April 14, 2024
Nagkinnari Book review by Dr P Vittal
Home » भयचकित करणारी विस्मयकारक कहाणी – नागकिन्नरी
मुक्त संवाद

भयचकित करणारी विस्मयकारक कहाणी – नागकिन्नरी

कोणताही लेखक जगण्याच्या असाधारण तत्त्वाशी संघर्ष करत असतो. या अस्वस्थतेतूनच तो अपरिचित, अविश्वसनीय अशा सामाजिक आदिमतेचा, धारणांचा शोध घेत असतो. लेखकाचे अनुभवक्षेत्र आणि लोकमानसातील त्याचा वावर जितका व्यापक असेल तितकीच त्याची निर्मिती आत्यंतिक प्रभावी आणि जिवंत ठरते. किशोर तरवडे यांची ‘नागकिन्नरी’ ही कादंबरी वाचकांना केवळ अशा जिवंतपणाचाच नव्हे; तर गूढ, गहन आणि रहस्यमय अशा अनुभवाचा थरारक अनुभव देते. भयचकित करणारी ही एक विस्मयकारक कहाणी आहे. या कादंबरीत जे घडतं, ते वाचून आपण अक्षरशः थक्क होतो.

दुःख, विवंचना, प्रतारणा आणि क्लेशासह शापित आयुष्याचे शल्य घेऊन मुक्तिच्या शोधात निघालेले नायक – नायिका एका अभूतपूर्व दुनियेचा प्रवास घडवून आणतात. ही केवळ ‘नागसेन’ आणि ‘नागनंदा’ यांच्या मिलनाची गोष्ट नाही; तर किन्नरांच्या विफल, वांझ आयुष्याची ही व्याकूळकथा आहे. लिंगभेदावरून केला जाणारा पक्षपात असो की, सामाजिकदृष्ट्या निषिद्ध (टॅब्यू) समजला जाणारा समलैंगिक व्यवहार असो, अथवा पुरुषसत्ताक प्रवृत्तीने बहिष्कृत केलेला आणि आत्मनाशाच्या उंबरठ्यावर उभा असलेला एलजीबीटीक्यू समाज असो- सामूहिक अभिशाप घेऊन जगणाऱ्या समूहाची वेदना लेखकाने आगळ्यावेगळ्या कल्पनाबंधातून साकारली आहे.

‘पाताळ आणि पृथ्वी’ अशा दोन्ही लोकात घडणारी आणि पूर्वजन्माचे गुपित रहस्यमयरित्या उलगडून दाखवणारी ही कथा काळ आणि प्रवृत्तीच्या प्राचीन आदिबंधाचे वेधक दर्शन घडवते. भूतकाळ आणि वर्तमानकाळाच्या असाधारण संयोगातून प्रेमभावनेचे प्राणतत्त्व विलक्षण पद्धतीने लेखक साकारतो. शरीर मनाच्या आदिम भाषेचा एक अपूर्व असा सांकेतिक अनुभव देणारी ही कादंबरी समकाळातील एक लक्षणीय कलाकृती आहे.

पुस्तकाचे नाव – नागकिन्नरी
लेखक : किशोर तरवडे
प्रकाशक – मैत्री पब्लिकेशन
किंमत : 350/-₹
पुस्तकासाठी संपर्क – सहित वितरण 9960374739, 9867752280, 9996399397

Related posts

भावी काळात शेतीचे महत्त्व वाढणार

शेतीभान देणारे संमेलनाध्यक्ष अमर हबीब

नामरुपाचा विस्तार…

Leave a Comment