
सज्जनगडावर जात असताना वाटेतच भली मोठी श्री हनुमानाची मुर्ती पाहायला मिळते. येथे समर्थ रामदास स्वामींचे जीवन चरित्र उलघडणारी समर्थ सृष्टी तयार केली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, अरुण गोडबोले आणि भाई वांगडे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या या सृष्टीत समर्थांचे चरित्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे. समर्थांना जाणून घेण्यासाठी या समर्थ सृष्टीला भेट जरूर द्यावी. या सृष्टीमध्ये आहे तरी काय ? या संदर्भात माहिती देणारा लेख…
रामदास स्वामी यांचा जन्म कोठे झाला येथे पासून ते सज्जनगडावरील समाधीपर्यंतचा कार्यकाल सुंदररित्या मांडण्याचा प्रयत्न या समर्थ सृष्टीत केला आहे. माहितीपूर्ण तसेच उत्तम कलाकृतीच्या माध्यमातून याची मांडणी करण्यात आली आहे. समर्थ रामदास स्वामी यांचे महान कार्य शब्दात सांगणे कठीण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक गुरु मौनी महाराज हे नेहमी मौन व्रतात असत. त्यांनी फक्त समर्थ रामदास स्वामी यांच्याजवळच मौनव्रत सोडले. यावरून रामदास स्वामी किती मोठे होते महान होते याची प्रचिती येते. समर्थांची वचने माणसे घडवणारी आहेत. मनाचे श्लोक हे नराचा नारायण करणारी अशी आहेत.
ही ऐतिहासिक कागदपत्रे मिळतात पाहायला
१. समर्थांच्या हस्ताक्षरातील एकमेव पत्र.
२. छत्रपती शिवाजी महाराज यांचे श्री समर्थांच्या महिपतगडावरील आगमनाविषयी सुचना देणारे पत्र
३. कल्याण स्वामींच्या हस्ताक्षरातील दुर्मिळ पत्र
४. शिवाजी महाराज यांची चाफळ देवस्थानाची आस्थापूर्वक कर्तव्यपालन करण्याची सुभेदारास ताकीद देणारे पत्र
५. समर्थांच्या सज्जनगडावरील आगमनाविषयी सुचना देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पत्र
६. रामदास स्वामी यांनी स्वहस्ते वाल्मिकी रामायणात रेखाटलेले चित्र
७. टाकळी (नाशिक) येथे समर्थांनी बालवयात लिहिलेल्या वाल्मिकी रामायणाचे एक पान
८. तंजावर मठाचे प्रमुख आणि समर्थ शिष्य भिमस्वामी यांनी समर्थांचे रेखाटलेले चित्र
९. कल्याणस्वामी यांचे शिष्य मुधाजीबुवा यांनी समर्थांचे रेखाटलेले चित्र
१०. कल्याण स्वामी यांच्या हस्ताक्षरातील मनाचे श्लोक
समर्थांचा जीवनपट
समर्थांचा जन्म मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील जांब या गावी झाला. त्यांचे आडनाव ठोसर असे होते. सर्मथांच्या घरी सूर्याची व श्री रामाची उपासना केली जात होती. जांब येथे सूर्याजीपंत ठोसर आणि राणूबाई यांना गंगाधर नावाचा एक मुलगा होता. रामनवमीच्या दिवशी याच दांम्पत्यांना दुसरे अपत्य झाले. त्या मुलाचे नाव नारायण असे ठेवण्यात आले. धाडसी स्वभावाचा नारायण सतत काही ना काही तरी उपदव्याप करत असायचा. खोडकर, नटखट स्वभावाचा नारायणाच्या जीवनात मात्र काही वेगळेच लिहिले होते. तो आठ वर्षांचा असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. साहजिकच सर्व जबाबदारी नारायणाच्या आईवर आली. खोडकर मुलाची काळजी आईला सतातव होती. या मुलाचे कसे होणार याचीच चिंता लागून राहायची. वडिलांच्या निधनानंतर मात्र नारायण बदलला. तो सतत एकटा एकटाच असायचा. गप्प गप्प असणारा या नारायणाची काळजी आईला वाटू लागली. कसल्यातरी वेगळ्याच विचारात असणाऱ्या या नारायणाला शेवटी आईने विचारले अरे नारायणा सतत कसला विचार करत असतोस. कसली चिंता लागली आहे तुला.? यावर नारायणाने उत्तर दिले मला विश्वाची चिंता लागली आहे.
नारायणाचा झाला रामदास
नारायणाची चिंता दुर व्हावी. त्याच्या आयुष्याला वळण लागावे म्हणून आईने व मोठ्या भावाने त्याचे लग्न करण्याचे ठरवले. पण नारायणाने लग्न मंडपातून पळ काढला. त्याने थेट नाशिक गाठले. येथे काळारामाच्या मंदिरात त्यांनी वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत यांचा अभ्यास मादुकरी मागून सुरु केला. मनाची एकाग्रता वाढावी यासाठी नारायण टाकळी या गावात राहाण्यासाठी गेला. येथे खऱ्या अर्थाने नारायणाच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. अध्ययन, तप करताना त्यांना लोकांची सुख-दुःखे समजू लागली. या दुःखी जनतेने सकारात्मक विचार करावा यासाठी त्यांनी टाकळी येथे हनुमंताची स्थापना केली. नारायणाने गोदावरीच्या पात्रात बारा वर्षे तप केले. श्रीरामाची उपासना केली. गायत्री मंत्राचे पुरश्चरन केले. या तपानंतर येथील लोक त्यांना रामदास म्हणू लागले.
समाज परिवर्तनाचा निर्धार
गोदावरीतील तपानंतर रामदास देशाटनासाठी बाहेर पडले. देशाटनात त्यांनी बद्रीनाथ येथे मुख्य मंदिराच्या समोरच हनुमंताच्या मुर्तीची स्थापना केली. बारा वर्षांच्या देशाटनानंतर विचाराने आणि ज्ञानाने समर्थ असणारे रामदास महाराष्ट्रात परतले. समाजाच्या विचाराचे परिवर्तन करण्याचा त्यांनी निर्धार केला आणि त्यांच्या विचाराचा जय जय रघुवीर समर्थ हा मंत्र सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमु लागला.
परिवर्तनाचे केंद्र चाफळ
मांड नदीच्या काठावरील चाफळ या गावी रामदासांनी परिवर्तन कार्याचे केंद्र सुरु केले. अंगापूरच्या डोहात त्यांना राममुर्ती सापडली. त्या मुर्तीची स्थापना चाफळ येथे त्यांनी केली. राम मंदिर उभारले व रामनवमीचा उत्सव सुरु केला. मनाचे श्लोक रामदास स्वामींनी याच मंदिरात लिहिले. शरीर बळकट असेल तर मन बळकट राहते यासाठी त्यांनी व्यायामशाळा सुरु केली. चाफळ जवळच्या अकरा गावात हनुमान मंदिरांची स्थापना केली.
दासबोधाची निर्मिती
चाफळ मुक्कामी असताना समर्थांना शिवथरघळीसारखं दुर्दम्य ठिकाण मिळाले. लिखाणासाठी त्यांनी त्यांचा मुक्काम शिवथरघळीत व्हायला लागला. याच ठिकाणी समर्थांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला. परमार्थ आणि व्यवहार यांची अचुक सांगड घालणारा हा ग्रंथ शिवथरघळीतच लिहिला. समाजाला आनंदी करणारा, सर्वसामान्यांचे जीवन सुखी करणारा विचार त्यांनी मांडला. तसे प्रत्येकाच्या विचारात, वागण्यात, वाणीत, आचरणात मांगल्य असावे हा त्यांचा ध्यास होता. यासाठीच त्यांनी त्यांचे आयुष्य वेचले. त्यांचे हे विचार आजही नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहेत.