December 6, 2022
Sunetra Vijay Joshi article on woman servent
Home » अनमोल चारित्र्य…
मुक्त संवाद

अनमोल चारित्र्य…

अर्थात चारित्र्य हे जसे स्त्रियांचे निर्मळ असावे, तसेच पुरुषांचेही. फक्त निसर्ग झालेल्या चुकीचे माप स्त्रियांच्या ओटीत टाकतो म्हणून सावधगिरी तिने जास्त घ्यायला हवी. इतिहासात पुराणात जसा पतिव्रता स्त्रियांचा उल्लेख असतो तसाच उत्तम चारित्र्य असलेल्या पुरुषांचाही आहे.

-सौ. सुनेत्रा विजय जोशी

रत्नागिरी

अलिबागला बहिणीकडे गेले होते. त्या दिवशी तिची कामवाली बाई कामाला आली नव्हती. तिला बहिण फोन लावत होती तर तिचा फोनही लागत नव्हता. बहिण म्हणाली बहुतेक नवर्‍याने दारु ढोसून हिला मारलेले दिसते. म्हणूनच आली नसावी. आणि मग ती दुसर्‍या दिवशी आली तेव्हा कळले. खरच नवऱ्याने  तिला रस्त्यावर गाठुन पकडून मारले. वर हिचा मोबाइल फोडून त्यातील सिमकार्ड पण मोडले. घरी रहायला चल नाहीतर कोऱ्या कागदावर सही दे मला दुसऱ्या लग्नासाठी म्हणत होता. 

मी म्हटले मग का रहात नाही जाऊन ? एक संधी देऊन पहा त्याला सुधारण्याची. तर ती म्हणाली आतापर्यंत पंधरा वीसवेळा हे नाटक झाले आहे. दोन दिवस बरा राहतो तिसऱ्या दिवशी परत पिऊन येतो. अन येतो ते येतो अन मारहाण करतो. अग पण आईवडिलांनी अस कस बघुन दिल ? तर म्हणाली काय सांगणार. मीच पळुन जाऊन लग्न केल.

ती पंधरा वर्षे वय असतांनाच याच्या प्रेमात पडली. तो हिच्यापेक्षा चांगला दहा वर्षे मोठा. म्हणजे तो जे चाळे करायचा तेच प्रेम असे तिला वाटायचे. मग काय दिवस राहील्यावरच घरातल्यांच्या लक्षात आले. मग लग्न करण्यावाचुन पर्याय नव्हता. खरे तर सासुला माहीत होते की आपला मुलगा कसा आहे म्हणुन ती हिला समजावत होती की लग्न नको करु याच्याशी पण काय करणार ? दिवस राहिले होते. प्रेम म्हणजे काय हे कळलच नाही अन आता पस्तावतेय. सासु असेस्तोवर तिचा आधार होता. पण दोन वर्षापुर्वी ती वारली अन याचा ताळतंत्र सुटला. 

अग पण मग घे घटस्फोट अन हो मोकळी. मी म्हटले. पण त्यावर ती म्हणाली म्हणजे हा पुन्हा दुसरीला छळायला मोकळा. शिवाय आहे नाही ते छप्पर विकून दारू पीत बसेल. म्हणून सही देत नाही. कामावर गेले तरी संशय घेऊन मारतो अन घरी बसले तरी पैसे दे दारुला म्हणून मारतो. वर म्हणतो माझ्याशी जसे लग्नाआधी वागलीस तसे अजुन कुणाबरोबर कशावरून वागली नसशील ? ही पोरगी तरी माझीच कशावरून ? माझीच बुध्दी कशी फिरली त्या वेळी असे ती स्वतःलाच दोष देते.

आता तिने पोलीस केस केलीय. पुढे काय होईल ते कळेल. पण हे सगळे भोग निस्तरणे आले. तिचे अवघे पंचवीस वय. कुणाच्या आधाराशिवाय जगणे मुलीला वाढवणे इतके पण सोपे नाही. ती गेली पण मनात अनेक विचार उठवून. यावरून एक नक्की की कुठल्याही स्त्रिने आपली किंमत अशी कमी करून घेऊ नये.

खुपदा प्रेमात असतांना एकांतात भेटतात अन मग नको ते घडण्यासाठी पोषक वातावरण मिळाल्याने नको ते घडते. अन मग हे एकदाच घडून थांबत नाही तर वारंवार घडत राहते. त्यामुळे एकांतात भेटणे टाळलेलेच बरे. प्रियकर म्हणत असेल की लग्न होणारच आहे मग काय फरक पडतो तर मुलीनेही त्याला हेच सांगावे की अरे लवकरच लग्न होणार आहे तर तुला तरी काय फरक पडतो ? लग्नानंतर आपण एकत्र असणार आहोतच. त्या गोष्टीतला रोमांस आधीच का घालवायचा. आणि तरी तो आग्रह धरत असेल तर समजुन जा त्याला तुमच्या मनाची काळजी नाही.

जर तो खरेच तुमच्या प्रेमात असेल तर तुम्ही योग्य शब्दात त्याला समजावल्यावर त्यालाही हे पटेलच. नाहीच पटले अगदी रागावला तरीही आग्रहाला बळी पडू नका. लग्न घरच्यांच्या संमतीने ठरले असेल तर  ही गोष्ट मोठ्या माणसांच्या कानावर घालून काय तो निर्णय घ्या. उद्या तो असेही म्हणेल नाहीतर तू बरी तयार झालीस म्हणजे तुलाच या गोष्टीची सवय असावी. मी काय जबरदस्ती थोडीच केली होती ? आणि तुमच्या चारित्र्याचा संशय घेतला जाईल. शिवाय मन दुखावले जाईल ते वेगळेच. स्वतःच्याच नजरेतून उतराल. त्या कामवाली बाईसारखे.

काही कारणाने लग्न त्या प्रियकराशी नाही झाले तरी तुमच्या चारित्र्यावर मात्र डाग राहणारच. शिवाय पुढचे सगळे सोपस्कार निस्तरायला बाईलाच लागतात. पुरुष करून नामानिराळे. पण तरी पुरुषांनी देखील हे जाणून घ्यावे कि स्त्रियांनाही चारित्र्यवान पुरुष आवडतात. तेव्हा दोघांनीही या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. प्रत्येक  गोष्ट ही त्या त्या वेळी झालेलीच चांगली असते. अर्थात चारित्र्य हे जसे स्त्रियांचे निर्मळ असावे, तसेच पुरुषांचेही. फक्त निसर्ग झालेल्या चुकीचे माप स्त्रियांच्या ओटीत टाकतो म्हणून सावधगिरी तिने जास्त घ्यायला हवी. इतिहासात पुराणात जसा पतिव्रता स्त्रियांचा उल्लेख असतो तसाच उत्तम चारित्र्य असलेल्या पुरुषांचाही आहे.  चारित्र्यवान स्त्री असो वा पुरुष नेहमीच आदर्श आणि वंदनीय असतात. तेव्हा चारित्र्य उत्तम आणि पवित्र राखणे हे दोघांनाही बंधनकारक आहेच.

Related posts

साहित्यकृतीचा सहृदयतेने घेतलेला शोध

आधुनिकीकरणाने उद्धवस्त झालेल्या शिंप्याची करुण कहाणी : ‘ उसवण ‘

संदीपच्या गोष्टी- ऐकूया, वाचूया

Leave a Comment