रोजरोजच्या कटकटीमधून आपणास होणाऱ्या त्रासातून मनाला थकवा जाणवतो. यासाठी ठराविक कालावधीनंतर अन्य वातावरणात फिरण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे मनात येणारे विचार त्या कटकटीपासून दूर जातात. वेगळ्या वातावरणात वेगळा विचार सुरु झाल्याने कटकटीतून होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६
तैसा मी एकवांचूनि कांही । मग भिन्नाभिन्न आन नाही ।
सोहम बोधे तयाचा ठायी । अनन्यु होय ।। १३९७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – त्याप्रमाणें मग मी एकट्यावाचून दुसरे भिन्न भिन्न कांहीच नाही, असे जे माझे स्वरूप त्याच्या ठिकाणी तोच मी आहे अशा ज्ञानाने अनन्य हो.
साधनेमध्ये सद्गुरुंनी दिलेल्या मंत्रावर लक्ष केंद्रीत करायचे असते. मंत्राची साधना करायची असते. पण प्रत्यक्षात साधना तशी होतच नाही. सर्वच साधकांची ही समस्या असते. साधनेच्या काळात मनात अनेक विचार डोकावत असतात. यामुळे मन साधनेत रमतच नाही. दिलेला मंत्र पुटपुटला जात असतो, पण मनात मात्र वेगळाच विचार कार्यरत असतो. मनापासून साधनाच होत नाही. अशी ही साधना फलद्रुप कशी होणार ?. मन साधनेत रमण्यासाठी अनेक उपाय केले तरीही मन साधनेत रमत नाही. अशाने नैराश्यही येते. साधना करायलाच नको असे वाटते. अशावेळी एकच विचार करायचा, आपण सद्गुरुंचा अनुग्रह घेतला तरी कशासाठी ? कशासाठी गुरूंची आपणास गरज वाटली ? मग आपोआपच आपल्या मनाला उत्तरे मिळू लागतील.
यासाठीच मनापासून साधना करण्याचा प्रयत्न करावा. सद्गुरुंनी दिलेला मंत्र मनाने ऐकावा. वारंवार ऐकण्याचा प्रयत्न केल्यास मन त्यामध्ये गुंतते अन् साहजिकच मनात डोकावणारे अन्य विषय आपोआपच थांबतात. ही प्रक्रिया किंवा हा बदल पटकण होईलच असे नाही. यासाठी काही कालावधी लागेल. पण सरावाने यात निश्चित यश प्राप्त होते. यावर विश्वास ठेवून आपण साधना करायला हवी. जीवनातील कठीण प्रसंगात आपण मन साधनेवर केंद्रीत केले तर निश्चितच त्याचा अधिक फायदा होतो. कारण अशा प्रसंगात आपल्या मनात भिती उत्पन्न झालेली असते, पण साधनेतून मिळालेल्या आत्मविश्वासामुळे ही भिती दूर होते.
रोजरोजच्या कटकटीमधून आपणास होणाऱ्या त्रासातून मनाला थकवा जाणवतो. यासाठी ठराविक कालावधीनंतर अन्य वातावरणात फिरण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे मनात येणारे विचार त्या कटकटीपासून दूर जातात. वेगळ्या वातावरणात वेगळा विचार सुरु झाल्याने कटकटीतून होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळते. जीवनशैलीत असे थोडथोडे बदल केल्यास जीवन निश्चितच सुखकारक होईल. वेगळ्या वातावरणात म्हणजे तुम्ही साधना, योगामध्येही आपले मन गुंतवू शकता. यामुळे मनाला आलेला थकवा निश्चितच दुर जातो. बदल म्हणून आपण मन साधनेत गुंतवायला हवे. म्हणजे मन साधनेत रमेल. सोहमचा बोध होईल. मनाला साधनेची सवय लागेल. वेगळे विचार उत्पन्न होऊन मनातील गुंतागुंत कमी होते. स्वतःमध्ये एक आत्मविश्वास, सकारात्मक विचार जागृत होईल. हा विचारच आपल्या जीवनात नवी आशा उत्पन्न करतो.
साधना करणे म्हणजे स्वरुपाची ओळख करून घेणे. मी कोण आहे हे जाणणे ? यातूनच आपला आत्मविश्वास, आत्मजिज्ञासा वाढते. मी आत्मा आहे हे समजले, पण त्याचा बोध जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपणाला त्याचे महत्त्व पटत नाही. म्हणूनच आत्मबोधासाठी साधना करावी. आत्मबोधातूनच मग देह आणि आत्मा वेगळा असल्याचा बोध होतो अन् सद्गुरु आणि आपण वेगळे नाहीत याचा प्रत्यय येतो. सद्गुरुंचा नित्य वास आपल्यात असल्याचा बोध होतो. अन् आपणच सद्गुरुमय होतो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.