पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी पावसाळ्यातच पाण्याचा साठा कसा करता येईल याचे नियोजन करावे लागते. तहान लागल्यावर विहीर खणता येत नाही. यासाठी आधीच नियोजन असावे लागते. समस्यांचा महापूर येण्याअगोदरच या समस्याच राहणार नाही याचे नियोजन करायला हवे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
ऐसी वार्धक्याची सूचणी। आपणिया तरुणपणीं ।
देखे मग मनीं । विटे जोगा ।। ५७५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा
ओवीचा अर्थ – असा पुढें येणाऱ्या म्हातारपणाचा इशारा जो आपल्या ठिकाणीं तरूणपणीं विचारानें पाहतो आणि मग जो त्याविषयीं मनांत विटतो.
नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर पगार बंद होतो. उत्पन्नाचा स्रोत खुंटला की मग समस्या सुरू होतात. वय झालेले असते. अशा कालात काय करायचे हा प्रश्न असतो. काहीवेळेला तर स्वतःची मुलेही जवळ करत नाहीत. मग अशा कठीण प्रसंगात करायचे काय? काहीजण वृद्धाश्रमाचा पर्याय निवडतात. पण वार्धक्याच्या काळाचे प्रयोजन जर तारुण्यातच केले तर ही समस्या पुढे भेडसावणार नाही. तरुणपणीच यासाठी काळजी घ्यायला हवी. निवृत्तीनंतरही उत्पन्नाचा स्रोत कायम राहील असे प्रयोजन करायला हवे. याचा विचार तारुण्यातच करायला हवा. वृद्धावस्थेतही चांगले जीवन जगावे असे वाटत असेल तर दूरदृष्टी ठेवून नियोजन करायला हवे.
पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी पावसाळ्यातच पाण्याचा साठा कसा करता येईल याचे नियोजन करावे लागते. तहान लागल्यावर विहीर खणता येत नाही. यासाठी आधीच नियोजन असावे लागते. समस्यांचा महापूर येण्याअगोदरच या समस्याच राहणार नाही याचे नियोजन करायला हवे. पुढे भेडसावणारे प्रश्नांचा विचार करायला हवा. जीवनामध्ये याचा विचारच होत नसल्यानेच आत्महत्या, खून, मारामाऱ्या यांचे प्रमाण वाढताना आढळत आहे.
जीवन कोणत्याही पातळीवर आनंदी राहील याचा सर्वांगीण विचार करायला हवा. जीवनात नियोजनाला अधिक महत्त्व आहे. सध्या नियोजन, दूरदृष्टी यांचा विचारच होत नाही. धार्मिक ग्रंथ हे जीवन कसे जगायचे हे शिकवतात. त्यातील चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करायला शिकले पाहिजे. तसे केले तर आपलेच जीवन सुखी, आनंदी होईल. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जीवन कसे जगायचे हे शिकवतो. जीवनाच्या विविध टप्प्यावर येणाऱ्या समस्यांचे वर्णन यामध्ये केले आहे. यावर उपायही सुचविले आहेत.
काळ बदलला, नवे शोध लागले तरी जीवन जगताना भेडसावणारे प्रश्न मात्र तेच असतात. ते बदलत नाहीत. जन्म आहे तेथे मृत्यू आहेच. तारुण्यानंतर वार्धक्य हे आहेच. कितीही आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले तरी जन्म-मृत्यू, तारुण्य-वार्धक्य हे काही बदलता येत नाही. वार्धक्यातही सुंदर दिसण्यासाठी क्रीम तयार केली जाऊ शकेल. पण त्यालाही मर्यादा आहेत. वार्धक्य सुंदर करायचे असेल सुखी करायचे असेल तर त्याचा विचार तारुण्यातच व्हायला हवा.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.