November 30, 2022
Nitin Gadkari Comment on Farmer in Sangli
Home » शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे – नितीन गडकरी
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास सत्ता संघर्ष

शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे – नितीन गडकरी

शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे, असं केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

आपल्या देशातला शेतकरी पेट्रोल-डिझेलचा , ऊर्जेचा पर्याय देण्यास सक्षम असून शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. गडकरी यांच्या हस्ते आज सांगली आणि सोलापूर शहरांना रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्गाशी जोडणाऱ्या बोरगाव – वाटंबरे राष्ट्रीय महामार्ग 166 आणि सानंद जत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 165 या दोन महामार्गांचे आज लोकार्पण करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जयंत पाटील ,जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य , दत्तात्रय भारणे ,सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य आणि डॉ. विश्वजित कदम सहकार ,कृषी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि खासदार संजयकाका पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते.

येणाऱ्या काळात साखरेऐवजी इथेनॉल आणि बगासपासून बिटूमीन बनवायला प्राधान्य द्यायला हवे,असे सांगत गडकरी पुढे म्हणाले की,बिट्यूमिनचे रस्ते आता आम्ही तयार करत असून पुण्याच्या प्राज इंडस्ट्रीने उसाच्या चिपाडापासून आणि बायोमासपासून बायो -बिट्यूमिन तयार केलं आहे. येणारा काळ बिट्यूमिनचा असून राष्ट्रीय महामार्गांच्या बांधणीत ते अनिवार्य करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

सांगली जिल्ह्यातल्या सर्व वस्तू थेट निर्यात करता याव्यात यासाठी सांगली जिल्हावासीयांची मागणी असेले ड्राय पोर्ट उभारण्याबरोबर सॅटेलाईट पोर्ट तसेच लॉजिस्टिक पार्क बांधण्याची केंद्र सरकारची तयारी असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

सध्या केंद्रसरकार देशभरात जवळपास २ लाख कोटी रुपयांचे लॉजिस्टिक पार्क आणि सॅटेलाईट पोर्ट बांधत आहे. जालना,नाशिक यांचा त्यात समावेश असून वर्ध्यातील प्रकल्प पूर्ण झाला आहे. सांगलीतला प्रस्तावही तेव्हा तयार करण्यात आला होता.

सांगली जिल्ह्यात रांजणी इथे जवळपास दोन हजार एकर जागा उपलब्ध आहे. केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारे यासाठी सामंजस्य करार करू, असे गडकरी यांनी यावेळी सुचवले. या लॉजिस्टिक पार्कमध्ये कुठलेही मोठे विमान उतरू शकेल असा साडे तीन किलोमीटरचा रस्ता बांधण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. या प्रस्तावित प्रकल्पामुळे विमानतळ, लॉजिस्टिक पार्क, प्री कुलिंग प्लांट, शीतगृह आणि थेट आयात-निर्यातीची व्यवस्था सांगलीच्या अर्थव्यवस्थेला फायद्याची होईल , असा प्रस्ताव गडकरी यांनी यावेळी राज्य सरकारच्या उपस्थित मंत्र्यांपुढे मांडला . राज्य सरकारने केवळ जागा उपलब्ध करून द्यावी, निधी उपलब्ध करून देण्याची केंद्र सरकारची तयार आहे, असे ते म्हणाले.

येणाऱ्या काळात Public Transportation on Electricity ही संकल्पना राबवून 12 हजार कोटी रुपये खर्चाचा पुणे -वाघोली – शिरूर या एकाच मार्गावर,खाली 8 पदरी रस्ता ,वर 6 मार्गीकेचे दोन पूल आणि त्यावर विजेवर आधारित सार्वजनिक वाहतूक सेवा असा प्रकल्प राबविणार अशी माहिती गडकरी यांनी दिली

यावेळी गडकरी यांनी पुणे ते बंगळूरू दरम्यान बांधल्या जात असलेल्या नव्या राष्ट्रीय महामार्गाविषयी सांगितले. 699 किलोमीटर लांबीचा हा संपूर्ण हरित महामार्ग असून तो सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मागास भागातून जाणार आहे ज्याचा त्या भागाच्या विकासासाठी फायदा होईल,असे ते म्हणाले

बोरगाव – वाटंबरे या मार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले आहे तर सांगोला – सानंद- जत या मार्गाचे पुनर्वसन उन्नतीकरण करण्यात आले आहे. 99.76 किलोमीटर एकूण लांबी असलेल्या या महामार्ग प्रकल्पांसाठी 2,334 कोटी रुपये खर्च आला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक या आंतरराज्य वाहतूकीसाठी सुलभ आणि सांगली आणि सोलापूरमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या जोडणीशी संबंधित चौपदरीकरण/सहापदरीकरणाची विविध कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर सोपवली आहेत. अर्थसंकल्पीय तरतुदीच्या माध्यमातून सार्वजनिक-खासगी भागीदारीद्वारे राष्ट्रीय महामार्ग अद्ययावत करण्याचे काम एनएचएआयकडून हाती घेण्यात आले. भारतमाला प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्ग १६६ च्या सांगली ते सोलापूरमधील भागाचे काम एनएचएआयद्वारे एचएएम पद्धतीने हाती घेण्यात आले.

राष्ट्रीय महामार्ग १६६ चा हा सोलापूर शहरातून जाणारा भाग रत्नागिरी ते नागपूर महामार्गावरील दळणवळणाचा महत्त्वाचा दुवा आहे. राष्ट्रीय महामार्ग ३६१ द्वारे तो नागपूरपर्यंत विस्तारित आहे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ असा पूर्व-पश्चिम जोडणारा, सर्वात महत्त्वाचा आणि कमी अंतराचा, महाराष्ट्रातल्या ११ जिल्ह्यातून जाणारा महत्त्वाचा आणि जवळचा दुवा आहे.

महाराष्ट्रातले सांगली ही हळदीची राजधानी म्हणून ओळखले जाते. अनेक साखर कारखाने इथे आहेत. सांगोला आणि जतला ऐतिहासिक महत्त्व आहे. सांगोला डाळिंब उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्ह्यात देशातील सर्वाधिक साखर कारखाने आहेत. आगामी काळात इथल्या रस्ते वाहतुकीत प्रचंड वाढ होणार आहे. यामुळे कोल्हापूर-सोलापूर मार्गावर जलदगतीने प्रवास करता येणे शक्य होणार आहे. ऊस, हळद, डाळिंब, द्राक्ष यासारख्या शेतीमालाची वाहतूक सुलभ होणार आहे. या शिवाय पश्‍चिम महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना मिळणार असून लोकांना रोजगार संधी उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पाचे फायदे

●वेळ आणि इंधनाची बचत

●वाहतूक सुरक्षा आणि अपघातात घट

●सुलभ ,सुरक्षित आणि जलद वाहतूक

●सांगली-सोलापूर जलद प्रवास

●ऊस,हळद डाळिंब,द्राक्ष, इ. कृषिमालाची सुलभ वाहतूक

राष्ट्रीय महामार्ग १६६ रत्नागिरीपासून सुरू होऊन सोलापूरपर्यंत आहे. त्याची एकूण लांबी ३८० किमी आहे. कोल्हापूर, जयसिंगपूर, सांगली, मिरज, सांगोला, मंगळवेढा आणि सोलापूर या शहरातून तो जातो. सांगली ते सोलापूर अशा मार्गिकेवर हा महामार्ग उभारण्यात आला आहे.

चार टप्प्यांमध्ये त्याची विभागणी करण्यात आली आहे

टप्पा १ – सांगली ते बोरगाव

टप्पा २ – बोरगाव ते वाटंबरे

टप्पा ३- वाटंबरे ते मंगळवेढा

टप्पा ४- मंगळवेढा ते सोलापूर

लोकार्पण झालेल्या दुसऱ्या टप्प्याचे काम २४ महिन्यात झाले असून यासाठी एकूण २०७६. ६३ कोटी रुपये खर्च आला आहे.

राष्ट्रीय महामार्ग ९६५ G हा सांगली जिल्यातील पाटस पासून हा मार्ग जतपर्यंत आहे. इंदापूर, बारामती, अकलूज, सांगोला आणि जत या शहरातून तो जातो. सांगोला ते जत या मार्गिकेवर हा महामार्ग उभारण्यात आला आहे.

चार टप्प्यांमध्ये त्याची विभागणी करण्यात आली आहे

टप्पा १ – पाटस ते काटेवाडी

टप्पा २ – काटेवाडी ते इंदापूर

टप्पा ३- इंदापूर ते तोंडाळे गाव

टप्पा ४- सांगोला ते जत

लोकार्पण झालेल्या सांगोला ते जत प्रकल्पाचे काम १८ महिन्यात झाले आहे.

Related posts

भुलाईमुळे लोकभाषेला संरक्षण…

उसाच्या पाचटापासून मिळवा उत्तम सेंद्रिय खत

रामसर साईट्‌स म्हणजे काय ? त्या कोणत्या ?

Leave a Comment