January 31, 2026
“MPKV Rahuri scientists demonstrating improved moong and urad varieties to farmers in the field.”
Home » स्वयंपूर्णतेच्या ध्येयाकडे : डाळींच्या वाढीला गती देण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रयत्न
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

स्वयंपूर्णतेच्या ध्येयाकडे : डाळींच्या वाढीला गती देण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रयत्न

गेल्या चार वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दिष्टाने महात्मा फुले कृषी विद्यापीठाने अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले. शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ व्हावी यासाठी मुख्य पिकात आंतरपीक म्हणून अल्प कालावधीत येणारी कडधान्य पिके — विशेषतः मूग व उडीद — प्रभावी पर्याय म्हणून पुढे आणली. या कडधान्यांच्या मुळांवरील रायझोबियम जीवाणूंच्या गाठी नत्र स्थिरीकरणास मदत करतात, ज्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते, तसेच सेंद्रिय कर्बवाढीसाठीही हे पीक अत्यंत उपयुक्त ठरते. विद्यापीठाने मोठ्या क्षेत्रांवर प्रात्यक्षिके घेऊन हे मॉडेल शेतकऱ्यांना दाखवून दिले.

डॉ. सुमेरसिंग राजपुत, कडधान्य पैदासकार

संपर्क – 9405138269

शेतकरी वर्गानेही या नव्या पद्धतींचा स्वीकार करत —

  • ऊस पिकात मूगाची आंतरपीक लागवड,
  • ऊसाच्या कापणीनंतर चिपाड्यात घन पद्धतीने मूगाची पुनर्लागवड

— अशा नवकल्पना आत्मसात केल्या. या पद्धतींमुळे जमीन नापीक होण्यापासून संरक्षण मिळाले.


राष्ट्रीय स्तरावर कौतुकास्पद मॉडेल

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली ही पिकपद्धती महाराष्ट्राबाहेरही पसरली असून, अनेक राज्यांतील शेतकऱ्यांनी ऊसपिकात कोणतेही रासायनिक खत न वापरता भरघोस उत्पादन मिळवले. रासायनिक खतावरील खर्चही वाचला आणि जमिनीची संरचना सुधारली.

स्वत: केंद्रीय कृषिमंत्र्यांनीही या यशस्वी प्रयोगांची पाहणी करून कौतुक केले. या मॉडेलचे मूळ प्रयोग रब्बी हंगाम 2024 मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमोद धोंडे पाटील (सडे, राहुरी) यांच्या शेतावर विद्यापीठाने राबवले होते.


कडधान्यांची वाढती मागणी – शेतकऱ्यांसाठी संधी

मूग व उडीद ही अल्प खर्चात येणारी, प्रथिनांनी समृद्ध अशी पिके जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असलेली आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातील शेतकरी या पिकांकडे जलद गतीने वळताना दिसतात.

गेल्या दोन वर्षांत —

  • उन्हाळी मूग लागवडीचा मोठा ट्रेंड तयार झाला असून प्रति एकर 5 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत आहे.
  • पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाळी उडीदाचाही मोठा विस्तार झाला असून प्रति एकर 5 क्विंटल उत्पादनाची नोंद आहे.

बाजारातील किंमतीत चढउतार असला तरी उडीद व तूर या कडधान्यांना देशांतर्गत मोठी मागणी असल्याने किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त भावाने खरेदी होते.


नवीन जातींचा विकास – शेतकऱ्यांसाठी वरदान

महात्मा फुले कृषी विद्यापीठ सातत्याने संशोधन करून जलद पिकणाऱ्या, कोरडवाहू प्रतिकूल हवामान सहन करणाऱ्या, उच्च उत्पादनक्षम कडधान्यांच्या जाती विकसित करत आहे.

गेल्या चार वर्षांत मूग, उडीद, तूर, चवळी, राजमा, हरभरा या पिकांत विद्यापीठाने विकसित केलेल्या अनेक जातींना केंद्रीय समितीने मान्यता दिली आहे.

मूगातील नवीन वाण

  • फुले चेतक (2021)
  • फुले सुवर्ण (2024) – खरीप 2025 साठी फक्त 52–55 दिवसांत तयार होणारी, प्रति एकर 4 क्विंटल उत्पादन देणारी, भुरी रोगास प्रतिकारक्षम जात.
    • फोटो–पीरियड इन्सेन्सिटिव्ह असल्याने भारतभर पेरणीस योग्य.
    • अखिल भारतीय कडधान्य संशोधन प्रकल्प (IIPR, कानपूर) येथील वैज्ञानिकांनीही या जातीची बियाण्यांसाठी मागणी दाखल केली आहे.

उडीदातील नवीन वाण

  • फुले वसू (2023)
  • फुले राजन (2024)
    ही दोन्ही वाण महाराष्ट्रासाठी अधिकृतरीत्या शिफारस केलेली आहेत.

IIPR चे प्रकल्प समन्वयक डॉ. आदित्य प्रताप यांनी 12 नोव्हेंबर 2025 च्या ग्रुप मीटिंगमध्ये विद्यापीठाच्या संशोधनाचे विशेष कौतुक केले.


बियाणे उपलब्धतेसाठी प्रभावी यंत्रणा

नवनवीन जाती त्वरित आणि पुरेशा प्रमाणात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून विद्यापीठाने —

  • महाबीज,
  • विविध फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स (FPOs)

यांच्यासोबत कायदेशीर समझोते (MOU) करून मूलभूत बियाण्यांपासून मोठ्या प्रमाणात बीजोत्पादन प्लॉट्स उभारले. परिणामी, मूग व उडीदाच्या नवीन वाणांचे प्रमाणित बियाणे शेतकऱ्यांना सहज उपलब्ध झाले.


महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे हे सातत्यपूर्ण आणि दूरदृष्टीचे प्रयत्न —

  • शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे,
  • जमिनीची सुपीकता जपणे,
  • रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करणे,
  • कडधान्य स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

— या सर्व दिशांनी क्रांतिकारी ठरत आहेत. आज महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर या नवीन वाणांचा अवलंब करत असून कडधान्याच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

रब्बी मका अन् ज्वारीसाठी पीक सल्ला…

उन्नी लागली पिकाला !

सेंद्रीय शेतीतून घडेल, निरोगी विकसित भारत !

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading