December 24, 2025
Mumbai political battle intensifies ahead of BMC elections with BJP and Thackeray brothers in direct confrontation
Home » रात्र वैऱ्याची आहे, जागा हो…
सत्ता संघर्ष

रात्र वैऱ्याची आहे, जागा हो…

मुंबई कॉलिंग –

भाजपच्या दैनंदिन टीकेचा रोख मातोश्रीवर दिसतोय. भाजपचे विधानसभेत सर्वाधिक आमदार असताना उध्दव यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करून भाजपच्या पाठित खंजीर खुपसला, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदापासून रोखले व स्वत:च्या मस्तकावर मुख्यमंत्रीपदाचा मुकूट चढवला ही घटना भाजप व देवाभाऊंना मोठी अवमान करणारी होती. त्याचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेत बंडाच्या नावाखाली मोठी तोडफोड झाली.

डॉ. सुकृत खांडेकर

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण – डोंबिवली, मिरा- भायंदर, वसई –विरार, उल्हासनगर, भिवंडी – निजामपूर, पनवेल, पुणे, पिंपरी – चिंचवड, नाशिक, संभाजीनगर, नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव, सांगली- मिरज, कोल्हापूर, परभणी, नांदेडसह राज्यातील २९ महापालिकांसाठी येत्या पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मुंबई महापालिकेचा कारभार गेले चार वर्ष प्रशासकांच्या ताब्यात होता. अन्य महापालिकांमधे चार ते सात वर्षे निवडणुकच झाली नाही. सरकारची अनिच्छा आणि न्यायालयात तारीख पे तारीख या चक्रात महापालिका निवडणुकींना वेळच मिळाला नाही. दैनंदिन नागरी समस्या सोडविण्यासाठी जनतेला आपल्या वॉर्डात आपला हक्काचा नगरसेवक आवश्यक आहे. पण निवडून आल्यावर आपल्या शहराचे नियोजन आणि विकासाचा आराखडा काय आहे, यावर कोणी चर्चा करताना दिसत नाही. जागा वाटप आणि फोडाफोडी ही मालिका चालूच आहे.

निवडून आणायचे त्यापेक्षा कोणाला पाडायचे, याचीच चर्चा अधिक ऐकायला मिळते. नगर परिषदांच्या व पंचायतींच्या निवडणुकीत पैशाचा जो खेळ झाला तोच पुन्हा महापालिकांच्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. नोटाबंदी झाल्यावरही पंचवीस- पन्नास लाखाच्या थैल्या कशा येतात याचे गूढ कायम आहे. विधानसभा निवडणुकीपेक्षा फार मोठा पैशाचा खेळ महापालिका निवडणुकीत बघायला मिळेल. सत्ताधारी पक्षांनी तर त्यासाठी कंबर कसली आहे. साम दाम दंड भेद मार्गाचा वापर करून राज्यातील सर्व महापालिकांवर सत्ता काबीज कशी करता येईल यासाठी राज्यात मोठा जुगार खेळला जाणार आहे.

यावर्षी मुंबई महापालिकेचे बजेट ७६ हजार कोटींचे आहे. पुढील वर्षी ते ९० हजार कोटींचे होण्याची शक्यता आहे. म्हणूनच देशातील सर्वात श्रीमंत व प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या या महापालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी भाजपा आणि शिवसेना ( शिंदे ) विरूध्द उबाठा सेना आणि मनसे अशी जबर शर्यत लागली आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे विरूध्द उद्धव ठाकरे व राज ठाकरे असा अटीतटीचा संघर्ष या निवडणुकीत बघायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा ही भाजपाची मोठी शक्ति आहे. तुलनेने भाजपाकडे धनशक्ती व कार्यकर्त्यांची फौज मोठी आहे. भाजपकडे आयटी सेल दणकट आहे. निवडणूक व्यवस्थापनात भाजपा आघाडीवर आहे. मुंबईत २२७ वॉर्ड असून १ कोटी ३ लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.

ठाकरे बंधुंच्या पक्षाकडे आज कुठेच सत्ता नाही. भाजपची राज्यात, केंद्रात आणि दिड डझन राज्यात सत्ता आहे. त्यामुळे भाजपाकडे साधनसामुग्री प्रचंड आहे. यापुर्वी भाजपा व ठाकरेंच्या शिवसेनेने युती करून मुंबई महापालिकेत पंचवीस वर्षे सत्ता उपभोगली. आता हेच दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत. मुंबईसह अन्य महापालिकांमधेही उबाठा सेना व मनसे यांना पराभूत करण्यासाठी भाजपाने सर्वस्व पणाला लावले आहे. उध्दव ठाकरे व राज ठाकरे हे अगोदर भाजपाचे चांगले मित्र होते. आता भाजपा आणि शिवसेना विरूध्द ठाकरे बंधू अशी राजकीय लढाई संपूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळते आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून ठाकरे ब्रँडचा मिडियातून मोठा गवगवा होत आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे आपणच वारसदार म्हणून एकनाथ शिंदे गेली साडेतीन वर्षे दावा करीत आहेत, पण या निवडणुकीत उद्धव ठाकरे व राज ठाकरे हेच शिवसेनाप्रमुखांचे खरे वारसदार आहेत असे चित्र त्यांच्या अनुयायांकडून रंगवले जात आहे. मुंबई महपालिका हा ठाकरेंच्या शिवसेनेचा तब्बल पंचवीस वर्षे ऑक्सिजन होता. उबाठा सेनेचा ऑक्सिजन कायमचा तोडण्याची भाजपाने रणनिती आखली आहे. साडेतीन वर्षापूर्वी ठाकरेंची शिवसेना फोडण्यात भाजपला यश मिळाले, शिवसेनेचे दिग्गज व धनवान नेते भाजपबरोबर आले व सत्तेत सहभगी झाले. पन्नास खोके, एकदम ओके, या घोषणेने महाराष्ट्र ढवळून निघाला. सत्ता नसल्यामुळे व पक्षात मोठी फूट पडल्याने भाजपला कडाडून विरोध करण्याची शक्ति आज तरी उबाठा सेनेकडे उरलेली नाही. भाजपकडून आपला पक्ष खच्ची करण्याचे प्रयत्न होत आहेत हे उद्धव व राज ठाकरे या दोन्ही बंधुंच्या लक्षात आले. स्वत:च्या आणि पक्षाच्या अस्तित्वासाठी आणि राज्यात विरोधी पक्षाची पोकळी भरून काढण्यासाठी एकत्र येण्याची हीच वेळ आहे, याची जाणीव ठाकरे बंधुंना झाली आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या हिंदीच्या सक्तिच्या निमित्ताने जुलै २०२५ मधे ठाकरे बंधु प्रथम एकत्र आले. तेव्हापासून ते सातत्याने एकमेकांच्या संपर्कात आहेत.

महापालिका निवडणुकीत मुंबई महानगर प्रदेशात भाजपचे टार्गेट उबाठा सेना आहे. मनसेची भाजपला भिती वाटत नाही. एकनाथ शिदेंची शिवसेना लक्ष्मण रेषा ओलांडणार नाही, याची भाजपला खात्री आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमागे चौकशा, नोटीसा व पोलीस कारवाईंचा ससेमिरा लागला आहे. धनंजय मुंडेंनंतर माणिकराव कोकाटे या राष्ट्रवादीच्या दुसऱ्या मंत्र्याची विकेट पडली आहे. नबाब मलिकांचे निमित्त करून भाजपने राष्ट्रवादीला दूर सारले आहे. काँग्रेस पक्ष तर गोंधळलेल्या मन:स्थितित आहे. आपल्या पक्षाचे भवितव्य काय हे शरद पवारांनाही आज सांगणे कठीण आहे. देवाभाऊ व एकनाथभाई या जोडीपुढे मुंबईत राज्यात लढणारा नेता कोण आहे ? आमदारांच्या तोडफोडीनंतर महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल झाला असून त्या चिखलात सर्वत्र कमळ फुलविण्याची भाजपला घाई झाली आहे.

भाजपच्या दैनंदिन टीकेचा रोख मातोश्रीवर दिसतोय. भाजपचे विधानसभेत सर्वाधिक आमदार असताना उध्दव यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करून भाजपच्या पाठित खंजीर खुपसला, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदापासून रोखले व स्वत:च्या मस्तकावर मुख्यमंत्रीपदाचा मुकूट चढवला ही घटना भाजप व देवाभाऊंना मोठी अवमान करणारी होती. त्याचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेत बंडाच्या नावाखाली मोठी तोडफोड झाली. अडिच वर्षांत उध्दव यांचे सरकार कोसळलेच पण आता त्यांना मुंबई महापालिकेत वाट्टेल ते करून रोखण्याचा भाजपने चंग बांधला आहे. आमची भाजपा, तुमची भाजपा, सर्वांची भाजपा, मुंबई महापालिकेत भाजपाच असे फलक संपूर्ण मुंबईत झळकले आहेत. भाजपाचा सप्टेंबर महिन्यात मुंबईत मेळावा झाला. या मेळाव्यात मुंबई महापालिकेत उबाठा सेना सत्तेवर आली तर मुंबईचा महापौर कोणी तर खान ( मुस्लिम ) होईल, अशी भिती मुंबईकरांना दाखविण्यात आली. उबाठा सेनेची मदार हिंदुंवर नव्हे तर मुस्लिम मतदारांवर आहे असे भाजपा ठसवून सांगत आहे.

महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी शर्यतीत सर्वच राजकीय पक्ष आहेत. नागरिकांच्या दैनंदिन समस्यांविषयी चर्चा करायला कोणाला फुरसत नाही. महापालिकेच्या तिजोरीवर हात मारायला कसा मिळेल आणि ठेकेदारांच्या टक्केवारीतून आपले कोटकल्याण कसे साधता होईल यासाठी ही शर्यत आहे. मुंबईचे सिंगापूर किंवा हॉँगकॉँग करणार असे कोणी बोलत नाही. गेली पंचवीस वर्षे ठाकरेंच्या शिवसेनेने महापालिकेची तिजोरी लुटली असे भाजप रोज सांगतो आहे. पण त्या पंचवीस वर्षात आपणही सत्तेत भागिदार होतो, महापौर शिवसेनेचा तर उपमहापौर आपला होता, याचा भाजपाला विसर पडलेला दिसतोय. सत्तेत युती असताना ठाकरेंच्या शिवसेनेचा भ्रष्टाचार भाजपाला कधी दिसला नाही, त्याविषयी कधी ब्र काढला नाही. आता ठाकरेंशी पंगा घेतल्यानंतर भ्रष्टाचारावरून उबाठा सेनेवर आगपाखड चालू आहे. मराठी माणसा जागा हो, रात्र वैऱ्याची आहे, ही तुझ्या अस्तित्वाची शेवटी लढाई आहे, अशी मुंबईत चौफेर लागलेली पोस्टर्स लक्ष वेधून घेत आहेत. पण एक कोटी मतदारांमधे मराठी मतदार किती आहेत, बावीस की पंचवीस टक्के ? मराठी मतदारही उबाठा सेना, शिवसेना, भाजपा, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा, वंचित बहुजन, रिपब्लिकन अशा सर्व पक्षात विभागलेला आहे. केवळ मराठी मतदारांना भावनिक आवाहन करून निवडणुका जिंकण्याचे दिवस कधीच संपले आहेत.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

भाजप जिंकलीच कशी ? समजवण्याचा विश्लेषणात्मक प्रयत्न

देवाभाऊंचा बडगा…

चर्चा अजित पवारांच्या पक्षाची…

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading