कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा जगभर बोलबाला होत आहे. त्याच्या आधारावर सुरू झालेली चॅट जीपीटी सारखी आयुधे आपल्या हातात आली आहेत. जगभरातील तरुणाईला त्याची भुरळ पडलेली असल्याने जगभरात १० कोटींपेक्षा जास्त त्याचे वापरकर्ते आहेत. अनेकांनी त्याच्या शिकवण्यांची “दुकाने ” थाटली आहेत. मात्र अशा आयुधांमुळे (टूल्स) मूलभूत संशोधनाच्या नितीमत्तेलाच सुरुंग लागण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. या धोक्याचा हा धांडोळा.
प्रा. नंदकुमार काकिर्डे, पुणे
जेष्ठ अर्थविषयक पत्रकार
जगभरातील सर्व विद्यापीठे, शिक्षण संस्थांमध्ये सर्वोच्च स्थान दिले जाते ते विविध प्रकारच्या शैक्षणिक मूलभूत संशोधनाला. कोणत्याही क्षेत्रातील संशोधनाला सातत्याने नैतिकता, पावित्र्य व प्रामाणिकपणाची बैठक असणे अनिवार्य असते. त्यामुळेच जगभरातील संशोधकांनी कष्टपूर्वक आणि प्रामाणिकपणे संशोधन केलेले असेल, त्यांचे निष्कर्ष सिद्ध केलेले असतील तर त्यांना नोबेल सारखी पारितोषिके देऊन त्यांचा सन्मान केला जातो. या संशोधनाचा गाभा असतो नीतिमत्ता व कुशाग्रतेचा प्रामाणिकपणा. समाज विज्ञान क्षेत्रात आज सर्व देशांमध्ये प्रचंड मूलभूत संशोधन प्रामाणिकपणे केले जाते. मात्र ” चॅट जीपीटी” सारख्या विविध आयुधांमुळे शैक्षणिक क्षेत्रातील संशोधन, शिक्षण, शिष्यवृत्ती व सर्वसाधारण निष्पक्षता यांनाच धाब्यावर बसवले जाण्याची भीती जगातील शिक्षणतज्ञ व अभ्यासकांमध्ये निर्माण झाली आहे.
या मुलभूत संशोधनाला छेद देणारी यंत्रणा या चॅट जीपीटी सारख्या आयुधांच्या माध्यमातून उभी रहात आहे असे जाणवायला लागले आहे. चॅट जीपीटी सारख्या सुविधा काय व कोणत्या प्रकारचे काम करते हे पाहिले तर अशा सुविधा मुलभूत संशोधनाच्या मुळावरच येतील किंवा कसे याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये इंटरनेटचा शिरकाव झाल्यानंतर सर्व देशांच्या भौगोलिक सीमारेषा पुसल्या गेलेल्या आहेत. जगभरातील कोणत्याही विषयाची तपशीलवार माहिती हवी असेल तर गेली अनेक वर्षे गुगल क्रोम, इंटरनेट एक्सप्लोरर, मोझीला फायरफॉक्स, सफारी, ऑपेरा, कॉंकरर व लिनिक्स सारख्या शोध इंजिनांच्या ( ज्याला सर्च इंजिन म्हणतात ) सुविधांच्या माध्यमातून मिळते. त्याचप्रमाणे विकिपीडिया, एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, स्कॉलर पीडिया, इन्फो प्लीज, फॅक्ट मॉन्स्टर, डिलिशान पीडिया, ऑनलाइन वर्ल्ड बुक यांचा माहितीचा अजस्त्र खजीना आपल्यासमोर मुक्तपणे खुला आहे. हे सर्व माहितीचे स्त्रोत गेली वीस ते तीस वर्षे मुक्तपणे जगभर वापरले जात आहेत. अनेक मूलभूत संशोधनाला त्याचा आजवर चांगला उपयोगही झाला असेल. मात्र या सर्व स्त्रोतांपेक्षा वेगळ्या प्रकारची “चॅट जी पी टी” सारखी मायक्रोसोफ्ट बिंग, गुगल बार्ड एआय, चॅट सॉनिक, हगिंग चॅट, जस्पर चॅट, परप्लेक्सिटी एआय, पीआय- यूवर पर्सनल चॅट, ॲमेझॉन कोडव्हिस्पर, डायलॉ जीपीटी, अशी १८ ते २० आयुधे बाजारात आल्यामुळे मोठ्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत.
या विविध आयुधांचा प्रारंभ अगदी गेल्या काही वर्षात झालेला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात काम करणारी “ओपन एआय” नावाची कंपनी आहे. त्यांनी 2018 मध्ये चॅट-जीपीटी हे आयुध (टूल) विकसित केले. त्यात सतत बदल होत जाऊन सध्याचे चवथे रूप बाजारात आले आहे. त्यासाठी लार्ज लैंग्वेज मॉडेल(एल एल एम) चा वापर केला जातो. हे आयुध वापरणाऱ्या व्यक्तीला जगातील कोणतीही माहिती त्याला हव्या त्या स्वरूपात म्हणजे मजकूर ( टेक्स्ट), इमेजेस म्हणजे प्रतिमा, व्हिडिओज, सिम्युलेशन,कोड या उपलब्ध होते. त्यामुळे वापरकर्त्याला कोणताही निबंध, संशोधनात्मक लेख, एखादी काल्पनिक कथा आणि अगदी गणिताचा वापर केलेले कार्यपत्रक (वर्कशीट) सुद्धा त्यात मिळू शकतात. योग्य शब्दांचा म्हणजे की-वर्ड चा वापर केला तर अक्षरशः काही सेकंदामध्ये अत्यंत अचूक व कार्यक्षम रीतीने कोणत्याही वापरकर्त्याला त्याची सर्व माहिती उपलब्ध होते. त्यात अनेक वेळा चुकीची माहिती दिली जाते. तरीही सध्याच्या चॅट जीपीटी चा वेग, त्याचा आवाका व कार्यक्षमता ही खरोखरच थक्क करणारी आहे.
त्यामुळेच या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शैक्षणिक पद्धती, चित्रपट क्षेत्र, तंत्रज्ञान व बाजारपेठ या सर्व क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर होत आहे. जगभरातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या व्यापार उद्योग, विस्तारासाठी त्याचा वापर करायला लागले आहेत. शिक्षण क्षेत्रात तर स्वयंचलित शिक्षक निर्माण करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर याचा वापर केलेल्या यंत्र मानवाने कायद्याचीच नव्हे तर एम बी ए ची परीक्षा ही उत्तीर्ण होऊन दाखवले आहे. त्यामुळे या सगळ्या माहितीचा किंवा त्याच्या स्त्रोताचा वापर करून जर कोणी संशोधन केले तर त्याला मूलभूत संशोधन म्हणता येईल किंवा कसे कसे याबाबत सर्वत्र सांशकता निर्माण होत आहे. किंबहुना ज्याला बौद्धिक संपदा कायदा म्हणतात त्यातील मुद्रणाधिकाराचा भंग म्हणजे वाङ्मय चौर्याचाच प्रकार होत आहे.
एखाद्या संशोधकाने लिहिलेली माहिती ही ओरिजिनल म्हणजे मूळ स्वरूपाची आहे का कोठून चोरी करून लिहिलेली आहे हे कळण्यास कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. किंबहुना चॅट जी पी टी हे असे हत्यार आहे की ते वापरकर्त्याच्या मनाचा वेध किंवा ठाव घेऊन त्याला काय करायचे आहे, त्याला हवे आहे त्याप्रमाणे ‘ सोप्या भाषेत सर्व लिखाण उपलब्ध करून देते. त्याला विविध लिखाण पद्धती येतात. त्यामुळे कोणी चोऱ्यामाऱ्या करून हे संशोधन केले आहे हे सिद्ध करणे ही अवघड आहे. आज कोणतीही घटना “फॅक्ट चेक” द्वारे खोटी किंवा खरी आहे किंवा कसे हे पाहता येते. परंतु एखाद्याने केलेले संशोधन हे चोरी करून लिहिलेले आहे किंवा कसे तपासण्यासाठी सक्षम यंत्रणा नाही. एक प्रकारे चॅट जी पी टी सारख्या साधनांनी त्यावर मात केलेली आहे.
जगभरात आज कोणीही संशोधन केले तर त्याच्यावर विश्वासार्हतेचे प्रश्नचिन्ह निर्माण करता येऊ शकते. एक प्रकारचे अविश्वासाचे वातावरण संशोधन शिक्षण क्षेत्रात निर्माण होईल अशी भीती वाटत आहे. अमेरिकेसह जगभरातील कोणत्याही देशांमध्ये या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांना सामोरे जाण्याची अजिबात क्षमता नाही. फ्रान्स, अमेरिका या दोन्ही देशांनी संशोधन कार्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यावर कडक बंधने घातलेली आहेत. मात्र कोणीही गांभीर्याने त्याचे पालन करत नाहीत. यातील गमतीचा भाग म्हणजे गेल्या एक-दोन वर्षात अनेक संशोधकांनी त्यांच्या संशोधन प्रबंधामध्ये चॅट जीपीटीचा वापर करून सहलेखन केले असल्याचे नमूद केलेले आहे. नेचर ग्रुप सारख्यांनी तर सहलेखक चॅट जीपीटी असेल तर त्याच्यावर बंदी घालून हजारो लेखांवर प्रसिद्धीची बंदी घातलेली आहे. काही संस्थांनी तर या माहितीचा वापर करून अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असेल किंवा वैज्ञानिक निष्कर्ष काढणार असेल तर त्यावर बंदी घातलेली आहे.
खरे तर एका अर्थाने संशोधन क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ही फार मोठी क्रांतीकारी घटना आहे. परंतु मूलभूत संशोधनाची नीतिमत्ता प्रामाणिकपणा यांच्या निकषांवर या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहकार्याने काढलेले निष्कर्ष हे त्या संशोधनाचा शैक्षणिक दर्जा अजिबात उंचावणारे नाहीत. त्यामुळे माणसाने बुद्धिमत्ता वापरून केलेले लिखाण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून निर्माण झालेले लिखाण याच्यातील फरक कोणाच्याही लक्षात येईलच असे अजिबात नाही. ते शोधून काढण्याची कोणतीही खात्रीलायक यंत्रणा आज तरी जगभरात नाही वस्तुस्थिती आहे. मात्र जगभरातील शिक्षण तज्ञांनी व बहुराष्ट्रीय कंपन्यांनी यासाठी लवकरात लवकर एकत्र येऊन यावर कार्यक्षम तोडगा काढण्याची गरज आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.