रेंदाळ ( जि. कोल्हापूर ) – येथील कविवर्य ए. पां. रेंदाळकर वाचनालयाच्या वतीने 2024 चे विविध साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले.
वाचनालयाच्या वतीने कोल्हापूर परिसरातील ज्येष्ठ आणि उल्लेखनीय अशा दोन लेखकांचा त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल सन्मान करण्यात येतो. यावर्षी ज्येष्ठ लेखक वसंत खोत ( कोल्हापूर ) आणि नव्या पिढीतील आश्वासक लेखक मारुती मांगोरे ( करंजफेन, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर ) या दोघांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय स्थानिक कवी महंमद नाईकवाडे ( रेंदाळ ) यांनाही त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.
वसंत खोत ( जन्मः1959 ) यांनी कथा, कादंबरी आणि अनुवाद अशा प्रकारांत संख्येने मोजकेच पण लक्षणीय असे लेखन केलेले आहे. त्यांचे आतापर्यंत सात ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. खोत यांचे ‘कृष्णछाया’ (2006) हा कथासंग्रह, ‘दाह’ (1992) ही कादंबरी तर , ‘भुईभिंगरी’ (2021) हे स्वकथन विशेष प्रसिद्ध आहे. याबरोबरच ‘खरे सुख व इतर कथा’ (2014) हा लियो टॉलस्टायच्या कथांचा अनुवाद, ‘महाकवी कालिदासांची नाटके’ (2010), ‘मानवतेचे उपासक’ (2007) इ. इतर ग्रंथ प्रकाशित आहेत.
मारुती मांगोरे ( जन्मः 1969 ) हे नव्वदीनंतरच्या कालखंडातील कथा व कादंबरी या प्रकारांतील महत्त्वाचे आणि एक आश्वासक नाव. ‘वंदोस’ (2011) कथासंग्रह आणि ‘मांजरखिंड’ (2024) कादंबरी, ही त्यांची विशेष चर्चित दोन पुस्तके. याबरोबरच ‘व्याकुळ धरणी’ (1999) आणि ‘गणगोत ‘ (2014) हे त्यांचे कवितासंग्रहही प्रकाशित आहेत.
महंमद नाईकवाडे (1958) यांचे शिक्षण इयत्ता सहावीपर्यंत झाले असून ते यंत्रमागावर मजूरीकाम करतात. त्यांनी विपुल प्रमाणात काव्यलेखन केले असून आतापर्यंत ‘आमराई’, ‘जाच’, ‘गावरान’, ‘वेदना’ आणि ‘माझा गाव माझी गाणी’ हे त्यांचे पाच कवितासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांचे ‘चांगभलं रे जोतिर्लिंगा’, ‘गजर जोतिबाचा’ या ध्वनिमुद्रिकांबरोबरच लावण्या, पोवाडे असे विविधांगी लेखनही प्रकाशित आहे.
सन 2024 च्या ग्रंथ पुरस्कारांसाठी कविता या प्रकारातील पुरस्कार विलास माळी ( गडहिंग्लज, जि. कोल्हापूर ) यांच्या ‘झांझरझाप’ ( कॉपर कॉईन प्रकाशन, दिल्ली ) या कवितासंग्रहास जाहीर झाला आहे. ‘कादंबरी’ या प्रकारासाठीचा पुरस्कार स्मिता पाटील ( मोहोळ, जि. सोलापूर ) यांच्या ‘मातीला पंख फुटताना’ ( दिलीपराज प्रकाशन, पुणे ) या कादंबरीस, तर कथासंग्रहासाठीचा पुरस्कार द. तु. पाटील ( बेळगाव ) यांच्या ‘शेतसरी’ ( मौज प्रकाशन, मुंबई ) या ग्रंथाला जाहीर करण्यात आला आहे. रोख रक्कम रुपये पाच हजार आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील सुमारे सत्तरहून अधिक लेखक- कवींनी आपली पुस्तके पाठविली होती.
या पुरस्कार निवड समितीत डॉ. रफीक सूरज, डॉ. गिरीश मोरे आणि डॉ. गोपाळ महामुनी यांनी काम पाहिले, अशी माहिती वाचनालयाचे विद्यमान अध्यक्ष आर. जी. पाटील यांनी दिली आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
