September 9, 2024
the-severity-of-the-cold-will-increase-manikrao-khule-report
Home » थंडीचा कडाका वाढणार
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

थंडीचा कडाका वाढणार

कशी असेल महाराष्ट्रातील थंडी?

           विदर्भातील संपूर्ण ११ व खान्देशातील ३ जिल्ह्यासह नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, हिंगोली, परभणी अश्या महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात सोमवार ( ता, १८ डिसेंबर) पासून दिवसाच्या थंडी बरोबर रात्रीच्याही थंडीतही वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ व उर्वरित दक्षिण महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर अश्या एकूण १४ जिल्ह्यात मात्र सध्या जाणवत असलेली थंडी ह्याच पातळीत टिकून राहू शकते. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मात्र तेथेही थंडी वाढेल, असे वाटते.

गुजरात किनारपट्टीबरोबरच मुंबई किनारपट्टीवरही ताशी १५ ते २० किमी वेगाचे वारे वाहतील. त्यामुळे मुंबईकरांनाही हलकेस्या का होईना पण बोचऱ्या थंडीला सामोरे जावे लागेल, असे वाटते.

महाराष्ट्रातील कमाल किमान तापमानांच्या नोंदी काय श्रेणीच्या असतील ?

विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान साधारण १२ ते १४ डिग्री सें. ग्रेड च्या आसपास तर दुपारचे कमाल तापमान २६ ते २८ डिग्री सें.ग्रेड च्या आसपास जाणवेल. ही दोन्हीही तापमाने  सरासरी तापमानापेक्षा एखाद्या डिग्री सें.ग्रेड खालावलेलीच आहेत. विदर्भातील पहाटेचे किमान तापमान हे १० ते १२ डिग्री सें.ग्रेड च्या आसपास जाणवेल, असे वाटते. एकंदरीत डिसेंबरच्या थंडीच्या मासिक भाकीतापेक्षा अधिक चांगली थंडी मुंबईसह महाराष्ट्राला उपभोगण्यास एकंदरीत मिळू शकते, असे वाटते.

पावसाची स्थिती काय असेल?

डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता जाणवत नाही.

महाराष्ट्रात कश्यामुळे थंडीची शक्यता निर्माण झाली?

उत्तर भारतात वायव्येकडून पूर्वेकडे मार्गस्थ होत असलेल्या पश्चिमी झंजावातांच्या साखळीतुन सध्या तेथे थंडी व बर्फ पडत आहे. उत्तरेकडून थंड वाऱ्यांच्या वहनानुकूलतेसाठी कमी दाब क्षेत्रेही सध्या मध्य प्रदेशसह महाराष्ट्रावर अस्तित्वात येत आहे. त्यामुळे मध्य प्रदेशाबरोबर जोरदार ईशान्यई थंड वारे महाराष्ट्राच्या भू-भागावर ओढले जाण्याची शक्यतेमुळे कडाक्याच्या थंडीचा प्रभाव ह्या भागात जाणवणार आहे. त्यामुळे डिसेंबरच्या महिन्यात पारा अधिक घसरणीमुळे होणारे महाराष्ट्रातील किमान तापमान सरासरी किंवा त्याखालची पातळी गाठू शकते, असे वाटते.

थंडीचा उत्तर भारतावर होणारा परिणाम कसा असेल?

उत्तर भारताचा संपूर्ण पट्टा सध्या धुक्याच्या चादरीत लपेटलेला आहे.  तेथील किमान तापमान सध्या ४ ते ८ सें.ग्रेड पर्यंत घसरले असुन  दृश्यमानता भागपरत्वे ५०० ते २०० मीटरच्या आत खालावली असुन रेल्वे व विमान वाहतुकीवर ह्याचा परिणाम जाणवत आहे. तरी देखील  पाऊस, बर्फ, थंडी, धुके  काहीसे जाणवत असले तरी उत्तर भारतातील हिवाळी पर्यटनास वातावरण ठीकच समजावे, असे वाटते.

रब्बी हंगामासाठी महाराष्ट्रात ह्या थंडीची उपयोगिता काय?

ह्या वर्षीच्या ‘एल-निनो’ मुळे ईशान्य मान्सून दक्षिण भारतातच १५ डिग्री अक्षवृत्तीय सीमारेषेदरम्यानच्या क्षेत्र मर्यादेतच कार्यरत राहिला. त्यामुळे महाराष्ट्रात आकाश ढगाळ वातावरण विरहित निरभ्र  राहिले. शिवाय ह्यावर्षी हिवाळी हंगामात शीत- लहरींची संख्याही दरवर्षीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. म्हणून एकत्रित ह्या सर्व पार्श्व भूमीवर सध्या डिसेंबर महिन्यात आपणास जी काही मिळत असलेली थंडी ही रब्बी हंगामासाठी नक्कीच पूरक व जमेचीच बाजू समजावी. कारण मागील वर्षी २०२२ला ह्याच दिवसात महाराष्ट्रातील डिसेंबरातील थंडी ‘मॅन-दौंस’ चक्री वादळामुळे हिरावली गेली होती. परंतु ‘ ला-निना ‘ होता म्हणून चांगल्या पर्ज्यन्यातुन रब्बी हंगाम तरला गेला.

केरळ तामिळनाडू राज्यात येते २-३ दिवस ईशान्य मान्सूनच्या हंगामातील शेवटच्या टप्प्यातील  पावसाची शक्यता अजुनही आहेच.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

नवदुर्गाः एव्हरेस्टवीर सुविधा कडलग

उंबळट : चकोटल्या चकोटल्या गोष्टी

अर्थसंकल्प 2022-23ः हवामहली व्हिजन डॉक्युमेंटच…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading