November 21, 2024
Swarajya Rakshak Sambhajiraje birth story by Suvarana Naik Nimbalkar
Home » …यासाठीच ठेवले बाळाचे नाव संभाजीराजे
मुक्त संवाद

…यासाठीच ठेवले बाळाचे नाव संभाजीराजे

🙏 “शंभूराजे यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा “🙏

माँसाहेब म्हणाल्या होत्या , “सई अफजलखानासारख्या दगाबाजाच्या हल्ल्यात निष्काळजीपणामुळे आमचे लाडके जेष्ठ पुत्र संभाजी कनकगिरीच्या लढाईत मारले गेले. संभाजी लढता लढता पडले.” त्यांचे सोने झाले ,पण आम्ही मात्र त्यांना कधीच विसरू शकलो नाही. त्यांची आठवण म्हणून बाळाचे नाव संभाजी राजे ठेवले. ”

गुरुवारचा शिशिरॠतुतला फाल्गुन महिन्यातील वद्य तृतीयेला हस्त नक्षत्रावर सईबाई राणीसाहेबांनी शंभू बाळाला जन्म दिला .या बाळाच्या जन्माने अवघा मराठा मुलूख धन्य धन्य झाला. या छाव्याच्या जन्माचा मान आमच्या पुरंदर किल्ल्याला मिळाला होता. पुरंदरावर आनंदी- आनंद झाला. गडावर तोफांचे आवाज होत होते. स्वराज्याच्या गादीचा वारस , शत्रुंचा कर्दनकाळ पुरंदरावर आला होता. तिन्ही लोकीचे ऐश्वर्य भरून राहिले होते. नियती प्रसन्न झाली. आई भवानीचा ,आई निमजाईचा वरदहस्त सईबाई राणीसाहेबांच्या मस्तकी पडला होता.

बाळराजांच्या आगमनाने सर्वत्र आनंदी आनंद झाला. या बाळाच्या आगमनाने सईबाई राणीसाहेब यांचे जीवन धन्य धन्य झाले. क्षणार्धात पुरंदरावर चारही बुरुजावरून तोफा चराचराला खबर देत होत्या .राजश्रिया ,विराचित सकलगुणमंडीत, भोसले कुलावतांस, श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या थोरल्या राणीसरकार सकल -सौभाग्यसंपन्न वज्रचुडेमंडित श्रीमंत सईबाई राणीसाहेब प्रसूत जाहल्या ! श्रीकृपेकरून पुत्ररत्न प्राप्त झाले. नगारे दुमदुमू लागले. मराठ्यांच्या स्वराज्याला पुत्र झाला. पुत्र शिवाजीराजांना झाला,पुत्र सईबाई राणीसाहेबांना झाला. जिजाऊसाहेबांनी घाई घाईने खलिते लिहायला सांगितले.हजार वाटांनी खलिते निघाले.

पहिला खलिता फलटणच्या नाईक निंबाळकरांकडे पोहोचला. साखर थैलीसह खलिता निघाला. गादीचा वारस जन्माला आला होता.शत्रुंचा कर्दनकाळ पुरंदरावर आला होता. तिन्ही लोकीचे ऐश्वर्या भरभरून राहिले. नियती प्रसन्न झाली होती.आई भवानीचा वरदहस्त सईबाई राणीसाहेबांच्या मस्तकी पडला होता. बालराजाच्या आगमनाने सर्वत्र आनंदी आनंद होऊन राणीसाहेबांचे आयुष्य धन्य धन्य झाले होते. फलटणच्या नाईक निंबाळकरांच्या लेकीचे जीवन या पुत्र जन्माने सत्कारणी लागले होते.

बाळाचे मोहक रूप राणीसाहेब डोळ्यात साठवत होत्या. तो चिमणा जीव, त्याचा उभटसा चेहरा, इवलीशी हनुवटी ,रंग गोरा, डोळे किंचित मोठे, पाणीदार व टपोरे, इवल्याशा बाहूंना बाळसेदार आकार होता .भालप्रदेशावरून हे बाळ मोठेपणी बुद्धिमान होणार हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नव्हती. सईबाई साहेबांना आता आपली जबाबदारी वाढल्याची जाणीव होऊ लागली होती. स्वराज्याच्या या भावी राजाला त्यांना घडवायचे होते. ” माँसाहेबांनी नव्हते का स्वारींना घडवले. तसेच सईबाई राणीसाहेबांना या छाव्याला घडवायचे होते.या छाव्याची जबाबदारी आई म्हणून राणीसाहेबांवरच होती.

बाळाचे भवितव्य आईच्याच हातात असते.आईच्या साध्या स्पर्शाने बाळाला उत्तुंग गिरीशिखरांना धडक देण्याचे सामर्थ्य पैदा होत असते. शिवरायांच्या राणीवशात कन्यारत्नांचे उंच टिपेचे रडणे कैक वेळा घुमले होते; पण बाळकृष्णाचे रडणे आज पहिल्यांदाच ऐकायला येत होते .कृतार्थतेने जिजाऊं माँसाहेबांचे डोळे पाणावले होते .मुलाच्या दर्शनाने ‘आऊपण ‘ धन्य होते. पण नातवाच्या दर्शनाने अवघे स्त्री पण धन्य होते. किल्ले पुरंदरच्या चारी बाजूंचे बुलंद बुरूज आपले तोफांचे कंठ फोडून माथ्यावरच्या मावळी, निळ्या आभाळाला खबर देत होते. राजाश्रीया विरजित, सकलगुण मंडित, भोसले कुलावतंस श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांच्या थोरल्या राणीसरकार वज्रचुडेमंडित सईबाई राणीसाहेब प्रसूत जाहल्या! पुत्ररत्न जाहले! आणि ती खबर ऐकून किल्ले पुरंदरच्या सगळ्या राऊळातले देव आपोआपच सोयरात पडले होते. पुरंदरच्या किल्ल्यावर आनंदी आनंद झाला होता.”

बारा दिवस झाले होते. पुरंदरावर जोरदार बारशाचा घाट घातला गेला .हलग्या , लेझीमांच्या तालावर वाजत -गाजत बाळंतविडे गड चढू लागले होते. नात्या – गोत्यातील माणसे ,फलटणचे नाईक-निंबाळकर तर पाचवीलाच आपल्या भाच्याच्या कौतुकासाठी गड चढून आले होते. सर्व राणीवसा भरजरी शालू -पैठणी नेसून बारशासाठी सज्ज झाला होता. राजो पाध्यांनी मुहूर्तासाठी घंगाळात घटिकापात्र सोडले होते. चंद्रकळी शालु नेसलेल्या सईबाई राणीसाहेब बाळंतपणाच्या तेजाने अधिकच सुंदर दिसत होत्या .हिरे-मोती ,माणिक, सोन्याची फुले मढवलेले कुंची ,जरीचे अंगडे टोपडे ल्यायलेले बाळ अधिकच सुंदर दिसत होते .सईबाई राणी साहेबांनी जणू “आकाशीचा चंद्रमाच खुडून “आणून सर्वांच्या हाती दिला होता.

नाव काय ठेवायचे आऊसाहेबांना विचारणा झाली!” बाळ राजांचे नाव संभाजी ठेवा ! त्यांच्या काकामहाराजांची ती यादगार आहे! ” आपल्या पुत्राच्या आठवणीने माँसाहेबांचे डोळे पाणावले. नेताजी पालकरांनी बत्ती दिलेल्या पुरंदरच्या चारी बुरुजावरच्या तोफांच्या भांड्याने आभाळाला खबर दिली.” राजश्रियाविराजित, सकलगुणमंडित भोसले कुलावतंस, श्रीमान छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या बाळराजांचे नामाभिधान जाहले! संभाजीराजे ऐसे शुभनाम ठेवले.”

सईबाई राणीसाहेबांना संभाजी हे नाव खूप आवडले. महाराजांच्या वडील बंधूंचे हे नाव , परंतु ते केवळ स्वारींच्या वडील बंधूचे होते म्हणून नव्हे ,तर ते धारातीर्थी पतन पावलेल्या एका शूर वीराचे ते नाव होते. या वीराने दुश्मनांशी लढताना प्रत्यक्ष मरणाचीही भीती बाळगली नव्हती. असे नाव धारण करण्यासाठी तसेच मोठे भाग्य असावे लागते. ते भाग्य दैवाने आपल्या बाळाराजांच्या हवाली केले होते. म्हणूनच संभाजी हे नाव सईबाई राणीसाहेब यांना खूप खूप आवडले होते. माँसाहेबांनी तर ते सुचवले होते.

माँसाहेब म्हणाल्या होत्या , “सई अफजलखानासारख्या दगाबाजाच्या हल्ल्यात निष्काळजीपणामुळे आमचे लाडके जेष्ठ पुत्र संभाजी कनकगिरीच्या लढाईत मारले गेले. संभाजी लढता लढता पडले.” त्यांचे सोने झाले ,पण आम्ही मात्र त्यांना कधीच विसरू शकलो नाही. त्यांची आठवण म्हणून बाळाचे नाव संभाजी राजे ठेवले. ”

बाळराजांच्या पायाने वैशाखीचा मार्तंड कुळात उपजला होता . साक्षात रुद्र जन्माला आला होता. स्वराज्यात आनंदी आनंद झाला होता. जिजाऊसाहेब आपले पुत्र संभाजींचे रूप आपल्या नातवात शोधत राहिल्या. पुढे छत्रपती शंभूराजे यांनी आपल्या कर्तुत्वाने व पराक्रमाने अशी काही दहशत निर्माण केली की मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही, इंग्रज, पोर्तुगीज, डच यांसारख्या बलाढ्य पातशाहींना नामोहरम करून सोडले. जगातील प्रत्येक माता-पित्याला हेवा वाटेल, असा पुत्र माता महाराणी सईबाई व पिता छत्रपती शिवरायांना लाभला.

पुत्र सईबाईंना झाला,
पुत्र शिवाजीराजांना झाला,
पुत्र सह्याद्रीला झाला,
पुत्र महाराष्ट्राला झाला,
पुत्र भारतवर्षाला झाला.
🚩 जय जिजाऊ🚩🚩जय शिवराय🚩🚩जय शंभूराजे 🚩

( संदर्भ – शिवपत्नी महाराणी सईबाई राणीसाहेब, संस्कृती प्रकाशन, पुणे )


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading