January 28, 2023
Brightan the life like sun article by Rajendra Ghorpade
Home » सूर्यासारखे स्वतःचे जीवनही करा प्रकाशमान  
विश्वाचे आर्त

सूर्यासारखे स्वतःचे जीवनही करा प्रकाशमान  

जो स्वतः प्रकाशमान असतो. तोच इतरांना प्रकाश देऊ शकतो. अंधारात चाचडपणारा, स्वतःच स्वतःची वाट विसरलेला इतरांना काय मार्ग दाखवणार ? इतरांना तो कसा प्रकाशमान करू शकणार ? सूर्य स्वतः प्रकाशमान आहे. त्याच्याजवळ अंधार हा शुन्य आहे. म्हणूनच तो इतरांना प्रकाशमान करू शकतो. यासाठी स्वतः सूर्यासारखे प्रकाशमान व्हायला हवे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

जो आपणपेंचि आपणया । प्रकाशीतसे धनंजया ।
काय बहु बोलों जया । नाहीं दुजे ।। ५५६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा

ओवीचा अर्थ – अर्जुना, जो आपण आपला प्रकाशतो, फार काय सांगू ! ज्याला दुसरें नाही ( म्हणजे जो एकाकी ) आहे.

सूर्याच्या ठिकाणी अगणिक स्फोट होत आहेत. या स्फोटातून निर्माण होणारी उर्जा, प्रकाश हा आपणापर्यंत पोहोचते. त्यामुळे आपल्या जीवनात प्रकाश पडला आहे. दिवसा उजेड मिळतो. पण रात्री अंधार होतो. यावर मात करण्यासाठी मानवाने विद्युत बलाचा शोध लागला. यामुळे रात्रीचाही अंधार नष्ट झाला. निसर्गाने रात्री उजेड देण्यासाठी चंद्रही दिला आहे. जीवन सदैव प्रकाशमान राहावे, असा प्रयत्न निसर्गाकडूनच केला जातो. यासाठीच निसर्गाच्या नियमांचे पालन करत जीवन जगायला हवे.

स्फोट घडतो किवा वीजेची, प्रकाशाची निर्मिती केव्हा होते ? दोन विरुद्ध भार एकत्र येतात तेव्हाच हे घडते. निसर्गाची ही किमया उद्भुत आहे. मानवाच्या जीवनातही ज्ञानाचा प्रकाश केव्हा पडतो ? दोन्ही नाकपुड्यातील श्वासाचा आत आणि बाहेर जाणाऱ्या वायूचा समतोल राखला जातो तेव्हांच हे घडते. सोहम स्वरातून हा ज्ञानाचा प्रकाश पडतो. एक स्वर आत येतो. दुसरा स्वर बाहेर पडतो. पण दोन्ही नाकपुड्यातून एकाचवेळी तो आत जातो अन् एकाच वेळी बाहेर येतो. हा समतोल जेव्हा साधला जातो तेव्हाच साधनेत ज्ञानाचा प्रकाश पडतो. म्हणजे स्वतःच प्रकाशमान होण्यासाठी सोहमचा समतोल साधावा लागतो.

जो स्वतः प्रकाशमान असतो. तोच इतरांना प्रकाश देऊ शकतो. अंधारात चाचडपणारा, स्वतःच स्वतःची वाट विसरलेला इतरांना काय मार्ग दाखवणार ? इतरांना तो कसा प्रकाशमान करू शकणार ? सूर्य स्वतः प्रकाशमान आहे. त्याच्याजवळ अंधार हा शुन्य आहे. म्हणूनच तो इतरांना प्रकाशमान करू शकतो. यासाठी स्वतः सूर्यासारखे प्रकाशमान व्हायला हवे. स्वतःतील अंधार शुन्यावर आणायला हवा. तरच आपण इतरांनाही प्रकाशमान करू शकू. यासाठी आत्मज्ञानी संत हे स्वतः प्रकाशमान झाले. त्यांनी त्यांच्यातील अज्ञानाचा अंधार घालवला. यामुळे ते इतरांच्या जीवनातील अंधार दूर करू शकतात. इतरांचे जीवन प्रकाशमान करू शकतात.

आपण विकास केला, प्रगती केली. असे म्हणतो. पण आपण प्रगती नेमकी कशाची केली ? ही प्रगती इतरांना बाधा ठरत असेल, तर ती प्रगती कसली ? दुसऱ्याला बेघर करून त्या जागी स्वतःचा राजवाडा बांधणारे राजे त्या महालात कधी सुखाने राहू शकतात का ? असे राजधर्म विसरलेले अज्ञानी राजे कधी खरे पराक्रमी, प्रजाहितरक्षक राजे झाले का ? राजाला जेव्हा राजा आहे म्हणून सांगण्याची वेळ येत असेल तर तो राज कसला ? राजकारणात मतांसाठी दुसऱ्यापुढे झोळी पसरावी लागत असेल तर त्याने राजकारभार तो काय केला ? कृतीतून राजा असल्याचे जो दाखवून देतो तो खरा राजा. तोच राजा स्वतः बरोबर इतरांचेही हीत करू शकतो. इतरांनाही बलाढ्य करू शकतो. अशा राजाने कितीही स्वतःतील राजधर्माचा गुण लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी तो आपोआप प्रकट होतो. अन् जेव्हा प्रकट होतो तेव्हा त्यात दुष्ट दुर्जनांचा नाश होतो. इतके सामर्थ्य त्याच्याच भरलेले असते. सूर्याने कितीही ठरवले आपण प्रकाशमान व्हायचे नाही तर ते शक्य आहे का ? तसेच राजाचे आहे. राजाने कितीही ठरवले तरी त्याच्यातील राजबिंडा गुण हा प्रकटतोच.

सूर्यामुळेच या सूर्यमंडलातील अनेक ग्रह हे प्रकाशमान आहेत. या ग्रह, ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश नाही. पण ते सूर्यामुळे प्रकाशमान झाले आहेत. सूर्याच्या असण्यातच त्यांचे प्रकाशमान राहण्याचे अस्तित्व दडलेले आहे. यासाठी सूर्यासारखे अखंड प्रकाशमान होण्याचा प्रयत्न करायला हवा. आपल्यातील ज्ञानाचा सूर्य प्रकाशमान करून इतरांनाही प्रकाशमान करण्याचा धर्म पाळायला हवा. संतांनी स्वतःतील अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश पाडला त्यांच्या त्या प्रकाशात आपणही प्रकाशमान होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

Related posts

मोहामुळे हरवते भान

जीवनात दुरदृष्टी ठेवून नियोजन हवे

धकाधकीच्या जीवनात आत्मबोधाचे ज्ञान उपयुक्त

Leave a Comment