शाहू महाराजांच्या हृदयात दीनदलितांसाठी करुणेचा झरा: डॉ. जयसिंगराव पवार
‘असे होते आपले शाहू महाराज’ या चरित्रग्रंथाच्या मराठीसह पाच भाषांतील आवृत्ती प्रकाशित
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या हृदयात दीनदलितांसाठी बुद्धाप्रमाणे करुणेचा झरा आणि आईप्रमाणे ममत्वभाव ओसंडून वाहात होता. डॉ. नंदकुमार मोरे यांच्या चरित्रग्रंथाच्या माध्यमातून या करुणासागराच्या संस्कारकथा बालकुमारांपर्यंत पोहोचणार आहेत, याचा मोठा आनंद वाटतो, असे उद्गार ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी आज येथे काढले.
विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी लिहीलेल्या ‘असे होते आपले शाहू महाराज’ या चरित्रग्रंथासह त्याच्या इंग्रजी, हिंदी, कन्नड आणि गुजराती अनुवाद ग्रंथांचेही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ. पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते. इतिहास अधिविभागाच्या वतीने कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले.
एकाच वेळी एकाच पुस्तकाच्या मराठीसह पाच भाषांतील अनुवाद प्रकाशित होण्याची विद्यापीठाच्या इतिहासातील पहिलीच वेळ असल्याचे सांगून डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, ‘असे होते आपले शाहू महाराज’ हे पुस्तक शिवाजी विद्यापीठामार्फत बालकुमारांसाठी प्रकाशित होणे ही अभिनव घटना आहे. डॉ. मोरे यांनी बालकुमार वयोगटातील मुलांचे मानसशास्त्र आणि आकलनक्षमता उमजून घेऊन लिहीलेले हे चरित्र आहे. अत्यंत सुबोध, रसाळ आणि साहित्यिक मूल्य व दृष्टी असणारे असे हे चरित्र झाले आहे. शाहू महाराजांच्या संस्कारकथा मुलांच्या मनावर बिंबविण्याच्या कामी ते मोलाची भूमिका बजावेल, अशी खात्री वाटते.
डॉ. पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र वाचताना दरवेळी वेगळा ध्वनी, वेगळा अन्वयार्थ आढळतो. शाहूचरित्राच्या बाबतीतही तसेच होते. दरवेळी शाहू महाराज नव्याने सामोरे येतात, गवसत जातात. प्रजेबद्दल अपार करुणा आणि माया हे लोककल्याणकारी राजाचे लक्षण असते. हे लक्षण या दोन्ही राजांमध्ये समान होते. शाहू महाराज हे त्यांना भेटणाऱ्या प्रत्येक घटकाची सातत्याने चिंता वाहात असत. मुलांबद्दल त्यांना विशेष ममत्व होते. त्यांच्यातील गुणवत्तेचा ते सतत शोध घेत. भाई माधवराव बागल यांच्यापासून अनेक मुलांमधील सुप्त गुण हेरून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम महाराजांनी केले. पुढे विविध क्षेत्रांमध्ये या गुणवंतांनी आपली चमक दाखवून महाराजांचा विश्वास सार्थ केला.
लेखक डॉ. नंदकुमार मोरे म्हणाले, शाहू महाराजांच्या या चरित्रग्रंथावर काम करीत असताना त्यांचे अनेक पैलू सामोरे आले. बुद्धापासून ते कबीर, तुकाराम, महात्मा गांधी, विनोबा भावे या साऱ्यांची आठवण झाली. एक तत्त्वचिंतक म्हणून राजर्षी शाहू महाराज सामोरे आलेच, पण त्याचबरोबर आईचे हृदय असणारा ममताळू माणूस म्हणूनही ते भावले. विशाल जीवनदृष्टी असणारे त्यांचे व्यक्तीत्व होते. बुद्धाने ज्याप्रमाणे जगातील दुःख दूर करण्यासाठी चिंतन आणि प्रयत्न केले, त्याचप्रमाणे वंचित, शोषित, बहुजन, दलित, स्त्रिया, मुले इत्यादी सर्वच घटकांचे दुःख, दैन्य दूर करण्यासाठी शाहू महाराज प्रयत्नशील राहिले. करुणा, दया, वात्सल्य, कर्तव्यबुद्धी यांच्या बरोबरीनेच निर्भयता आणि समन्यायी दृष्टी ही त्यांच्या व्यक्तीमत्त्वाची अविभाज्य अंगे होती. त्यामुळेच ते अन्य राजांपेक्षा वेगळे उठून दिसतात. शाहू महाराजांचे चरित्र लिहीण्याची संकल्पना मांडून ती पूर्णत्वास नेण्यासाठी सातत्याने प्रोत्साहित केल्याबद्दल कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, शाहू महाराजांचा हा चरित्रग्रंथ म्हणजे मराठी साहित्य, इतिहास आणि कला यांचा त्रिवेणी संगम आहे. शिक्षणाच्या प्रथामिक पायरीपासून उच्चशिक्षणापर्यंत सर्वच स्तरांसाठी विद्यापीठांनी सहसंबंध प्रस्थापित केले पाहिजेत, ते दृढ करीत राहिले पाहिजेत, याचे अधोरेखन करणारा हा प्रकल्प ठरला आहे. बालकुमार घटकांमध्ये मूल्यशिक्षण रुजविणारे हे पुस्तक आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचे अनुवादक डॉ. गोरख थोरात, चित्रकार अन्वर हुसेन यांनी या प्रकल्पाचे काम करीत असताना आपण संपूर्णपणे शाहूमय होऊन गेल्याची भावना व्यक्त केली. इतिहास अधिविभागाचे प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी स्वागत केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, डॉ. राजन गवस, डॉ. अरुण भोसले, डॉ. भारती पाटील, डॉ. वसुंधरा पवार, डॉ. मंजुश्री पवार, डॉ. भारत जाधव, डॉ. नीलांबरी जगताप, डॉ. शरद गायकवाड, डॉ. अनिल गवळी, डॉ. गोमटेश्वर पाटील, किरण गुरव, डॉ. जी.पी. माळी, डॉ. अरुण शिंदे उपस्थित होते.
प्राचार्य कणबरकर यांच्या पुस्तकाच्या अनुवाद ग्रंथाचेही प्रकाशन
शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य रा. कृ. कणबरकर यांचे ‘ग्लिम्प्सेस ऑफ राजर्षी शाहू महाराज’ हे इंग्रजी पुस्तक शिवाजी विद्यापीठाने प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉ. धनंजय देवळालकर यांनी केला. त्यांच्या या ‘शाहू महाराजांचे दर्शन’ या अनुवादग्रंथाचे प्रकाशनही डॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रकाशनादिवशीच पुस्तकाच्या हजार प्रतींची विक्री
‘असे होते आपले शाहू महाराज’ या ग्रंथाच्या सुमारे एक हजार प्रतींची आज प्रकाशनाच्या दिवशीच विक्री झाली. विद्यापीठाने या पहिल्या आवृत्तीची किंमत प्रत्येक समाजघटकाला परवडेल अशी म्हणजे अवघी ५० रुपये इतकी ठेवली आहे. त्यामुळे शाहू जयंतीचे औचित्य साधून आज दिवसभरात अनेक शाहूप्रेमींनी या पुस्तकाची खरेदी केली. अनेकांनी भेट देण्यासाठीही एकाहून अधिक प्रती खरेदी केल्या.
शाहू महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात आज सकाळी त्यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, वसुंधरा पवार यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी जाधव, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्र संचालक डॉ. रामचंद्र पवार, तंत्रज्ञान अधिविभाग संचालक डॉ. अजित कोळेकर यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व सेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी प्रांजली क्षीरसागर यांनी छत्रपती शाहू महाराज यांनी काढलेल्या सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या जाहीरनाम्याचे वाचन केले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.