March 25, 2023
Yadi Book Review by Dr Anant Soor
Home » उपासमार अन् मातृप्रेमाने भारावलेले आत्मकथन: याडी
मुक्त संवाद

उपासमार अन् मातृप्रेमाने भारावलेले आत्मकथन: याडी

‘याडी’चे वाचन करताना बंजारा गोरमाटी समाजात असणाऱ्या परंपरा, दुष्काळ, तांड्यावरील जग, सण आणि उत्सव, उपासमार, शिक्षणासाठीचा संघर्ष, याडीच्या मुलाप्रती असलेल्या भविष्यातील अपेक्षा, पंजाबचे संघर्षमय जगणे, वडीलाचा प्रमाणिकपणा, दारिद्र्यात मदतीला धावून न येण्याची नातेवाईकांची वृत्ती, काकाची कुटुंबातून वेगळे होण्यासाठी चाललेली धडपड यासारख्या अनेक गोष्टी वाचकांचे मन अस्वस्थ आणि विचलित करतात.

डॉ. अनंता सूर (भ्र.९४२१७७५४८८)
मराठी विभागप्रमुख,
श्री गजानन महाराज महाविद्यालय, मुकुटबन, ता – झरी (जा.), जि – यवतमाळ पिन- ४४५३०४

विदर्भातील मातीने अनेक क्षेत्रांमध्ये आपला कायमस्वरूपी ठसा उमटवलेला दिसून येतो. मग ते क्षेत्र राजकारणाचे असो की साहित्याचे असो परंतु विदर्भाने नेहमीच बाजी मारली आहे. मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे याच बळीराजाला कर्जापोटी आत्महत्या करण्याची मालिकासुद्धा विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याच्याच वाट्याला आली आहे. ज्या शेतीत रात्रंदिवस शेतकरीराजा राबराब राबतो तीच शेतीव्यवस्था निसर्गावर आधारलेली असल्यामुळे पाऊस कमी झाला किंवा जास्त झाला तरी त्याचा परिणाम शेतकऱ्याच्या जीवनावर होतो आणि आपले लाखमोलाचे जीवन शेतकरी गमावून बसतो.परंतु खरे पाहिले तर आत्महत्या हे शेतीचा व्यवसाय करतांना शोधलेले उत्तर होऊ शकत नाही. आत्महत्येने आयुष्याचे प्रश्न सुटत नाही हे पुन्हा एकदा शेतकरी राजाने समजून घेण्याची गरज आहे.

याच विदर्भाच्या मातीतील पुसदच्या परिसरातील तांड्यातून आपले आयुष्य फुलविणारे एक सक्षम लेखक म्हणजेच पंजाब चव्हाण हे होत. आज त्यांची साहित्यातील ओळख ही ‘याडीकार’ म्हणून आहे. ‘याडी’ अर्थात आई. ‘याडी’ हे एकप्रकारे पंजाब चव्हाण यांनी लिहिलेले आत्मकथन म्हणावे की कादंबरी असा प्रश्न वाचकांना पडू शकतो. कारण आत्मकथन म्हणून ‘याडी’चा उल्लेख करावा तर यामध्ये आईचा जीवनसंघर्ष मोठ्या प्रमाणात सांगितलेला आहे आणि कादंबरी म्हणून ‘याडी’कडे पहावे तर यामध्ये पंजाब चव्हाण यांनी प्रत्यक्षपणे आपला आणि आईचा जीवनसंघर्ष रेखाटलेला आहे. त्यामध्ये कल्पनातीत असे काहीही नाही. त्यामुळे सर्वांगीण विचार केल्यास एका अर्थाने ‘याडी’चा समावेश आत्मकथन म्हणून करणे जास्त सोयीस्कर वाटते. साधारणपणे दीडशे पृष्ठांमध्ये पंजाब चव्हाण यांनी आई- वडील आणि स्वतःचा यातनामय जीवनसंघर्ष रेखाटलेला आहे. उपासमार आणि मातृप्रेम यांची सांधेजोड अतिशय मार्मिकपणे ‘याडी’मध्ये केलेली दिसते.

पंजाब चव्हाण यांच्या ‘याडी’मध्ये एकूण ‘याडी’ ते ‘अनमोल याडी’ अशा स्वरूपाची एकंदरीत २१ प्रकरणे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. यात आई आणि लेखकाचा जीवनसंघर्ष सहजरित्या उलगडतो. दारिद्र्य हा मानवी जीवनाला मिळालेला एक शाप आहे असे सामान्यपणे म्हटले जाते. दारिद्र्यामुळे पोटाची उपासमार आणि शिक्षणाला ठिकठिकाणी व्यत्यय येतो हे मान्य. परंतु खऱ्या अर्थाने जीवन समजून घ्यायचे असेल तर दारिद्र्यामध्ये जगलेल्या व्यक्तींकडूनच. दारिद्र्यामध्ये जन्माला येणे हे आपल्या हाती नसले तरी दारिद्र्यासारख्या परिस्थितीशी टक्कर देत आयुष्याचे सोने करणे ही बाब मात्र आपल्या हाती आहे. त्यामुळे वाट्याला आलेल्या परिस्थितीचे रडगाणे न गाता जीवन फुलविण्याचा सकारात्मक संदेश दिला पाहिजे.

‘याडी’चे वाचन करताना बंजारा गोरमाटी समाजात असणाऱ्या परंपरा, दुष्काळ, तांड्यावरील जग, सण आणि उत्सव, उपासमार, शिक्षणासाठीचा संघर्ष, याडीच्या मुलाप्रती असलेल्या भविष्यातील अपेक्षा, पंजाबचे संघर्षमय जगणे, वडीलाचा प्रमाणिकपणा, दारिद्र्यात मदतीला धावून न येण्याची नातेवाईकांची वृत्ती, काकाची कुटुंबातून वेगळे होण्यासाठी चाललेली धडपड यासारख्या अनेक गोष्टी वाचकांचे मन अस्वस्थ आणि विचलित करतात. बंजारा समाजाची भाषा आणि जातपंचायतीचेही दर्शन लेखकाने याठिकाणी घडविल्याचे दिसते.

‘याडी’ची सुरुवातच आईने सत्य बोलण्याच्या सवयीने झालेली आहे. शाळेत १५ ऑगस्टला तिरंगा ध्वज फडकविण्याच्या तयारीत असताना श्री एस. पी. राठोड सर सावधानची ऑर्डर देऊन सर्व मुला-मुलींनी आंघोळ केली का? असा प्रश्न करतात. तेव्हा पंजाब आपण आंघोळ केली नसल्याचे सरांना स्पष्टपणे सांगतो. राठोड सर त्याला आंघोळ करून येण्यासाठी रांगेतून बाहेर काढतात. तो लगेच घरी जाऊन उघड्यावर उघड्यानेच आंघोळ आटोपून लगेच शाळेत हजर होतो. पंजाबचं खरं नाव विजय. परंतु आजोबा( देवरा) सामाजिक परिवर्तन जपणारे असल्यामुळे ते पंजाबचं नाव बदलविण्याची भूमिका घेतात. ते वसंतराव नाईक यांचे भाषण ऐकण्याकरिता पुसदला गावावरून पायी पायी जायचे. नाईकसाहेब म्हणजेच बंजारा समाजाचा जीव की प्राण होता. त्या देव माणसाचे भाषण ऐकण्यासाठी त्यावेळी उमरखेड, महागाव, दिग्रस, दारव्हा आणि वाशिममधून माणसं यायची. कारण वसंतराव नाईक तमाम गोरमाटी गणांना उद्देशून परिवर्तनाकडे नेण्याकरिता पोटतिडकीने भाषण करायचे आणि आपल्या भाषणामध्ये वारंवार पंजाबराव देशमुख यांचे नाव घ्यायचे. त्यामुळे आजोबाच्या मनात पंजाबराव हे नाव ठाम झाले. आणि भाषण आटोपल्यानंतर रात्री ते आपल्या तांड्यावर आले आणि मनाशी खुणगाट करून विजयचे पंजाबराव असे नामकरण करून टाकले.

पंजाबची आई सुंदलीबाई हीच ‘याडी’मध्ये केंद्रस्थानी आहे. वडील लालसिंग व काका भिकू उर्फ रामा हे वसंतराव नाईक साहेबांच्या पुसदमधील बंगल्यावर स्वयंपाकी म्हणून काम करायचे.आई सुंदलीबाई आणि जिजाकाकू दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करीत असल्यामुळे त्यांच्या मजुरीवरच कुटुंब जगायचे. घरातील लहान मंडळींमध्ये पंजाबच्या दोन लहान बहिणी गोदावरी आणि पूर्णा तर एक भाऊ बबन असतो.आणि भिकूकाकाला छगन नावाचा एक मुलगा असतो.आजी ( रखी)दोन्ही पायाने लुली झालेली. अशा एकंदरीत दहा माणसांचा प्रपंच. घरात अठराविश्व दारिद्र्य असल्यामुळे आई आणि काकूला मजुरी मिळाली नाही की उपाशी झोपल्याशिवाय पर्याय नसे. चक्कीत सांडलेले पीठ आणून कधीमधी माय भाकरी करायची तेव्हा तोंडात खडे चावायचे. अशाही स्थितीत पंजाब अभ्यासाकडे नीट लक्ष देत असल्यामुळे त्याचा वर्गात पहिला नंबर यायचा. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला इंग्रजीमध्ये भाषण देण्यासाठी शाळेत पंजाबचा नंबर राखीव राहत असे.एस.पी. राठोड सरांच्या आग्रहामुळेच तो इंग्रजी घोकुन घोकुन पाठ केलेले भाषण द्यायचा आणि शाळेतील शिक्षक, मान्यवर मंडळी व सर्व विद्यार्थीही जोरजोराने टाळ्या वाजवीत असे.

कुटुंब आर्थिक परिस्थितीने पछाडलेले असले तरी ‘पंजाब शिकून मोठा साहेब झाला पाहिजे’अशी आई आणि आजोबाची इच्छा होती. एक दिवस रात्री असेच घरातील सगळेजण उपाशी झोपलेले असताना मोठा विषारी नाग आईच्या पोटावरून मुलांच्या पोटापर्यंत चालत जातो. त्यामुळे आई जागी होते आणि घाबरून डोळ्यात अश्रू आणित कुलदैवत सामत दादाची प्रार्थना करते. नागराज घरातील कोपऱ्याकडे गेल्याची खात्री होताच ती सर्व मुलांना झोपेतच उचलून अंगणात आणून ठेवते आणि बाहेर येऊन जोरजोराने रडायला लागते. आजूबाजूची मंडळी जमा होताच ती त्यांना साप आल्याचे सांगते. घरी जमा झालेले लोक सापाला शोधून मारतात. आपल्याला राहायला चांगले घर नसल्यामुळे आज आपल्या मुलांवर अशी परिस्थिती उद्भवली याची खंत ‘याडी’च्या मनात निर्माण होते. परंतु परिस्थितीपुढे साऱ्याच गोष्टी सहन करण्याची ताकद तिच्या अंगी निसर्गाने दिल्याचे दिसून येते.

दुसऱ्या दिवशीही सकाळची चूल न पेटल्यामुळे याडी शेतात तरी मुलांना भाकर मिळेल या आशेने पांडू जाधव मावश्याच्या माळरानात लेकरांना घेऊन जाते. कारण दुपारच्या जेवणाच्या वेळी मालक मंडळींकडून मजूर बायांना भाकर दिल्या जात असते.भूक लागल्याने पंजाब,’याडी दोपेर कना हंच.’ म्हणून चौकशी करतो. दुपार झाल्यानंतर सर्व मजूर मंडळींकडून अर्धी कोरभर भाकर देऊन आईला समजावतात. ती जड अंतकरणाने आपल्या दोन दिवसाच्या उपाशी मुलांना भाकर देते.काळजाच्या तुकड्याची अन्नापोटी उपासमार झाली की आईच्या मनाची कशी तगमग होते याचे वास्तव चित्रण या ठिकाणी पाहायला मिळते. तरीही याडी,” पंजाब तू काही काळजी कर मत, तोर सवार शाळेम जायेन मळीय.”(पृ.३९)असे म्हणून पंजाबच्या मनाला दिलासा द्यायला चुकत नाही.
कुठलीही मजुरी मिळत नसल्यामुळे एकदा बाबाची मजुरी आणण्यासाठी याडी पंजाबला घेऊन पुसदमधील नाईक साहेबांच्या बंगल्यावर जाते. बंगल्यातील नौकर बाबासाहेब नाईकांची पत्नी पार्वतीबाईला लालसिंगची बायको बाहेर येऊन बसलेली असल्याचे सांगतो. त्या त्यांना लगेच आत बोलावून त्यांची आस्थेने चौकशी करतात. पोटभर जेवण देऊन त्यांना त्या काही पैसेही देतात. मुलांची आठवण झाल्याने याडी त्या जेवनातील काही पोळ्या ओढणीच्या कोश्याला बांधते. जातांना मालकीण सहा पायल्या ज्वारी देण्याविषयी नौकराला सूचना करते. नौकर सहा पायल्या ज्वारी मोजून देतो आणि अजूनही दोन पायल्या ज्वारी घेऊन जाण्यास सांगतो. परंतु याडी मात्र त्या गोष्टीला नकार देते. घरी आल्यावर पंजाब, याडी आपणं दि पाली जार जादा का कोणी लेलदे…’ म्हणून प्रश्न करतो त्यावेळी “नको नानकी नायकणं जतरा की वतराच लेयरो.”(पृ.४१) अर्थात कधी कुणाचे जास्तीचे घेऊन विश्वासघात करायचा नसतो.माणसाने कोणत्याही परिस्थितीत प्रामाणिक असले पाहिजे. प्रामाणिकपणाच शेवटी माणसाला यशाकडे घेऊन जात असतो असे तत्त्वज्ञानही अशिक्षित याडी पंजाबला देताना दिसते.

झडीमुळे किंवा बिमारीमुळे शेळ्या मरायला लागतात. त्यावेळी गुलाबभाऊ तांड्यातील मंडळींना त्या घेऊन जायला सांगतात.तांड्यातील मंडळी मेलेल्या शेळ्या कापून मटण शिजवून खातात परंतु भाकर नसते. तर कधी मासोळ्या, घोरपड, रानबिल्ली, करमकागला खाऊन तांड्यातील लोकांना दिवस काढावे लागते. असेच एकदा पंजाब आणि लहान बहिण गोदावरीला गोवर निघाल्यामुळे याडी कामावर जाणे बंद करते. घरातील ज्वारी, पीठ संपल्यामुळे कुटुंबावर उपाशी राहण्याची वेळ येते. त्यामुळे याडी शेजाऱ्याजवळ उसनवारीने दोन पायल्या ज्वारी मागायला जाते. परंतु अंधश्रद्धेत बुडालेला तांडा ज्याच्या घरी देवीचा रोग झाला आहे त्याला ज्वारी देण्यास नकार देतो.शेवटी सामकी आत्या दहा कडव्याच्या पेंढ्या याडीला देते.त्या पेंढ्या याडी पुसदच्या बाजारात विकण्यासाठी दिवसभर घेऊन बसते. शेवटी सायंकाळी एका मुसलमान माणसाला याडीने घरची सत्य परिस्थिती सांगितल्यावर त्याला तिची दया येऊन तो दहा रुपयांमध्ये सर्व पेंड्या विकत घेतो. त्या पैशातून ती तांदूळ विकत आणून पोरांना भात करून देते. रडत रडत,”भगवान ई कायी पाळी लायो रे तार हाम काई… रे..?”( पृ.४३)म्हणत याडी आपल्या डोळ्यातील अश्रूंना मोकळी वाट करून देते.

याडी डोंगराएवढे दुःख सहन करीत पंजाबला साहेब करण्यासाठी कसेतरी शिकवित होती. तशीच ती लुली आजी आणि आजोबाचीसुद्धा मनोभावे सेवा करायची.आजीला पॅरालिसिस झाल्यामुळे तिला उचलून संडासला न्यायची. आजोबासुद्धा अनेकदा धोतरात संडास करायचे परंतु आईने त्यांच्याशी कधीच वाद घातला नाही. उलट स्वतः उपाशी राहून जिजाकाकू, आजी-आजोबांना जेवायला वाढत असे. त्यामुळेच आईने पहिली भाकर आजोबांना वाढली की ते,” जो सुंदल तार एकेर एकविस हिय ! तू हारी भरी रिय !”( पृ.४४)अशा शब्दात आशीर्वाद द्यायचे.तर शाळेतील पंजाबची हुशारी पाहून,” सुंदल… तार छोरा पंजाब घणो हुशार छं. एक दन तार छोरारे आंघपाच पाचपचीस लोक रिय!( पृ.४४) अशा शब्दात स्तुती करतात. पंजाब हाच तिला आपला आधार वाटत असल्यामुळे याडी आपली मुलगी गोदावरीला शाळेतून काढून घराच्या हातभारासाठी निंदण करायला लावते. दोन मुलांना शिकवणे तिला जड जात असते.

असेच एकदा शेलुला पाटलाच्या घरी वऱ्हाडी मंडळीसोबत लग्नाच्या पंगतीमध्ये बसलेले असताना,’ अरे पंक्तीत लभानी लोक बसले आहे.’ असे म्हणून मुलांना उठवले जाते. एकदा बाबा आईला घागरा घेऊन देण्यासाठी पुसदमधील मेन रोडच्या कपड्याच्या दुकानात नेतात. परंतु आई मात्र घागऱ्याचा बेत सोडून भांड्याच्या दुकानातून पाण्याचा पितळेचा हंडा खरेदी करते.घर संसाराला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे याडीची असलेली दक्षता या ठिकाणी आपल्याला दिसून येते. याच दरम्यान भिकूकाका अलग राहण्यासाठी घरामध्ये कुरकुर करायला लागतो. परंतु जिजाकाकूला मात्र एकत्रच राहावेसे वाटते. एक दिवस तो भिकूकाका याडीसोबत भांडण करून, नको ते बोलून याडीला अपमानित करतो. आपण दोन दिवसांपासून उपाशी असताना मात्र आपला लहान भाऊ वेगळे होण्यासाठी आपल्या बायकोबरोबर झगडा करतो ही गोष्टसुद्धा त्यावेळी बाबाला मुळीच पटत नाही.
झडीच्या दिवसातही तांड्यातील लोकांचे धान्य संपल्यामुळे तीन दिवसांपासून सर्वच चुली बंद पडलेल्या असतात. कुणाला उसने मागावं म्हटलं तर सगळ्यांची अवस्था सारखीच. झोपडीत गळणाऱ्या पावसामुळे सगळे भिजलेले. घरात पाणी आल्याने झोपायलाही पुरेशी जागा नाही. अशा भर पावसात सवाई पवार कुटुंबाला जगवण्यासाठी म्हणून पीठ मागत तांड्यात फिरतो. परंतु त्याला कुठेही पीठ उसने मिळत नाही. सकाळी पाऊस थांबताच तो कुऱ्हाड घेऊन जंगलाच्या वाटेने जातो.आणि झुडपात लाकूड तोडायला कुऱ्हाड मारणार तोच उजव्या पायाला विषारी साप चावल्यामुळे त्याच्या सर्वांगात दाह होऊ लागतो. अशाही स्थितीत तो कसातरी तांड्यावर येतो. परंतु शेवटी अंधश्रद्धेपोटी तांड्यातील लोकांनी मंत्रतंत्र, धागेदोरे, लिंबू उतारा केल्याने शेवटी त्याचा जीव जातो.

जातपंचायतीने समजावूनसुद्धा भिकूकाकावर काहीच फरक पडत नाही.आणि तो बायकोला व मुलाला घेऊन वेगळा संसार करून राहू लागतो. कुटुंब फुटण्याच्या वेदना उरात घेऊन याडी दुसऱ्याच्या शेतात विळा घेऊन ज्वारी कापायचे काम करते तर दुसरीकडे बाबालाही वेळेवर मजुरी मिळू लागते. मात्र वेगळी चूल केल्याबरोबर काका लपवून ठेवलेल्या पैशातून भांडे विकत आणतो.आई मात्र कष्ट करून मुलांना पोसण्यात आणि शिक्षण देऊन वाढविण्यात गुंग झालेली असते. तांड्याचा विकास अंधश्रद्धेमुळे थांबलेला असतो. भानामती येणे, समणं पाहून पोचामायला (देवीला) बोकड कापणे, आजारी व्यक्तीला धागादोरी बांधून लिंबू ओवाळण्यासारख्या गोष्टी तांड्यामध्ये खुलेआम चालतात.

असाच एकदा पंजाब सितारामसोबत जंगलात जातो. अंधार पडूनही तो न आल्यामुळे याडी चिंतेत पडते. रात्री बऱ्याच उशिरा दोघेही तांड्यावर येतात तेव्हा मात्र आईचा जीव भांड्यात पडतो. तांड्यात सातवी पास झाल्यानंतर पंजाब आठवीला कोषटवार दौलतखान विद्यालयात प्रवेश घेतो. राहण्याची मोफत व्यवस्था शासकीय मुलांचे वस्तीगृह, बजाज बिल्डिंग, मोतीनगरला झालेली असते. दर रविवारी याडी बाजाराकरिता आली की तो बाजारात चालत जाऊन एका भजेवाल्या हॉटेलात आईची वाट पाहात थांबायचा. आई आल्याबरोबर त्याला छातीशी कुरवाळायची. तिने सोबत आणलेल्या भाकरी रस्सेवाल्या आलूबोंड्यासोबत हॉटेलात दोघेही खायचे.बाजार झाल्यानंतर याडी गावाचा रस्ता धरताना रडायला लागायची. तिला पाहून पंजाबच्याही डोळ्यात पाणी येई.ती त्याला सारखं,” पंजाब तु आचो शाळा शिक,नोकरीन लागतोच आपनेंन बाटी मळीय!”(पृ.७८)असं सांगून घरच्या परिस्थितीची जाणीव करून द्यायची. त्यामुळे तो अभ्यासात मेहनत घ्यायचा. अशा स्थितीत पंजाब जेव्हा दहावी पास होतो तेव्हा आई स्वतःचीच काहीतरी पुटपुटत एका हाताने आपले डोळे पुसते. ”बरं झालं तू पास झाला बाबा” म्हणत गुणपत्रिकेच्या जाडीवरून मुलगा पास झाल्याचा तिला बोध होतो.

पंजाब अकरावीला पुसदच्या फुलसिंग नाईक महाविद्यालयात वाणिज्य शाखेला प्रवेश घेतो. गरिबी हटाव मोहिमेअंतर्गत स्टेट बँकेचे सतराशे रुपये लोन मंजूर होऊनही दोन म्हशीच्या मोबदल्यात एकच म्हैस मॅनेजरसाहेब त्यांना देतो. पंजाब पुसदच्या हॉटेलला दूध विकून साठ रुपये महिन्याला बँकेत भरतो.मात्र म्हैस दूध देणे बंद करताच गोदावरीचे लग्न जोडून आई-बाबा ती म्हैस विकून टाकतात. याच दरम्यान भिलसिंग राठोड मामाचा मुलगा मोहन हा रेडिओवर ऐकून हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब गेल्याची बातमी तांड्यात सांगतो. त्यावेळी तांड्यातील लोकांमध्ये, “आपणो बाप चलेगो.आब आपणे समाजेर कु कायी हीय…भा?.”(पृ.८५)म्हणत दुःखी होतात. प्रत्येकाला आपल्या घरातील व्यक्तीच मरण पावल्यासारखे वाटते.

पुढे पंजाब एडवोकेट चंदूसिंग नाईकाच्या भूदान चळवळीच्या कार्यालयात हप्त्याला दहा रुपयेप्रमाणे लिहिण्याचे काम करतो. बाबांनी नाईक साहेबांच्या बंगल्यात हिमालयासारखी माणसे जवळून पाहिलेली होती. त्यामुळे पंजाबला ते स्वावलंबी जीवन जगण्याचा आणि स्वतःशीसुद्धा प्रामाणिकपणे राहण्याचा उपदेश द्यायचे. एकदा याडी आणि पंजाब बाबाजवळ पंढरपूर बघण्याची इच्छा व्यक्त करतात. त्यावेळी ते त्यांना म्हणतात,” अरे पंजाब मी साक्षात देव माणसासोबत राहिलो आहो. आणि तू मला मंदिरातील दगड बघण्यासाठी नेतो आहे. अरे मंदिरात देव नाही दगड असतात. जर देवच पाहायचे असेल तर माणसात देव बघ.”(पृ.९०) हे आयुष्यामध्ये अनुभवलेले बाबांचे तत्त्वज्ञान होते.

इसापुर धरण बघितल्यानंतर पंजाब एकदा मामाच्या गावी सावरगावला (बंगला) जातो. तिथे गेल्यावर मोठ्या सेवामामाची मुलगी सीता त्याला आवडते. आपली भावी बायको अशीच असावी असा क्षणभर विचार तिला पाहिल्यानंतर त्याच्या मनात येतो. पंजाबच्या विनंतीवरून मामा-मामी सीताला पंजाबसोबत त्याच्या गावी पाठवतात. पुढे दोघांचेही एकमेकांवर प्रेम जोडल्याने पंजाबचे आई-बाबा नोकरी लागण्याआधीच त्यांची सोयरीक पक्की करतात. बारावी पास झाल्यानंतर बी. ए.किंवा डी. एडच्या मागे न लागता लवकर नोकरी लागावी या दृष्टिकोनातून पंजाब वरुडच्या कृषी विद्यालयात प्रवेश घेतो. त्यावेळी त्याला महिन्याला याडी दोन पायल्या ज्वारी द्यायची. त्यावर आणि शाळेच्या ड्रेस व्यतिरिक्त एका पॅन्टवर शिकून मनाशीच काहीतरी करून दाखवायचा पंजाब निर्धार करतो. एकदा ज्वारीचे पीठ भिजवलेले असताना स्टोव्हमधील घासलेट संपल्यामुळे समोरच राहणाऱ्या सालदाराच्या झोपडीत पंजाब आणि त्याचा मित्र वाणी दोघेही जातात. मात्र सालदाराची बायको,”बरं झालं बाबा आटा आणला.मी लगेच भाकरी करून मुलांना वाढते. तुमचे फार उपकार होईल.” (पृ.१०६)असे म्हणून कालपासून उपाशी असलेल्या आपल्याच मुलांना ती भाकरी करून देते.तेव्हा ‘आता उपाशी कसे झोपायचे?’ म्हणून ते दोघेही गणपत राठोडच्या जागलीवर जातात. परंतु गणपतही ‘आत्ताच जेवण करून आल्याचं’सांगतो तेव्हा पंजाब व वाणी रात्री दोन ग्लास पाणी पिऊन झोपतात. दुसऱ्या दिवशी लगेच पंजाब पिंपळखुट्याला यशोदा वहिनीला भेटून सारं सांगताच ती त्याला भाकरीसोबत मिरचीचा ठेचा देऊन पोटभर जेवायला घालते. आणि जातानासुद्धा तीन-चार भाकरी व ठेचा बांधून देते. त्यामध्ये वाणी नावाचा मित्र जेवण करतो आणि कपडे, ढुंगण धुणाऱ्या कॅनालचे पाणी पिऊन आपल्या पोटाची आग भागवतो.

आई-बाबा कालव्याचे खोदकाम करण्यासाठी धावजी भाऊसोबत निवग्याजवळ जातात.पंजाबला महिन्याला मिळणाऱ्या साठ रुपयांमध्ये बबनला बोर्डिंगचे दहा रुपये आणि पाच रुपये तेल व शाहीच्या खर्चासाठी देतो. आणि शिल्लक पंचेचाळीस रुपयात पंजाब महिना काढतो. जानेवारी महिन्यात दोघेही भाऊ घरी येतात परंतु घराला कुलूप असते. तेव्हा दोघेही गोपी मावशीकडे जेवण करतात. दुसऱ्या दिवशी बबनला बोर्डिंगवर सोडून पंजाब भाड्याच्या सायकलने आई-बाबाचा शोध घेत तीन वाजता रात्री कालव्याजवळ पोहोचतो. त्याने हाक मारून बोलावताच याडी उठून बसते आणि पंजाबला पाहून रडायला लागते. याडी त्याला जेवायला वाढते. दुसऱ्या दिवशी सायकल भाड्यापुरते दहा रुपये घेऊन आई-बाबांचा निरोप घेतो.

कृषीचा पंजाब कृषीचा डिप्लोमा ७९ टक्के मिळवून पास होतो. त्यावेळी मुलाला ग्रामसेवकाची नोकरी लवकरच लागेल या अपेक्षेने आई – बाबा पंजाबच्या गैरहजेरीत सीतासोबत त्याचा साखरपुडाही आटोपतात. त्यामुळे पंजाब आपल्या बाबावर नाराज होतो. परंतु आईच्या आग्रहाखातर नोकरी लागलेली नसतानाही शेवटी पंजाबला लग्नाला लग्नासाठी होकार द्यावा लागतो. बाबा सुंदरसिंग या मामेभावाकडून लग्नासाठी कर्ज काढतो. लग्नातही रात्रभर नवे कपडे घालून शेतातून पायी पायी चालल्यामुळे बैलगाडीच्या वंगणाने ड्रेस खराब झालेला असतो. त्यामुळे सासरी पोहोचताच बाबा जवळच असलेल्या एका घरातील नवरदेवाच्या आईला विनंती करून नवीन ड्रेस मागून आणतात. आणि आत्मारामभाऊंनी ड्रेस आहेर केल्यानंतर पंजाबने घातलेला नवरदेवाचा ड्रेस पुन्हा बाबा परत करतात. मामाजीची परिस्थिती नाजूक असल्याने लग्नात सीताला फक्त एक चादर, एक ताट आणि एक वाटी एवढेच सामान मिळते.

लग्नानंतर घरच्या परिस्थितीमुळे आईसोबत सीताही दुसऱ्याच्या शेतात निंदन करायला जाऊ लागते.तर पंजाब पटेल कंट्रक्शन कंपनीत दहा रुपये रोजीनं सुपरवायझरचे काम करून आपले कुटुंब चालवतो. त्याचा प्रामाणिकपणा पाहून लुकमान शेठ त्याला पाचशे रुपये महिना कबूल करतात.होळीच्या सणाला पगार आणि दोनशे रुपये देतात.याच दरम्यान काही दिवसांनी पंजाबला ग्रामसेवक पदाच्या नोकरीची ऑर्डर येते. त्याला पहिली ग्रामसेवकाची ऑर्डर साकोली तालुक्यात मिळते. परंतु तिथे जायला आणि राहायलादेखील पंजाबजवळ पैसे नसतात.त्यामुळे तो बाबाला घेऊन मनोहर नाईक साहेबांच्या बंगल्यावर पुसदला जातो.नाईकसाहेब त्याला महिन्याला पुरेल इतके म्हणजेच सातशे रुपये देतात. दुसऱ्या दिवशी आतेभाऊ गुलाबला घेऊन ते बसने साकोलीला पोहोचून नोकरीचा रुजू अहवाल देतात. रात्री ऑफिसमध्ये झोपून नंतर काही दिवस बस स्टैंडवर झोपून पंजाब दिवस काढतो. पुढे मुंडीपार/सडक ग्रामपंचायत मिळून जीवनाच्या संघर्षाला आर्थिकदृष्ट्या पूर्णविराम मिळतो. एकुणच ‘याडी’ हे आत्मकथन आई व पंजाबचा जीवनसंघर्ष चितारणारे मराठी साहित्यातील अतिशय मोलाचे असे आत्मकथन ठरते यात शंका नाही.

Related posts

मराठी पुस्तकांच्या ऑनलाईन विक्रीचे विहंगम चित्र

नानायण…

चिमुटभर कुंकू…

Leave a Comment