April 25, 2024
Scientist Find out mistakes in Bhasma Process Research article
Home » भस्माच्या प्रक्रियेतील या त्रृटी रोखा…
संशोधन आणि तंत्रज्ञान

भस्माच्या प्रक्रियेतील या त्रृटी रोखा…

शंख, समुद्रातील कवडी, प्रवाळ, मोती यापासून सुधा वर्ग भस्म तयार करण्यात येते, पण हे तयार करताना अनेक शास्त्रीय गोष्टी विचारात घ्यायला हव्यात. बऱ्याचदा भस्माचा वापर केल्याने अनेक रोग जडल्याचे प्रकार समोर येत आहेत. सुधा वर्गांच्या भस्माचे औषधी गुणधर्मांचा लाभ मिळण्यासाठी ती योग्य रितीने तयार करणे आवश्‍यक आहे. यासाठी भस्म या औषधींची गुणवत्ता राखण्यासाठी त्यातील बारकावे आणि होणाऱ्या चुका संशोधकांनी शोधल्या आहेत. यासंदर्भातील शास्त्रोक्त माहिती सांगणारा हा लेख….

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

पृथ्वीतलावर औषधी गुणधर्म नसणारी अशी एकही वस्तू नाही. नैसर्गिकरित्या तयार झालेल्या प्रत्येक वस्तूत काही ना काही तरी औषधी गुणधर्म असतो असे आर्युर्वेद मानते. भस्म हे नैसर्गिक अजैविक औषधी आहे आणि धातूचे रुपांतर ऑस्काईड आणि सल्फाईडमध्ये करून ते तयार केले जाते. लोह, कॅल्शियम, तांबे (कॉपर) , कथील ( टिन) , चांदी, सोने, शिसे (लीड), आणि जस्त ( झिंक) यापासून तयार केलेल्या भस्माचा औषधी म्हणून वापर केला जातो. पारंपारिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात भस्म तयार करणे सहज शक्‍य होत नाही. यामुळे सध्या आधुनिक पद्धतीचा अवलंब केला जातो. पण यात होणाऱ्या काही चुकांमुळे तयार होणारे भस्म हे दिसायला औषध असले तरी प्रत्यक्षात ते शरीराला अपायकारक ठरू शकते. सुधा वर्गातील भस्माच्या संदर्भातील असे काही बारकाव्यांवर संशोधकांनी प्रकाश टाकला आहे. बनारस हिंदु विद्यापीठातील सहाय्यक प्राद्यापक डॉ. गुरुप्रसाद निल्ले यांच्यामते सुधावर्गाचे भस्मे तयार करताना काही गोष्टी प्रामुख्याने विचारात घेणे महत्त्वाचे आहे.

सध्याच्या युगामध्ये कॅल्शियमची उपयुक्तता लहान मुले, गर्भिनी, प्रसुता, मासिक पाळी बंद होण्यानंतरच्या अवस्थेमध्ये तसेच वृद्धांमध्ये पाहायला मिळते.

कॅल्शियमचा नैसर्गिक स्त्रोत

  1. खनिजामधून – सुधा (कॅल्शियम ऑक्‍साईड), खटीका किंवा खडू, बदराश्‍म (सिलिकेट लाईम), गोदंती (जिप्सम)
  2. प्राण्यांकडून – शंख (कॉन्च शेल), शुक्ती (ऑयस्टर शेल), शंबुक (पायला), शेळी आणि बकरीची हाडे (अजास्थी), हरणाची शिंगे (मृग शिंग), कोंबडीच्या अंड्याचे कवच, कटल फिशची हाडे, वराटीका किंवा कवडी (क्राऊरी), मुक्ता (मोती), प्रवाळ
  3. वनस्पती – वंशलोचन (बांबू)

कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत असणारे कॅल्शियम कार्बोनेट हे औषधी म्हणून वापरले जाते. कॅल्शियमचे नैसर्गिक स्त्रोत विचारात घेता. हे अगदी सोपे वाटत असले तरी भस्म तयार करताना चुका घडल्याने कॅल्शियम कार्बोनेट न होता कॅल्शियम ऑक्‍साईड तयार होते. यासाठी कॅल्शियम कार्बोनेटचे गुणधर्म विचारात घेणे गरजेचे आहे.

कॅल्शियम कार्बोनेटची तथ्ये –

औषधासाठी कॅल्शियम कार्बोनेटचे हे गुणधर्म विचारात घेणे अत्यंत गरजेचे आहे.

  1. योग्य तापमान – 840 अंशापेक्षा जास्त तापमानास कॅल्शियम कार्बोनेटचे विघटन होते. यातून कार्बनडायऑक्‍साईड हा वायू उत्सर्जित होतो व कॅल्शियम ऑक्‍साईड तयार होते.
  2. निर्जल कॅल्शियम कार्बोनेटची तीन बहुरुपे आहेत. व्हॅटेराईट, ऍरागनाइट आणि कॅल्साईट या बहुरुपांची थर्मोडायनॅमिक स्थिरता क्रमता वाढत जाते.
  3. कॅल्शियम कार्बोनेटच्या शरीरात शोषणासाठी पाचक द्रव्याची ऍसिडक पीएच महत्त्वाचा असतो. पोटातील ऍसिडचे प्रमाण कमी असणाऱ्या व्यक्ती ( 50 वर्षांपेक्षा जास्त वय ) कॅल्शियम कार्बोनेटपेक्षा कॅल्शियम सायट्रेटचे शोषण सहज करू शकतात.
  4. कॅल्शियम कार्बोनेट हे आहारासोबत घेतल्यास उत्तम शोषले जाते. तर कॅल्शियम सायट्रेट हे रिकाम्या पोटी किंवा भरलेल्या पोटी सुद्धा घेतल्यास उत्तम शोषले जाऊ शकते.
  5. तापमान 500 अंश सेल्सिअस तापमानाला ऍरागनाइटचे कॅल्साईटमध्ये रुपांतर होण्यास सुरुवात होते.
  6. ऍरागनाइटपेक्षा कॅल्साईटचे रुप हे शरीरात उत्तम शोषक आहे.

शंखापासून भस्म तयार करताना घ्यावयाची काळजी

बऱ्याचदा शंखापासून भस्म तयार करणे म्हणजे शंख घेणे आणि जाळून त्याचा चुरा करणे असे समजले जाते. पण प्रत्यक्षात तसे नाही. यामध्ये येणाऱ्या रासायनिक प्रक्रिया विचारात घेणे महत्त्वाचे आहे. शंख किंवा सुधावर्गातील द्रव्ये घेऊन त्या पदार्थांचे प्रथम शोधन केले जाते. त्यानंतर भावना आणि मारण म्हणजे भस्मिकरण करण्यात येते.

शोधन करण्याचा उद्देश…

शोधन करण्याचा उद्देश काय ? तर त्या सुधावर्गातील घटकांचे शुद्धीकरण. शंखासोबत समुद्रातील रेती, वाळू असे काही घटक येतात. किंवा त्यामध्ये असणाऱ्या प्राण्यांचे काही अवशेषही त्यासोबत आलेले असतात. तसेच काही सेंद्रिय वनस्पतीही त्या शंखावर असू शकते. याचे शुद्धीकरण हे गरजेचे आहे. हे करताना प्रथम शंखाचे तुकडे करणे गरजेचे आहे. शुद्धीकरणासाठी मुख्यतः लिंबूचा रस हे ऍसिडिक माध्यम वापरण्यात येते. याचे मुख्य कारण हे आहे की शंख हा आम्लयुक्त आहे. शंखाच्या तुकड्यांची पुरचुंडी बांधून लिंबाच्या रसात बुडवून ठेवून त्याचे स्वेदन केले जाते. 100 ते 125 अंश सेल्सिअस तापमानात तीन तासांच्या प्रक्रियेमध्ये या शंखातील अशुद्धी दुर केली जाते. शुद्ध झालेले हे शंखाचे तुकडे पुन्हा गरम पाण्याने धुवुन घेणे गरजेचे आहे. कारण सिलिका किंवा अन्य घटक त्यामध्ये चिकटून राहिल्याची शक्‍यता असते. यासाठी ते स्वच्छ धुवून घेणे गरजेचे आहे.

मारण का गरजेचे ?

शंख तयार करणाऱ्या प्राण्याचे प्रोटीनयुक्त काही अवशेष या शंखाला चिकटून राहीलेले असतात. ते तेथून नष्ट करणे गरजेचे असते. हे अवशेष शरीरास अपायकारक ठरून लिव्हर, किडनी यांना धोका पोहोचवू शकतात. शोधनाच्या प्रक्रियेमध्ये हे प्रोटीन घटक बऱ्याचदा राहून जातात. याचसाठी मारणाची (भस्मी करणाची प्रक्रिया) अशा प्रोटीन्सना त्या शंखापासून दूर करण्यासोबतच त्याच्या ऍरोगनाईट रुपातून कॅल्साईट रुपामध्ये परिवर्तीत करण्यासाठी सहाय्यक ठरतात. या पूर्ण प्रक्रियेमध्ये योग्य तापमानाची ( 500 ते 700 अंश सेल्सिअस ) नियंत्रण करून वापरणे गरजेचे आहे. जर चुकीने हे तापमान नियत्रण सुटले तर तेथे क्रल्समाईट रुपाचे ऑक्‍साईट रुपात परिवर्तन होण्यास सुरुवात होते. हे आपणास अपेक्षीत नसते. म्हणूनच यासाठी कॅल्सियम कार्बोनेट कॅल्साईट रुपात मिळण्यासाठी शोधन, भावना आणि मारण हे टप्पे हे गरजेचे आहे.

भावना करण्याची गरज काय ?

कॅल्साईटमध्ये रुपांतर चुकुन झालेच तर अशी सुधावर्गाची भस्मे वापरण्यापूर्वी त्यांना लिंबाच्या रसाच्या तीन भावना देऊन वापरण्याचा निर्देश आयुर्वेदीक आचार्यांनी केलेला मिळतो. या मागचे कारणे जर समजायचे म्हटले तर लिंबाच्या रसाने ऑक्‍साईड रुपाचे सायट्रेड रुपामध्ये परिवर्तन होण्यासाठी सहय्याक ठरते. जे शरीरास उपयुक्त ठरते.

Related posts

सोरायसीसवर आयुर्वेदात यशस्वी उपचार असल्याचे सिद्ध

भस्मास आंतरराष्ट्रीय मान्यता मिळावी यासाठी हवे संशोधन

Leave a Comment