विशेष आर्थिक लेख
देशभरात दिवाळीच्या सणाची धामधूम असतानाच सोने चांदीच्या दरांनी ऐतिहासिक उच्चांकी गाठली आहे. एका बाजूला इस्रायल पॅलेस्टाईन यांचे एकमेकांवरचे हल्ले, रशिया – युक्रेन मधील युद्धाचे ढग गडद होत असताना आर्थिक मंदी व अस्थिरतेनेही अमेरिका, युरोपला ग्रासलेले आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये हे दर अजून वाढण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने सोने चांदी बाजाराचा घेतलेला मागोवा.
प्रा. नंदकुमार काकिर्डे
गेल्या सप्ताहात म्हणजे दिनांक 23 ऑक्टोबर रोजी बाजारपेठांमध्ये सोन्याच्या दराने प्रति औंस सोन्यासाठी 2578.37 डॉलर्सची उच्चांकी पातळी नोंदवली. भारतात दहा ग्रॅमसाठी 81 हजार रुपयापेक्षा जास्त तर चांदी प्रति किलो एक लाख रुपयांच्या घरात गेलेले होते. या उच्चांकी पातळीनंतर काही सत्रांमध्ये या पातळीमध्ये थोडीशी घसरण झाली. चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारने सोने व चांदीवरील आयात शुल्क 15 वरून 6 टक्क्यांवर आणल्याचा परिणाम आयात वाढण्यावर झालेला आहे. देशांतर्गत सोने-चांदी मागणी सातत्याने वाढत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्यांच्याकडील राखीव निधी बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून सोन्यामधील गुंतवणूक वाढवलेली आहे. यामुळेही सोन्याच्या आयातीमध्ये वाढ होत आहे.
प्रगत देशांच्या अर्थव्यवस्थेचा आढावा घेतला असता गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सर्व देश सोन्याच्या गुंतवणुकीला सर्वाधिक प्राधान्य देत आहेत. विकसित देशांच्या अर्थव्यवस्थेची आकडेवारी पाहिली तर कोणत्या देशामध्ये मंदीसदृश्य वातावरण निर्माण झाले आहे किंवा सुरू आहे याबाबत अद्यापही गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम आहे. जगभरात भौगोलिक राजकीय तणाव किंवा युद्धाचे ढग गडद झालेले आहेत. आजही भारत आणि चीन मोठ्या प्रमाणावर सोन्याची आयात करणारे देश म्हणून ओळखले जात आहेत. या सर्वांचाच परिणाम मर्यादित पुरवठा व सतत वाढती मागणी यामुळे सोन्या चांदीच्या भावातसतत वाढ आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये गुंतवणूकदारांमधे सोन्यापेक्षा चांदीमध्ये जास्त ओढा निर्माण झाला असून त्याच्या आयातीतही सातत्याने वाढ होत आहे. भारतामध्ये सौरऊर्जेसाठी तयार केली जाणारी पॅनेल आणि उत्पादन क्षेत्रांमध्ये वापरली जाणारी चांदी यांच्यात मागणी वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर वाढत असल्याने सध्याच्या दरामध्ये त्याचा वाढता साठा करून ठेवावा या भावनेतून भारतातील उद्योजक व आयातदार त्याचा मोठ्या प्रमाणावर साठा करत आहेत हे आयात वाढण्याचे प्रमुख कारण आहे. अनेक वेळा बाजारामध्ये चांदीचा भाव हा सोन्यावर दबाव टाकत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे गुंतवणूकदारांना चांदीमध्ये सोन्यापेक्षा जास्त मिळणारा परतावा मिळावा.
बाजारात सोन्याचे दर थोडेफार स्थिर असतात त्यावेळेला चांदीचे दर वर जाताना दिसतात. त्याचाही परिणाम सोन्याचे दर वाढण्यामध्ये होतो असे एक प्रकारचं वेगळे नातं सोन्या चांदीच्या दरामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात दिसत आहे. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह ही मध्यवर्ती बँक जेव्हा त्यांच्या व्याजदर कपातीचा निर्णय लांबवते तेव्हा चांदीचे दर हे सोन्यापेक्षा जास्त वाढत असल्याचे लक्षात येत आहे.
अमेरिका व चीन या प्रमुख बाजारपेठांमध्ये ग्राहकांच्या मागणीमध्ये अनिश्चितता किंवा अस्थिरता निर्माण झालेली आहे. याचा प्रतिकूल परिणाम भारतातून निर्यात होणाऱ्या सोन्या चांदीच्या दागिन्यांवर झालेला आहे. केंद्र सरकारने आयात शुल्क कमी करण्यामागे सोन्या चांदीच्या दागिन्यांची निर्यात करणाऱ्या उद्योगाला मदत व्हावी व त्यांच्या भांडवलाला चालना मिळावी हा प्रमुख उद्देश होता. अद्यापही त्यात फार मोठा अनुकूल परिणाम झालेला दिसत नाही. सध्या भारतातून सोन्याचे दागिने निर्यात करण्याचे प्रमाण संथ झालेले आहे तर चांदी व हिऱ्यांच्या दागिन्यांची निर्यात मात्र काहीशी अडचणीत असल्याचे दिसत आहे. भारताने युनायटेड अरब एमिरात म्हणजे युएई बरोबर केलेल्या द्विपक्षीय व्यापार करारामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातीला चांगला लाभ होणार आहे. त्याचवेळी गल्फ मधून आयात होणाऱ्या सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसत असल्याने त्याबाबत केंद्र सरकारने फेर आढावा घेण्याची गरज आहे. भारताच्या जड जवाहीर दागिने उद्योगावर क्षीण होत असलेल्या निर्यातीचा संमिश्र परिणाम जाणवत आहे.
जागतिक बाजारपेठेमध्ये सोन्याचे दर कसे ठरतात याचा अभ्यास केला असता गुंतवणूकदारांनी सोन्याच्या गुंतवणुकीला दिलेले प्राधान्य व सोने हे सर्वाधिक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय हीच दोन प्रमुख कारणे आहेत. जगभरातील प्रमुख बँकांचे व्याजदर आणि सोन्याचा भाव याच्यातही एक वेगळे नाते असल्याचे लक्षात येते. बँकांच्या व्याजदरावर मर्यादा असतात तेव्हा सोन्याचे दर कमी आकर्षक वाटतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलर क्षीण होतो किंवा व्याजदर कमी असतात त्यावेळेला जगभरातून सोन्याची मागणी वाढताना दिसते. परंतु युद्धजन्य परिस्थिती, अर्थव्यवस्थेतील चढ-उतार व मागणी यांचाही परिणाम सोन्याचा दर ठरण्यावर होतो. जगभरातील सर्व प्रमुख मध्यवर्ती बँका त्यांच्याकडील सोन्याचा साठा वाढवत असल्याने त्यावरूनही हे स्पष्ट होते. अनेक मध्यवर्ती बँका परकीय चलनाच्या साठ्याऐवजी सोन्यामध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिल यांच्या आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये जगभरातील काही मध्यवर्ती बँकांनी आठ टन सोन्याची खरेदी केली होती. यामध्ये भारतासह पोलंड व टर्की यांच्या मध्यवर्ती बँकांचा समावेश होता. सोन्याचे साठे मर्यादित आहेत मात्र त्याची मागणी अमर्यादित वाढत आहे, हे सुद्धा सोन्याच्या किंमती वाढण्यामागचे महत्वाचे कारण आहे. कोणत्याही खाणीमध्ये सोने सापडण्यापासून त्याचे प्रत्यक्ष उत्पादन होण्यामध्ये किमान दहा ते पंधरा वर्षाचा कालावधी जातो हे लक्षात घेतल्यानंतर मागणी पुरवठ्यातील तफावत जास्त लक्षात येते.
आपल्या देशाबाबत बोलायचे झाले तर प्रत्येक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत म्हणजे जुलै ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये सणासुदीच्या तसेच विवाहाच्या हंगामामुळे जास्त मागणी असते. दिवाळी संपल्यानंतर सोन्याच्या मागणीला फारसा जोर नसतो त्यामुळे सणासुदीच्या काळातच भारतामध्ये सोन्याच्या किमती वाढलेल्या दिसतात. अमेरिकेन डॉलरचा विनिमय दरसुद्धा सोन्या चांदीच्या दरांवर परिणाम करणारा असतो. डॉलर क्षीण होतो त्यावेळेला सोन्याची मागणी किंवा दर वाढलेले लक्षात येते. या वर्षात सोन्याच्या मागणीत दहा टक्के घट तर दरामध्ये पंधरा टक्के वाढ झाल्याने झाल्याचे दिसते. देशाच्या विविध भागातील चांगला मोसमी पाऊस व चांगल्या पिकांमुळे द्वितीय व तृतीय श्रेणीची शहरे तसेच ग्रामीण भागातील गुंतवणूकदारांकडून सोन्याची मागणी वाढताना दिसत आहे. भारतातील दाग दागिन्यांची निर्यात करणाऱ्या स्थानिक परिषदेच्या अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात सोन्याचे दर प्रति औंस 50 डॉलरने वाढून प्रति औंस 2800 ते 3000 डॉलरच्या घरात जाईल असा अंदाज आहे. त्यामुळे भारतातील सोन्याचा दर दहा ग्रॅम साठी हा 92 ते 96 हजार रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांनी याबाबत योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
(लेखक पुणेस्थित अर्थविषयक जेष्ठ पत्रकार व बँक संचालक आहेत)
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.