“भगवान स्वामीनारायणांच्या कृपेने – विकसित भारताच्या दिशेने साधू-संतांचा संदेश: पंतप्रधान मोदी यांचे प्रेरणादायी भाषण”
श्री स्वामीनारायण मंदिराच्या द्विशताब्दी वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद
जय स्वामीनारायण !
मी भगवान श्री स्वामीनारायणांच्या चरणी नतमस्तक होत आहे. भगवान श्री स्वामीनारायणांच्या कृपेने, वडताल धाम येथे एक भव्य द्विशताब्दी उत्सव आयोजित केला जात आहे. देशभरातून आणि जगभरातून भाविक एकत्र आले आहेत आणि स्वामीनारायण समुदायात नेहमीच अशी परंपरा राहिली आहे, की येथील कोणताही उपक्रम सेवेशिवाय पूर्ण होत नाही. आज, लोक विविध सेवाकार्यात उत्साहाने योगदान देत आहेत. गेल्या काही दिवसांत मी या उत्सवाचे दूरदर्शनवर, माध्यमांमध्ये पाहिलेले फोटो तसेच सामाजिक माध्यमांवरून सामायिक केलेल्या ध्वनी चित्रफिती यामुळे माझा आनंद द्विगुणित झाला आहे.
मित्रांनो,
वडताल धाम येथील स्थापनादिनाचा हा द्विशताब्दी सोहळा हा केवळ एक समारंभ किंवा एखादा ऐतिहासिक महत्त्वाचा दिनविशेष नाही. माझ्यासारख्या व्यक्तींसाठी, ज्यांची वडताल धामवर अढळ श्रद्धा आहे, त्यांच्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण प्रसंग आहे. आमच्यासाठी, हा उत्सव म्हणजे भारतीय संस्कृतीचा शाश्वत प्रवाही ओघ आहे. आम्ही दोन शतकांपूर्वी भगवान श्री स्वामीनारायण यांनी स्थापन केलेल्या वडताल धामच्या आध्यात्मिक चेतनेचे जतन केले आहे. आजही, भगवान श्री स्वामीनारायणांची शिकवण आणि दैवी ऊर्जा येथे जाणवते. मी सर्व साधूंच्या चरणी नतमस्तक होऊन या भव्य द्विशताब्दी उत्सवाबद्दल तुम्हा सर्वांचे आणि आमच्या देशबांधवांचे अभिनंदन करतो. मला आनंद आहे की भारत सरकारने या प्रसंगाचे औचित्य साधत 200 रुपयांचे एक चांदीचे नाणे आणि संस्मरण म्हणून एक टपाल तिकिट जारी केले आहे. ही चिन्हे येणाऱ्या पिढ्यांसाठी या महत्त्वपूर्ण घटनेच्या आठवणी जिवंत ठेवण्यास मदत करतील.
मित्रांनो,
भगवान स्वामीनारायण यांच्याशी जोडलेला प्रत्येकजण या परंपरेशी असलेल्या माझ्या बंधाची गहनता समजून घेतो. तिथे उपस्थित असलेले राकेश जी,हे तुम्हाला सांगू शकतील की त्यांच्याशी माझे नाते किती जुने आणि महत्त्वाचे आहे. हे बंधन केवळ आध्यात्मिकच नाही तर सामाजिक देखील आहे. गुजरातमध्ये असताना, मला साधूसाध्वींसोबत वेळ घालवण्याचे आणि सत्संगात सहभागी होण्याचे मोठे भाग्य लाभले. असे क्षण अनुभवण्याचे आणि त्यातील प्रत्येक क्षण जपण्याचे भाग्य मला लाभले.भगवान स्वामीनारायणांच्या कृपेने, आजही, एका ना अनेक प्रकारे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, ते नाते कायम राहिले आहे. अनेक प्रसंगी, मला साधूसंतांचे आशीर्वाद मिळाले,ज्यामुळे मला राष्ट्रीय महत्त्वाच्या बाबींवर सखोल चिंतन करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
आज वडताल धाम येथील या धार्मिक उत्सवात आपण प्रत्यक्ष उपस्थित राहावे, अशी माझी मनापासून इच्छा होती. तुम्हा सर्वांसोबत बसून, पूर्वीच्या अनेक गोड आठवणींना उजाळा देऊन या आनंदाच्या प्रसंगात सहभागी व्हावे अशी माझी मनोमन इच्छा होती. स्वाभाविकच, अशा आवडीच्या क्षणांतील आनंद अनुभवायला मिळाला असता. तथापि, माझ्या जबाबदाऱ्या आणि वचनबद्धतेमुळे हे शक्य झाले नाही. तरीही, मी मनाने तुम्हा सर्वांसोबत आहे. या क्षणी माझे मन पूर्णपणे वडताल धामसोबत एकरुप झाले आहे.
मित्रांनो,
आदरणीय साधू, भारताच्या उल्लेखनीय गुण वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे कठीण काळात, ऋषी, महर्षी, संत आणि महात्मा नेहमीच समाजाचे मार्गदर्शन आणि उन्नती करण्यासाठी पुढे आले आहेत. शतकानुशतके पारतंत्र्यात राहिल्यानंतर, आत्मसन्मान गमावून, आत्म-वंचनेत बुडाल्यानंतर आपला देश कमकुवत झाला होता; तेव्हा भगवान स्वामीनारायण प्रकट झाले. अशा संकटकाळी, भगवान स्वामीनारायण आणि त्या काळातील ऋषींनी आपल्याला नवीन आध्यात्मिक ऊर्जा दिली. त्यांनी आपला स्वाभिमान जागृत केला आणि आपल्यात आत्मप्रतिष्ठेची भावना पुनरुज्जीवित केली. या संदर्भात शिक्षापत्री आणि वचनामृताच्या शिकवणींनी मोठे योगदान दिले आहे आणि या शिकवणींना मूर्त रूप देणे आणि त्यांना पुढे नेणे हे आपले कर्तव्य आहे
या दृष्टिकोनातून प्रेरित होऊन, वडताल धाम मानवतेची सेवा करण्यासाठी आणि या युगाला आकार देण्यासाठी समर्पित एक महान संस्था बनली आहे याचा मला आनंद होत आहे. या पवित्र वास्तूत सागरम जी सारख्या वंचित समुदायातील भक्तांचा उदय झाला आहे. आज, तुमच्या प्रयत्नांमधून असंख्य उपक्रम राबवले जात आहेत, ज्यात असंख्य मुलांना अन्न, निवारा आणि शिक्षण देण्याचे प्रकल्प समाविष्ट आहेत. शिवाय, दुर्गम वनक्षेत्रात अनेक सेवा-संबंधित उपक्रम कार्यरत आहेत. तुम्ही आदिवासी भागातील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे यासारखी महत्त्वाची कामे हाती घेतली आहेत. गरिबांची सेवा करणे असो, नवीन पिढीवर संस्कार करणे असो किंवा आधुनिकतेला अध्यात्माशी जोडून भारतीय संस्कृतीचे जतन करणे असो, उज्ज्वल भविष्यासाठी सुरू असलेली प्रत्येक मोहीम तुमच्या समर्पणाची साक्ष आहे. मी केलेल्या प्रत्येक आवाहनाला – स्वच्छतेसाठी असो किंवा पर्यावरण संवर्धनासाठी – नेहमीच तुमचा उत्साही प्रतिसाद मिळाला आहे. तुमच्यासारख्या साधू आणि भक्तांनी मला कधीही निराश केले नाही; तुम्ही माझ्या प्रत्येक विनंतीला तुमची स्वतःची जबाबदारी म्हणून स्वीकारले आहे, ती पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले आहेत.
अलिकडेच मी प्रस्तावित केलेल्या मोहिमेविषयी मी ऐकले: ‘आईच्या नावाने एक रोप लावा’ (एक पेड माँ के नाम). स्वामीनारायण कुटुंबाने उत्साहाने यात सहभाग घेतला आहे, या उपक्रमांतर्गत एक लाखाहून अधिक झाडे लावली आहेत.
मित्रांनो,
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचे एक उद्दिष्ट असते आणि हे उद्दिष्ट आपल्या अस्तित्वाला आकार देत असते. ते आपल्या विचारांवर, कृतींवर आणि शब्दांवर प्रभाव पाडत असते. जेव्हा आपण आपल्या जीवनातील उद्दिष्ट शोधतो, तेव्हा सर्वकाही बदलते. इतिहासात, आपल्या संतांनी आणि ऋषींनी लोकांना त्यांच्या जीवनाचा अर्थ आणि उद्देश समजून घेण्यास मदत केली आहे. या आध्यात्मिक मार्गदर्शकांचे समाजात मोठे योगदान राहिले आहे. जेव्हा संपूर्ण समाज किंवा राष्ट्र एक समान उद्देश साध्य करण्यासाठी एकत्र येते तेव्हा यश अपरिहार्य असते, हे असंख्य उदाहरणांतून पहायला मिळते. आपण ते आधी साध्य केले आहे – आपल्या द्रष्ट्यांनी ते साध्य केले आहे, आपल्या समाजाने ते साध्य केले आहे आणि आपल्या धार्मिक संस्थांनी ते साध्य केले आहे.
आज आपल्या तरुणांसमोर एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे आणि संपूर्ण राष्ट्र एका सुस्पष्ट दृष्टिकोनासह आगेकूच करत आहे. हे स्वप्न विकसित भारत निर्माण करण्याचे आहे. मी वडतालच्या साधू आणि ऋषींना तसेच संपूर्ण स्वामीनारायण कुटुंबाला आवाहन करतो की त्यांनी सर्वांना या उदात्त मोहिमेत, विकसित भारताच्या या भव्य कार्यात सामील होण्यासाठी सर्वांना प्रेरित करावे. ज्याप्रमाणे स्वातंत्र्य चळवळीला स्वातंत्र्याच्या दुर्दम्य आकांक्षेने चालना दिली, ज्याने शतकाहून अधिक काळ सर्व स्तरातील लोकांच्या हृदयात ही भावना प्रज्वलित केली, त्याचप्रमाणे आपणही राष्ट्रीय विकासासाठी तसेच अथक प्रयत्न केले पाहिजेत. स्वातंत्र्यलढ्यातील एकही दिवस किंवा क्षण असा गेला नाही की लोकांच्या हृदयातील स्वातंत्र्याची आस जिवंत राहिली नाही आता अशा समर्पणाची आपल्याला आता आपल्या 140 कोटी देशवासीयांपैकी प्रत्येकाला गरज आहे.
एकत्रितपणे, आपण सर्वांना – विशेषतः आपल्या तरुण मित्रांना – पुढील 25 वर्षे विकसित भारताच्या या स्वप्नासाठी समर्पित करण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. आपण हे ध्येय जगले पाहिजे आणि हाच ध्यास धरला पाहिजे, प्रत्येक क्षणी त्याच्याशी जोडलेले राहिले पाहिजे. आपण जिथेही आहोत, आपण त्याच ठिकाणाहून योगदान देण्यास सुरुवात केली पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येकाने या ध्येयासाठी योगदान दिल्याने आपल्याला त्याचा एकत्रितपणे लाभ होईल. विकसित भारताच्या दिशेने एक आवश्यक पाऊल म्हणजे स्वावलंबन साध्य करणे. स्वावलंबी राष्ट्र निर्माण करण्यासाठी, आपण बाह्य मदतीची अपेक्षा न करता आत्मनिर्भर राहिले पाहिजे. सर्व 140 कोटी नागरिकांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि येथे उपस्थित असलेले भक्तही त्याला अपवाद नाहीत. आपण स्थानिक उत्पादने आणि व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी’स्थानिक हेच जागतिक ‘(‘व्होकल फॉर लोकल’) या मोहिमेपासून आरंभ करू शकतो.विकसित भारतासाठी, आपली एकता आणि राष्ट्रीय अखंडता अत्यंत महत्त्वाची आहे. दुर्दैवाने, काही लोक, स्वार्थी हितसंबंध आणि मर्यादित समजुतीने प्रेरित होऊन, जात, धर्म, भाषा, सामाजिक स्थिती, लिंग आणि शहरी-ग्रामीण भेदभावाच्या आधारे समाजाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते भारताच्या उज्ज्वल भविष्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांना कमकुवत करत आहेत. देशाच्या विरोधकांनी निर्माण केलेल्या या धोक्यांचे गांभीर्य आपण ओळखले पाहिजे आणि या संकटाचे गांभीर्य समजून घेतले पाहिजे. एकत्रितपणे, आपण या विभाजनकारी कृत्यांना हाणून पाडले पाहिजे आणि त्यांना यशस्वी होऊन देता कामा नये. आपल्या राष्ट्रीय एकतेचे रक्षण करण्यासाठी आपण एकजूटीने आणि दृढनिश्चयाने राहिले पाहिजे.
भगवान श्री स्वामीनारायण यांनी आपल्याला शिकवले की महान ध्येय हे अपार समर्पण आणि कठोर परिश्रमातून साध्य होते. तरुणांच्या मनात राष्ट्राला निर्णायकपणे घडवण्याची क्षमता असते, यावर त्यांनी भर दिला होता. तरुणाई देशाला विकसित करू शकते,असा विश्वास त्यांनी निर्माण केला. हे साकार करण्यासाठी, आपण सक्षम, सजग आणि सुशिक्षित तरुणांचे त्या दृष्टीने संवर्धन केले पाहिजे. विकसित भारतासाठी आपल्या तरुणांना सक्षम करणे आवश्यक आहे. कुशल तरुण व्यक्ती आपली सर्वात मोठी संपत्ती बनतील. आपल्या तरुणांना असलेली जागतिक मागणी वाढतच जाईल. आज, मी ज्यांना भेटत असतो, त्यातील बहुतेक जागतिक नेते भारताचे तरुण, कुशल कर्मचारी आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील व्यावसायिकांनी त्यांच्या देशांमध्ये काम करावे अशी इच्छा व्यक्त करतात. भारताच्या तरुणांच्या गतिमानतेने जग मोहित झाले आहे. हे तरुण केवळ आपल्या राष्ट्राच्या गरजा पूर्ण करणार नाहीत तर जागतिक मागण्या देखील पूर्ण करतील. कुशल युवाबळ विकसित करण्याचे आमचे प्रयत्न राष्ट्र उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देतील.
माझी तुम्हाला आणखी एक विनंती आहे. स्वामीनारायण संप्रदायाने व्यसनमुक्तीच्या लढाईत नेहमीच महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आपले संत, सज्जन आणि भक्त आपल्या तरुणांना अंमली पदार्थांच्या सेवनापासून दूर ठेवण्यात आणि त्यांना व्यसनमुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. तरुणांना अंमली पदार्थांच्या जाळ्यात अडकण्यापासून रोखण्यासाठी मोहिमा आणि उपक्रम आखणे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ते सुरूच राहिले पाहिजेत. हे सर्व प्रयत्न समाजात आणि आपल्या देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन करणे आवश्यक आहे आणि आपण या मोहिमेत सातत्य ठेवले पाहिजे.
मित्रांनो,
एखादे राष्ट्र जेव्हा आपल्या वारशाचा अभिमान बाळगते आणि त्याचे जतन करते,तेव्हाच ते प्रगती करू शकते; म्हणूनच आपले मार्गदर्शक तत्व वारसा संवर्धनासोबतच विकास हे देखील आहे. आपल्या प्राचीन वारसा स्थळांवरील वैभवाचे पुनरुज्जीवन होत असल्याचे पाहून मला आनंद होतो, ज्या अनेक स्थळांना विसरून गेलो होतो त्यांची आता पुनर्बांधणी केली जात आहे. अयोध्येचे परिवर्तन हे एक उत्तम उदाहरण आहे, जिथे 500 वर्षांपासून जपलेले स्वप्न अखेर साकार झाले आहे.अनेक पिढ्यांनी हे स्वप्न साकार केले, त्यासाठी संघर्ष केला आणि ते साकार करण्यासाठी त्याग केला. आज, आपण काशी आणि केदारनाथचे पुनरुज्जीवन झालेले पाहतो, या पुनरुज्जीवनाचे ते दाखले आहेत. पावागडमध्ये, 500 वर्षांनंतरही, आपल्या श्रद्धेचा झेंडा आता अभिमानाने फडकत आहे. मोढेराचे सूर्यमंदिर आणि सोमनाथची भव्यता ही आणखी उल्लेखनीय उदाहरणे आहेत. आपण जिथे पाहू तिथे एक नवीन भावना आणि सांस्कृतिक क्रांती झालेली आपल्या डोळ्यांसमोर उलगडत आहे.
इतकेच नाही तर शतकानुशतके आपल्या देशातून आपल्या देवतांच्या मूर्ती चोरीला जात होत्या आणि त्यांच्या गायब होण्याबद्दल कोणालाही काळजी नव्हती. आज, बऱ्याच प्रयत्नांनंतर, आपल्या देवदेवतांच्या या चोरीला गेलेल्या मूर्ती सापडत आहेत आणि आपल्या मंदिरांमध्ये परत आणल्या जात आहेत. आपण, गुजरातचे लोक, आपल्या प्राचीन संस्कृतीचे प्रतीक असलेल्या धोलावीरा आणि लोथलच्या वारशाचा अपार अभिमान बाळगतो. या स्थळांचे पुनर्संचयन आणि पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत. भारताची सांस्कृतिक जाणीव जागृत करण्याची ही मोहीम केवळ सरकारी उपक्रम नाही. ही या भूमीवर, या देशावर प्रेम करणाऱ्या, त्याच्या परंपरा जपणाऱ्या, त्याच्या संस्कृतीवर अभिमान बाळगणाऱ्या आणि त्याच्या वारशाचे कौतुक करणाऱ्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची आहे आणि तुम्ही या संदर्भात प्रेरणास्थान होऊ शकता. भगवान स्वामीनारायणांशी संबंधित अनेक वस्तू असलेले वडताल धाममधील अक्षर भुवन संग्रहालय या सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचा एक भाग आहे आणि या कामगिरीबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. हे संग्रहालय नवीन पिढीला खूप कमी वेळात आपल्या वारशाची झलक दाखवते. मला खात्री आहे की अक्षर भुवन हे भारताच्या शाश्वत आध्यात्मिक वारशाचे एक भव्य मंदिर बनेल.
मित्रांनो,
मला ठाम विश्वास आहे की विकसित भारताचे स्वप्न अशाच प्रयत्नांमधूनच साकार होईल. जेव्हा 140 कोटी भारतीय एका सामायिक उद्देशाने एकत्र येतात तेव्हा स्वाभाविकपणे यश मिळतेच. या प्रवासात आपल्या संतांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे आणि देश-विदेशातील हजारो संत आणि भक्त येथे जमल्यामुळे मला असे वाटते की मी या कुटुंबाचा भाग आहे. यामुळे मला तुम्हाला आणखी एका मोहिमेत सहभागी करून घेण्याची संधी मिळते. या वर्षी, प्रयागराजमध्ये पूर्ण कुंभ होत आहे. दर 12 वर्षांनी होणारा पूर्ण कुंभ होत हा भारताच्या विशाल वारशाचा उत्सव आहे, जो आता जागतिक स्तरावर मान्यता मिळवत आहे.13 जानेवारीपासून, 45 दिवसांच्या कालावधीत, अंदाजे 40 ते 50 कोटी लोक कुंभमेळ्यासाठी एकत्र येतील. माझी एक नम्र विनंती आहे: तुम्ही हे शिवधनुष्य पेराल का?, अनेक देशांमध्ये मंदिरे आहेत, त्यामुळे आपल्याला जागतिक स्तरावर अध्यात्मिक ओळख आहे. तुम्ही परदेशातील लोकांना कुंभमेळ्याचे महत्त्व, तो का साजरा केला जातो आणि त्यामागील सांस्कृतिक तत्वज्ञान याबद्दल प्रशिक्षित करू शकाल का? तुम्ही भारतीय नसलेल्या समुदायांशी संवाद साधू शकता का आणि तुमच्या परदेशी स्नेहसंबंधितापैकी किमान 100 परदेशी लोकांना प्रयागराज येथील कुंभमेळ्यात आदर आणि श्रद्धेने आणण्याचा प्रयत्न करू शकता का? जगभरात सांस्कृतिक जागरूकता पसरवण्याचे हे एक शक्तिशाली कार्य असेल आणि मला खात्री आहे की तुम्ही ते सहजतेने पूर्ण करू शकाल.
पुन्हा एकदा, मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटू शकलो नाही याबद्दल दिलगीरी व्यक्त करतो, पण दृकश्राव्य माध्यमाद्वारे तुम्हाला सर्वांना पाहण्याची संधी मिळाल्याबद्दल मी आभारी आहे. इतके परिचित चेहरे पाहून मला खूप आनंद होतो. जरी दूरवरून पाहिले तरी, हा क्षण मला आनंदाने भारून टाकतो आणि या द्विशताब्दी सोहळ्याचा भाग असल्याचा मला आनंद होत आहे.
खूप खूप अभिनंदन! तुम्हा सर्वांचे आभार!
जय स्वामीनारायण.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
