छंदातून आनंदाची बाग फुलवणार्या कविता – छंद देई आनंप्रयोगशील साहित्यिक एकनाथ आव्हाड आपल्या लेखनात सतत नवनवीन प्रयोग करीत असतात. या लेखन प्रयोगाच्या माध्यमातून बालवाचकांना नित्य नवीन देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. एकूणच विविध छंदाची महती सांगणारा असा हा सर्वांगसुंदर बालकवितासंग्रह आहे.
✍🏼 गुलाब बिसेन
मोबाईल – 9404235191
एकनाथ आव्हाड हे मराठी बालसाहित्यातील सुपरिचित असे नाव. त्यांनी आजवर बालकथा, बालकविता, काव्यकोडी, नाट्यछटा, गोष्टीरूप चरित्र लेखन, सदर लेखन या माध्यमातून मराठी बालसाहित्यात मोलाचे योगदान दिले आहे. आजवर कथाकथनाचे त्यांनी पाचशेवर अधिक कार्यक्रम केले आहेत. पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांच्या बालकविता आणि बालकथांचा समावेश झालेला आहे. असे बहुआयामी लेखन करणारे एकनाथ आव्हाड यांचा “छंद देई आनंद” हा बालकवितासंग्रह प्रकाशित झाला आहे.
छंदांना मानवी जीवनात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. छंद मनाला आनंद, विरंगुळा तर देतातच. शिवाय मानसिक आरोग्य उत्तम ठेवणार्या टाॅनिकचेही ते काम करीत असतात. छंदांतून आनंद देणार्या अशा ४२ कविता या संग्रहात आहेत. या कवितासंग्रहाची सुरुवात “गाणे माझे” या कवितेने होते.
गाणे माझे पाखरांचे
फिरत राही रानावर
गाणे माझे आभाळाचे
सूर्य, चंद्र अन तार्यांचे
…या ओळी वाचताना सर्व सृष्टीच गाण्याने व्यापली असल्याची जाणीव वाचकाला आपसूकच होऊन जाते. पोहण्याच्या छंदाची “शाबासकी” ही कविता, फिरण्याचा, नवीन ठिकाणे पाहण्याचा छंद जोपासायला सांगणारी “शोधू आनंदाच्या वाटा” ही कविता, अभ्यासाचा छंद जोपासायला सांगणारी “लाखांमधील एक….”ही कविता… अशा कविता वाचताना वाचकाला आपला छंद जोपासण्याची नवी उर्मी देतात.
“आमच्या मुळेबाई” ही कविता मुळेबाईंच्या माध्यमातून कविता गायन, कथाकथन या छंदांची ओळख करून देते. “सप्तसूर” ही कविता हार्मोनियम, सतार, व्हायोलिन, बासरी, पखवाज इ. वाद्यांवर प्रेम करायला शिकवण्यासोबतच वादनाचा छंद जोपासणाऱ्या कुटुंबाची आपल्याला भेट घडवते. आपापला छंद जोपासणारे हे लहान थोर आपल्याही घरात असावेत असे मनाला वाटून जाते. पुस्तकांच्या भन्नाट दुनियेची सफर करवून देणारा वाचनाच्या छंदाविषयी “विरंगुळा” कवितेत लिहिताना कवी म्हणतात,
कथा, कविता, ललित
चरित्र, नाटक, कादंबरी
पुस्तकांची न्यारीच दुनिया
माझ्या चिमुकल्या घरी
विरंगुळ्याचे क्षण माझे
पुस्तकांनी होती गंधित
लिहितो मी कथा कविता
माझ्याच आगळ्या धुंदित
कल्पनेचे पंख लेवून “मी कोण होणार?” या प्रश्नाचे उत्तर शोधू पाहणारा बालक म्हणतो,
कधी वाटे आग विझवणारा
व्हावा मी अग्निशामक
कधी वाटे लेख लिहिणारा
व्हावा मी मोठा लेखक
कधी वाटे कथा सांगणारा
व्हावा मी कथेकरी
कधी वाटे शेती पिकवणारा
व्हावा मी शेतकरी
छंदांच्या दुनियेची मजेदार सफर घडवणारा हा कवितासंग्रह उच्च जीवनमूल्यांची रूजवण करतो.
छत्रपती शिवराय, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत ऐतिहासिक घटनांची थोरवी पोवाड्यातून गाणारा “छोटासा शाहीर” या कवितांतून आपल्याला भेटतो. इंटरनेट, टिव्ही, स्मार्टफोन अशा संवादाच्या आधुनिक साधनांच्या रेलचेलीतही मनाच्या एका कप्प्यात आपली वेगळी जागा व्यापणारे पत्र आपल्याला “काळजाचा तुकडा” या कवितेत भेटते. झाडाप्रमाणे निर्व्याज प्रेम देणारं घरातील “आनंदाचं झाड” म्हणजे आई. तिचे घरातील वावरणे हेच घराला घरपण देणारे असते. अशा आईच्या मायेची गोष्ट या कवितेत कवी लिहितो.
बालपण हा आयुष्यातील सुवर्णकाळ अनेकानेक छंदांनी भरलेला आणि भारलेला असतो. पतंग उडवणे, पुस्तकांचे वाचन करणे, शेताशिवारात फिरणे, आजीच्या गोष्टी ऐकणे अशा छंदांमुळे बालपण समृद्ध होत जाते. या छंदांच्या विविध छटा हा कवितासंग्रह वाचताना पानोपानी आपल्याला बघायला मिळतात. “बैठ्या खेळांची रंगत” ही कविता बैठ्या खेळांची गोडी लावते. पत्ते, कॅरम, बुद्धिबळ, सापशिडी, सारीपाट हे सारेच खेळ फावल्या वेळाला सत्कारणी लावणारे आहेत. उन्हाळी सुट्टीत तर या खेळांवरच बालकुमारांची सारी मदार असते. असे हे खेळ मुलांना खेळाचा छंद लावायला पूरक ठरतात.
वर्तमानपत्र, साप्तिहिक, पाक्षिक, मासिक, त्रैमासिक, षण्मासिक, वार्षिक अशा नियतकालिकांची ओळख “आमच्या घरी येते…” या कवितेतून होते. रंगांच्या विविध छटा “छटा रंगांच्या” ही कविता करवून देते. “भुतोबा” कवितेत मदत करणारा, मारकुटा नसलेला भूत भेटतो. “गाणारा वर्ग” ही कविता वाचताना वाचकही वर्गातील गायनात तल्लीन होऊन जातो. या कवितेत माधव पोवाडा गातो. अहमद भावगीत गातो. जोसेफ, सुखविंदर, राजू हेही भक्तिगीत, प्रार्थना, कोळीगीत गातात.
समूहगीत गायनात सर्व एकत्र येतात. “पहिला दिवस शाळेचा” या कवितेत पुस्तके, गणवेश, नवे जुने मित्र, सुट्टीतील गमतीजमती, अभ्यास, खेळ, बाईंचे शिकवणे, गप्पागोष्टी सारी धम्माल वाचायला मिळते. “मैत्री असावी तर अशी” या कवितेतून कावळा, उंदीर, कासव आणि हरीण यांच्या दोस्तीची कथा वाचायला मजा येते. शीर्षक कविता असलेली “छंद देई आनंद”… जुनी नाणी जमवण्याचा ताईचा छंद, दादाचा चित्रे काढण्याचा छंद, बाबांचा कविता करण्याचा छंद, आईचा नवीन पदार्थ बनवण्याचा छंद वाचकाच्या मनात एक तरी छंद जोपासण्याची ओढ लावतात.
प्रयोगशील साहित्यिक एकनाथ आव्हाड आपल्या लेखनात सतत नवनवीन प्रयोग करीत असतात. या लेखन प्रयोगाच्या माध्यमातून बालवाचकांना नित्य नवीन देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. एकूणच विविध छंदाची महती सांगणारा असा हा सर्वांगसुंदर बालकवितासंग्रह आहे. या संग्रहाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष, सुप्रसिद्ध साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांची सुंदर अशी प्रस्तावना लाभली आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि आतील चित्रांची मांडणी चित्रकार सागर नेने यांनी अत्यंत आकर्षक केली आहे. दिलीपराज प्रकाशनाने या पुस्तकाची निर्मिती अत्यंत दर्जेदार अशी केली आहे. लहान मुलांना हाताळायला सुयोग्य तसेच सुबक आणि संपूर्ण रंगीत असा हा बालकवितासंग्रह बालवाचकांना नक्कीच आवडेल.
पुस्तकाचे नाव – छंद देई आनंद (बालकवितासंग्रह)
पुस्तकाचे कवी – एकनाथ आव्हाड
प्रकाशक – दिलीपराज प्रकाशन, पुणे
पृष्ठे – ६४
मूल्य – १५० ₹
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.