April 19, 2024
win your body fort article by rajendra ghorpadewin your body fort article by rajendra ghorpade
Home » असा जिंका देहाचा किल्ला…
विश्वाचे आर्त

असा जिंका देहाचा किल्ला…

तयाचा देहदुर्ग हा थारा । मोडूनि घेतला तो वीरा ।
आणि बळ हा दुसरा । मारिला वैरी ।। १०५२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – हे वीरा अर्जुना, देहरूपी किल्ला हा त्या देहाहंकाराचा आश्रय होय, त्याचा पाडाव करून त्याने तो काबीज केला. विचाराने देहाचा निरास केला आणि कामादिरागाचे सामर्थ्य हा दुसरा शत्रू मारला.

किल्ल्यांचे विविध प्रकार आहेत. जलदुर्ग हे समुद्रातील किल्ले, डोंगरमाथ्यावर असणारे गिरीदुर्ग, जमिनीवर असणारे भुईकोट किंवा स्थलदुर्ग, जंगलामध्ये असणारे वनदुर्ग असे विविध प्रकार आहेत. प्रत्येक किल्ल्यांचे वैशिष्ट्य वेगळे आहे. शत्रूपासून बचाव करण्यासाठी उत्तम ठिकाण म्हणून किल्ल्याकडे पाहीले जाते. सुरक्षेच्या दृष्टीने त्यामध्ये रचनाही करण्यात आलेली असते. शत्रूने किल्ल्याला वेढा दिला तर त्यावर मात कशी करायची ? वेळप्रसंगी बाहेर पडण्यासाठी किल्ल्यामध्ये चोरवाटाही असतात. चोख सुरक्षा व्यवस्थेसह तट, बुरजांची भक्कमताही महत्त्वाची असते. आक्रमणाला सडेतोड उत्तर देण्यासाठी या किल्ल्यांची बांधणी मजबूत केलेली असते. एकंदरीत पाहाता शत्रूपासून बचाव करण्यासाठीची ही रचना असते.

असे हे भक्कम किल्ले जिंकण्यासाठी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करणे फायद्याचे ठरते. यासाठी किल्ल्यांचा सर्वांगीन अभ्यास करावा लागतो. किल्ल्यावर कोणत्या सुविधा आहेत. पाण्याची व्यवस्था कशी आहे ? धान्य पुरवठा आदी साहित्य कोठून येते ? किती प्रमाणात येते ? सैन्यबळ किती आहे ? हे सर्व विचारात घेऊन आपण किल्ल्याला वेढा टाकणे गरजेचे असते. किल्ल्यावर जाणारी रसद तोडली तर किल्ल्यावरील लोकांना जगणे अशक्य होऊ शकते ? सैन्यबळाचा वापर न करता शक्तीपेक्षा युक्तीने असे किल्ले जिंकले जातात. छोट्या छोट्या युक्त्याच अशा प्रसंगी उपयोगी ठरतात. शत्रूशी न लढता कोणतीही जीवितहानी न करता युक्तीने किल्ले जिंकले जातात.

अशाच पद्धतीने देहाच्या किल्ल्यावरही विजय मिळवणे शक्य आहे. देह हा एक किल्ला आहे असे समजून त्याचा अभ्यास करायला हवा. या देहाला कोणत्याही यातना न देता, कोणताही त्रास न देता या देहावर कसा विजय मिळवणे शक्य आहे याचा अभ्यास, विचार आपण करायला हवा. दुःख न देता सुखाने देहावर विजय मिळवण्याचा सोपा मार्ग जाणून घ्यायला हवा. देहातील अहंकाराला असेच हरवून आपण देहाच्या किल्ल्यावर विजय संपादन करायला हवा. देहाला मीपणाचा अहंकार आहे. पण हा मी कोण आहे याचा अभ्यास आपण करायला हवा. याची अनुभुती आपण घ्यायला हवी. मी कोण आहे ? याची ओळख करून घेऊन देहाचा अहंकार उतरवू शकतो. मीची ओळख पटल्यानंतर आत्मज्ञानाचा झेंडा देहाच्या किल्ल्यावर फडकवायला हवा.

युद्धामध्ये दोघांचेही नुकसान होते. हे टाळायचे असेल तर युद्ध न करता शत्रूचा पराभव कसा करता येईल याचा विचार करायला हवा. देहाच्या किल्ल्याचा पराभव करण्यासाठी देहासोबत लढत राहीलो तर देहावर विजय संपादण करणे अवघड होते. देहाला त्रास देऊन, यातना करून स्वतःला त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नाही. देहातील कामवासना, क्रोध, विविध विषय हे घालवणे गरजेचे आहे. योगाने शरीराला त्रास होतो. या सर्वावर विजय अगदी सहज मिळवता येतो. फक्त अवधान असायला हवे. मनात आलेला राग विसरायचे. काम, क्रोध, लोभ, विषय, विकार, वासना निर्माणच होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. राग आला तरी तो विसरून जायचे. त्याला फारसे महत्त्व द्यायचे नाही. विषय, वासना आल्या तर त्या विचारापासून दूर जायचे. मन अन्य कामात गुंतवायचे. यातून आपोआपच त्यावर मात केली जाऊ शकते. राग किंवा वासना घालवायची असेल तर मन लगेचच इतरत्र गुंतवावे. रागाच्या ठिकाणाहून बाहेर जाऊन मन मोकळे करून घ्यावे. अर्थातच अशाने रागावर मात केली जाऊ शकते. अन् त्यानंतर लगेचच मन साधनेवर केंद्रीत केले तर मनाला आनंद मिळू शकतो. यातूनच मग देहाच्या किल्ल्यावर विजय मिळतो.

Related posts

भू संपादन कायद्यातील दुरुस्ती शेतकरी हिताची ?

माणूस मोठा जिद्दीचा…

चांगली निर्यात क्षमता असलेल्या 50 कृषी उत्पादनांची सारणीः अपेडा

Leave a Comment