September 25, 2023
Shashank Purandarae article On Sant Tukaram
Home » तुकोबा हे एकमेवाद्वितीय…
विश्वाचे आर्त

तुकोबा हे एकमेवाद्वितीय…

माघ शुद्ध वसंत पंचमी आज संत तुकाराम महाराज जयंती या निमित्ताने….

एका विठ्ठलाचीच हृदयात स्थापना करणारे तुकोबा हे अव्यभिचारी भक्तीच आचरत होते. अतिशय विवेकयुक्त व वैराग्यशीलतेचे प्रतिक असणारे तुकोबा हे विठ्ठलाचे आगळेवेगळे महाभक्त होते.

शशांक पुरंदरे

प्रपंची किती घातआघात होती
करी खंत ना विठ्ठला नाही तुटी
सदा किर्तने चिंतनाचेनी गुणे
हरी ध्येय मार्गी विशेषे रहाणे

बहू दैवते सांडूनी सर्व काही
विवेके सदा विठ्ठला येक ध्यायी
अती आगळा भक्त विरक्तमूर्ती
जया संगती लाभते सर्व युक्ती 

मराठी जना लाभले भाग्य मोठे
तुकाराम साधू महाभक्त येथे
जयाचेनी नामे विठूलागी येणे
तुकाराम पायी अम्हासी रहाणे

धिराने कधी व्याकुळे होत प्राणे
पदी विठ्ठलाचे सदा होत जाणे
विवेके विरक्ते हरी आळविणे
तुकाराम साधू पुन्हा नाही होणे

विठू देवराया, पदासी विनंती
जरा वैखरी दे अभंगा समस्ती
तुकाराम वाणी असे सर्व ठेवा
वरी चिंतनी सर्वही भाव द्यावा

तुकाराम महाराजांना प्रपंचातील अनेक संकटांना तोंड द्यावे लागले, पण त्यांना या संकटांची अजिबात खंत नव्हती व या संकटांमुळे त्यांच्या विठ्ठल भजनात खंडही पडत नव्हता. विठ्ठलाचे चिंतन, मनन व किर्तन याद्वारेच ते हरी ध्येयाप्रत विश्वासाने वाटचाल करीत होते.

एका विठ्ठलाचीच हृदयात स्थापना करणारे तुकोबा हे अव्यभिचारी भक्तीच आचरत होते. अतिशय विवेकयुक्त व वैराग्यशीलतेचे प्रतिक असणारे तुकोबा हे विठ्ठलाचे आगळेवेगळे महाभक्त होत. अशा तुकोबांच्या संगतीत (त्यांच्या अभंगांच्या संगतीत) परमार्थातील सर्व युक्त्या..प्रयुक्त्या साधकाला नक्कीच सापडतात.

श्री तुकाराम महाराजांसारखे अतिशय श्रेष्ठ संत या मराठी मातीत जन्मले हे सर्व मराठी भाषिकांचे मोठे भाग्यच ! या तुकोबारायांचे/महाभागवताचे नुसते स्मरण जरी कोणी केले तरी प्रत्यक्ष श्री विठ्ठलाला तिथे येणे भाग पडेल. अशा महान योग्यतेच्या श्री तुकोबांच्या चरणी रहाणेच आम्हाला अतिशय आवडते.

तुकोबारायांच्या अभंगांची वैशिष्ट्ये –

कधी अतिशय धीराने तुकोबा उभे राहताना दिसतात तर कधी अगदी प्राणपणाने विठ्ठलाला आळवताना दिसतात. विवेक व विरक्ती यांचा सुरेख संगम ज्यांच्या ठिकाणी झालेला दिसतो अशा तुकोबांसारखा महानुभाव पुन्हा होणे नाही.

हे विठूराया, तुझ्या चरणांशी एक विनम्र प्रार्थना – श्री तुकोबारायांची वचने (वाणी ) हाच आमच्यासाठी अति मौल्यवान खजिना आहे. हे सर्व अभंग आमच्या वैखरीत सदोदित असावेत व या अभंगांचे भावासहित चिंतन मनन आमच्याकडून घडावे.

जय जय राम कृष्ण हरी.

श्री तुकाराम महाराजांच्या चरणी प्रेमपूर्वक दंडवत.

शशांक पुरंदरे.

Related posts

शरीराच्या गावात आत्मानंद नित्य नांदण्यासाठी….

कर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व

सबीज समाधी कशास म्हणतात ?

Leave a Comment