November 12, 2025
बिहारमध्ये मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या महिलांवतीने बनवलेल्या वोट बँकेचा अभ्यास – सायकल योजना, दारूबंदी, दस हजाराची मदत आणि निवडणूक धोरण यांचा खोल अर्थ.
Home » नितीशकुमारांचा आधार : महिला व्होटबँक
सत्ता संघर्ष

नितीशकुमारांचा आधार : महिला व्होटबँक

नितीशकुमार हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा सन २००६ मधे त्यांनी महिलांसाठी सायकल योजना सुरू केली. त्याचाही त्यांना लाभ झाला. महिला व्होट बँकेसाठी सायकल ते दस हजारी असे त्यांच्या कारकिर्दीचे वर्णन केले जात आहे. नितीशकुमार यांनी राज्यात दारूबंदी जाहिर केली. त्याचे महिलांनी जोरदार स्वागत केले. त्याचाही लाभ नितीशकुमार यांना निवडणुकीत होईल. महिला व्होट बँक हा नितीशकुमार यांचा मोठा आधार आहे.

डॉ. सुकृत खांडेकर

बिहारच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात नेहमीपेक्षा मतदान जास्त झाल्याने त्याचा लाभ कुणाला होणार याविषयी वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाने मतदारांना आकर्षित केले आहे. त्यांनी अनेक सुशिक्षित नवे चेहरे उमेदवार म्हणून उतरवले आहेत. त्यांच्या सभांना शहरी भागात मोठा प्रतिसाद लाभल्याने ते निवडणुकीत किती मते मिळवतात व त्याचा भाजपच्या व्होट बँकेवर किती परिणाम होऊ शकतो, त्यावर सत्ता स्थापनेची समीकरणे बदलू शकतात. छट पुजा उत्सवानंतर लगेचच मतदान झाल्यामुळे परप्रांतातून आलेले मतदार राज्यात थांबले व त्यामुळेही मतदानाची आकडेवारी वाढली असे सांगण्यात येते. सर्वात महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत राज्यातील दिड कोटी महिलांच्या बँक खात्यात निवडणुकीच्या तोंडावर नितीशकुमार यांच्या सरकारने थेट दहा हजार रूपये जमा केल्यामुळे महिला अतिशय आनंदी आहेत. महिला मतदारांचे भरघोस मतदान एनडीएच्या उमेदवारांना मिळेल, असा विश्वास नितिशकुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाला व भाजपाला वाटतो आहे. तब्बल वीस वर्षे मुख्यमंत्री पदावर असलेल्या नितीश कुमार यांना पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी महिलांसाठी दस हजारी योजना राबवावी लागली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापुर्वी विरोधी पक्षांच्या राज्यात निवडणुकीच्या तोंडावर दिल्या जाणाऱ्या सवलतींवर सडकून टीका केली होती. त्यांनी अनेकदा रेवडी संस्कृतीची खिल्ली उडवली. पण मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि हरयाणात तेथील भाजप सरकारने राबवलेल्या लाडकी बहिण योजनेने भाजपला पुन्हा सत्ता मिळवून दिल्यापासून मोदींनी रेवडी वाटपावर टीका करणे बंद केले आहे. भाजपने या तीन राज्यात रेवड्या वाटून सत्ता मिळवली तसेच नितीशकुमार यांनी बिहारमधे निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री महिला रोजगार योजना जाहीर केली. महिलांना स्वयंरोजगार व उद्योग सुरू करण्यासाठी ही योजना आहे. त्याची सुरूवात म्हणून दिड कोटी महिलांच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रूपये सरकारने जमा केले आहेत. राज्यातील कायम निवासी तसेच १८ ते ६० वयोगटातील महिलांसाठी ही योजना आहे, त्यांनी आपला रोजगार – उद्योगाचा आराखडा सादर केल्यावर सहा महिन्यात आणखी दोन लाख रूपये त्यांना देण्यात येणार आहेत.

महाराष्ट्राप्रमाणे लाडकी बहिण योजना सरसकट सर्व महिलांसाठी लागू केलेली नाही. नितीशकुमार हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा सन २००६ मधे त्यांनी महिलांसाठी सायकल योजना सुरू केली. त्याचाही त्यांना लाभ झाला. महिला व्होट बँकेसाठी सायकल ते दस हजारी असे त्यांच्या कारकिर्दीचे वर्णन केले जात आहे. नितीशकुमार यांनी राज्यात दारूबंदी जाहिर केली. त्याचे महिलांनी जोरदार स्वागत केले. त्याचाही लाभ नितीशकुमार यांना निवडणुकीत होईल. महिला व्होट बँक हा नितीशकुमार यांचा मोठा आधार आहे.

हरियाणात महिलांना दरमहा २१०० रूपये व बेरोजगारांना दरमहा १२०० ते ३५०० रूपये देण्याचे भाजपने निवडणुकीत आश्वासन दिले होते. महाराष्ट्रात लाडकी बहिण योजनेखाली दरमहा १५०० रूपये दिले जातात. निवडणुकीत मतदारांना विकास कामांपेक्षा थेट रेवड्या महत्वाच्या वाटतात हेच महाराष्ट्र, मध्य प्रदेश व हरयाणाने दाखवून दिले आहे. बिहारमधे राजदने सत्तेवर आल्यास महिलांना दरमहा अडिच हजार रूपये देऊ असे आश्वासन दिले आहे. अतिमागास कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याचेही तेजस्वी यादव यांनी आश्वासन दिले आहे.

नितीशकुमार यांच्यावर राम मनोहर लोहिया व जयप्रकाश नारायण यांच्या विचारांचा प्रभाव आहे. पण त्यांनी सत्तेसाठी काँग्रेस, राजद व भाजप अशी अलटून पालटून युती केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी चौदा नोव्हेंबरला आहे, एनडीए सत्तेवर आली पुन्हा नितीशकुमारच मुख्यमंत्री होतील की भाजप आपल्याकडे मुख्यमंत्रीपद घेईल हे ठामपणे सांगता येत नाही. एनडीएचा निवडणूक जाहीरनामा घोषीत झाला तेव्हा स्वत: नितीशकुमार हजर होते पण पण केवळ तीस सेकंदात पत्रकार परिषद संपली व सर्व नेते उठून गेले. एनडीएचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण हा प्रश्न विचारला जाईल अशी त्यांना खात्री होती, त्याचे उत्तर टाळण्यासाठी प्रश्नोत्तरे न होताच पत्रकार परिषद संपवली गेली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना काही दिवसापूर्वी पत्रकारांनी मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी निवडून येणारे आमदार ठरवतील असे उत्तर दिले होते. नितीशकुमार यांना त्यांचे उत्तर आवडले नसावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या सभेला नितीशकुमार उपस्थित राहीले. मोदींच्या नंतर राज्यात डझनभर सभा व रोड शो झाले, भाजपच्या अनेक बड्या नेत्यांचे प्रचार दौरे झाले पण नितीशकुमार तिकडे फिरकले नाहीत.

गेल्या सतरा निवडणुकांमधे पाच टक्के मतदान वाढले किंवा कमी झाले तर सत्ता परिवर्तन होते, हा बिहारचा अनुभव आहे. १९९० मधे काँग्रेसची राजवट संपली तर २००५ मधे लालू – राबडी राज संपुष्टात आले. नितीशकुमार गेली वीस वर्षे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे वय झाले आहे, तब्येतही नरम असते. त्यांनी आपल्या पक्षाचा वारस किंवा नंबर दोन कोण आहे हे जाहीर केलेले नाही. नितीशकुमार पुन्हा मजबुतीने विजयी होतील असे अनेकांना वाटते. पण तेजस्वी यादव पराभूत झाले तर महाआघाडीला नवा नेता शोधावा लागेल. मतदारांनी चूक केली तर बिहारमधे पुन्हा जंगलराज येईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक सभेतून दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांनी बिहारमधे प्रचारात हजेरी लावली आहे. भाजपने सर्व राज्यातून शेकडो नेते व हजारो कार्यकर्त्यांची फौज गेले महिनाभर बिहारमधे तैनात ठेवली आहे.

राज्यात सवर्ण मतदारांची संख्या दहा टक्के आहे. पण त्या आधारावर भाजप सत्तेपर्यंत पोचू शकत नाही. म्हणूनच नितीशकुमार यांची मदत घेतल्याशिवाय भाजप पाटण्याची सत्ता काबीज करू शकत नाही असे अनेकांना वाटते. उत्तर भारतात बिहार हे एकमेव हिंदी भाषक राज्य आहे की तिथे भाजपला आपला मुख्यमंत्री आजवर बसवता आलेला नाही. चौदा तारखेच्या मतमोजणीनंतर काय चमत्कार घडतो त्यावर बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण हे ठरणार आहे. प्रचार सभेत अमित शहा म्हणाले – न लालू का बेटा सीएम बनेगा , न सोनिया का बेटा पीएम बनेगा, बिहार मे लालू का सुपडा साफ होगा.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading