January 26, 2025
Vishal Ingole poem that strengthens the human heart
Home » माणूस मूळे घट्ट करणारा कवितासंग्रह – माझ्या हयातीचा दाखला
मुक्त संवाद

माणूस मूळे घट्ट करणारा कवितासंग्रह – माझ्या हयातीचा दाखला

माणूस मूळे घट्ट करणारी कविता
काळजातून आणि काळजीतून येते ती कविता अशी भूमिका घेऊन लिहिताना कवितेने जगले पाहिजे. जगविले पाहिजे आणि जागविले पाहिजे हा हढनिश्चय ही कविता निर्माणते…

आनंद रंगराज, कोल्हापूर
९४२१२२७९८६

कवि आणि कवितांचा सुकाळ असणाऱ्या या काळात एखादी कविता लिहून झाल्यावर लगेच उपलब्ध समाजमाध्यमांवर पाच-पंचवीस लाईक्सच्या मोहजाळापाई झळकविली जाते. आत्ताच, इथल्या इथे, येता-येता, प्रवासातच ही कविता सूचली. असे म्हणून अनेक ठिकाणी राजरोसपणे अशा कविता सांगितल्याही जातात आशा या उत्कट उथळ प्रकाशनकाळात घाईचा प्रकाशनमोह टाळून ताऊन सुलाखून आलेली कविता म्हणून कवी विशाल इंगोले यांच्या ‘माझ्या हयातीचा दाखला’ या संग्रहाकडे पहावे लागेल.

भूत-भविष्य आणि वर्तमानाचा धांडोळा घेत जाती-माती-नाती अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर आपली निश्चयी निरीक्षणे नोंदविताना कवीची लेखणी तिफण झालेली पहावयास मिळते. व्यवस्थेच्या पडीक जमिनीची उलथापालथ करून मशागत करते. क्रांतीबिजे पेरत रहाते. संस्कृतीच्या वेगवेगळ्या पदरांत विहरताना माणसांच्या पिढ्‌या उकरून काढणाऱ्या या कवीला शस्त्रांच्या धारेखाली, शास्त्रास्त्रांच्या गुलामीत आणि उन्मत्त पैशाच्या टाचेखाली दीन- दुबळ्या, क्षीणानलेल्या माणसांचे थरच्या थर सापडतात तेव्हा आगतिक होत जाणारा हा कवी आणि कविता आतबाहेर ढवळून निघते. आणि म्हणून येणाऱ्या पिढ्‌यांसाठी शस्त्र- शस्त्रांशिवाय स्वतंत्र कवट्यांचा एखादा तरी थर सापडेल एवढेतरी आपण करू हा निस्सीम आशावाद कवी पेरतो. काळजातून आणि काळजीतून येते ती कविता अशी भूमिका घेऊन लिहिताना कवितेने जगले पाहिजे. जगविले पाहिजे आणि जागविले पाहिजे हा हढनिश्चय ही कविता निर्माणते

कोणत्याही कवीची कवितेची कविता ही त्या कवीचे अगर त्याच्या समकालीन कवीसमुहाचे चारित्र्य उजागर करीत असते. कवीचे चारित्र्य उलगडवणाऱ्या, आपला आसपास- भोवताल मुठीत पकडून व्यवस्था विच्छेदन करणाऱ्या जवळपास नऊ कविता या संग्रहात आहेत. या कविता प्रश्नगर्भ निर्माण करतात त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात. या संग्रहामधून विविध पातळ्यांवरच्या निरीक्षण नोंदी या केवळ कागदावर न करता थेट काळ आणि काळजावर होतात असे असले तरी या चारित्र्याशीला एकट्या कवीच्या न रहाता उगवून येण्याची परिभाषा करणाऱ्या प्रत्तेकाच्या होऊन जातात त्यामुळे वाचकाजवळ आल्यानंतर या कविता वाचणाऱ्याच्याही नकळत त्याच्या रक्तात सकारात्मक ऊर्जा भारत राहतात वाचकाच्या अंगी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी ही कविता कोणाच्याही आयुष्यात आल्यावर रक्तात भिनलेली नकारात्मक ग्लानी दूर करण्यास कारण ठरावी एवढी प्रबळ आहे. या कवितांमधून कवी खूप निश्चयी नोंदी करताना आढळतो कवितेचा चश्मा लागल्यापासून उपेक्षीत जगणे अधोरेखीत करणे मला टाळता येत नाही किंबहुनातसे करणे म्हणजे माणसाच्या व एकूण माणूसपणाच्या विरोधात लिहिणे ही भावना बळावताना दिसते.

कवी म्हणतो की, माणूस समानतेत बघायचा असेल तर आपली पावले अजिंठ्याकडे वळली पाहिजेत. अजिंठ्याच्या टेलिस्कोपमधून माणसांना पाहता आले पाहिजे. संत तुकारामांनी जे लिहिले ते भोगले. असा दाखला देऊन. कवी अत्यंतिक जबाबदारीने ‘मी नुसतेच लिहितों’, हे कळायला हवे. अशी नोंद करतो. यावरून कवी आपल्या भोवतालाकडे आपल्यासह समग्रपणे पाहताना दिसून येते. कवितेची दिंडी खांद्यावर वाहताना कविता माझा श्वास असल्याचे सांगतो तर ज्या दिवशी माणसांची अक्षरे होऊन अक्षरमाणसी कविता होईल त्या दिवशी कवितेची आणि माझी मुक्ती आहे असे सांगतो.

भावनेच्या बोटाला पकडून जाणारी ही कविता कुठेही वैयक्तिक दुःख – दैण्याला भोंजारताना दिसत नाही. समुहभावना घेऊनच ती व्यक्त होते. कार्यकर्ता, आई, तरुणाई, राज्यकर्ते, कष्टाळता बाप अशा सर्व व्यक्तिरेखा रेखाटताना ती प्रत्ययास येते. खरंतरं बाप ही व्यक्ति नसून वृत्ती आणि प्रवृत्ती आहे. जी माती आणि नाती जोडून ठेवते. बाप मातीला माय माऊली मानतो. पिठ्यान – पिढ्या राबतो. ऊन-वारा-पाऊस हे त्याचे कर्दनकाळी शिक्षक होतात. वेळप्रसंगी बोगस निघतात. दगाफटका करतात. त्यामुळे बाप जगण्याच्याआणि शेताच्या शाळेत उत्तीर्ण होत नाही. त्याच्या पाठीवरील कर्जदफ्तर खाली उतरत नाही. त्याच्या सातबाऱ्यावरचं ओझं वाढत जातं.

व्यवस्थेचे हजारो अदृश्य हात त्याच्या गळ्याभोवतीचा फास आवळत असतात. तरीही तो ही शेतशाळा करत रहातो. अशातच बापाच्या काळजाचा तुकडा असणारी जमीन विकून मोटारी घेण्याची आस बाळगलेली फोर जी (4G) पिठी उदयास आलीय. त्यामुळे बाप नावाची संस्कृती सुरुंग पेरलेल्या जमिनीवरच शेती करतेय की काय ? असा प्रश्न निर्माण होतो. ‘उत्तम शेती’ हे समीकरण बदलत्या काळात व्यवस्थेच्या विकलांग ध्येयधोरणामुळे कनिष्ठ जागी कधी आली ते कळलेच नाही. इथे कविता बंडाची भाषा करताना म्हणते की, बापाने घरादारात, शेताशिवारात आणि एकूणच जगण्यात फुलून यायचे असेल तर व्यवस्थेचा विषारी फणा ठेचावा लागेल. आता प्रत्येक वावराने नवे गाणे गायला पाहिजे आणि त्यासाठी विद्रोही बियाणे पेरायला पाहिजेत. अशी सडेतोड विद्रोहाची भाषा बोलतानाही ही कविता कुठेही ऊरबडवेपणा करत नाही हा तिचा अंगभूत स्थायी स्वभाव.

जगण्याचे तुकडे सांधताना ही कविता नदी आणि नदीच्या संस्कृतीसारखी प्रवाही राहते. नदी मातीला फुलविते माणसांना जगविते आणि वाहात राहते अखंडपणे माणसांच्या सुखदुःखाची गोळाबेरीज सोबत घेऊन. अशी नदी प्रत्येकाच्या आत वाहात राहिली पाहिजे अशी काळाची गरज अधोरेखित करते. या नदीकाठांवर विस्तारलेल्या गावांच्या बदलणाऱ्या संदर्भाचा धास्तावालेला काळ उभा ठाकला आहे. माणसांची मूळं हलवू पाहणारा आणि संशयसूती वाढवणारा हा काळ माणसाला आत्महत्तेपर्यंत नेतो. धर्मांधता निर्माण करतो. गावातून शहरात आणतो आणि बेगडी आव आणून मळका माणूस टाळायचा प्रयत्न करतो. हा समस्यांची माणसे आणि माणसांची गर्दी करतोय या गर्दीला मालकही पुरवितो, मनमानी कारभार करणारे आणि गर्दीच्या जिवावर आपली वर्दी निर्माण करणारे या संग्रहातील सर्व कवितांच्या आशय मुळाशी माणूस असलेला आढळतो.

हा मुळातला माणूस अभंग राहण्यासाठी ही कविता धडपडते. माणसाशी माणूस जोडण्यासाठी आपल्या अंगात सूर्य पाळण्याचे धाडस करते. अंधारून आलेल्या काळात चाचपडणाऱ्या हातात ही सूर्य मशाल देण्यासाठी व्यवस्थेच्या चरख्यालाही भेटू पहाते. खिशाला कोरड पडली अथवा जीवाशी आच आली तरी सच्चा शब्दांशी प्रतारणा करता येणार नाही असा विवेकी विचार मांडते. शब्द माणसे जोडतील त्यांच्या माळा उभ्या राहतील. असा आशादायक सूर लावते. जीवनव्यवहाराचे सर्व चढ-उतार चालत जाऊन माणसाला माणसाशी आणि सम्यक सुखाशी जोडण्याचा प्रयत्न करते. काळजातला माणूस मस्त चाललेल्या या काळाच्या रणभूमीवर शांतीचा बुद्ध घेऊन जाते. माणसा माणसातला माणूस जीवंत ठेवण्यासाठी धडपडते. त्याला सम्यक मार्गाशी आणि दुःख निवारक बुद्धाशी जोडताना कालौघात बोधिविचार वृक्षाभोवती झालेली अतिक्रमणे काढण्याची क्रांतिकारी भाषा बोलते. आणि मगच त्या बोधिवृक्षाखालचे अतिक्रमण काढावे म्हणतो. बुद्धाला आणि माणसाला थेट जोडावे म्हणतो असा उत्क्रांत विचार मांडते. माणूसपणाची वीण घट्ट होण्यास मदत करते. चळवळींचा फोलपणा विषद करताना ती कुठेही कचरत नाही. समाजवास्तवाशी भिडताना ती अधिक टोकदारपणे समोर येते. गाव आणि शहरी विचारात वाढत जाणारी तफावत उघडी पाडून नात्यात वाढत जाणारे अंतर कमी करण्याच्या दिशेने निर्देश करते, एकुणच आपला भोवताल आणि समकाल याचे वास्तव चित्रण प्रतिमांकित करण्यात ही कविता उजवी ठरते.

पुस्तकाचे नाव – माझ्या हयातीचा दाखला
कवी – विशाल इंगोले
प्रकाशन – काव्यागृह प्रकाशन, वाशिम
पृष्ठसंख्या – १२८


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading