मध्ययुगातील सामाजिक कल्पनांनी व्यापलेल्या कोकणातील ‘देवरुख’ सारख्या गावातील स्त्रीचे हे प्रेरक चरित्र आहे. सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, ताराबाई मोडक याच परंपरेतील स्वयंप्रकाशित स्त्रीची ही कहाणी आहे. स्वत:च्या आत्मबळावर उत्तुंग कार्य उभं करणाऱ्या इंदिराबाई हळबे यांची हृदयस्पर्शी गाथा म्हणजे अभिजित हेगशेट्ये यांनी लिहिलेले ‘देवरुखच्या सावित्रीबाई’ हे पुस्तक होय. या पुस्तकाचा परिचय…
‘देवरुखच्या सावित्रीबाई’ हे चरित्रपर पुस्तक अभिजित हेगशेट्ये यांनी लिहिलेले आहे. मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या चरित्रातील देवरुखच्या सावित्रीबाई या मूळच्या इंदिराबाई हळबे आहेत. या व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या कर्तृत्वामुळे ‘सावित्रीबाई’ असे म्हटलेले आहे. सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, ताराबाई मोडक यांच्या परंपरेतल्या आणि संपूर्ण स्वयंप्रकाशित, स्वयंप्रेरित असलेल्या इंदिराबाईंनी स्वतःच्या आत्मबळावर जे विश्व उभे केले आहे ते पाहिल्यानंतर त्यांना सावित्रीबाई म्हणणे अगदी सयुक्तिक आहे. हे चरित्र अभिजित हेगशेट्ये यांनी हळबे मावशीच्या कार्यावरील अतीव निष्ठेतून आणि प्रामाणिकपणातून लिहिले आहे.
आपल्या मनोगतात ते म्हणतात, ‘देवरुखच्या सावित्रीबाई या पुस्तकाची निर्मिती माझ्याकडून झाली. देवरुखच्या ‘मातृमंदिर’ चा परिसर बहुधा माझ्याच प्रतीक्षेत होता की काय, ज्याने माझ्याकडून मावशींची कथा लिहून घेतली. मावशींच्या कामाचा चढता आलेख शब्दबद्ध करण्याची ऊर्मी, ऊर्जा या वास्तूने आणि मावशींच्या अचंबित करणाऱ्या अफाट कामांनी मला दिली, हे मी माझे भाग्य समजतो. यातून हळबे मावशींबद्दल आणि मातृमंदिराबद्दल लेखकाची प्रचंड निष्ठा आपल्याला यातून दिसून येते.
या पुस्तकात त्यांचा सहवास लाभलेल्या आणि त्यांच्या कार्याची माहिती असलेल्या काही महनीय लोकांनी आपले अभिप्रायही व्यक्त केलेले आहेत.
प्रख्यात भाषा शास्त्रज्ञ डॉ. गणेश देवी यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. प्रस्तावनेत ते म्हणतात, ‘इंदिरा हळबे यांच्या समाजसेवेची वाटचाल झाली तो काळ मध्ययुगातल्या सामाजिक कल्पनांनी व्यापलेला होता. देवरुखसारख्या गावात राहून एका दीर्घ तपश्चर्येसारखे त्यांनी केलेले काम दिव्य असे आहे. स्वतःच्या असीम आत्मबळावर अफाट काम करणाऱ्या हळबे मावशींच्या जीवनाची ही हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायक कहाणी आहे. अशा प्रकारचे अंत:करण उजळून टाकणारे लिखाण क्वचितच वाचायला मिळते.’ कोकणातल्या ‘देवरुख’ या ठिकाणी गोरगरीब जनतेसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी मातृमंदिरची स्थापना हळबे मावशींनी केली. परिसरातल्या महिला, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येऊ लागले. ७० वर्षांपूर्वी लावलेल्या या रोपट्याचे आज ‘मातृमंदिर हॉस्पिटल’ या मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. हे सर्व महत्कार्य इंदिराबाई हळबे मावशी यांच्या हातून झालेले आहे.
इंदिराबाईंचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील केळ्ये मजगावचा. २५ ऑगस्ट १९१४ रोजी खेर कुटुंबात त्यांचा जन्म झाला. इंदिराबाई हे सासरचे नाव. माहेरचे नाव चंपावती खेर हे होते. खेर कुटुंब हे मूळचं धार्मिक कुटुंब. धर्मातील नियमाप्रमाणे सर्व काही व्हावे यावर त्यांचा कटाक्ष असायचा. चंपावती लहानपणापासूनच निर्भीड आणि तल्लख बुद्धिमत्तेच्या होत्या. अशा या विचक्षण बुद्धिमत्तेच्या मुलीचं लग्न रघुनाथराव हळबे यांच्याशी तेराव्या वर्षीच झालं. रघुनाथराव हळबे हे पुरोगामी विचारांचे होते. पुढे त्यांना दोन अपत्येही झाली. पण दुर्दैवाने लवकरच वारले आणि इंदिराबाईंना पंचविसाव्या वर्षी वैधव्य आले. इंदिराबाई देवरुखला ज्यांच्याकडे राहत होत्या त्या काकासाहेब पंडितांकडे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय तसेच स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित अनेक लोक येत असत. त्यांच्यात विविध विषयांवर चर्चा घडत. त्या इंदिराबाईंना ऐकायला मिळत होत्या. पतिवियोगाच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्यांना या नव्या घडामोडींची मोठीच मदत झाली.
इंदिराबाईंना आपल्या मोठ्या मुलीला, मीनाक्षीला डॉक्टर करायची इच्छा होती. पण तिचा अकालीच मृत्यू झाला. ही घटना इंदिराबाईंच्या आयुष्यात महत्त्वाची आहे. मुलीचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पुढे स्वतः इंदिराबाईंनी नर्सिंगचे शिक्षण घेऊन पूर्ण करायचे त्यांनी ठरवले. त्याच काळात सामाजिक उत्थापनाची, परिवर्तनाची चळवळ साने गुरुजींनी हाती घेतली होती. जातिभेद, अस्पृश्यता या गोष्टींना त्यांचा विरोध होता. दरम्यान वडाळ्याला सेवा दलाचे शिबिर होते. त्यात आठल्ये यांच्या म्हणण्यावरून इंदिराबाईही त्या शिबिरात सहभागी झाल्या. या शिबिरात झालेल्या वैचारिक चर्चेवरून साने गुरुजींच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी रमाबाईंची जीवनकहाणीही त्यांना यादरम्यान आठवली. वडाळ्याच्या शिबिरातून परतल्यानंतर आपणही असंच उपेक्षितांसाठी, वंचित, अन्यायग्रस्त महिलांच्यासाठी, मुलांसाठी काम करावं हा विचार त्यांच्या मनात आला. पुढे तो त्यांचा ध्यास बनला. आणि अशा कामात आपलं उर्वरित आयुष्य झोकून देण्याचा निर्णय त्यांनी पक्का केला…
त्यानंतर इंदिराबाईंनी अत्यंत आत्मविश्वासाने नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केले. इंदिराबाईंनी आपल्या मनाला मोकळी वाट करून दिली आणि त्यांनी तिथेच शपथ घेतली की, नर्सिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आरोग्यसेवेचे काम करेन. या संधीचं मी सोनं करेन असा विश्वास त्यांच्या ठायी होता. त्याची सुरुवात गुरांच्या गोठ्यात दोन कॉट टाकून झाली आणि देवरुखमधल्या पहिल्या आरोग्यसेवा केंद्राचा ‘मातृमंदिर’ या नावाने प्रारंभ केला. धार्मिक प्रभावातून रूढीग्रस्त बनलेल्या समाजात हे काम करणं म्हणजे शिवधनुष्य पेरण्यासारखं होतं. हे त्या जाणून होत्या. पण ‘घेतला वसा सोडणार नाही’ असा त्यांचा ठाम निर्धार होता. २ जानेवारी १९५४ मध्ये इंदिराबाईंच्या मातृमंदिर हॉस्पिटलमध्ये पहिली महिला बाळांत झाली. पण नंतर दहाव्या महिलेच्या बाळंतपणानंतर २० जानेवारी १९५४ रोजी मातृमंदिरचा उद्घाटन सोहळा पार पडला. तेव्हापासून देवरुख पंचक्रोशीतल्या बहुतांश घरातल्या गरोदर स्त्रिया ‘माझे बाळंतपण हळबे मावशींच्या हातूनच व्हावं’ असा आग्रह धरू लागल्या. त्याच वेळी गावातील इतर लोक ही बाई काही संबंध नसताना आपल्या गावात आली आणि आरोग्यसेवेच्या नावाखाली आपला धर्म बुडवायला लागली, असे म्हणू लागले. अशा विरोधी सुरांमुळे काही समाजकंटकांशी त्यांना दोन हात करावे लागले. पण हळबे मावशी डगमगल्या नाहीत.
१९५६ च्या जानेवारी महिन्यात ‘मातृमंदिर देवरुख’ या संस्थेची कायदेशीर नोंदणी करण्यात आली. एक संचालक मंडळ नेमण्यात आले. नंतर मावशीने प्रयोग म्हणून याच संस्थेअंतर्गत बालवाडीचीही सुरुवात केली. त्याचा परिणाम म्हणून परिसरात अनेक ठिकाणी बालवाड्या सुरू करण्यात आल्या. साने गुरुजींचा सेवाभाव आणि कारुण्य ही मावशींच्या कार्यामागची मुख्य प्रेरणा होती. हळूहळू मातृमंदिर अनाथांचं ‘गोकूळ’ होऊन गेलं. पुस्तकात त्याचे अनेक किस्से सांगितले.
गेले आहेत. ते वाचनीय असे आहेत. पुढे त्यांना राज्य शासनाकडून दिला जाणारा’ ‘दलित मित्र’ हा पुरस्कारही दिला गेला. खेड्यातील महिला आणि बालकल्याणाच्या कार्यासाठी श्रीमती इंदिरा हळबे म्हणजे मावशींना ‘जमनालाल बजाज पुरस्कार’ ही मिळाला. रुग्णसेवेपासून, अडलेल्या स्त्रियांच्या बाळंतपणापासून सुरू झालेला हा ध्यास कायम राहिला. नंतर हे हॉस्पिटल निराधारांचं गोकूळ, शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, आय. टी. आय., कृषी केंद्र, शेती व पाणलोट क्षेत्र विकास, महिलांसाठी रोजगार निर्मितीचे प्रयोग, गोकूळमधून शिकून गेलेल्या मुलींचे माहेर तर भारतीय संविधानावर विश्वास ठेवून काम करणाऱ्या परिवर्तनवादी संस्था, संघटना यांचा हक्काचा आधार असा मोठा परीघ व्यापणारा कामाचा विस्तार आणि त्यातून घडणारा, थक्क करणारा एका स्त्रीचा प्रवास या चरित्रातून उलगडत जातो.
आज एकूणच समाज विखुरला जाऊ लागला आहे. त्याला एका धाग्यात गुंफणारं, बांधून ठेवू शकणारं असं काहीच भोवताली नाही. अशा पार्श्वभूमीवर मावशीने उभं केलेल्या कामाचं महत्त्व डोंगराएवढं मोठं आहे. अनेकांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारं आणि आजच्या पिढीला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारं असं हे चरित्र सर्वांनी वाचायलाच हवं असं आहे.
पुस्तकाचे नाव – देवरुखच्या सावित्रीबाई
लेखक – अभिजित हेगशेट्ये
प्रकाशक – मनोविकास प्रकाशन, फ्लॅट ३ ए, चौथा मजला, शक्ती टॉवर, ६७२ नारायण पेठ, लोखंडे तालीमजवळ, पुणे ३० मो. : ८८८८५५०८३७
किंमत – २७० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.