- “झाड-माणसं” माहितीपटाच्या पोस्टरचे अनावरण….
- आनंदवनातील वृक्षमित्र ‘झाड-माणसं’ माहितीपटातून भेटीला….लेखक-दिग्दर्शक आशिष निनगुरकर
सध्या जमाना डिजिटलचा म्हणजे ओटीटी माध्यमाचा आहे. अगदी कमी कालावधीत उत्तम कंटेन्ट, फुल टू मनोरंजन प्रेक्षकांना अनुभवायला मिळतं. लघुपट व माहितीपट अगदी कमी वेळात प्रेक्षकांना खूप काही सांगून जातात. हे लघुपट व माहितीपट मनोरंजन तर करतातच त्याचबरोबर काही तरी सामाजिक संदेशही देऊन जातात. अशाच अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी गावाजवळ असणाऱ्या मांडवे येथे उभे राहिलेल्या ‘आनंदवन’ उपक्रमातील वृक्षमित्रांची माहिती ‘झाड-माणसं’ या नव्या माहितीपटातून आपल्या भेटीला येणार आहे. ‘आनंदवन’ महोत्सवात ‘झाड-माणसं’ या माहितीपटाच्या पोस्टरचे अनावरण प्रसिद्ध लेखक -गीतकार अरविंद जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जगताप यांच्याबरोबर लेखक-दिग्दर्शक आशिष निनगुरकर, आनंदवन वृक्षमित्रांची संपूर्ण टीम,संदीप राठोड व शिवशंकर राजळे आदी मान्यवर उपस्थित होते.
आनंदवन जैवविविधता वन उद्यान हा पाथर्डी तालुक्यातील मित्रांनी एकत्र येऊन निर्माण केलेला एक आगळावेगळा उपक्रम आहे. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. जंगलतोड जगभर सुरु आहे. सर्वत्र निसर्गाचे लचके तोडण्याचे काम सुरू आहे. निसर्गातील मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाची जैवविविधता पूर्णपणे धोक्यात आली आहे. त्यामुळे पुढच्या पिढ्यांसाठी गंभीर संकट निर्माण झाले आहे. निसर्गाची काळजी घेणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, याच जबाबदारीच्या भावनेतून मांडवे गावातील वनजमीनीवर वृक्षमित्र शिक्षक संदीप राठोड यांनी २०१७ साली झाडे लावायला सुरुवात केली. पहिल्या वर्षी ५१ रोपांची लागवड केली आणि त्याचे वर्षभर संगोपन केले. २०१८ साली पुन्हा १०० रोपांचे रोपण करून त्याचे संवर्धन केले. याच अनुभवातून धडा घेवून त्यांनीं आजपर्यंत ७००० रोपांचे लागवड करुन त्यांची काळजी घेतली आहे.
आनंदवनाच्या उभारणीत राठोड सहित अनेक कुटुंबीयांची, स्थानिकांची आणि मित्रांची फार मोठी साथ लाभली आहे. गावातील शंकर बर्डे हा तरुण प्राण्यांची शिकार करायचा, पण हाच शंकर आता आनंदवनची काळजी घेत आहे. ‘आनंदवन’ जवळ राहत असणारे शेतकरी शिवाजी शिदोरे यांची उन्हाळ्यात रोपांना पाणी देण्यासाठी खूप मदत झाली, त्यांनी स्वतःच्या विहिरीतील पाणी उपलब्ध करुन दिले.
आनंदवनच्या उभारणीत मित्रांचे सहकार्य आणि मार्गदर्शन फार मोठं आहे. बालानंद परिवारातील सदस्य कायम आनंदवनला आपलं कुटुंब मानत आले आहेत. या परिवारातील प्रत्येक सदस्य हा झाडांविषयी आणि सामाजिक जाणिवांविषयी खुप संवेदननशील आहे. सूर्यकांत काळोखे , लहू बोराटे, राकेश पवार, गणेश कांबळे, तुकाराम भगत, युवराज जगताप, सुधाकर ढाकणे, शाम शिरसाट, प्राणजित बोरसे, विनायक सरसे, रवींद्र गोल्हार, नारायण मंगलारम, सचिन चव्हाण व संतराम साबळे अश्या अनेक मित्रांची साथ आनंदवनाला लाभली आहे, ही मंडळी वर्षभर आनंदवनमध्ये राबतात.
निसर्गाची आवड असणारे अनेक व्यक्ती आनंदवनशी जोडले गेले आहेत. आनंदवनाचा मुख्य हेतू हा निसर्गाविषयी समाजामध्ये जाणीव जागृती व्हावी आणि वन्यप्राण्याना हक्काचं घर मिळाव हा हेतू आहे. याच उपक्रमाची विस्तृतपणे माहिती आता युवालेखक -दिग्दर्शक आशिष निनगुरकर यांच्या ‘झाड-माणसं’ या माहितीपटातून जागतिक पटलावर आपल्या भेटीला येणार आहे. याच पोस्टरचे अनावरण ‘आनंदवन’ महोत्सवात दिग्गज मान्यवरांच्या हस्ते झाले.
या माहितीपटाचे लेखन- दिग्दर्शन आशिष निनगुरकर यांनी केले असून स्वप्नील जाधव यांनी पोस्टर डिझाईन केले आहे. या माहितीपटाच्या उत्तम निर्मितीसाठी प्रदीप कडू, अशोक व्यवहारे व सिद्धेश दळवी आदी टीम कार्यरत आहे. संवेदनशील युवालेखक -दिग्दर्शक आशिष निनगुरकर कायमच नवाकोरा विषय घेऊन हटके काहीतरी देण्याचा प्रयत्न करतात.आजवर त्यांनी लिहिलेले पुस्तके, लघुपट व माहितीपट यांचा विविध स्तरावर गौरव करण्यात आला आहे.
झाडांच्या गर्दीत माणूसपणाचा मेळा उभे करणाऱ्या वृक्षमित्रांची माहिती या माहितीपटामुळे जागतिक पातळीवर जाईल व अनेकांना आजच्या काळात वृक्षांचे महत्व कळेल असे वाटते. या माहितीपटासाठी सर्पराज्ञी वन्यजीव पूर्ववसन केंद्र, तागडगाव, बालानंद परिवार, पर्यावरण संवर्धन- संरक्षण चळवळ, सुवर्णयुग मंडळ – पाथर्डी व वन व्यवस्थापन समिती सदगुरुवाडी आदींचे विशेष सहकार्य लाभणार आहे. आशिष यांच्या ‘झाड-माणसं’ या माहितीपटातून ‘आनंदवन’ उपक्रम व या वृक्षमित्रांची माहिती विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरील फेस्टिवलमध्ये नोंद घेतली जाईल. त्यानिमित्ताने जगाच्या कानाकोपऱ्यात ‘आनंदवन’ उपक्रम रसिकप्रिय ठरेल व त्यातून झाडांबद्दलची माणुसकी निर्माण होईल हा सकारात्मक आशावाद वाटतो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.