महात्मा फुले म्हणजे सत्यशोधक समाज असे नसून या सत्यशोधक चळवळीत योगदान असलेल्या अनेकांचे दुर्लक्षित काम या ग्रंथाद्वारे डॅा. अरूण शिंदे यांनी समोर आणले आहे.
ॲड.शैलजा मोळक
२४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्याला २४ सप्टेंबर २०२३ रोजी १५० वर्ष पूर्ण होत आहेत. आजही सत्यशोधक विचार समाजात जोपासला जातो. यातून तो वाढीस लागत आहे. सत्यशोधकीय विचार जनमानसांपर्यंत जावेत यासाठी तत्कालीन सत्यशोधकांनी पत्रकारितेचा आधार घेऊन नियतकालिके सुरु केली.
महात्मा फुले, कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, भास्करराव जाधव, मुकूंदराव पाटील, भगवंतराव पाळेकर, वालचंद कोठारी, अण्णासाहेब लठ्ठे, श्रीपतराव शिंदे, बाबुराव यादव, दिनकरराव जवळकर, केशव सीताराम ठाकरे अशा अनेकांनी अनुक्रमे सत्सार, दीनबंधू, अंबालहरी, शेतकऱ्याचा कैवारी, मराठा दीनबंधु, दीनमित्र, जागृति, जागरूक, डेक्कन रयत, विजयी मराठा, गरीबांचा कैवारी, तरूण मराठा, कैवारी, तेज, प्रबोधन, लोकहितवादी अशी अनेक नियतकालिके सत्यशोधकीय विचार प्रचार प्रसारासाठी काढली होती.
महात्मा फुले म्हणजे सत्यशोधक समाज असे नसून या सत्यशोधक चळवळीत योगदान असलेल्या अनेकांचे दुर्लक्षित काम या ग्रंथाद्वारे डॅा. अरूण शिंदे यांनी समोर आणले आहे. या ग्रंथात सत्यशोधक चळवळ, सत्यशोधकीय नियतकालिकांचे स्वरूप, सत्यशोधकीय नियतकालिकांचे वैचारिक साहित्य, सत्यशोधकीय नियतकालिकातील कविता, कादंबऱ्या, कथा, नाट्यस्वरूप वाड्मय आदीचा सखोल संशोधन व अभ्यास करून यात अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे.
डॅा. आ. ह. साळुंखे यांनी या ग्रंथाची पाठराखण केली आहे. असा अभ्यासपूर्ण ग्रंथ मराठीत प्रथमच येत आहे असे ते म्हणतात. भूतकाळ समजून घेऊन वर्तमानात त्या विचारांची अंमलबजावणी केली तर आपला भूतकाळ प्रकाशमान होईल यात शंकाच नाही.
पुस्तकाचे नाव:- सत्यशोधकीय नियतकालिके
लेखक :- डॅा. अरूण शिंदे
प्रकाशक – कृष्णा संशोधन व विकास अकादमी, मंगळवेढा
पृष्ठे:- ५३२ (पुठ्ठा बायडिंग )
किंमत :- ₹ ७५०/-
पुस्तकासाठी संपर्क – 9823627244
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.