गेल्याच सप्ताहात संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने “जागतिक लोकसंख्येचा दृष्टिक्षेप”( वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स) बाबतचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यामध्ये भारताला विकासाची खूप मर्यादित संधी असल्याचे नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर ‘भारताच्या लोकसंख्या शास्त्राचे प्राक्तन म्हणजे नशीब काय आहे ?’ याचा घेतलेला हा वेध.
प्रा. नंदकुमार काकिर्डे
अर्थविषयक ज्येष्ठ पत्रकार
संयुक्त राष्ट्र संघाने गेल्या सप्ताहामध्ये जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने भविष्यातील जागतिक संभाव्य लोकसंख्या काय असू शकेल याबाबतचे आडाखे मांडून जगभरातील विविध देश आणि प्रदेश याबाबतचे अंदाज या निमित्ताने जाहीर केले. या अहवालात जगाची लोकसंख्या सातत्याने लक्षणीयरीत्या वाढत असून साधारणपणे 2080 पूर्वीच ती 1000 कोटींच्या घरात जाईल असा अंदाज व्यक्त केला आहे. सध्याची जागतिक लोकसंख्या 800 कोटींच्या घरात आहे. पुढील 55 वर्षात ती 200 कोटींनी वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र हळूहळू जागतिक लोकसंख्येमध्ये घट होण्यास प्रारंभ होईल असे नमूद करण्यात आले आहे. मात्र या अहवालात विविध राष्ट्रे किंवा प्रदेशांमध्ये लोकसंख्या कशा स्वरूपाची असेल याचा फारसा उल्लेख केलेला नसून ते गुलदस्त्यात ठेवलेले आहे. आगामी काही वर्षांमध्ये लोकसंख्या वाढ आफ्रिकेमध्ये व विशेष करून सहारा-आफ्रिका प्रदेशांमध्ये होईल असेही नमूद केलेले आहे. या प्रदेशात सोमालिया किंवा डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (डीआरसी) यासारख्या देशांचा समावेश असून हे दोन्ही देश राजकीय दृष्ट्या अत्यंत अस्थिर आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले आहेत. काँगो सारख्या देशांमध्ये नैसर्गिक साधनसामग्रीची रेलचेल असून , पुढील काही दशकांमध्ये त्याचे मूल्य निश्चितपणे वाढत राहणार आहे. त्यामुळेच एका बाजूला नैसर्गिक साधनसंपत्तीचे वाढते मूल्य आणि दुसरीकडे अत्यंत तरुण, अस्वस्थ असलेली लोकसंख्या यामुळे तेथील नैसर्गिक साधनसामग्रीवर ताबा मिळवण्यासाठी सुरू होणाऱ्या तीव्र स्पर्धेची ठिणगी जगाच्या तसेच विविध भौगोलिक प्रदेशांमध्ये पडणार आहे.
आज भारत आणि चीन हे दोन देश सर्वाधिक लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून पहिल्या दोन क्रमांकात आहेत. अलीकडच्या एका पाहणीनुसार आपण चीनची लोकसंख्या ओलांडून पुढे गेलेलो आहोत. पुढील काही काळ भारत देश लोकसंख्येच्या बाबतीत चीनवर मात करेल व त्याच्या पुढे राहील असा अंदाजही या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. त्याचवेळी आपल्या शेजारी असलेल्या पाकिस्तानातील लोकसंख्ये बाबत अंदाज व्यक्त करताना या अहवालात असे नमूद केले आहे की पाकिस्तानची लोकसंख्या ही सातत्याने वाढत असून काही वर्षांमध्ये ती अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जास्त होईल व ती साधारणपणे 39 ते 40 कोटीच्या घरात जाईल असा अंदाज आहे. सध्या पाकिस्तानची लोकसंख्या 25 कोटीच्या घरात आहे.
जागतिक पातळीवर आजच्या घडीला भारताची लोकसंख्या 141.24 कोटीपेक्षा थोडीशी अधिक आहे. आपण 2023 मध्येच चीनला मागे टाकलेले आहे. त्याखाली तिसरा क्रमांक येतो तो अमेरिकेचा. त्यांची लोकसंख्या 33.6 कोटींपेक्षा जास्त आहे. त्याखालोखाल इंडोनेशिया 28.15 कोटी, पाकिस्तान 25.23 कोटी, नायजेरिया 23.67 कोटी, ब्राझील 22 कोटी, बांगलादेश 16.8 कोटी, रशिया 14 कोटी व मेक्सिको 13 कोटी असे जगभरातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले पहिले दहा देश आहेत. भारताच्या लोकसंख्येचा जागतिक दृष्टिकोनातून विचार करता जागतिक लोकसंख्येच्या 7 टक्के लोकसंख्या केवळ भारताची आहे. 1972 मध्ये भारताच्या लोकसंख्येचा वाढीचा दर 2.3 टक्क्यांच्या घरात होता. मात्र सध्याचा लोकसंख्या वाढीचा दर 1 टक्क्यापेक्षा कमी असल्याचे आढळले आहे.याचे प्रमुख कारण म्हणजे भारतीय महिलांना तिच्या आयुष्यात मुले होण्याचे प्रमाण 5.4 वरून 2.1 वर आलेले आहे. देशाची एकूण लोकसंख्या वाढत असली तरी सुद्धा शून्य ते 14 वर्षे;14 वर्षे ते 24 वर्षे व 65 पेक्षा जास्त वय असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण घटताना दिसत आहे.
भारताची लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे त्यामुळे आपल्यासमोर अनेक गंभीर समस्या उभ्या ठाकत आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दरवर्षी सातत्याने वेगाने वाढ होत आहे. बहुसंख्य व अल्पसंख्य यांच्यातील दरी सातत्याने वाढतv आहे. देशातील बेरोजगारीचे प्रमाणही गेल्या काही वर्षात लक्षणीयरित्या वाढलेले आहे.त्याचप्रमाणे देशाची एकूण साधन संपत्ती घटताना दिसत आहे. लोकसंख्येमध्ये असमान उत्पन्न वितरणाचे प्रमाण वाढत आहे तर दुसरीकडे गरिबीचे प्रमाणही हाताबाहेर गेलेले दिसत आहे. विविध राज्यांमधील लोकसंख्येचे असमान प्रमाण आणि जातीयतेवर आधारित आरक्षणासारखे राजकीय प्रश्न हे देशाची डोकेदुखी वाढवत आहेत. याशिवाय भारताच्या लोकसंख्या वाढीमुळे पर्यावरणाचे किंवा प्रदूषणाचे प्रश्न सातत्याने वाढत असून ते गंभीर स्वरूप धारण करत आहेत. देशाच्या विविध भागातील जैवविविधता नष्ट होत आहे आणि त्याच वेळेला जागतिक तापमान वाढण्यामध्येही भारताचा समावेश करावा लागत आहे.
देशाच्या विविध भागांमध्ये संसर्गजन्य साथींचे प्रमाण चिंताजनक रित्या वाढताना दिसत आहे. आजच्या घडीला भारताच्या वाढत्या लोकसंख्येचा मोठा लाभ किंवा लोकसंख्याशास्त्रीय ‘लाभांश’ आपल्याला मिळाला आहे तो म्हणजे 35 वर्षाखाली वय असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण 65 टक्क्यांच्या घरात आहे. म्हणजे एका अर्थाने भारत हा जगातील सर्वात तरुण लोकसंख्या असलेला देश आहे. त्यामुळे एका बाजूला मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग उपलब्ध असून दुसरीकडे अर्थव्यवस्थेची वाढ चांगली होण्यास या मनुष्यबळाची सातत्याने मदत होत आहे. एवढेच नव्हे तर या लोकसंख्येचे वैविध्य विविध निकषांवर लक्षणीय आहे. त्यात सांस्कृतिक विविधता,भाषा यामुळे देशाला अत्यंत समृद्ध असा सांस्कृतिक वारसा प्राप्त झालेला आहे. भारतीय वाढत्या लोकसंख्येचा आणखी एक लाभ म्हणून म्हणजे सर्वात मोठी ग्राहक बाजारपेठ म्हणून संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागलेले आहे. त्यामुळे विविध प्रकारचे व्यवसाय आणि गुंतवणूक भारताकडे जास्तीत जास्त आकर्षित होताना दिसत आहे. या वाढत्या तरुण लोकसंख्येमुळेच नवकल्पना व उद्योजकता या क्षेत्रामध्ये आपण जगभरात आघाडीवर आहोत. या सर्वात मोठ्या लोकसंख्येचा परिणाम जागतिक पातळीवर झालेला असून आंतरराष्ट्रीय संबंध आणि भूराजकीय पटलावर भारताचे महत्त्व निश्चित वाढलेले आहे. याच लोकसंख्या वाढीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेगही खूप चांगल्या रीतीने गेल्या काही वर्षात देशाला प्राप्त झालेला आहे. त्यामुळे देशातील कामगार वर्गाला किंवा अन्य घटकांना चांगल्या प्रकारची सामाजिक सुरक्षितता मिळत आहे. एवढेच नाही तर जगभरातील तरुण आणि बुद्धिमान वर्ग भारताकडे आकर्षित होत असून अनिवासी भारतीयांचा आर्थिक विकासामध्ये मोठा हातभार लागत आहे. विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्याची तसेच विविध समस्यांवर मात करण्याची क्षमता आपल्या लोकसंख्येमध्ये निश्चित आहे. याचा वापर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्था वाढीसाठी तसेच नवकल्पना व सांस्कृतिक देवाणघेवाण यासाठी निश्चित करता येऊ शकतो. यामुळेच भारताला जागतिक पातळीवर एक महत्त्वपूर्ण देश म्हणून मान्यता मिळताना दिसत आहे.
भारतीय लोकसंख्येतील अजून एक समस्या म्हणजे 15 वर्षाखालील व 65 वर्षे वयाच्या व्यक्तिंचे एकमेकांवर अवलंबून असलेल्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. आज जरी पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला देश नसला तरी त्यांच्याकडील लोकसंख्या वाढीचे प्रमाण लक्षात घेता ते अमेरिकेला मागे टाकून तिसरा क्रमांक पटकावू शकतात अशी शक्यता आहे. त्यामुळेच अशा पाकिस्तानला दुर्लक्षित करणे किंवा जागतिक समुदायांपासून त्याला वेगळे पाडणे अशा प्रकारचे धोरण केंद्र सरकार हाती घेईल किंवा कसे हे पाहणे एक अभ्यासपूर्ण धोरण ठरू शकते.
भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून या अहवालातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधारणपणे पुढील दशकामध्ये भारतातील लोकसंख्येचे प्रमाण कमी वाढताना दिसण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण लोकसंख्येपेक्षा देशातील काम करणाऱ्या कामगारांचे वाढण्याचे प्रमाण बंद होणार आहे. 2054 मध्ये म्हणजे आज पासून 30 वर्षात जे 65 वर्षाकडे झुकणार आहेत त्यांना आज रोजगारासाठी वणवण फिरावे लागत आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अंदाजपत्रकामध्ये भारताच्या लोकसंख्या शास्त्राच्या गुण- दोषांचा गंभीरपणे विचार करून मार्ग काढण्याची हीच वेळ आहे. सार्वजनिक क्षेत्रांमध्ये किंवा सरकारमध्ये रोजगाराची अपेक्षा ठेवणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे. देशाच्या धोरणकर्त्यांसमोरील हा चिंतेचा पण गंभीर विषय आहे.देशाच्या अर्थव्यवस्थेचा एकूण स्तर वाढवण्याची क्षमता , कौशल्य या तरुण वर्गामध्ये आहे हे निश्चित. त्यामुळेच कौशल्ययुक्त तरुण वर्ग निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी उच्च दर्जाचे शिक्षण देऊन कौशल्य युक्त तरुण वर्ग निर्माण करणे याला अन्य कोणताही पर्याय नाही. वाढत्या लोकसंख्येचा लाभांश घेण्याची हीच संधी असून आपल्या हातून आता वेळ निसटण्यास प्रारंभ झाला आहे. देशातील जनता वृद्ध होण्याची प्रक्रिया थांबवता येणारी नाही. त्यामुळेच पुढील तीन दशकांमध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या “भांडवलाचा” लाभ सत्ताधाऱ्यांनी उठवण्याशिवाय पर्याय नाही. ही वाढती लोकसंख्या हेच आपल्या नशिबात असेल तर त्याचा योग्यरित्या लाभ उठवून जागतिक पातळीवर देशाची अर्थव्यवस्था आणखी उच्च पातळीवर नेता येऊ शकेल. “मोदी 3” च्या कारकिर्दीत भारतीय लोकसंख्याशास्त्राचे गमक ओळखले जाऊन त्या दृष्टिकोनातून आर्थिक विकासाची योग्य पाऊले उचलली जातील अशी अपेक्षा केली तर ती फोल ठरू नये.
प्रा. नंदकुमार काकिर्डे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.