September 8, 2024
Sant Vich Constitution is something to be proud of Ajay Kandar Speech
Home » संत विचार आणि संविधान ही अभिमानाने मिरवण्याची गोष्ट
काय चाललयं अवतीभवती

संत विचार आणि संविधान ही अभिमानाने मिरवण्याची गोष्ट

  • ‘संत साहित्य आणि संविधान’ व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन
  • माणगांव येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात वारकऱ्यांचेही रिंगण

कणकवली – पायांनी होतो तो प्रवास आणि हृदयाने होते ती वारी. मात्र हृदयापासून समजून घेतलं तरच संविधानची महानता आपल्याला कळू शकते. संत साहित्याने जी समतेची शिकवण दिली तीच मूल्ये संविधानामध्ये असून संत विचार आणि आपल्या देशाचे संविधान ही अभिमानाने मिरवण्याची गोष्ट आहे, असे प्रतिपादन नामवंत कवी तथा स्तंभ लेखक अजय कांडर यांनी माणगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘संत साहित्य आणि संविधान ‘ या व्याख्यानात केले.

यसार सोशल फाउंडेशनतर्फे आषाढी एकादशीच्या निमित्ताने “आम्ही संविधान आम्ही वारकरी’ या अनोख्या उपक्रमानिमित्त माणगाव हायस्कूलच्या सभागृहात कवी अजय कांडर यांचे ‘संत साहित्य आणि संविधान’ या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सगुण धुरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या व्याख्यानात बोलताना कवी कांडर यांनी कस वागा हे सांगितल जात त्याला बंधन म्हणतात.

नियमाच्या चौकटीत राहून जगणं म्हणजे कायदा व एकमेकांना समजून घेऊन बंधुभावाने पुढे जात रहाणं म्हणजे संविधानाच आचरण होय असेही आग्रहाने सांगितले. यावेळी वेंगुर्ले येथील शिक्षण संस्था चालक इर्शाद शेख, कोरो इंडियाचे अमोल पाटील, यसार फाउंडेशनचे संस्था प्रमुख सत्यवान तेंडोलकर, प्रा. वासंती परुळेकर, सायली नारकर, आनंद परुळेकर, श्री पिळणकर, कृष्णा सावंत, श्री, गोसावी, किरण मुंज, बाळा परब, बाबुराव चव्हाण, रामा चव्हाण शेखर धुरी आदी उपस्थित होते.

दुदैवाने संत साहित्य आणि संविधान याबद्दल एकूण समाज फारच अडाणी असल्यामुळे आपल्यातील प्रेम भावनाच नाहीशी झाली आहे. प्रेम वाढीसाठी संत साहित्य उपयोगी येते. त्याचप्रमाणे संविधानाचाही अभ्यास उपयोगी येत असतो.

अजय कांडर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला दिले. बाबासाहेब बुद्ध विचाराकडे वळले. त्यातून समतेकडेही ते वळले. आज जो समतेचा पाढा गाईला जातो त्यामागे संत साहित्य सारखेच संविधानाचे मोठे योगदान आहे. बाबासाहेबांनी पंढरपूर विठ्ठलाची मूर्ती ही बुद्धमूर्ती असल्याचे संशोधन केले, आणि त्याचा संदर्भ आपल्याला संत साहित्यातही मिळतो. अंधश्रद्धा, भोंदूगिरीविरोधात साडेसातशे वर्षांपूर्वी वारकरी संतांनी पहिली आरोळी पंढरपूरच्या वाळवंटात ठोकली. नामदेव, ज्ञानदेवांपासून ते वारकरी संप्रदायाचा कळस म्हणून ओळखल्या गेलेल्या संत तुकाराम महाराजांपर्यंत आणि संत जनाबाईंपासून ते बहिणाबाई पाठक यांच्यापर्यंत वारकरी स्त्री-पुरुष संतांनी समाजातील कुप्रथांवर प्रहार केले. या वाटचालीमध्ये स्त्री संतांची भूमिका अधिक धिटाईची दिसते. त्यांना सामाजिक विषमतेचे चटके बसलेले होते, तसेच स्त्री म्हणूनही दुय्यम वागणूक दिली जात होती. त्याचे प्रतिबिंब स्री संतांच्या साहित्यात उमटल्याचे दिसून येते, असेही कांडर म्हणाले.

महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा भक्कम वारसा असून तो अधिक मजबूत करण्यात वारकरी संतांचे योगदान मोठे आहे; किंबहुना ज्यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धेच्या दलदलीत रुतून बसला होता, जातिव्यवस्थेच्या रेट्याखाली चिरडला जात होता, त्याच काळात वारकरी चवळवळीने अधिक आक्रमक होत त्याच्याविरोधात जागरण केले. सामाजिक समता आणि अंधश्रद्धामुक्त समाज हेच वारकरी संप्रदायाचे मूळ उद्दिष्ट आहे. अंधश्रद्धेच्या अधीन गेलेल्या समाजाला जागृत करण्यासाठी ज्ञानोबांपासून तुकोबांपर्यंत आणि जनाबाईपासून बहिणाबाईंपर्यंत सर्वांनीच प्रयत्न केले, असेही कांडर म्हणाले.

यावेळी सगुण धुरी, इर्शाद शेख सत्यवान तेंडोलकर,यांनीही विचार व्यक्त केले. स्वागत सायली नारकर, कृष्णा सावंत यांनी केले. सूत्रसंचालन महेश पास्ते यांनी केले तर प्रस्ताविक वासंती परुळेकर यांनी केले.

वारकऱ्यांचे रिंगण

या कार्यक्रमात व्याख्यानानंतर कार्यक्रमात सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी रिंगण करून काही अभंग सादर केले. त्यात उपस्थित आबालवृद्ध सहभागी झाले होते. तर मुलानी संतांची वेशभूषा करून संतांच्या प्रतिमेचे उपस्थितांना दर्शन घडविले.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मुर्झाच्या संमेलनात झाडीबोलीचा जागर

ज्ञानरुपी तलवारीने छेदा अज्ञान

खोबऱ्यास प्रति क्विंटल 10 हजार 590 रुपये किमान आधारभूत किंमत

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading