वेदात खूप काही सांगितलेले आहे. पण सर्वच आपणाला लागू पडते असे नाही. आपणाला आवश्यक तेवढा भाग घेऊन आपण आपले हित साधायला हवे. त्यातच आपली प्रगती होते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६
जरी वेदे बहुत बोलिलें । विविध भेद सुचिले ।
तऱ्ही आपण हित आपुले । तेचि घेपे ।। २६० ।। अध्याय २ रा
ओवीचा अर्थ – जरी वेदांत पुष्कळ गोष्टी सांगितल्या आहेत. अनेक विधिनिषेधाचे प्रकार सुचविले आहेत, तरी त्यापैकी जेवढे काही आपल्या हिताचे असेल तेवढेच घ्यावे.
काहींना पुस्तके जमविण्याचा छंद असतो. घरातील कपाटे पुस्तकांनी भरलेली असतात. अशा घरातील नवी पिढी ती पुस्तके जतन करेल, वाचेल याची शाश्वती मात्र छंद जोपासणाऱ्या व्यक्तीला नसते. कारण काळानुसार सर्वकाही बदलत असते. इतिहास हा विषय त्यातून बोध घेण्यासाठी शिकायचा असतो. भलेही पुस्तके इतिहास जमा झाली असली तरी त्यातून अनेक बोध आपणाला होऊ शकतात. ही पुस्तके आपली मार्गदर्शक ठरू शकतात. या पुस्तकात अनेक गोष्टी असतील, पण वेळप्रसंगाला हिताचे उपदेश देणारे एखादे पुस्तक हाती लागू शकते अन् आपली प्रगती होऊ शकते. यासाठी आवश्यक तेवढेच घेण्याची सवय लावायला हवी. मार्गदर्शक म्हणून त्याकडे पाहायला हवे. यासाठीच हा ठेवा जतन करायला हवा.
ज्ञानेश्वरी हा ग्रंथ बाराव्या शतकात लिहिला गेला. पण तो आजही मार्गदर्शक ठरतो. गीता हा प्राचीन ग्रंथ आहे. त्यावरील ही टिका आहे. म्हणजेच प्राचीन ग्रंथ आजही मार्गदर्शक आहेत. ज्ञानेश्वरीत नऊ हजार ओव्या आहेत. एका दिवसात हा ग्रंथ वाचून संपवणे शक्य नाही. रोज वाचायला वेळ मिळेल असेही नाही. पण काही नियोजन करून रोज एकतरी ओवी अभ्यासता आली तरी बऱ्हेच काही मार्गदर्शन होऊ शकते. ज्ञानेश्वरीत खूप काही सांगितले आहे. कुंडलिनी जागृतीपासून सत-रज-तम या तिन्ही गुणांची लक्षणे, उदाहरणे देऊन सविस्तर सांगितली आहेत. इतके सर्व एकाच वेळी वाचायला शक्यही होत नाही. एकदम वाचून हाती काहीच लागत नाही असेही होते. यासाठी आपणास आवश्यक असणारा भाग एक एक ओवी अनुभवून घेतल्यास आपली आध्यात्मिक प्रगती निश्चितच होऊ शकते. आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक गोष्टीच घ्यायला हव्यात. सर्वाच्याच मागे लागलो तर हाती काहीच लागणार नाही. यासाठी आवश्यक तेवढाच विचार आपण घ्यायला हवा.
देवकृपेने आपणाला सर्व काही मिळाले आहे. तरी त्याचा योग्य वापर आपण करायला हवा. तसा मनाचा निर्धार करायला हवा तरच ते शक्य आहे. अन्यथा सर्वकाही व्यर्थ आहे. दिव्यांगांना काही गोष्टींची मर्यादा असते. पण त्याच्या मनाने जर निर्धार केला तर तो सर्व अवयव असणाऱ्यांपेक्षाही मोठी प्रगती करू शकतो. कारण तो फक्त आवश्यक तेवढ्यावरच लक्ष देऊन मनपूर्वक ती गोष्ट साध्य करत असतो. यासाठीच खूप काही मिळाले तरी आपणाला आवश्यक तेवढ्याच हिताच्या गोष्टी त्यातून घ्यायला हव्यात. सर्वच घेण्याचा आग्रह धरून बसलो तर हाती भोपळा येण्याची शक्यता असते. यासाठी मनाचा दृढनिश्चय हा महत्त्वाचआहे. उपलब्ध साधनांचा योग्य वापर आपण करू शकलो तर आपली प्रगती निश्चितच होते.
वेदात खूप काही सांगितलेले आहे. पण सर्वच आपणाला लागू पडते असे नाही. आपणाला आवश्यक तेवढा भाग घेऊन आपण आपले हित साधायला हवे. त्यातच आपली प्रगती होते. औषधी वनस्पतीचा उपयोग करताना वनस्पतीचा कोणता भाग औषधी आहे हे माहीत असणे आवश्यक आहे. तेवढ्याच भागाचा वापर करून रोग बरा केला जातो. आवश्यक तेवढेच औषधी वनस्पतीतील घेतले तरच ती औषधी आजारावर उपयुक्त ठरते. औषधी आहे म्हणुन मुळासकट खाऊ लागलो तर रोग कधीच बरा होणार नाही. उलट तो बळावेल. यासाठी आपणास आवश्यक गोष्टीच तेवढ्या घ्यायल्या हव्यात. ऊस गोड लागला म्हणून तो मुळासकट खायचा नसतो. गोडी, रस कशात आहे तेवढाच भाग घ्यायला हवा.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.