November 30, 2023
All is pure by the yoga of pure knowledge
Home » शुद्ध ज्ञानाच्या योगाने सर्व शुद्धच
विश्वाचे आर्त

शुद्ध ज्ञानाच्या योगाने सर्व शुद्धच

एखादी वाईट घटना घडली, तर आपण त्याकडे आव्हान म्हणूनच पाहायला हवे. तरच आपण आव्हानांचा सामना करू शकू. या आव्हानातून काय शिकता येईल ? कोणता बोध घेता येईल ? अशा घटना पुन्हा होणार नाहीत यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी. असे सकारात्मक अन् शुद्ध विचार ठेवल्यास आपण या कठीण प्रसंगात निश्चितच प्रगती साधू शकतो.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

जे दिठीं जरी चोख कीजे । तरी भलतेंही चोख सुजे ।
तैसें ज्ञानें शुद्धें लाहिजे । सर्वही शुद्ध ।। ५२७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – कारण की, दृष्टि निर्मळ केली तर वाटेल ते शुद्ध दिसते. त्याप्रमाणे शुद्ध ज्ञानाच्या योगाने सर्व शुद्धच प्राप्त होते.

सकारात्मक विचार करण्याची वृत्ती का जोपासायला हवी ? याचे फायदे काय आहेत ? हे जेंव्हा समजेल तेंव्हा निश्चितच सकारात्मक विचार करण्याकडे कल वाढेल. आपण सदैव नकारात्मक विचार करत राहीलो, तर आपले मनही नकारात्मक होते. यातून विचारही नकारात्मकच उत्पन्न होतात. याचा तोटा असा होतो की आपले मन खचते अन् पदरी अपयश पडते. यासाठी कितीही मोठी आव्हाने उभी राहीली तरी, त्याकडे सकारात्मकदृष्टीने पाहून त्याचा सामना करायला हवा.

जीवनात अनेकदा आव्हाने उभी राहातात. कठीण प्रसंग, अडचणींचा सामना करावा लागतो. या प्रसंगात मानसिक स्थितीही अस्वस्थ करते. पण अशा कालावधीत मनाला चांगल्या विचारांची गोडी लावून आव्हानातून काही नवे शिकायला मिळते असे समजून सामोरे गेल्यास कठीण प्रसंगावर सहज मात करता येते. कठीण प्रसंगाने नुकसान झाले म्हणून डोक्याला हात लावून बसलो तर नुकसानच अधिक होते. यासाठी अशा कठीण प्रसंगाकडे पाहाण्याची दृष्टी ही बदलायला हवी. कठीण प्रसंगात पळवाट न शोधता, त्याचा सामना करणारी पर्यायी फळी उभी करायला हवी. यात होणाऱ्या फायद्याच्या गोष्टींनी प्रोत्साहित करायला हवे म्हणजे फायदा अधिक होत राहील. यात थोडाजरी फायदा झाला तरी पदरी आलेल्या मोठ्या अपयशाला आपण पळवून लावू शकतो. खचलेल्या मनाला धैर्य अन् स्फुर्ती मिळू शकते.

यासाठीच एखाद्या गोष्टीकडे पाहाण्याचा दृष्टीकोन हा शुद्ध, सकारात्मक ठेवायला हवा. सर्वच क्षेत्रात काळानुसार बदल हे होत आहेत. त्यामुळे काळानुसार बदल घडवून बदलत राहण्याकडे आपला कल असायला हवा. पूर्वीची हत्यारे, आयुधे वेगळी होती. नव्या युगातील आयुधे, हत्यारे वेगळी आहेत. काळानुसार बदल हा करावाच लागतो. अन्यथा आपली सुरक्षितता ही धोक्यात येऊ शकते. नवनवे शोध हे लागत राहातात तसा त्याचा वापरही होत राहीला पाहीजे. नवे विचार नवी आव्हाने ही येतच राहातात. या प्रत्येक गोष्टीकडे शुद्ध विचाराने, सकारात्मक दृष्टीकोणातून पाहायला हवे. तरच आपण या गोष्टींचा धैर्याने सामना करू शकतो.

एखादी वाईट घटना घडली, तर आपण त्याकडे आव्हान म्हणूनच पाहायला हवे. तरच आपण आव्हानांचा सामना करू शकू. या आव्हानातून काय शिकता येईल ? कोणता बोध घेता येईल ? अशा घटना पुन्हा होणार नाहीत यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी. असे सकारात्मक अन् शुद्ध विचार ठेवल्यास आपण या कठीण प्रसंगात निश्चितच प्रगती साधू शकतो. सकारात्मक, शुद्ध विचारातून समोरच्या व्यक्तीकडूनही सुखद अनुभव मिळू शकतो. त्याच्याही मनात आपण परिवर्तन घडवून आणू शकतो. यातून आपणास शुद्ध लाभ होऊ शकतो. नुकसान झाले आहे मग आपणही त्याचे नुकसान करू असा अशुद्ध विचार दोघांचेही नुकसान करू शकतो. युद्धात दोघांचीही हाणी होते. पण मित्रत्वात दोघांचाही फायदा होतो. असे शुद्ध विचार घेऊन पाऊले उचलल्यास कठीण प्रसंगात आपणास यश प्राप्ती होऊ शकते.

यासाठीच सर्व गोष्टीत आपली दृष्टी ही शुद्ध ठेवायला हवी. घटनेकडे पाहाण्याचा दृष्टिकोन हा शुद्ध ठेवायला हवा. तसे बदल आपण आपल्या जीवनात करायला हवेत. तरच आपण प्रगती करू शकू. अन्यथा आपली अधोगतीच अधिक होईल. शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी. यासाठी शुद्ध विचारांची पेरणी केल्यास येणारी ज्ञानाची फळे ही शुद्धच असतील.

Related posts

वडाचीच पूजा व्हावी !

नव्या अक्षरांचे आगमन…

ज्ञानरुपी तलवारीने छेदा अज्ञान

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More