दही, ताक, लोणी हे रोजच्या जीवनातील उदाहरण आहे. दह्यापासून ताक, लोणी हे सर्वांनाच माहीत आहे. पण ते कसे होते ? हे सुद्धा सर्वांना ज्ञात आहे. रवीने दही घुसळल्यानंतर त्यापासून ताक व लोणी मिळते. दह्यात लोणी असते हे रवीने घुसळल्याशिवाय समजत नाही.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल ९०११०८७४०६
यालागी पुढती । आत्मा वेगळाचि सुमती ।
आतां असो हें किती । जाणतासिं तूं ।। ५१६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – हे सुमति अर्जुना, एवढ्याकरिता आत्मा कर्मापासून वेगळा आहे. आतां हे पुन्हा किती सांगावे ? आतां हे राहू दे, हे तूं जाणतच आहेस.
आत्मा कर्मापासून वेगळा आहे. देहापासून आत्मा वेगळा आहे. हे अनेक उदाहरणातून संत ज्ञानेश्वरांनी वारंवार सांगितले आहे. याची ओळख व्हावी. याची अनुभुती यावी हाच या मागचा उद्देश आहे. अज्ञानाने आपण देहालाच आत्मा समजत आहोत. हे अज्ञान दूर करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी अनेक उदाहरणे सांगितली आहेत. कोणताही अवघड विषय फोड करून सांगितला तर तो लगेच समजतो. सोप्या सोप्या अन् छोट्या छोट्या उदाहरणातून तो विषय समजावून सांगितला तर तो पटकण समजतो. अध्यात्मातील अवघड असे विषय सोप्या सोप्या उदाहरणातून सांगून ज्ञानेश्वरांनी या तत्त्वज्ञानाने सर्वसामान्यांना ज्ञानी केले आहे.
दही, ताक, लोणी हे रोजच्या जीवनातील उदाहरण आहे. दह्यापासून ताक, लोणी हे सर्वांनाच माहीत आहे. पण ते कसे होते ? हे सुद्धा सर्वांना ज्ञात आहे. रवीने दही घुसळल्यानंतर त्यापासून ताक व लोणी मिळते. दह्यात लोणी असते हे रवीने घुसळल्याशिवाय समजत नाही. रवीने घुसळल्याशिवाय ते स्वतंत्रही होत नाही. ह्या क्रियेत रवी ही महत्त्वाची आहे. जसे दह्यात लोणी आहे तसेच देहात आत्मा आहे. तो आपणास दिसत नाही. यासाठी सोsहम साधनेची रवी ही घुसळावी लागते तेव्हाच देह आणि आत्मा वेगळे असल्याची अनुभुती येते. आत्म्याला जाणण्यासाठी सोsहम साधना आहे.
सूर्याभोवती पृथ्वी फिरत आहे, तसेच पृथ्वी ही स्वतःभोवतीही फिरत आहे. या तिच्या फिरण्यामुळेच दिवस-रात्र अनुभवास येतात. सूर्याच्या प्रकाशात जेव्हा पृथ्वीचा समोरचा भाग येतो तेंव्हा तेथे दिवस असतो, अन् मागच्या बाजूला अंधार अर्थात तेथे रात्र असते. पृथ्वीच्या फिरण्यामुळेच हे दिवस-रात्र अनुभवास येते. सूर्य प्रकाशमान आहे. तो एकाठिकाणी स्थिर आहे. दिवस आणि रात्र हे त्याच्यामुळे आहे, पण तो त्यापासून अलिप्त आहे. या कर्मापासून तो वेगळा आहे. सूर्याप्रमाणेच देहात आलेला आत्मा आहे. देहाच्या सर्व कर्मामध्ये सोबत आहे, पण तो त्या कर्मापासून स्वतंत्र आहे.
संत ज्ञानेश्वरांनी अशी अनेक उदाहरणे देऊन देह आणि आत्मा कसे वेगळे आहेत हे सांगण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे. इतकेच नव्हेतर आत्मा देहातील कर्मापासून कसा वेगळा आहे, हे सुद्धा उदाहरणे देऊन सांगितले आहे. ही अनुभुती यावी. याचे ज्ञान व्हावे, हाच उद्देश हे सांगण्यामागे आहे. एकदा ज्ञान झाले, अनुभुती आली की मग पुन्हा अज्ञान राहात नाही. माघारी फिरणे नाही. दह्याचे लोणी झाल्यानंतर पुन्हा त्या लोण्याचे दही होत नाही. दही करता येत नाही. म्हणजे एकदा ज्ञान झाल्यानंतर पुन्हा त्यात अज्ञान उरतच नाही. फक्त त्या ज्ञानाची अनुभुती येणे आवश्यक आहे.
आत्मज्ञानी, ब्रह्मज्ञानी होण्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी हे वारंवार सांगितले आहे. साधना ही त्यासाठीच आवश्यक आहे. मनामध्ये तो विचार प्रकट होण्यासाठी, त्याची अनुभुती येण्यासाठी साधना आहे. साधनेने देह आणि आत्म्याचे वेगळेपण हे अनुभवायचे आहे. हे ज्ञान अवगत करून घ्यायचे आहे. यातूनच सर्वज्ञ होता येते. स्वतःची ओळख ही स्वतःच करून घ्यायची आहे. एकदा ओळख झाल्यानंतर, अज्ञान दूर झाल्यानंतर मग चुकण्याची भिती कसली ? यासाठी साधनेने हे ज्ञान हस्तगत करायचे आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.