पहिल्या भेटीतील बोलीचे चार शब्दच आंतरिक ओढ निर्माण करतात. एखाद्याची बोली आपणाला मोहित करून टाकते. पहिल्या भेटीतील निरपेक्ष भाव, मनमोकळ्या गप्पा नकळतच नैसर्गिक प्रेमात रुपांतरीत होतात. पहिल्या भेटीतील अनुभवातच प्रेमाचे बीज पेरले जाते. या बीजाला पोषक वातावरण मिळाल्यास प्रेमाचा वटवृक्ष उभा राहातो. जीवनात अशा घटना क्वचितच घडत असतात. कारण अशा प्रेमाची सुरुवात ही नैसर्गिक असते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६
आणि प्रिय आलिया स्वभावे । सबळ उरे वेचे ठाउवे नव्हे ।
तैसें सत्प्रसंगे करावे । पारुषे जरी ।। ५९१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – प्रियकर मित्र वैगरे आला असता त्याच्या सन्मानार्थ आपल्याजवळील सर्व सामग्री खर्च झाली अथवा काही शिल्लक आहे, याचे जसें स्वाभाविकच भान राहात नाही; त्याप्रमाणे एखादा योग्य प्रसंग सत्पुरुषाशी आत्मचर्चा करणे वैगरेचा प्रसंग प्राप्त झाला असता भान न राहुन आपले नित्य कर्म करावयाचें जर राहीलें.
प्रिय व्यक्तीसाठी आपण खर्च करताना मागे पुढे कधीही पाहात नाही. खर्च अधिक झाला म्हणून कधी आपण कुरकुरही करत नाही. काळवेळाचेही भान नसते. कारण येथे काळ, वेळ आणि पैसा यापेक्षा प्रेमाला अधिक महत्त्व असते. आपणाला हे करताना कधीही कंटाळाही येत नाही किंवा इतका खर्च झाला म्हणून त्याचे दुःखही वाटत नाही. असे का होते ? कारण आपले जीवापाड त्यावर प्रेम असते.
प्रेम हे कधी ठरवून होत नसते. ते व्हावे लागते. त्यासाठी आंतरिक ओढ निर्माण व्हावी लागते. पहिल्या भेटीतच अनेकजण प्रेमात पडतात. पहिल्या भेटीतील प्रेम हे कधीही विसरले जात नाही. नकळत अन् उत्स्फुर्तपणे घडलेली ही घटना असते. असे हे प्रेम नैसर्गिक असते. ते कधी सांगून होत नसते. पाऊस पडताना कधी सांगून पडत नाही. पावसाचा अंदाज बांधता येतो पण तो पडेल, बरसेल काय ? याची शाश्वती देऊ शकत नाही. पडला तरी तो किती पडेल हे सुद्धा सांगू शकत नाही. फक्त याचे अंदाज बांधता येतात. तसेच प्रेमाचे आहे. प्रेम कधी कोणावर होईल अन् ते कसे बरसेल हे सांगता येत नाही.
पहिल्या भेटीतील बोलीचे चार शब्दच आंतरिक ओढ निर्माण करतात. एखाद्याची बोली आपणाला मोहित करून टाकते. पहिल्या भेटीतील निरपेक्ष भाव, मनमोकळ्या गप्पा नकळतच नैसर्गिक प्रेमात रुपांतरीत होतात. पहिल्या भेटीतील अनुभवातच प्रेमाचे बीज पेरले जाते. या बीजाला पोषक वातावरण मिळाल्यास प्रेमाचा वटवृक्ष उभा राहातो. जीवनात अशा घटना क्वचितच घडत असतात. कारण अशा प्रेमाची सुरुवात ही नैसर्गिक असते. सुंदरतेवर भाळून कधी प्रेम होत नसते. त्यात वासनेचा अंश असतो. असे प्रेम झालेच तरी ते शाश्वत असेल की नाही हे सांगता येत नाही. संवाद, शब्द अन् बोलीतूनच प्रेम होते, ते नैसर्गिक असते. तेच प्रेम मनाला लळा लावते, गोडी लावते, ओढ निर्माण करते. त्यात व्याकुळता असते. तेच प्रेम शाश्वत असते.
प्रेमातील भेटीसाठी जीव कासाविस होतो. तो भेटल्याशिवाय चैन पडत नाही. अशी अवस्था होते. त्याचे दर्शन हेच सुख देणारे असते. त्याचे प्रेमाचे चार बोलही मनाला आनंद देणारे असतात. अशी आंतरिक ओढ असेल तरच ते शाश्वत प्रेम असते. देव, सद्गुरु अन् भक्तांमध्ये असे प्रेम असते. देवाच्या भेटीसाठी भक्त व्याकूळ असतो. त्याच्या दर्शनासाठी व्याकुळ असतो. त्याच्या भेटीसाठी तो हजारो मैल चालुही शकतो. त्याला त्याचा कधीही त्रास वाटत नाही. कारण त्याचे मन हे त्याच्यामध्ये गुंतलेले असते. तासनतास केलेल्या साधनेचाही त्याला कधी त्रास होत नाही. उलट शब्दाच्या, गुरुमंत्राच्या साधनेतून त्याचे प्रेम वृद्धींगत होत असते.
प्रेमाबद्दल बाबा महाराज आर्वीकर म्हणतात, कोणत्याही उपासनेच्या क्रमात उपास्याचे ज्ञान असणे यापेक्षा उपास्याचे प्रेम असणे याला विशेष महत्त्व आहे. प्रेमाशिवाय उपासना नाही व उपासनेशिवाय ज्ञानानुभव नाही. मानवी वृत्तीचा असाच निसर्गक्रम असल्यामुळे प्रेम हे सर्व अनुभवांचे आदिबीज ठरते.
यासाठी साधना करताना देवावर, सद्गुरुंच्यावर दृढ प्रेम असणे महत्त्वाचे आहे. प्रेमाशिवाय उपासना होऊ शकत नाही. गुरुमंत्रावरही आपले प्रेम असायला हवे. त्या शब्दातूनच प्रेम वृद्धींगत होत असते. यासाठी ते शब्द मन लावून प्रेमाने ऐकायला हवेत. तरच ज्ञानानुभव येईल. या अनुभवातूनच प्रेम वृद्धींगत होते अन् ज्ञानानुभव वाढत जातो. साधनेत अशी ओढ निर्माण व्हायला हवी. उठता, बसता, झोपता सर्वच क्षणी त्याची आठवण, त्याची ओढ ही असायला हवी. यातून होणाऱ्या ज्ञानानुभवातूनच आत्मज्ञानाची प्राप्ती होते. ब्रह्मसंपन्नता येते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.