November 22, 2024
Recognize the importance of water oxygen in life and prevent pollution 
Home » पाण्याचे, ऑक्सिजनचे जीवनातील महत्त्व ओळखा अन् प्रदुषण रोखा 
विश्वाचे आर्त

पाण्याचे, ऑक्सिजनचे जीवनातील महत्त्व ओळखा अन् प्रदुषण रोखा 

पाण्याचे प्रदूषण होणार नाही याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. नद्यांचे प्रदूषण वाढले आहे. काही शहरात वाहणाऱ्या नद्या ह्या नद्या आहेत की गटारे हे सांगणेही आता कठीण झाले आहे. नदीची गटारगंगा व्हावी ह्याइतके दुर्दैव दुसरे कोणते असू शकेल ? जीवनासाठी आवश्यक घटकांकडे दुर्लक्ष झाले तर जीवनच नष्ट होईल याचा विचार करण्याची गरज आहे. यासाठी संयुक्त लढा, प्रबोधनाची गरज आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

नगरेचिं रचावीं । जळाशयें निर्मावीं ।
महावनें लावावीं । नानाविधें ।। 233 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा

ओवीचा अर्थ – शहरेच वसवावीत, जलाशय वैगरे पाण्याचे साठे बांधावेत, नाना प्रकारचे मोठे बगीचे लावावेत.

पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. देह हा विविध पेशींनी तयार झाला आहे. पाण्यामुळे शरीरातील या पेशी जिवंत राहतात. पेशींची संख्या कमी जास्त झाली तर देहावर याचा परिणाम होतो. जीवन प्रवासच संपतो. यासाठी प्रत्येक सजीवासाठी पाणी हा आवश्यक घटक आहे. पृथ्वीवर पाणी आहे म्हणूनच तर येथे जीवसृष्टी आहे. इतर गृहावर जीवसृष्टी आहे का नाही हे पाहण्यासाठी तेथे पाणी आहे का हे प्रथम तपासले जाते. मंगळावर पाणी आढळल्याचा दावा केला जातो. पाणी असेल तर तेथे निश्चितच जीव असणार. पण पृथ्वी वगळता इतर कोठेही पाणी नाही.

पाणी म्हणजे काय? तर एचटुओ. दोन हायड्रोजनची संयुगे व एक ऑक्सिजन मिळून पाणी तयार होते. यातील ऑक्सिजनच महत्त्वाचा आहे. हा प्राणवायू आहे. श्वास घेतो व सोडतो म्हणजे आपण नेमके काय करतो ? ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि कार्बनडायऑक्साईड बाहेर सोडतो. श्वास हा प्राणवायू आहे. श्वास आहे तर आपण जिवंत नाहीतर देह दगड. श्वासोच्छवासाची क्रिया थांबली की जीवन संपते. देहात श्वास येतो आणि बाहेर जातो. आत्मा असेपर्यंत ही क्रिया सुरू राहते. या देहातून आत्मा बाहेर पडला की ही क्रिया थांबते.

आत्मज्ञान प्राप्तीच्या क्रियेत देह हा वायुरुप होतो. या क्रियेत एकटा प्राणवायू उरतो. यातूनच शक्ती जागृत होते. ऑक्सिजनची देहाला गरज आहे. हा ऑक्सिजन श्वासोच्छवासाव्यतिरिक्त पाण्यावाटेही त्याला मिळतो. शरीरातील पेशीतून तो मिळतो. सध्या प्रदूषण वाढले आहे. हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे आपणास विविध आजार होत आहेत. प्रदूषणमुक्तीसाठी आपण लढा उभारतो आहोत. जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी पर्यावरणाचा समतोल ढळू न देणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी आवश्यक उपाययोजनांची गरज आहे.

जीवनात पाण्याचे, ऑक्सिजनचे महत्त्व आहे. हवेचे व पाण्याचे प्रदूषण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. पाणी आहे तरच विकास आहे. घर बांधले पण पाणी नसेल तर तेथे राहणार कसे ? पाणी आहे तेथेच वस्ती वसते. पाणी नाही त्या वाळवंटात कोणी राहू शकत नाही. नदीपात्रात डोह आहेत त्या ठिकाणी पूर्वी वस्ती उभी राहिली. डोंगरावर, उंच पठारावर पाणी जिथे सापडले तेथे वसाहती निर्माण झाल्या. पाणी असेल तरच शेतकरी पिके घेऊ शकेल ना? पाण्याचे साठे करण्यासाठीच धरणे, जलाशये बांधली गेली. विहिरी, कूपनलिका खोदल्या गेल्या. पाऊस पडला तरच पिके येऊ शकतात. अन्यथा उत्पन्न मिळणार नाही.

पावसाचे पाणी जमिनीत मुरवले तरच विहिरी, कूपनलिकांना पाणी येईल. पाणी असेल तरच बागायती शेती करता येईल. अन्यथा पावसावर जितकी पिके घेता येतील तितकीच पिके घेणे शक्य होईल. इस्राईलमध्ये खूपच कमी पाऊस पडतो. पण तेथे शेतीचे उत्पन्न आपल्यापेक्षाही अधिक होते. कमी पाण्यावर जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येते. याचे तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले. पाण्याचा योग्य वापर केला तर ते शक्य आहे. आपल्याकडे पाऊस मुबलक पडतो पण नियोजन नसल्याने भरघोस उत्पादन होत नाही. गरजेपेक्षा अधिक मिळाले की दुर्लक्ष होते. यात नुकसान होते.

गरजेपेक्षा कमी किंवा आवश्यक तेवढेच मिळाले तर त्याचा वापर योग्य प्रकारे केला जातो. काटकसर, बचत करण्याची सवय लागते. पावसाचे पाणी वर्षभर पुरविता यावे, यासाठी ते साठविणे गरजेचे आहे. शेतीचा विकास साधण्यासाठी पाणी ही मुख्य गरज आहे. विहीर खोदणे, कूपनलिका खोदणे किंवा शेततळे उभारणे ही गरज आहे. पावसाच्या पाण्यावर फक्त खरीप पिके घेता येणे शक्य आहे. बारमाही पिकांसाठी पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी लागते. सध्या शेततळ्याचा वापर करून शेतीतील पाण्याचा प्रश्न मिटवला जात आहे.

ग्रीनहाऊस हे तंत्रज्ञान आता अनेक ठिकाणी वापरले जाऊ लागले आहे. पूर्वी पावसाचे पाणी शेतात पडत होते. ते जमिनीत मुरत होते. भूजलपातळी वाढली जात होती. पण आता ग्रीनहाऊसमुळे पाणी थेट जमिनीत मुरत नाही. ते शेतात पडतच नाही. यासाठी आता पाणी जमिनीत मुरवण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज भासू लागली आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग हे नवे तंत्र नव्या तंत्राने शेती करणाऱ्यांनी वापरणे गरजेचे आहे. इस्राईलमध्ये पाऊस कमी पडतो त्यामुळे तेथे या तंत्राची सक्ती आहे.

आपल्याकडे पाऊस मुबलक पडत असल्याने याकडे दुर्लक्ष केले जाते. तसे होता कामा नये. भूजलपातळी घटण्याची ही प्रमुख कारणे आहेत. मोठमोठ्या वसाहती उभ्या राहिल्या. या वसाहतीमध्ये चिखल होऊ नये, घाण होऊ नये यासाठी जमिनीवर फरशा बसविल्या. स्वच्छता राखण्यासाठी ही सोय केली पण यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याची क्रिया थांबली. भूजलसाठे घटले. प्रदूषित झाले. यासाठी मोठ्या वसाहतीमध्ये आता रेन वॉटर हार्वेस्टिंगची गरज आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरावे यासाठीच्या उपाययोजनांची सक्ती हवी.

पाण्याचे प्रदूषण होणार नाही याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. नद्यांचे प्रदूषण वाढले आहे. काही शहरात वाहणाऱ्या नद्या ह्या नद्या आहेत की गटारे हे सांगणेही आता कठीण झाले आहे. नदीची गटारगंगा व्हावी ह्याइतके दुर्दैव दुसरे कोणते असू शकेल ? जीवनासाठी आवश्यक घटकांकडे दुर्लक्ष झाले तर जीवनच नष्ट होईल याचा विचार करण्याची गरज आहे. यासाठी संयुक्त लढा, प्रबोधनाची गरज आहे. प्रत्येकाने कर्तव्य म्हणून जीवनात तसा बदल करण्याची गरज आहे. प्रत्येकाने पाणी आणि हवा शुद्ध ठेवण्याचा संकल्प केला आणि त्यानुसार जीवन जगण्याचा निर्धार केला तर ते शक्य आहे.

माणसाने काही सवयी लावून घेण्याची गरज आहे. आज नको उद्या बघू असे म्हणत पिढ्यानपिढ्या याकडे दुर्लक्ष होत आहे. आता याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अशी स्थिती उत्पन्न झाली आहे. प्रदूषण कमी करणे ही संयुक्तिक जबाबदारी आहे. हवा शुद्ध ठेवण्यासाठी झाडे लावण्याची गरज आहे. हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य राखण्यासाठी, शुद्ध ऑक्सिजनसाठी प्रयत्न करायला हवेत. शुद्ध हवा आत घेण्यासाठी परिसर शुद्ध ठेवणे हे याचसाठी गरजेचे आहे. श्वासावर नियंत्रण हाच आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग आहे. स्वतःच्या कानांनी श्वास ऐकणे हीच साधना आहे. मनाने ऐकल्याने, एकाग्रता वाढविल्याने आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग सुकर होतो.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading