काटेरी अळीचे (घोणस अळी) शास्त्रीय भाषेमध्ये स्लग कॅटरपिलर किंवा काटेरी अळी व ग्रामीण भाषेमध्ये घोणस अळी म्हणून ओळखले जाते.
डॉ. दत्तात्रय गावडे
(शास्त्रज्ञ- केव्हीके नारायणगाव )
अळीची ओळख-
ही एक पतंगवर्गिय कीड असून ती लिमाकोडिडे (स्लग कॅटरपिलर पतंग) या कुटुंबातील आहे. ह्या अळीचे पतंग त्याच्या भक्षकांसाठी मऊ आणि पौष्टिक खाद्य असतात, पंतग फार वेगाने फिरत नाहीत. या अळ्या त्यांच्या शरीराच्या गर्द आणि प्रखर तेजस्वी रंगाद्वारे आणि काटे किंवा केसांद्वारे त्यांच्या भक्षकांना डंख मारण्याची चेतावणी देतात. हे या अळ्यांना त्यांच्या भक्षकांपासून वाचवते. या गटातील सर्व अळ्यांच्या शरीरावर काटे किंवा केस नसतात. या किडीच्या काट्यांच्या दशांमुळे काही प्रमाणात त्रासही होऊ शकतो परंतु या किडीचे पतंग अपायकारक नसतात.
खाद्य वनस्पती
बहुभक्षी प्रकारातील कीड आहे. विशेषतः एरंडी, आंबा, केळी, डाळींब, लिंबूवर्गीय फळे, इतर फळझाडे, देशी बदाम, ओक, चहा, कॉफी, शोभेच्या वनस्पती, तणे आणि इतरही वनस्पती वर आढळून येते.
पिकांसाठी किती धोकादायक
ही अळी फारसे नुकसान करत नाही. परंतु काही वेळा अळीचा प्रादुर्भाव काही ठराविक भागापुरताच मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि प्रादुर्भाव जास्त झाल्यास अळ्या फक्त पानांच्या शिरा सोडून बाकी भाग अधाशीपणे खातात.
अळीचे नियंत्रण
या अळीच्या नियंत्रणासाठी स्पर्शजन्य किटकनाशक योग्य ठरते. यामध्ये काही कीटकनाशक शिफारस नसले तरी चांगले नियंत्रण करतात त्यामध्ये क्विनालफास २० मिली किंवा इमामेक्टिन बेंझोएट ४.४ ग्राम किंवा फ्लबेंडामार्डड ३ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. तसेच बरेच नैसर्गिक मित्र कीटकांदवारे ही या किडीचे नियंत्रण नैसर्गिकरित्याच होते.
कोणत्याही “केसाळ” किंवा “काटेरी” अळ्यापासून स्वरक्षणाची सावधगिरी बाळगावी. अळी मुळे दंश झाल्यास घाबरून न जाता योग्य उपाय अथवा उपचार करावेत.