April 26, 2025
Good thought mind flows good concepts article rajendra ghorpade
Home » सात्विक विचारातून फुटावा सात्त्विकतेचा पान्हा
विश्वाचे आर्त

सात्विक विचारातून फुटावा सात्त्विकतेचा पान्हा

दूषित विचारांच्या वातावरणात आत्मज्ञानाचा प्राणवायू सोडणारे वृक्ष लावण्याची गरज आता भासत आहे. संतांनी हेच केले. भांडत बसून त्यांनी ऊर्जा वाया घालवली नाही. खेचराच्या मनालाही सात्विकतेचा पान्हा फोडण्याचे सामर्थ्य याचमुळे त्यांना प्राप्त झाले.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

खेचराचियाही मना। आणि सात्त्विकाचा पान्हा।
श्रवणासवें सुमना। समाधी जोडे ।। 1058 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ –पिशाश्चादि अज्ञानी योनी आहेत. पण त्यांसहि माझे शब्द सत्वगुणाचा पान्हा फोडतील आणि शुद्ध अंतःकरणाच्या लोकांना तर, माझे शब्द ऐकल्याबरोबर समाधि लागेल.

मंदिरात पहाटे पाच वाजता नियमाने मंत्रपुष्पांजली असायची. सकाळच्या प्रसन्न वातावरणात ही पुष्पांजली मनाला प्रोत्साहित करायची. अभ्यासासाठी उठणारा विद्यार्थी या मंत्राने उत्साहित होत असे. अनेक मंदिरांत सकाळच्या या आरत्यांनी वातावरण प्रसन्न होत असे. काही वर्षांपासून मात्र यात बदल झाला आहे. काही ठिकाणी ही पुष्पांजली बंदच झाली आहे. सुरू असली तरी त्यात नियमितता राहिलेली नाही. काही ठिकाणी आरत्या होतात; पण त्यामध्ये प्रसन्नता उत्पन्न करणाऱ्या घटकांचा अभाव दिसत आहे. नेमके हे कशाने झाले?

हवेतील वातावरणात बदल झाला आहे; पण प्रदूषणाचा हा परिणाम आहे असे म्हणता येणार नाही. दैनंदिन जीवनात बदल झाला आहे. कामाचा ताण वाढला आहे. याचा परिणाम जरूर आहे; पण कामाचा ताण, थकवा दूर करण्यासाठीच तर मंदिरात जाणे असायचे. नित्य-नियमाने साधना, धार्मिक ग्रंथ वाचले जायचे. मग हा बदल झाला कसा? गेल्या काही वर्षांत धार्मिक ग्रंथांतील काही वादग्रस्त मुद्दे घेऊन वातावरण तापविण्याचे प्रयत्न झाले. धार्मिक तेढ निर्माण करण्यात आली. धर्म ग्रंथांचा चुकीचे ठरविणारे विचार पसरविण्यात आले. सातत्याने हे असे केलेही जात आहे. असे धार्मिक वादविवाद निर्माण करून त्यांना यामागे नेमके काय साधायचे आहे, हे त्यांनाच माहीत; पण हा बदल झाला आहे.

मध्यंतरीच्या काळात शंकराचार्यांचे पीठासन अधिकारीही भडकवणारी व्याख्याने देत असत. सध्या राजकीय तसेच काही धार्मिक नेते वादग्रस्त विचारांवर चुकीची वक्तव्ये करून नागरिकांची मने पेटवत आहेत. वक्तव्य भडकावू केले तर भडका हा उडणारच. काही वेळेला भडका उडला नाही, पेट घेतला नाही तरी त्यामध्ये असणारी ही आग धुमसत राहते. धुमसणारी ही आग प्रसन्न वातावरण दूषित करत आहे. सध्या हेच तर झाले आहे. नको त्या विचारांनी वातावरण प्रदूषित झाले आहे. मंदिराचे प्रसन्न वातावरण वेगळ्या विचारांनी दूषित झाले आहे.

वारकरी संप्रदायामध्येही असेच वातावरण दूषित करण्यात आले आहे. हे प्रकार पूर्वीच्या काळीही घडले जायचे. धर्माचा वापर राजकारणासाठी केला जायचा; पण त्यावेळी धर्म रक्षण, सात्त्विक विचारांचे रक्षण याला प्राधान्य दिले जायचे. आता मात्र तसे होताना दिसत नाही. धर्म रक्षणाच्या नावाखाली वेगळेच विचार पसरवून समाजात दुफळी निर्माण केली जात आहे. तोडा, फोडा आणि राज्य करा, हाच उद्योग केला जात आहे. अशा विचारांना आता सात्विकतेचा पान्हा फोडण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

दूषित विचारांच्या वातावरणात आत्मज्ञानाचा प्राणवायू सोडणारे वृक्ष लावण्याची गरज आता भासत आहे. संतांनी हेच केले. भांडत बसून त्यांनी ऊर्जा वाया घालवली नाही. खेचराच्या मनालाही सात्विकतेचा पान्हा फोडण्याचे सामर्थ्य याचमुळे त्यांना प्राप्त झाले. सत्वगुणांचे विचार समाजात पसरवून समाजात सात्विकतेचा पूर आणायला हवा. सात्विक विचार खेचराच्याही मनाला सात्विकतेचा पान्हा फोडू शकतात. इतके सामर्थ्य त्या शब्दात आहे. यासाठी अशा विचारांचा इतका प्रभाव वाढवावा की हे दुषित विचार पसरवणारेच या सात्विकतेच्या लाटेत गाडले जावेत. गाडलेले पुन्हा उगवणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. यासाठी ते कुजवून त्यापासून सात्विकतेची रोपे वाढतील असा प्रयत्न करायला हवा.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading