कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात गुऱ्हाळघरे आहेत. साखर कारखान्याला ऊस उत्पादन करणे आणि खास गूळासाठी ऊसाचे उत्पादन करणे यामध्ये खूप अंतर आहे. या उत्पादनातील बारकावे विचारात घेऊन प्रा. अरूण मराठे यांनी हे पुस्तक लिहीले आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
बदलत्या काळात साखर कारखान्यांनी गुळाचे महत्त्व कमी केले आहे. पण आहारातील गुळाचे महत्त्व आजही कायम आहे. गुळाचा वापर कमी झाला असला तरी कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यात आजही हजारो शेतकरी या व्यवसायात कार्यरत आहेत. आजतर गुळाला जगभरातून मागणी आहे. मागणीनुसार गुळाच्या उत्पादनात अनेक मोठे फेरबदल झाले आहेत. नवेतंत्रज्ञान त्यामध्ये आले आहे. पण गुळाचा दर्जा राखण्यात आजही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. रसायनांचा अती वापर, गुळ उत्पादनात साखरेचा वापर या अशा आरोग्यासाठी घातक असणाऱ्या अनेक कारणांनी गुळ उद्योगासमोर आव्हाने उभी राहीली आहेत. हे सर्व विचारात घेऊन प्रा. अरुण मराठे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरेल असे हे व्यापारी गूळ उत्पादन हे पुस्तक लिहीले आहे.
पहिल्याच प्रकरणात त्यांनी गुळाचे आरोग्यदायी महत्त्व सांगितले आहे. रक्ताची शुद्धी, उत्तम पचन क्रिया, थकवा दूर करण्यासाठी ऊर्जा स्त्रोत, सांधेदुखीवर आरामदायी म्हणूनच हाडांचा मित्र, अर्धशिशी थांबते, सर्दी-खोकल्यावर गुणकारी, वजन कमी करण्यासाठी, रक्तक्षय टळतो, लोहाची कमतरता असणाऱ्या स्त्रियांसाठी उपयुक्त, त्वचा व केसाच्या आरोग्यासाठी गुळाचे सेवन हे केले जाते. असे हे बहुगुणी गुळाचे फायदे या प्रकरणात सांगितले आहेत.
कोल्हापुरी गुळ हा भारतात प्रसिद्ध आहे. असा या वैशिष्ट्यपूर्ण गुळाच्या उत्पादनापासून ते बाजारपेठेपर्यंतचा प्रवास दुसऱ्या प्रकरणात मराठे यांनी मांडला आहे. गुळाचे उत्पादन करण्यासाठी ऊस हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. गुळासाठी लागणारे ऊसाचे वाणही वेगळे असते. कृषी विद्यापीठ आणि ऊस संशोधन संस्थेद्वारे कोसी – 671, को -419, को -92005, को – 8014, को – 86032, को – 94052 या वाणांची शिफारस केली आहे. या वाणांसाठी लागणारी जमीन, हवामान, रासायनिक आणि सेंद्रीय खतांचा संतुलित वापर याची माहीती मराठे यांनी या पुस्तकात दिली आहे. उत्तम प्रतीचा गुळ तयार करण्यासाठी उत्तम प्रतीचा रस वापरणे आवश्यक आहे. रसाची प्रत उसाच्या पक्वतेवर अवलंबून असते. या अनुशंगाने ऊसाच्या पक्वतेची लक्षणे यावर एक स्वतत्र प्रकरण या पुस्तकात आहे.
दर्जेदार गुळ निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची अभ्यासपूर्ण माहिती या पुस्तकात दिली आहे. उसासाठी वापरण्यात येणारे चरके हे लाकडी व लोखंडी असत. त्यामधून ५२ ते ६२ टक्केच रस गाळला जायचा. पण आता नव्या पद्धतीच्या चरक्यातून ७० ते ७५ टक्क्यांपर्यत रसाचे गाळप केले जाते. चरके आणि आतील लाटा या लोखंडी असल्याने रसामध्ये हे लोखंड उतरले जाते व याचा परिणाम गुळ काळा पडण्यावर होतो. यासाठी आता क्रोयियमचे वेस्टन असणाऱ्या चरक्याचा वापर केला जात आहे. उसाच्या रसांची गाळणी सुद्धा स्टेनलेसस्टीलची वापरण्याची गरजेची आहेत. अशा या बारीकसारीक गोष्टीची माहिती देऊन गुळाची प्रत कशी उत्तम राखता येते याची माहिती मराठे यांनी दिली आहे.
गुळाची साठवणूक कशी करायला हवी ? साठवणूक काळामध्ये गुळाला पाणी सुटते, बुरशी वाढते, त्यामुळे गुळातील साखरेचे विघटन होते या साठवणुकींच्या समस्यावरही उपाय, तसेच गुळाचे मुल्यसंवर्धन कसे करावे यावर या पुस्तकात माहिती दिली आहे. गुऱ्हाळघरे चालकांना, गूळव्यांना, शेतकऱ्यांना गुळ उत्पादन करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ऊस तोडणीनंतर गुळाचे गाळप किती वेळात करावे ?, गुळ तयार करताना चुन्याचा वापर किती करावा ?, काकवीची साठवण केल्यावर खाली साखर तयार होते, गुळात हैड्रास पावडरचा वापर करावा का ? गुळात होणारी भेसळ कशी रोखायची ? या अशा प्रशांची उत्तर या पुस्तकात देण्यात आली आहेत. यामुळे हे पुस्तक गुळ उत्पादकांसाठी निश्चितच मार्गदर्शक असे आहे.
पुस्तकाचे नाव – व्यापारी गूळ उत्पादन
लेखक – प्रा. अरुण मराठे
प्रकाशक – तेजस प्रकाशन, कोल्हापूर मोबाईल – 9322939040
पृष्ठे – ६४, किंमत – ७५ रुपये