July 16, 2025
Indian army troops in action during Operation Sindoor, with a backdrop of India-Pakistan map and strategic visuals.
Home » चीन, तुर्कीची पोलखोल…
सत्ता संघर्ष

चीन, तुर्कीची पोलखोल…

जगात सुमारे ५० इस्लामिक देश आहेत. पैकी तुर्की व अजरबैजान या देशांनी भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानला पूर्ण ताकदीने साथ दिली. तुर्कीने दिलेल्या ड्रोनचा भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानने वापर केला. तुर्कीचे दिलेले पाचशे ड्रोन पाकिस्तानने भारताच्या दिशेने टाकले पण भारतीय सेनेने त्यांची वाटेत विल्हेवाट लावली.

डॉ. सुकृत खांडेकर

चार दिवस चाललेल्या घनघोर लढाईनंतर भारताने पाकिस्तान विरोधात सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर मोहीम स्थगित केले, पण त्याचवेळी पाकिस्तानने पुन्हा कुरापत काढली, तर पुन्हा मोहीम सुरू करण्याची भारताने धमकीही दिली. अण्वस्त्रांच्या ब्लॅकमेलिंगला भारत घाबरत नाही, यापुढे जर पाकिस्तानशी चर्चा झाली, तर ती फक्त पाकिस्तानव्याप्त काश्मीर व दहशतवादावरच होईल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठणकावून सांगितले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतला, म्हणूनच पाकिस्तान बचावले असेच म्हणायला हवे होते. आणखी चार दिवस ऑपरेशन सिंदूर चालले असते, तर पाकिस्तानमध्ये हाहा­कार उडाला असता, असंतोष भडकला असता, अगोदरच घसरलेली अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडून पडली असती आणि पाकिस्तानची वाटचाल आणखी नवीन विभाजनाकडे सुरू झाली असती.
भारताने शस्त्रसंधी हा शब्द वापरलेला नाही, भारताने ऑपरेशन सिंदूर स्थगित केले असे म्हटले आहे, याचा अर्थ पाकिस्तानप्रेरीत दहशतवादी कारवाया पुन्हा सुरू झाल्या, तर नव्या जोमाने ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू करण्यास भारत शस्त्रसज्ज आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रबंदी झाल्याचे दि. ९ मे रोजी जाहीर केले, दोन्ही देशांचे आभारही मानले व नंतर काही तासांतच भारताने ऑपरेशन सिंदूर तूर्त स्थगित केल्याचे जाहीर केले. या निर्णयानंतर दोन्ही देशांतून एकमेकांवर होणारे क्षेपणास्त्रांचे व ड्रोनचे हल्ले थांबले. सरहद्दीवरील गावात जनजीवन सुरळीत झाले. युद्ध आपणच जिंकले म्हणून दोन्ही देशांत लोकांनी रस्त्यावर येऊन जल्लोष केला. दोन्ही देशांनी चार दिवसांच्या घनघोर लढाईला युद्ध असे म्हटले नव्हते. मात्र लाईन ऑफ कंट्रोल व आंतरराष्ट्रीय सीमा रेषा ओलांडून दोन्ही देशांनी विमाने, क्षेपणास्त्रे व ड्रोनचा एकमेकांवर मारा केला हे दोन्ही देशांनी जगाला सांगितले. या युद्धात भारताची सरशी झाली हे मान्य करावेच लागेल आणि चीन व तुर्कीची जगात पोलखोल झाली हे सुद्धा जगाला दिसून आले.

चीन आणि तुर्की हे दोन्ही देश भारताच्या विरोधात प्रत्यक्षात युद्धात उतरलेले नव्हते पण त्यांची शस्त्रे, विमाने, ड्रोन त्यांनी भारताच्या विरोधात पाकिस्तानला दिले होते. चिनी बनावटीची शस्त्रे ही कमी दर्जाची आहेत हे या युद्धात दिसून आले. चिनी शस्त्रांचा भारताच्या प्रतिकारापुढे निभाव लागला नाही. चिनी शस्त्रास्त्रांची कामगिरी निराशाजनक होती. त्यातही चीन व तुर्कीची शस्त्रे पाकिस्तानी सैन्याला नीट वापरता आली नसतील, तर त्यापेक्षा आणखी त्यांचे दुर्दैव काय असू शकते. या युद्धात पाकिस्तान, चीन व तुर्की या तिनही देशांची नाचक्की झाली. आपली शस्त्रास्त्रे उत्तम होती पण पाकिस्तानी सैन्याला नीट हाताळता आली नाही असे चीन आता म्हणतो आहे. चीनच्या खुलाशावर कोणताही देश विश्वास ठेवणार नाही. चीनने कोणताही दावा केला तरी त्यावर तो जगाला मान्य कसा होणार?

पाकिस्तानने चिनी बनावटीच्या एचक्यू १६ व एचक्यू ९ या डिफेन्स सिस्टीमच्या प्रणालीचा उपयोग केला. एचक्यू ९ ची १२५ किमी, तर एचक्यू १६ ची ५० किमी रेंज आहे. पण त्याचा लाभ पाकिस्तानला काहीच झाला नाही. भारताने सोडलेले ड्रोन किंवा क्षेपणास्त्रे चिनी सिस्टीम रोखू शकली नाही. भारतीय हवाई दलाने चिनी बनावटीची डिफेन्स सिस्टीम आपल्या हल्ल्यातून पूर्ण उद्ध्वस्त करून टाकली. चीनने पाकिस्तानला जेएफ १७ हे लढाऊ विमान दिले होते. पण तेही निरूपयोगी ठरले. पाकिस्तानने चार दिवसांच्या युद्धात वापरेली चिनी बनवाटीची शस्त्रास्त्रे भारताच्या सरहद्दीवर येण्यापूर्वीच निकामी झाली.

चीन हा भारताचा पूर्वीपासूनचा शत्रू आहे. तो आता पाकिस्तानचा मित्र देश आहे. सर्व परिस्थितीत आम्ही पाकिस्तानच्या बरोबर असू, असे चीनने जाहीरच केले आहे. पाकिस्तानला शस्त्रास्त्रांची सर्वांत जास्त मदत चीनकडून मिळते. दुसरीकडे चिनी बनवाटीच्या वस्तूंनी भारताची बाजारपेठ मोठी व्यापली आहे, स्वस्तात मिळते म्हणून भारतीय लोक चिनी वस्तू खरेदीला प्राधान्य देतात व भारतीय बाजारपेठेच्या जीवावर चिनी अर्थव्यवस्था मोठी होते. भारताने चिनी बनावटीच्या वस्तूंवर निर्बंध लावले, तर चीनला भारत विरोधी भूमिका बदलणे भाग पडेल. पण आजवरच्या कोणत्याही सरकारने तसा प्रयत्न केला नाही. कैलास मानसरोवरला जाण्यासाठी भारतीय यात्रेकरूंना परवानगी मिळते हेच चीनचे भारतावर फार मोठे उपकार आहेत, अशी आपली मानसिकता आहे. चीन अर्थव्यवस्था व संरक्षण क्षेत्रात बलाढ्य आहे, चीनने भारताचा मोठा भू-भाग काबीज केला आहे तरीही आपण आरे ला, कारे म्हणू शकत नाही.

जगात सुमारे ५० इस्लामिक देश आहेत. पैकी तुर्की व अजरबैजान या देशांनी भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानला पूर्ण ताकदीने साथ दिली. तुर्कीने दिलेल्या ड्रोनचा भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानने वापर केला. तुर्कीचे दिलेले पाचशे ड्रोन पाकिस्तानने भारताच्या दिशेने टाकले पण भारतीय सेनेने त्यांची वाटेत विल्हेवाट लावली.

खरं तर भारताने तुर्कीशी संबंध चांगले ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केलाय. सन २०२४ मध्ये २ लाख ७५ हजार भारतीय पर्यटक तुर्कीला गेले होते, तर अजरबैजानला २ लाख ५० हजार भारतीय पर्यंटक गेले होते. २०२२ ते २०२४ च्या दरम्यान अजरबैजानला जाणाऱ्या भारतीय पर्यंटकांच्या संख्येत ६८ टक्के वाढ झाली. तुर्कीमध्ये पर्यटक साधारणत: आठवडा ते दहा दिवसांचा दौरा करतात, तर अजरबैजानला ४ ते ६ दिवसांचा पर्यटन दौरा असतो. अजरबैजानला भारतीय पर्यंटकांकडून हजार ते बाराशे कोटी मिळतात, तर तुर्कीच्या पर्यटनात भारतीय पर्यटकांचे तीन ते साडेतीन हजार कोटींचे योगदान आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला तुर्कीचे आकर्षण आहे. तुर्की व अजरबैजानमध्ये २० हजारपेक्षा जास्त प्रत्यक्ष रोजगार पर्यंटनावर आधारित आहे, तर अप्रत्यक्ष पन्नास ते साठ हजार रोजगारांच्या संधी तिथे उपलब्ध आहेत.

गेल्या चार वर्षांत आदरातिथ्य क्षेत्रातही मोठी गुंतवणूक तिथे वाढली आहे. भारतीय पर्यटकांच्या जीवावर तुर्की व अजरबैजानची अर्थव्यवस्था सुधारली आहे, पण हे दोन्ही देश भारताच्या विरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला शस्त्रात्रे देण्यासाठी पुढे सरसावले हे अनाकलनीय आहे. तुर्कीला जाणाऱ्या हजारो भारतीय पर्यटकांनी विमानाची तिकिटे व तेथील हॉटेल बुकिंग रद्द केले आहे. तुर्कीहून येणाऱ्या सफरचंदावर मुंबई, पुणे, दिल्लीतील व्यापाऱ्यांनी बहिष्कार घालण्याचे जाहीर केले आहे. हा तर केवळ ट्रेलर आहे…

ऑपरेशन सिंदूर काळात भारताने बजावलेल्या कामगिरीनंतर भारताने वापरेल्या शस्त्रांस्त्रांबद्दल जगात विश्वसनीयता वाढली आहे. भारताच्या ब्रह्मोसने केलेल्या कामगिरीने सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले. ब्रह्मोसला जगातून मागणी वाढली तर भारताची अर्थव्यवस्था आणखी समृद्ध होऊ शकेल. रशियाने भारताचा मित्र म्हणून नाते कायम टिकवले आहे. रशियाने भारताला नेहमीच नवे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. अमेरिका नेहमीच अन्य देशांकडे सौदागर म्हणून भूमिका बजावत असते. पाकिस्तानबरोबर झालेल्या चार दिवसांच्या युद्धाच्या काळात रशिया व इस्त्रायल हे दोनच देश भारताच्या पाठिशी ठाम राहिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या अकरा वर्षांत सात-आठ डझन देशांना भेटी दिल्या असतील. पण युद्धकाळात बहुसंख्य देश भारताच्या समर्थनासाठी पुढे का आले नाहीत, याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. तुर्कीमध्ये जेव्हा भूकंप झाला तेव्हा भारताने ऑपरेशन दोस्त मोहीम राबवली होती. तुर्कीला वैद्यकीय मदत पाठवली. एडीआरएफची टीम पाठवली. दगड, मातीचे ढिगारे हलविण्यासाठी व गाडलेल्या लोकांना शोधून त्यांची सुटका करण्यासाठी भारताने मदत केली.

भारताने तेव्हा तुर्कीला सहा विमाने भरून साधनसामग्री व वैद्यकीय मदत पाठवली होती. पण त्याची जाणीव न ठेवता तुर्कीने भारताशी लढण्यासाठी पाकिस्तानला शस्त्रे व सुरक्षा रक्षकही पाठवले हे आता उघड झाले आहे. तुर्कीमध्ये भूकंप झाला तेव्हा भारताने त्या देशाला भरघोस मदत केली. पण त्याच तुर्कीने युद्धकाळात पाकिस्तानला ड्रोन व शस्त्रे पुरवून भारताच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. तुर्कीचे अध्यक्ष रेसप तय्यीप एर्दोगन यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय नुकसानीचा विचार न करता, तुर्की-पाकिस्तानला मदत करीतच राहील. चांगल्या व वाईट काळात तुर्की सदैव पाकिस्तानबरोबर राहील… शस्त्रसंधी झाली म्हणजे युद्ध संपलेले नाही, भारताला पुन्हा दहशतवादाविरोधात व त्यांना मदत करणाऱ्या आकाच्या विरोधात मोठी सशस्त्र झेप घ्यावी लागणार आहे…


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading