पंधराव्या-सोळाव्या शतकापासूनच्या पाश्चात्त्यांच्या व भारतीयांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक स्थितीचा व समाज मानसिकतेचा एक्स-रे काढण्यास हे पुस्तक प्रवृत्त करते व मानवी प्रगतीचे खरेखुरे तत्त्व-सूत्र समजून घेण्यासाठी अंतर्मुख करते, हे या पुस्तकाचे यश आहे.
डॉ. अरुण शिंदे
मराठी विभागप्रमुख व प्राध्यापक, नाइट कॉलेज, कोल्हापूर
मो. 9421024055
विज्ञान ललित साहित्य हे वैज्ञानिक संकल्पनांच्या आधारे कल्पित वास्तवाची निर्मिती करीत असते. माहितीपर विज्ञान साहित्य वैज्ञानिक संकल्पना, तत्त्वे, संशोधक, साधने वगैरेंची माहिती रुजवत असते. समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती करण्यासाठी विज्ञान साहित्य महत्त्वाची भूमिका बजावत असते. वैज्ञानिक संकल्पना व सर्जनशील कल्पना यांचा संगम विज्ञान साहित्यामध्ये असतो.
डॉ. व्ही. एन. शिंदे हे सध्या मराठी विज्ञान साहित्यामध्ये मौलिक भर घालणारे लेखन सातत्याने करीत आहेत. ‘एककांचे मानकरी’ (2015) मध्ये त्यांनी भौतिक शास्त्रातील एकवीस राशींना ज्या शास्त्रज्ञांची नावे देण्यात आली आहेत, त्यांच्या संशोधन कार्याचा परिचय करून दिला आहे. ‘असे घडले भारतीय शास्त्रज्ञ’ (2018) मध्ये विज्ञान क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी करून भारताला जागतिक पातळीवर मान्यता मिळवून देणार्या संशोधकांच्या कार्याची ओळख करून दिली आहे. ‘हिरव्या बोटांचे किमयागार’ (2018) मध्ये अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी संशोधन करणार्या कृषिसंशोधकांची गाथा मांडली आहे. ‘आवर्त सारणी व मूलद्रव्याची दुनिया’ (2019) हे त्यांचे महत्त्वाचे पुस्तक असून महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले वाङ्मय पुरस्काराने गौरविले आहे. ‘कृषिक्रांतीचे शिलेदार’ (2024) मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या संशोधनाने शेतीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणार्या शास्त्रज्ञांच्या कार्यावर प्रकाश टाकला आहे. या ग्रंथात्मक लेखनाशिवाय विविध वृत्तपत्रे, नियतकालिके, ब्लॉग वगैरे माध्यमांतून डॉ. शिंदे हे सातत्याने लिहीत आहेत. विज्ञानातील संकल्पना, शोध, संशोधक वगैरेंची सुबोध मांडणी करीत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्यामध्ये डॉ. शिंदे हे महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत.
‘एककांचे इतर मानकरी’ (2023) हे त्यांचे पुस्तक अक्षरदालन प्रकाशन, कोल्हापूर यांनी प्रकाशित केले आहे. ‘एककांचे मानकरी’ या पुस्तकामध्ये समाविष्ट न झालेल्या इतर संशोधकांच्या जीवनकार्याची ओळख त्यांनी या पुस्तकामध्ये करून दिली आहे.
आपल्या लेखन प्रेरणेविषयी डॉ. शिंदे मनोगतामध्ये लिहितात की, “विद्यार्थी म्हणून भौतिकशास्त्राचा अभ्यास करताना काही राशींच्या मापन एककांना शास्त्रज्ञांची नावे दिलेली आढळली. त्या वेळी शास्त्रज्ञांच्या कार्याचे कुतूहलमिश्रित आश्चर्य वाटायचे. या शास्त्रज्ञांचे जीवनकार्य-संशोधन जाणून घेण्याच्या जिज्ञासेने पुढे त्यांच्याविषयी जे जे शक्य आहे, ते ते वाचले. तेव्हा लक्षात आले की, यांच्यातले सर्वच जण ‘कॉमनमॅन’ म्हणून जन्माला आले होते. त्यांच्यापैकी अनेक जणांची आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती. तिच्याशी ते झगडले आणि त्या परिस्थितीवर मात करून यशस्वी संशोधक झाले. हे सर्व कसे घडले व ते एककांचे मानकरी कसे झाले, हे मराठीतून विद्यार्थ्यांपुढे, समाजापुढे आणावे, या हेतूने ही पुस्तके लिहिली आहेत.” पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी म्हटले आहे की, “एकक हे जरी मध्यवर्ती सूत्र असले तरी विवेचनातून विज्ञानाचा इतिहास उलगडत जातो.”
पुस्तकामधील बावीस प्रकरणांमधून तेवीस शास्त्रज्ञांची संशोधनगाथा उलगडत जाते. डॉ. शिंदे यांनी प्रत्येक शास्त्रज्ञाच्या जीवनकार्याची मांडणी एका विशिष्ट पद्धतीने केली आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी, बालपण, शिक्षण, विज्ञानातील रुची, कारकिर्द, संशोधन, कष्ट, संघर्ष, वैज्ञानिक जगतातील योगदान, पुरस्कार, भौतिक राशीच्या एककास दिलेले त्यांचे नाव व त्याचे स्पष्टीकरण अशी मांडणी केली आहे. विज्ञानसंशोधनाची प्रक्रिया कशी घडत असते, वैज्ञानिकांच्या व्यक्तिमत्त्वाचे रसायन कसे असते, याचा प्रत्यय वाचकांना येथे येतो.
साधारणतः सोळाव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंतच्या पाचशे वर्षांच्या काळात युरोप-अमेरिकेमध्ये शास्त्रीय संशोधनाचे विज्ञानयुग कसे अवतरले, याचा एक व्यापक कालपट डॉ. शिंदे यांनी इथे साकारला आहे. पाश्चात्त्य देशामध्ये नवनव्या संशोधनासाठी धडपडणारे बुद्धिमान तरुण, सृष्टीची रचना, नियम समजून घेण्यासाठी त्यांना पडणारे प्रश्न, त्यांची जिज्ञासा, कुतूहल, त्यांनी केलेले नवनवीन प्रयोग, त्यासाठीचे प्रचंड कष्ट, यशापयशाचा संघर्ष, नव्या संकल्पनांची मांडणी करण्यासाठी शास्त्रीय पद्धतींचा विकास, वैज्ञानिक संशोधनास प्रोत्साहन देणार्या तेथील राज्यसत्ता, तत्कालीन सामाजिक धारणा, पारंपरिक समजुती, धर्मसंस्था व वैज्ञानिक जगत यांच्यात झालेला कडवा संघर्ष व अंतिमतः काळाच्या कसोटीवर वैज्ञानिक प्रमेयांचा झालेला विजय, विज्ञानयुगाच्या रोमहर्षक विकासाचे टप्पे, वैज्ञानिक प्रयोगशाळा, अॅकॅडमीज्, शोधनिबंधारित चर्चा, अशा असंख्य बाबींचे, घटना-प्रसंगांचे, कल्पना, संकल्पनांच्या उदयाचे, प्रयोग-परिश्रमाचे, यशापयशाचे व त्याच्या मानवजातीवरील परिणामांचे एक ऐतिहासिक कालचित्र साकारले आहे.
गेल्या पाचशे वर्षांमध्ये पाश्चात्त्य देशांमध्ये ज्या वेळी भौतिकशास्त्रांचा, रसायनशास्त्रांचा उदय होत होता, मानवजातीच्या जीवनात अभूतपूर्व बदल करणारे क्रांतिकारी संशोधन होत होते; नेमके त्याच वेळी आपल्या महाराष्ट्रात, भारतात काय घडत होते, याची सातत्याने तुलना होत राहते व पाश्चात्त्यांच्या प्रगतीची व भारतीयांच्या मागासलेपणाची मुळे कशी दडलेली आहेत, याचे एक भेदक विश्लेषण हाती येते. ते वाचकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालते. पंधराव्या-सोळाव्या शतकापासूनच्या पाश्चात्त्यांच्या व भारतीयांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक स्थितीचा व समाज मानसिकतेचा एक्स-रे काढण्यास हे पुस्तक प्रवृत्त करते व मानवी प्रगतीचे खरेखुरे तत्त्व-सूत्र समजून घेण्यासाठी अंतर्मुख करते, हे या पुस्तकाचे यश आहे.
विल्यम गिल्बर्ट (1544-1603) यांनी मध्ययुगीन धर्मसत्तेच्या प्रभावातील सरंजामी समाजव्यवस्थेमुळे प्रयोगावर आधारित विज्ञान संशोधनाचा पाया कसा रचला, याचा वेध डॉ. शिंदे यांनी घेतला आहे. सोळाव्या शतकात इंग्लंडसह युरोपियन देशांनी सागरी मोहिमा उघडून वासाहतिक साम्राज्यविस्ताराचा प्रारंभ केला होता. त्या वेळी नाविकांना, व्यापार्यांना दिशा समजण्यासाठी गिल्बर्ट यांनी सतरा वर्षे प्रयोग करून चुंबकसूची तयार केली. ‘दि मॅग्नेटी’ हा ग्रंथ लिहून चुंबकशास्त्राचा पाया घातला. ‘इलेक्ट्रिसिटी’ या शब्दाचा प्रथम वापर करून विद्युतशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात केली. विज्ञानाच्या मूलभूत संकल्पनांची मांडणी केली. त्यांच्या कार्याने विज्ञान संशोधनाची पद्धत बदलली. सोळाव्या शतकात निसर्गातील घटनांची कार्यकारणभावात्मक उकल करण्यासाठी शास्त्रीय प्रयोग करून विज्ञानयुगाची पायाभरणी करणारे गिल्बर्ट वाचताना, त्याच वेळी आपल्या देशात काय सुरू होते, याची आठवण तीव्र विषण्णता निर्माण करते.
वातावरणीय दाबमापी तयार करणारे टॉरिसेली (1608-1646), भौतिकशास्त्र, कीटकशास्त्र, पुनरुत्पादनशास्त्र, धातुशास्त्र, जीवशास्त्र आदी अभ्यासशास्त्रांचा पाया घालणारे रेऊमर (1683-1757), तापमापीचे संशोधक फॅरेनहाइट (1686-1736) यांची संशोधनाची आस, परिश्रम व शोधकार्य पाहून वाचक अचंबित होतो. समुद्रसपाटीचा हवेचा दाब संदर्भ धरून पहिला दाबमापक टॉरेसेलीने कसा तयार केला व त्याच्या कार्याचा गौरव म्हणून हवेच्या दाबाच्या एककास टॉर हे नाव कसे देण्यात आले, याची रंजक कहाणी कथन केली आहे. रेऊमर यांचा निसर्गातील प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती यांचा प्रचंड अभ्यास, कीटकांवरील सात खंडांचे लेखन, मधमाशांवरील संशोधन, अभ्यासासाठी विविध देशांतून जमा केलेल्या वनस्पती, प्राणी, कीटक, खडक वगैरेंचे उभारलेले संग्रहालय; नकाशे, आराखडे, सूची यांची निर्मिती, उद्योगांची सर्वेक्षणे, तापमापीची निर्मिती अशा अनेकविध संशोधनातून अठराव्या शतकातील विज्ञान-तंत्रज्ञानाच्या इतिहासात त्यांना विशेष स्थान कसे प्राप्त झाले, याचा परिचय डॉ. शिंदे यांनी करून दिला आहे. एका श्रीमंत व्यापारी कुटुंबात जन्मलेल्या डॅनियल फॅरनहाइट यांचे मन पारंपरिक व्यवसायात रमले नाही. ते विज्ञान संशोधनाकडे वळले. त्यांनी सात वर्षे काम करून तापमापी बनविली. आज वैद्यकीय क्षेत्रात फॅरहाइट तापमापी वापरली जाते. मानवी शरीराचे सामान्य तापमान हे 98.6 डिग्री फॅरेनहाइट असते. या तापमापीची जन्मकथा आपल्या ज्ञानात भर घालते.
गॅलिलिओ गॅलिली (1564-1642) या इटालिअन संशोधकाने आकाश निरीक्षणासाठी दुर्बीण तयार करून आपली निरीक्षणे मांडली. त्यांनी आठ पुस्तकांचे लेखन केले. ते लोकांना प्रत्यक्ष दुर्बिणीतून आकाशातील ग्रहतारे दाखवत. त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसू लागला. त्यांनी अॅरिस्टॉटल व टोलेमीचे म्हणणे चुकीचे आहे, हे सिद्ध करून कोपर्निकसच्या सिद्धांतास बळकटी दिली. चंद्र, गुरू, शनी, शुक्र या ग्रहांच्या निरीक्षणावर आधारित ‘दि स्टोरी मेसेंजर’ नावाचे पुस्तक लिहिले. सौर डागासंदर्भातील निरीक्षणावर ‘लेट्टर्स ऑन सनस्पॉट’ (1613) हे पुस्तक लिहिले. त्यांच्या कार्याने त्यांना अनेक शत्रू निर्माण झाले. त्यांच्याविरुद्ध चर्चकडे तक्रारी करण्यात आल्या. त्यांनी कोपर्निकसच्या सिद्धांतास शिकवू नये आणि त्याचा प्रसार करू नये अशी सक्त ताकीद देण्यात आली. त्यांच्या ‘दि डायलॉग’ या ग्रंथावर धर्मसत्तेने बंदी घातली. त्यांच्यावर खटला चालवून माफी मागण्यास भाग पाडले. त्यांना नजरकैदेत ठेवले. दुर्बिणीचा शोध, खगोलशास्त्रीय संशोधन आणि धर्मसत्तेबरोबरील संघर्ष यांमुळे जगभरामध्ये दंतकथेचा विषय बनलेल्या गॅलिलिओचा खगोलशास्त्रीय अभ्यास व धर्मसत्तेबरोबरचा संघर्ष हा सत्य व सत्ता यांच्यातील दीर्घकालीन संघर्षाचे प्रतीक म्हणून अजरामर झाला आहे. गॅलिलिओचा संघर्ष व संशोधन यांचे विलोभनीय शब्दचित्र डॉ. शिंदे यांनी रेखाटले आहे.
जर्मनीचा राजा फ्रेडरिक द ग्रेट यांचा लॅम्बर्ट या युवकाशी झालेला संवाद व युवकाचे काम पाहिल्यानंतर राजाने त्याच्याविषयी नोंदविलेले मत- ‘माणसाची नियुक्ती करताना त्याच्या बुद्धीचा विस्तार पाहायला हवा. त्याचे दिसणे, त्याचा पेहराव या बाबी महत्त्वाच्या नाहीत’- या प्रसंगाच्या वर्णनाने जोहान लॅम्बर्ट (1738-1777) यांच्यावरील प्रकरणाची सुरुवात होते. अत्यंत गरिबीत जन्मलेल्या व आयुष्यभर साधेपणाने राहिलेल्या लॅम्बर्ट यांनी हवामानशास्त्र, खगोलशास्त्र, सैद्धांतिक गणित, भूमिती, भौतिकशास्त्र अशा विविध क्षेत्रांत मौलिक संशोधन केले. त्यांच्या संशोधनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी डॉ. शिंदे यांनी प्रसिद्ध तत्त्वज्ञ कांटचे विधान उद्धृत केले आहे. कांट म्हणाले होते की, ‘जर लॅम्बर्ट यांचे कार्य दुर्लक्षित केले तर विज्ञानाचा पाया अनिश्चिततेवर उभा आहे, असे समजावे लागेल.’ परावर्तनाचा सिद्धांत अभ्यासण्यासाठी लॅम्बर्ट बर्लिनमधील एका कॅफेमध्ये आरशासमोर उभे राहून अनेक तास तलवार वेगवेगळ्या पद्धतीने फिरवीत राहिले होतेे. संशोधकाचे झपाटलेपण काय असते, याचा एक नमुना म्हणून ही घटना बोलकी आहे.
अणुवस्तुमानाचे संशोधक जॉन डॉल्टन (1776-1844) यांनी 1787 पासून ते मृत्यूपूर्वी तीन तास अगोदरपर्यंत आयुष्यभर अव्याहतपणे हवामानविषयक लेखी नोंदी घेतल्या. या नोंदी हवामान व पर्जन्यमानाच्या बदलाच्या अभ्यासासाठी ऐतिहासिक दस्तऐवज मानला जातो. रंगांधळेपणाचाही त्यांनी सखोल अभ्यास केला. या संदर्भात डॉ. शिंदे लिहितात, “डाल्टन स्वतःही रंगाधळे होते. सच्चा संशोधकाप्रमाणे त्यांनी आपल्या निधनानंतर डोळ्यांचा अभ्यास करावा आणि आपल्या निष्कर्षाची खात्री करावी असे सांगितले. त्यांचा एक डोळा रॉयल सोसायटीने जतन करून ठेवला होता. त्यातील डीएनएचा अभ्यास करण्यात आलाआणि डाल्टन यांना हिरवा रंग दिसत नव्हता आणित्यांचे निष्कर्ष अचूक होते हे सिद्ध झाले.” ‘केमिकल फिलॉसॉफी’ या ग्रंथातून त्यांनी रसायनशास्त्राशी जणू संकल्पनेसह नवी तत्त्वे सांगितली. अणुवस्तुमानाच्या एककास ‘डाल्टन’ हे नाव देण्यात आले. 1834 मध्ये मँचेस्टरच्या सिटी हॉलमध्ये त्यांचा पुतळा उभारण्यात आला. ‘ते पहिले संशोधक होते की, ज्यांचा हयात असताना पुतळा उभारण्यात आला’ असा गौरव डॉ. शिंदे यांनी केला आहे. आयुष्यभर प्रयोगशाळेत रमलेला हा संशोधक आजन्म अविवाहित राहिला. ‘लग्न करण्यासाठी माझ्याकडे वेळच नव्हता!’ असे ते म्हणत. त्यांच्या जीवनातील अनेक घटना व संशोधनकार्य यांचे चित्रण डॉ. शिंदे यांनी केले आहे.
हॅन्स ओरस्टेड (1777-1851) यांचा प्रवासदौरा, विज्ञान संशोधन, जाहीर व्याख्यानास तिकीट काढून श्रोत्यांची उपस्थिती, विद्युतचुंबकीय अभ्यास, चुंबकीय बलाचा शोध इत्यादींचा परिचय पुस्तकामध्ये येतो. चुंबकीयक्षेत्र मापनासाठी ओरेस्टेड हे एकक सीजीएस मापन पद्धतीत निश्चित करण्यात आले. त्यांच्या संशोधनाचे महत्त्व सांगताना डॉ. शिंदे लिहितात की, “आपले भौतिकशास्त्र या पुढे गती, उष्णता, हवा, प्रकाश, विद्युत, चुंबकीय बले आणि आणखी काही अशा तुकड्यांत विभागलेले नसेल तर सारे विश्व एकच पद्धतीत वसलेले आढळेल, असे सांगणार्या या महान संशोधकाने डिजिटल क्रांतीचा पाया घातला हे निश्चित!”
चुंबकीय अभिवाह घनतेचे संशोधक ओहान गॉस (1777-1855) यांचे गणितावरील विलक्षण प्रभुत्व, प्रचंड बुद्धिमत्ता, संख्याशास्त्राचा अभ्यास, बहुभुजाकृतीची निर्मिती, गणिताच्या आधारे अवकाशातील लघुग्रहांची स्थाननिश्चिती, ‘अंकगणिताचा शोध’ (1801) या ग्रंथाचे लेखन, अवकाशातील घटकांच्या गतीच्या सिद्धांतावरील ‘थिअरी ऑफ मोशन ऑफ सेलेस्टियल बॉडीज’ (1809) या ग्रंथाचे लेखन, वेधशाळेतील संशोधन, विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रातील संशोधन वगैरेंचा वेधक परामर्श डॉ. शिंदे यांनी घेतला आहे. द गॉस यांच्या मेंदूचे जतन करण्यात आले आहे, ही दुर्लभ माहिती त्यांनी दिली आहे.
चलद्रव्य विष्यंदितीचे संशोधक पॉइस्सेली (1797-1869), तरंगलांबीचे संशोधक अँडर्स अॅगस्ट्रॉम (1814-1874), द्रवगतिकीशास्त्राचा पाया घालणारे शास्त्रज्ञ जॉर्ज स्टोक्स (1819-1903), ऊर्जा अक्षय्यतेचा सिद्धांत मांडणारे विल्यम रॅन्कीन (1820-1872) आदी शास्त्रज्ञांची मोठी उद्बोधक व रोचक माहिती पुस्तकामध्ये येते. जॉर्ज स्टोक्स हे तर गणिताने इतके भारावलेले होते की, आपल्या भावी पत्नीला ते गणिती भाषेत पत्र लिहीत असत. एका पत्रात ते लिहितात, “माझे डोके अपसारी मालिकेप्रमाणे चालते. अनियंत्रित स्थिरतांची विफलता असावी तसे मन होते.” एकदा तर त्यांनी पंचावन्न पानांचे पत्र लिहिले, मात्र तेही असेच. शास्त्रज्ञांच्या जीवनातील अशा अनेक रंजक, विस्मयकारी गोष्टी या पुस्तकात आल्या आहेत.
जेम्स मॅक्सवेल (1831-1872) यांची चौकस बुद्धी, निसर्गातील घटनांबद्दल त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शिक्षकांना देता येत नसल्याने त्यांनाच मंदबुद्धी ठरविण्याचा प्रयत्न, केंब्रिज विद्यापीठाचे रँग्लर, महाविद्यालयाने ‘बिनकामाचे’ असा शेरा मारून नोकरीवरून काढून टाकलेला हा माणूस पुढे न्युटनचा वारसदार म्हणून प्रख्यात होतो, हा सारा थक्क करणारा प्रवास डॉ. शिंदे यांनी मांडला आहे. विद्युतचुंबकीय क्षेत्रातील मॅक्सवेल यांच्या चार सूत्रांनी आजच्या संदेशवहन तंत्रज्ञानाचा पाया घातला आहे. या चार सूत्रांचे स्पष्टीकरण डॉ. शिंदे यांनी दिले आहे.
प्रारणांचे उष्मावहन शोधणारे सॅम्युएल लँगले (1834-1906) यांचे आंतरविद्याशाखीय संशोधन, वेधशाळेचे संचालक म्हणून काम, प्रमाणवेळेच्या संकल्पनेची मांडणी, सौर डागांचा अभ्यास, सौर प्रारणांचा अभ्यास, हवेत उडणार्या पहिल्या विमानाचा प्रयोग अशा अनेक बाबींची माहिती त्यांच्या चरित्रातून पुढे येते व आपणांस अपरिचित असणारे विश्व व विशेषतः विमान उड्डाणासाठीचे प्रारंभीचे संशोधन ज्ञात होते.
आकाशाच्या निळ्या रंगाचे गूढ उकलणारे व ध्वनीच्या प्रवासाचे संशोधन करणारे शास्त्रज्ञ बॅरन रॅले (1842-1919) यांनी निष्क्रिय वायू अरगॉनचाही शोध लावला. त्यांना 1904 साली भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला. नोबेल पुरस्काराची रक्कम त्यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या प्रयोगशाळेच्या विस्तारीकरणासाठी दिली. सन 1900 मध्ये त्यांना रॉयल सोसायटीचे अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती करण्यात आली होती. तेव्हा त्यांनी सांगितले की, “आज मी विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात गरजेचा आहे. जेव्हा येथील माझी उपयुक्तता संपेल, तेव्हा हे पद मी अवश्य स्वीकारेन.” त्यांनी निधनापूर्वी पाच दिवस अगोदर एका शोधनिबंधाचे लेखन केले होते.
क्ष-किरणांचे संशोधक विल्यम राँटजन (1845-1923) यांच्या आयुष्यातील अनेक चढउतार, न केलेल्या चुकीसाठी शाळेतून काढून टाकले जाणे, शिक्षणाची आस, प्रयोगशाळेतील अखंड संशोधन, क्ष-किरणांचा शोध व त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास, क्ष-किरणांच्या आधारे पत्नी-बर्थाच्या- हाताचे पहिले छायाचित्र, क्ष-किरणांच्या संशोधनानंतर ‘आता सर्व दुःखे दूर होतील’ हे राँटजन यांचे उद्गार, भौतिकशास्त्राचा पहिला नोबेल पुरस्कार, क्ष-किरणांच्या संशोधनाचे स्वामित्व हक्क न घेता जगभरातील गरजूंना त्याचा फायदा व्हावा म्हणून ते मुक्त ठेवणारा मानवतेचा महान पुरसकर्ता अशा अनेक पैलूंनी त्यांचे लखलखते चरित्र वाचकांना प्रभावित करते.
हंगेरीत विज्ञान विश्वाचा पाया घालणारे लोरँड इव्टवोज (1848-1919) यांनी गुरुत्वीय प्रवणतेचा शोध घेतला. त्यांचे वडील हे त्यांचे सर्वांत जवळचे मित्र होते. निधनापूर्वी ते लोरँड यांना म्हणाले, “विज्ञानाची कास सोडू नये. राजकारणात कधीही पडू नये. हेच तुला आनंदी ठेवेल.” लोरँड यांनी गुरुत्वीय बलाच्या केलेल्या अभ्यासामुळे आईनस्टाइन यांच्या सापेक्षता सिद्धांताचा पाया घातला गेला, असे मानले जाते. त्यांच्या कार्याचा देशाला लाभ व्हावा, म्हणून त्यांना हंगेरीचे शिक्षणमंत्री नेमण्यात आले. त्यांच्या निधनानंतर बुडापेस्ट विद्यापीठाचे नामकरण ‘लोरँड इवट्वोज विद्यापीठ’ करण्यात आले. त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करताना डॉ. शिंदे लिहितात, “गुरुत्वीय प्रवणतेसाठी इवट्वोज या राशीच्या एककाच्या रूपात ते अजरामर झाले आहेत. विज्ञान संशोधनात मागास असलेल्या देशामध्ये विज्ञान शिक्षणाची खर्या अर्थाने सुरुवात करणारा शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी मनापासून प्रयत्न करणारा शिक्षणमंत्री, प्रसिद्धीपासून दूर राहून मूलभूत विषयावर संशोधन करणारा संशोधक अशी त्यांची बहुआयामी ओळख आहे.”
शिक्षणाच्या काळात अंधुकपणामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर मात करीत शिक्षण पूर्ण करून आयुष्यभर संशोधन करणारे, स्वतःची संशोधनाची पद्धती विकसित करणारे व तरंगांकांच्या कैसर या एककाच्या रूपाने अजरामर झालेले हेन्रिच कैसर (1853-1940) यांचेही चरित्रकार्य वाचनीय आहे.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना वडिलांचे निधन व आर्थिक परिस्थिती ढासळल्यामुळे शिष्यवृत्तीच्या जोरावर शिक्षण पूर्ण करीत पुढे थेट नोबेल पुरस्काराला गवसणी घालणारे जोसेफ जॉन थॉम्सन (1856-1940) यांचे चरित्र विद्यार्थ्यांसाठी विलक्षण प्रेरणादायी आहे. त्यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला व त्याबद्दल त्यांना 1906 साली नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. सार्वजनिक कार्यक्रमांना ते हजर राहत. ‘या कार्यक्रमातून समाजातील नवीन लोकांची ओळख होते आणि विज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. विज्ञानाच्या हितासाठी ज्येष्ठ वैज्ञानिकांनी अशा कार्यक्रमात सहभागी झाले पाहिजे’, असे त्यांचे मत होते.
पती-पत्नी आणि त्यांची मुलगी-जावई असे एकाच कुटुंबातील चौघाजणांनी नोबेल पुरस्कार मिळविण्याची असाधारण व दुर्मीळ अशी घटना ज्यांच्या बाबतीत घडली, त्या मारी आणि पिअरे क्युरी यांच्या चरित्राचा व किरणोत्सारावरील संशोधनाचा मोठा प्रेरक वेध डॉ. शिंदे यांनी घेतला आहे. पिअरे क्युरी (1859-1906) व मारी क्युरी (1867-1934) यांचे बालपण, कुटुंब, शिक्षण, त्यांचा परिचय व प्रेम, उभयतांचे संशोधनाचे वेड, एकमेकांना सायकली देऊन वाङ्निश्चय, विवाह, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केलेले संशोधन, पोलोनियम, रेडियम या नव्या मूलद्रव्यांचा शोध, रेडिअमच्या प्रारणांचा सजीवांवर होणार्या परिणामांचा अभ्यास, ‘क्युरी थेरपी’, रेडियमच्या संशोधनासाठी नोबेल पुरस्कार, किरणोत्साराचा अभ्यास, 1906 साली पिअरे यांचे अपघाती निधन, 1911 साली मारी यांना रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार, रेडियम इन्स्टिट्युटची स्थापना, किरणोत्साराच्या एककास ‘क्युरी’ हे नाव, पुढे मुलगी व जावई यांना नोबेल पुरस्कार असा क्युरी दांपत्याचा इतिहास डॉ. शिंदे यांनी उलगडला आहे.
‘जगाकडे चौकस बुद्धी आणि कुतूहलाने पाहणारा तरुण’ पुढे नोबेल पुरस्काराचा विजेता कसा होतो, याची कहाणी पीटर डिबॉय (1884-1966) यांच्या रूपात वाचायला मिळते. एकंदरीत पाहता, भौतिक राशीतील एककांच्या नावांच्या कूतूहलामधून सुरू झालेला हा प्रवास विज्ञानयुगाच्या प्रारंभापासून आजपर्यंतच्या सुमारे पाचशे वर्षांतील काही महत्त्वाच्या घटना-घटिते, संशोधन, संशोधक यांच्यावर प्रकाश टाकतो. या पुस्तकामध्ये सोळाव्या शतकापासूनची पाश्चात्त्य देशातील समाजस्थिती, मानसिकता, राजसत्तांचे संशोधनास प्रोत्साहन, नवीन संकल्पना, कल्पना यांचे स्वागत व त्यांना पाठिंबा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उदय व विकास वगैरेंचा एक व्यापक ऐतिहासिक पट उलगडत जातो. धर्मसत्ता, पारंपरिक मानसिकता यांच्याबरोबर कडवा संघर्ष करीत वैज्ञानिकांनी आपली निरीक्षणे, निष्कर्ष, संशोधन मांडीत व प्रसंगी त्याची किंमत चुकवत मानवजातीला कसे पुढे आणले, याचा एक चित्तथरारक आलेख साकारत जातो.
पाश्चात्त्य देशात प्रबोधनयुगामुळे विश्व/सृष्टी जाणून घेण्याच्या जाणिवांना धुमारे फुटले व त्याचा आविष्कार वेगवेगळ्या रूपांत झाला. त्याच्या वैज्ञानिक पैलूंचा परिचय या पुस्तकात करून दिला आहे. पाश्चात्त्य देशामध्ये पंधराव्या-सोळाव्या शतकापासून आधुनिक ज्ञानविज्ञान गणिताचे शिक्षण देणारी शिक्षणव्यवस्था, महाविद्यालये, विद्यापीठांची स्थापना व त्यांना प्रोत्साहन देण्याचे धोरण; संशोधनसंस्था, विद्यापीठे, सायन्स अॅकॅडमीज्, प्रयोगशाळा, वेधशाळा आदींची संस्थात्मक उभारणी, संशोधनासाठी प्रोत्साहन, अनुदान, अर्थसाहाय्य, अॅकॅडमीज्चे सदस्यत्व, फेलोशिप्स, शोधनिबंधांचे प्रकाशन, त्यावरील चर्चा, विद्यापीठादी संस्थांमधील प्राध्यापकपदी नियुक्ती वगैरे अनेक गोष्टींमधून एका वैज्ञानिक संस्कृतीची पायाभरणी व उभारणी कशी होत गेली, याचा एक ऐतिहासिक पट उलगडत जातो. आजच्या पाश्चात्त्य देशांच्या प्रगतीचे खरेखुरे मूळ कशामध्ये आहे, याचेही वस्तुनिष्ठ आकलन होते. गेल्या पाचशे वर्षांमध्ये विज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोनाचे नवे युग पश्चिमेकडे उदयास येत असताना, त्याच काळात महाराष्ट्रात, भारतात काय घडत होते, याचा तुलनात्मक अभ्यास केल्यास आपल्या मागासलेपणाची, पारतंत्र्याची, अधःपतनाची खरीखुरी कारणमीमांसा हाती येते. अशी मीमांसा करण्यासाठीचे सच्चेपण व नैतिक धैर्य आपल्याकडे आहे का? हाच खरा प्रश्न आहे. दांभिकता टाकून सत्याचा शोध व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करण्याशिवाय पर्याय नाही, हा खूप मोठा धडा हे पुस्तक आपणांस देते.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. प्रस्तुत पुस्तकातील शास्त्रज्ञांपैकी अनेक जण सामान्य परिस्थितीतून, बेताच्या आर्थिक स्थितीतून झगडत, संघर्ष करीत पुढे आले. पूर्णतः नवी स्वप्ने, नव्या कल्पना पाहणे व त्यांचा पडताळा घेण्यासाठी पराकोटीचे परिश्रम, कष्ट करीत संशोधन करणे हे त्यांचे असाधारण गुणविशेष होते. जिज्ञासा, कुतूहल, कल्पना, संकल्पना, निरीक्षणे, प्रयोग, पडताळणी, परिश्रम, संघर्ष, संशोधन या गुणांच्या बळावरच ते मानवजातीचा इतिहास बदलू शकले व स्वतःचाही इतिहास घडवू शकले. पाश्चात्त्य देशामध्ये शास्त्रज्ञांची जाहीर व्याख्याने तिकिटे लावून होत असत व काही शास्त्रज्ञ आपल्या संशोधनकार्यासाठी या माध्यमातून निधी संकलित करीत, ही गोष्ट आपल्या देशात अविश्वसनीय वाटावी अशीच आहे! ज्ञानविज्ञानाची एक संस्कृती असते आणि तिची शास्त्रीय पद्धतीने घडण करावी लागते. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ हे वचन वेगळ्या संदर्भाने इथे अधोरेखित करण्याचे कार्य प्रस्तुत पुस्तकातून घडते.
डॉ. शिंदे यांनी अभ्यासपूर्वक आणि परिश्रमपूर्वक हे पुस्तक सहेतुक लिहिले आहे. भौतिकशास्त्रातील संशोधन, राशी, त्यांची एकके, शास्त्रीय संज्ञा, त्यांची परिभाषा, सूत्रे, आकृत्या वगैरे बाबी सामान्य वाचकांना समजण्यास कठीण असतात. डॉ. शिंदे यांनी सोप्या, ओघवत्या, वाचनीय शैलीत लेखन करण्याचा प्रयत्न केला आहे. शास्त्रीय संज्ञा, संकल्पनांचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण केले आहे. शास्त्रज्ञांची दुर्मीळ छायाचित्रे, प्रयोग, प्रयोगशाळांची छायाचित्रे, आकृत्या वगैरे दृश्य प्रतिमांचा पुरेपूर वापर करून परिणामकारकता वाढविली आहे. ग्रंथाच्या शेवटी संदर्भसूची दिलेली आहे. त्यामुळे जिज्ञासू वाचकांना मूळ संदर्भाचा शोध घेणे शक्य होईल. शास्त्रीय संज्ञांची मराठी रूपे अधिकाधिक वापरली असून कंसामध्ये त्यांचे मूळ इंग्रजी रूप दिले आहे. त्यामुळे संदर्भ शोध तत्काळ होण्यास साहाय्य होते.
डॉ. शिंदे हे सातत्याने विज्ञानविषयक लेखन करून मराठीला ज्ञानभाषा बनविण्यामध्ये व विज्ञानाधिष्ठित समाज निर्माण करण्यामध्ये हातभार लावीत आहेत. विज्ञानविषयक अशा पुस्तकांमुळे मराठी विज्ञानसाहित्यामध्ये भर पडते. समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा व वैज्ञानिक माहितीचा प्रचार-प्रसार होतो. डॉ. शिंदे यांनी ‘एककांचे इतर मानकरी’ या पुस्तकाचे लेखन करून वैज्ञानिक अभिरुची, वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञानवृद्धी व वैज्ञानिक संस्कृतीची घडण करण्यास हातभार लावला आहे, हे नक्की! या पुस्तकातील काही लेख शालेय पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करण्याच्या योग्यतेचे आहेत. शाळेत व महाविद्यालयीन विद्यार्थी, स्पर्धा परीक्षार्थी, शिक्षक, संशोधक तसेच सर्व स्तरांतील वाचक यांनी स्वतःचे आणि आपल्या समाजाचे वर्तमान आणि भविष्य विज्ञानाच्या प्रकाशात घडविण्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे.
पुस्तकाचे नाव – एककांचे इतर मानकरी
लेखक – डॉ. व्ही. एन. शिंदे
प्रकाशक – अक्षरदालन प्रकाशन, कोल्हापूर
पृष्ठे – 266
मूल्य – रु. 400/-
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.