April 11, 2025
Overspeeding is deadly article by Prashant Daithankar
Home » ओव्हरस्पीडींग प्राणघातकच …
विशेष संपादकीय

ओव्हरस्पीडींग प्राणघातकच …

तीव्र उतार, तीव्र वळण तसेच अनेक ठिकाणी असणारे ब्लॅक स्पॉट यामुळे रस्ते अपघाताची संख्या वाढत असते यावर एकमेव उपाय म्हणजे आपले गतीवरील नियंत्रण.

प्रशांत दैठणकर

आपण दरवर्षी जानेवारी महिन्यात नवी सुरुवात म्हणून काही सप्ताह साजरे करतो त्यातील एक परिचित सप्ताह म्हणजे रस्ते सुरक्षा सप्ताह होय. मुळात रस्ता सुरक्षा आणि त्याच्याशी निगडीत बाबी या सप्ताहापुरत्या मर्यादीत न राहता तो आपल्या जीवनशैलीचा एक भाग असला पाहिजे.

काही वर्षांपूर्वी भारतात चांगले रस्ते नाहीत म्हणून अपघात होतात अशी ओरड होत होती. आता रस्ते चांगले झाले रस्त्यांचे जाळे विस्तारले समृध्दीसारखे महामार्ग आता उपलब्ध झाले आहेत असे असताना अपघात कमी होण्याऐवजी अपघातांची संख्या आणि भिषणता वाढत आहे असे आढळून आले आहे आणि सर्वात धक्कादायक प्रकार म्हणजे यात बळी पडणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे.

रस्ते अपघातांबाबत झालेल्या अभ्यासानुसार संपलेल्या 2022 या संपूर्ण भारतात रस्ते अपघातामध्ये 1 लाख 55 हजार 622 जणांना मृत्यू आला. याच अभ्यासात असाही निष्कर्ष समोर आला आहे की या मृत्यूपैकी 60 टक्के मृत्यू हे गतीच्या वेडाने अर्थात ठरवून दिलेल्या सुरक्षित वाहन गती पेक्षा अधिक वेगाने (ओव्हरस्पिडींग) वाहने चालवल्याने झाले आहेत.

जानेवारी ते जून 2022 या सहा महिन्यांच्या कालावधीत 31 हजार अपघातांची नोंद झाली. यात मृत्यू झालेल्यांची संख्या 8068 आहे तर जखमी झालेल्यांची संख्या 14 हजार इतकी आहे. राज्यात दररोज होणाऱ्या छोटया मोठया अपघातांच्या FIR ची संख्या 150 ते 200 च्या घरात आहे. यातील बहुतेक अपघात हे स्पीडींग (गती) चेच आहेत हे दुर्दैवी आणि धक्कादायक आहे.

आपण वाहन गती वाढवतो त्यावेळी वाहनावर असणारे नियंत्रण कमी व्हायला लागते. वाहनाची उच्चतम गती मर्यादा चालवणे भारतात शक्य नाही कारण आपली लोकसंख्या आणि त्याच झपाटयाने वाढलेली वाहन संख्या आहे.

तीव्र उतार, तीव्र वळण तसेच अनेक ठिकाणी असणारे ब्लॅक स्पॉट यामुळे रस्ते अपघाताची संख्या वाढत असते यावर एकमेव उपाय म्हणजे आपले गतीवरील नियंत्रण. वाहन कमी वेगात असेल तर आपण आणीबाणीच्या प्रसंगी झटकन ब्रेक लावून अपघात टाळू शकतो आणि दुर्दैवाने वाहनांची धडक झाली तरी असे अपघात प्राणघातक असत नाहीत.

वाहनचालकांसाठी यावर प्रबोधन करणे सातत्याने सुरु आहे. मात्र त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. यासाठीच रस्ते सुरक्षा हा जीवनशैलीचा भाग होणे आवश्यक आहे. वाहन अपघाताची इतरही अनेक कारणे आहेत त्याकडेही आपण लक्ष देण्याची गरज आहे. परंतु त्या सर्वात महत्वाचे म्हणजे 60 टक्के प्राणघातक अपघातांना कारण ठरणारे ओव्हरस्पीडींग. हे बंद झाले तरच रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण आपल्याला कमी करता येईल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading