निसर्गाला बिघडत्या पर्यावरणाचे अनेक फटके बसत असतांना मौजे असुर्डे येथील युवा शेतकरी मकरंद मुळ्ये यांनी फळबाग लागवडीसाठी केलेले प्रयत्न नक्कीच अनुकरणीय आणि अभिनंदनीय आहे . या तरुण शेतकऱ्यांने चक्क घरातील देशी केळीपासून रोपे तयार करून सुमारे २०० केळीच्या रोपांची लागवड केली आहे.
जे. डी. पराडकर
संगमेश्वर
कष्ट केले तर , त्याचे फळ नक्की मिळते. मात्र फळ मिळायला हवे असेल तर, आधी कष्ट करायला हवेत. निसर्गात झालेल्या पर्यावरणीय बदलांमुळे पिकांना आणि विविध शेतमालाला फटका बसतोय हे जरी खरे असले तरीही प्रयत्न करत रहायलाच हवे या उक्तीप्रमाणे संगमेश्वर तालुक्यातील मौजे असुर्डे येथील प्रयोगशील युवा शेतकरी मकरंद मुळ्ये यांनी यावर्षी आपल्याच जागेत तब्बल २०० केळीच्या रोपांची लागवड करुन केळी उत्पादनाचा अभिनव प्रयोग करायचे ठरवले आहे.
सध्या बाजारपेठेत केळी ५० ते ६० रुपये डझन या दराने विकली जातात. गावठी केळींची मागणी आणि दर विचारात घेऊन मुळ्ये यांनी या केळीच्या लागवडीवर भर दिला आहे. मौजे असुर्डे या दुर्गम गावात नैसर्गिक जलस्त्रोतांच्या आधारावर मकरंद दरवर्षी मिरची, चवळी, पावटा, भुईमूग, पालेभाज्या, भेंडी, वांगी यांची लागवड करतात. या सर्व शेतमालाला संगमेश्वर ही एक मोठी बाजारपेठ आहे. तरीही मुळ्ये यांनी असंख्य खासगी ग्राहक जोडून ठेवले. यामुळे त्यांना बाजारपेठेत मोठ्या भाजी विक्रेत्याकडे कमी दरात आपला शेतमाल विकण्याची वेळ येत नाही. विविध प्रकारची भाजी संगमेश्वर बाजारपेठत येइपर्यंत वाटेतच संपते. विक्रीचे गणित उत्तम साधले असल्याने उत्पादन घेण्यासाठी कितीही मेहनत घ्यायची तयारी आपण ठेवली असल्याचे मुळ्ये सांगतात.
शेतात कामासाठी येणाऱ्या कामगारांसोबत मुळ्ये स्वतः मेहनत घेत असल्याने त्यांचे कामाचे आणि वेळेचे नियोजन आजवर कधीही बिघडले नाही. मुळ्ये यांनी गुरे पाळली असल्याने त्यांनी गोबर गॅससह शेतामध्ये रासायनिक खतांच्या ऐवजी सेंद्रिय खतांच्या वापरावर करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे उत्पादन खर्च तर कमी येतोच शिवाय शेतमालाचा दर्जाही उत्तम राखला जात असल्याचा अनुभव मुळ्ये यांनी सांगितले.
आपण सेंद्रिय खतांचा वापर करतो, हे आपल्या ग्राहकांना माहिती असल्याने आपल्या शेतातील भाज्यांना असणारी मागणी दिवसेंदिवस वाढतच जात आहे. यातूनच अधिकाधिक उत्पादन घेण्याची तयारी आपण ठेवली असल्याचे मुळ्ये यांनी सांगितले. भाजीपाल्या बरोबरच सुपारीचे उत्पादन देखील समाधानकारक असून ठिबकसिंचनद्वारे मुळ्ये यांनी बागेला पाण्याचे नियोजन केले आहे. या पाण्यावर फळबाग फुलवता येइल या हेतूने मुळ्ये यांनी यावर्षी सुमारे २०० केळींची लागवड केली. यासाठी त्यांनी घरी असणाऱ्या जुन्या केळींमधूनच या रोपांची निर्मिती केली.
घरात लावलेली गावठी केळीची जात उत्तम आहे. याच केळीपासून रोपे तयार करण्याचे ठरवले. त्यापासून तयार झालेली रोपे घेऊन लागवड केल्याने खर्चही कमी झाला. या रोपांना सेंद्रिय खते आणि पाण्याचे योग्य नियोजन केले असल्याने रोपांची वाढ उत्तम झाली आहे. गावठी केळ्यांना डझनाला ६० ते ७० रुपये एवढा दर मिळत असल्याने आपल्याला केळी विक्री करण्याची चिंता वाटत नाही.
मकरंद मुळ्ये
मौजे असुर्डे, जि. रत्नागिरी