३० मे ला केरळ मध्ये दाखल झाला.

पावसाचे खण्ड –

ह्या वर्षीच्या मान्सून कालावधीत ऑगस्ट मध्ये जाणवणारा पावसाचा खण्ड जाणवला नाही. मान्सून ट्रफ हिमालयाच्या पायथ्याशी सरकला नाही. पूर्वोत्तर, यू पी व पूर्व भारतात राज्यात पावसाचे प्रमाण कमी म्हणजे सरासरी इतकेच राहिले. त्यामुळे ४ महिन्यात महाराष्ट्रात पाऊस हा भाकीताप्रमाणे सरासरीपेक्षा अधिकच राहिला.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading