September 16, 2024
Sculptor Sonali Palavs quest for eternal truth
Home » शिल्पकार सोनाली पालव : शाश्वत सत्याचा शोध
विशेष संपादकीय

शिल्पकार सोनाली पालव : शाश्वत सत्याचा शोध

शाश्वत सत्याचा शोध घेणे हे चांगल्या शिल्पकाराचे काम असते. एखाद्या सुंदर व्यक्तीचे शिल्प बनवण्याच्या पलिकडला आनंद मला श्रमाशी निगडित शिल्प बनवते तेव्हा मिळतो.कलाकार म्हणून आपल नात समग्र मानवी कल्याणाशी हव. आपल्या शिल्पकलेबद्दल अशी स्वतंत्र दृष्टी मांडणाऱ्या शिल्पकार सोनाली पालव म्हणजे पुरुषी मक्तेदारी असणाऱ्या शिल्पकला क्षेत्रात त्यांच्या मागून येणाऱ्या महिला शिल्पकारांना एक प्रेरणाच होत.

शिल्पकला म्हणजे मूर्ती घडविणे एवढाच मर्यादित विचार नसतो. शब्दांच्या पलीकडे शिल्प बोलत असते. शाश्वत सत्याचा शोध घेणे हेही चांगल्या शिल्पकाराचे काम असते. केव्हा केव्हा कल्पनाशक्तींचा उपयोग करून शाश्वत सत्याच्या मर्यादाही ओलांडल्या जातात. शिल्पकला आपल्याला एक स्वतंत्र अस्तित्व देते. मला या अस्तित्वापर्यंत पोहचायचे आहे. शिल्प असो किंवा कोणतीही कला त्यातून व्यक्त होणे ही तुमची जगण्याची गरज असली पाहिजे आणि ही गरज समग्र मानवी कल्याणाच्या जगण्याशी निगडित हवी. म्हणूनच एखाद्या सुंदर व्यक्तीचे शिल्प बनवण्याच्या पलिकडला आनंद मला श्रमाशी निगडित एखादे शिल्प मी बनवते तेव्हा मिळत असतो. एखादं कोकरू हातात घेऊन उभी राहिलेली स्त्री किती अभावग्रस्त व्यवस्थेतून जगत असते, हे भान मी जेव्हा शिल्पकलेतून व्यक्त करते तेव्हा मिळणार समाधान कोणत्याही पुरस्कारापेक्षाही अधिक असतं. आपल्या शिल्पकलेबद्दल अशी स्वतंत्र – स्पष्ट दृष्टी असणाऱ्या सुप्रसिद्ध शिल्पकार म्हणजे सोनाली पालव.

शिल्पकलेत नाव प्राप्त केलेले अनेक शिल्पकार आहेत. मात्र पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या या कलाक्षेत्रात महिला शिल्पकार म्हणून सोनाली यांनी आपली दमदार वाटचाल सुरू ठेवली आहे. यामुळेच प्रसिध्दीपासून अलिप्त राहणाऱ्या सोनाली यांच्या कामाची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. बॉम्बे आर्ट सोसायटीज ऑल इंडिया ॲन्यूअल एक्जीबिशन” मध्ये पद्मश्री राम सुतार (गुजरात नर्मदातीरी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगप्रसिद्ध पुतळा उभरणारे शिल्पकार) यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित अशा पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले आहे.

सोनाली या मूळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जांभवडे येथील; पण त्यांचा परिवार कणकवली येथेही वास्तव्यास आहे. मात्र शिल्पकलेतच नावलौकिकता मिळविण्यासाठी त्यांनी मुंबईचा रस्ता धरला आणि प्रचंड संघर्षात त्यांनी शिल्पकलेची वाटचाल सुरू ठेवली. महाविद्यालयीन जीवनात त्यांना रांगोळीसाठी मुंबई विद्यापीठाची दोन सुवर्णपदके मिळाली. इथूनच त्यांच्यातील कलाकार खऱ्या अर्थाने जागा झाला. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टची पदवी घेतलेल्या सोनाली यांना “लोनलीनेस” या त्यांच्या शिल्पासाठी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट चा ‘पंडित दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार मिळाला आहे.” मदर इन लॉ” या शिल्पाला “शिल्पकार बी. व्हि. तालीम” पुरस्कार मिळाला आहे. याच शिल्पाला पुढे “उलवे आर्ट फेस्टिवल” मध्ये प्रथम पारितोषिक मिळाले. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या शिक्षणानंतर त्यांनी व्यवसायिक दृष्टीने काम सुरू केले. कामाच्या निमित्ताने त्यांचा अनेक ठिकाणी प्रवास झाला. त्यातून व्यवसायिक आणि वैयक्तिक पातळीवर चालणाऱ्या कामांमधला प्रचंड भेद जाणवला. त्यातून त्यांनी स्वतःसाठीही काही कामे केली.

आतापर्यंत त्यांनी ७५० च्या आसपास शिल्पकृतींची निर्मिती केली आहे. पण परिस्थितीच्या अस्थिरतेमुळे त्यांच्या बऱ्याच कलाकृती गहाळ झाल्या. जागेच्या अभावामुळे त्यांना शिल्पाकृतींचा संग्रह करता आला नाही. पुढे काही शिल्पे त्यांनी प्रचंड ओढाताण करून बनवली. त्यातील काही निवडक शिल्पे त्यांच्या संग्रही आहेत. त्यातील “पोतराज” हे पूर्णाकृती शिल्प सन 2020 मध्ये “ललित कला अकादमी, नवी दिल्ली” येथील राष्ट्रीय प्रदर्शनात प्रदर्शित झाले. आणि ” द शेफर्ड ” या व्यक्तीशिल्पासाठी सन 2021 मध्ये ” बॉम्बे आर्ट सोसायटीज ऑल इंडिया ॲन्यूअल एक्जीबिशन” मध्ये “पद्मश्री राम सुतार” पुरस्कार उत्कृष्ट शिल्प म्हणून मिळाला.

याबद्दल सोनाली म्हणतात,”यश मिळाले खरे; पण या सर्व शिल्पांसाठी मला प्रचंड खर्च आला. मात्र स्वतःला सिद्ध करण्यासाठी, माझ्या अस्तित्वाला अभिव्यक्त करण्याचा मी प्रयत्न केला याचा आनंद मोठा आहे.”

आपल्या प्रारंभीच्या वाटचालीविषयी सोनाली सांगतात, सुरुवातीला मी महान चित्रकार रघुवीर मुळगावकर, एस. एम. पंडित, बाबुराव पेंटर आणि राजा रविवर्मा यांच्या वास्तववादी स्पर्श असलेल्या चित्रशैलीकडे आकर्षित झाले. मात्र मी भोवताली जे काही पाहिले, अनुभवले तेच मी माझ्या चित्रांतही रंगवत राहिले. पुढे त्याला मातीचा स्पर्श आला. त्यातून मला जास्त आनंद आणि परिपूर्णता मिळू लागली. यातूनच माझी शिल्पकला उदयास आली. पुढे मी चित्रकलेचे आणि शिल्पकलेचे रितसर शिक्षण घेतले. दरम्यानच्या काळात अनेक संकटांचा सामना करावा लागला. गरिबी जवळून बघितली. अनेक चित्र विचित्र अनुभव आले. जीवनातील महत्त्वाचा काळ परिस्थितीच्या अपुरेपणाशी लढण्यात गेला. शेवटी काहीही झालं तरी आपल्यातल्या कलाकाराला जगवायचं आहे हे ठाम ठरवून याच परिस्थितीतून वाट काढली.ज्येष्ठ शिल्पकार, चित्रकार यांच्याबरोबर काही काळ काम केले.

चित्रपट सृष्टीतली कामे केली. कमी वयात खूप अनुभव घेतले. माझ्यासाठी शिल्पकला ही फक्त कला नाही. तर ती माझ्या विचारांची, माझ्या व्यक्तिमत्त्वाची, स्त्री म्हणून माझ्या संस्कृतीची आणि या जगाशी असलेल्या माझ्या संबंधाची प्रकट अभिव्यक्ती आहे. जे मला शब्दात व्यक्त करता येत नाही ते मी शिल्पांतून व्यक्त करते.शिल्पकला क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग निश्चित खूप कमी आहे. मुळात हा विषय तसा पुरुषी ताकदीचाच आहे. कारण शिल्पाच्या निर्मिती प्रक्रियेत त्याचे आर्मिचर बनवणे, त्यावर मातीचे लेपन करणे, विशिष्ट उंचीवर चढून काम करणे, ते मातीमध्ये बनवून पूर्ण झाले, की त्याचा मोल्ड बनवणे, पुढे टिकाऊ माध्यमात त्याचे कास्टिंग करणे या सर्व प्रक्रियेत प्रचंड मेहनत लागते. तसेच ते प्रत्येक वेळी यशस्वी ठरतेच असे नाही. कित्येकदा पुरेशा तांत्रिक कौशल्याअभावी ही कामे निष्फळही होतात. केव्हा मोल्ड मध्ये फसतात, कधी तुटतात, मग सारे श्रम वाया जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हा धैर्याचा आणि जोखिम पत्करण्याचा विषय आहे. त्यामुळे या क्षेत्राची निवड कमी महिला करतात आणि बऱ्याचदा केलेच तर त्यांचे काम एक तर गुणवत्तेत नसते त्यामुळे मूल्यमापन कमी होते, नाहीतर दुर्लक्षितच राहते. त्यामुळे स्त्रिया शिल्पकलेपेक्षा चित्रकला जास्त प्रमाणात निवडतात.

या सगळ्या पार्श्वभूमीवर सोनाली यांची शिल्पकलेची एकूण समज प्रगल्भ अशीच आहे आणि त्यातून सोनाली यांचे शिल्पकार म्हणून स्वतंत्र अस्तित्वही लक्षात येते. म्हणूनच शिल्पकला क्षेत्रात त्यांच्या मागून येणाऱ्या महिला शिल्पकारांना ते प्रेरणा देणारेही आहे.

( लेखक विख्यात कवी, व्यासंगी पत्रकार आहेत.)


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

एम. एस. वाडिया यांना भावपूर्ण श्रद्धांजली

नमो नमो गणराया ! तू चौदा विद्येचा पाया !

छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्येक मराठ्याच्या हृद्ययात स्वराज्य निर्मिले – जयसिंगराव पवार

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading