December 25, 2025
Uddhav Thackeray and Raj Thackeray announcing political alliance for Marathi identity and Mumbai civic elections
Home » मुंबईचे लचके नि मराठी माणूस , पुन्हा ऐरणीवर..
सत्ता संघर्ष

मुंबईचे लचके नि मराठी माणूस , पुन्हा ऐरणीवर..

ठाकरे बंधू एकत्र आल्याने महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही हे भाजपने बजावले आहे. मुंबईचा महापौर हा मराठीच होईल व ठाकरे बंधुंचा असेल असे राज ठाकरे व संजय राऊत यांनी निक्षून सांगितले पण भाजपने मात्र मुंबईचा महापौर मराठीच होईल व महायुतीचा होईल असा पलटवार केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही पक्षाचा विस्तार करताना मुंबईचे केंद्राकडून लचके तोडले जातील अशी अनेकदा भिती घातली होती. मराठी माणूस व मराठी अस्मिता हा शिवसेनाचा तर आधार आहे. आता तेच तेच मुद्दे ठाकरे बंधूंना किती लाभदायक ठरतील ?

डॉ. सुकृत खांडेकर

उबाठा सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत एका संयुक्त पत्रकार परिषदेत उबाठा सेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती झाल्याचे जाहीर केले. ठाकरे बंधू एकत्र येणार याचा मिडियातून मोठा गवगवा झाला होता. वीस वर्षापूर्वी राज ठाकरे हे अविभाजित शिवसेनेतून बाहेर पडले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची त्यांनी स्थापना केली. शिवसेना व मनसे या दोन्ही पक्षांचा आधार मराठी माणूस व मराठी अस्मिता आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला भगदाड पडले, शिवसेना पक्ष, निवडणूक चिन्ह शिंदे घेऊन गेले. आज शिंदे यांच्या शिवसेनेचे साठ आमदार विधासभेत आहे. उध्दव ठाकरेंच्या पक्षाचे केवळ वीस आमदार निवडून आलेत. राज यांच्या पक्षाकडे आज एकही आमदार नाही आणि एकही नगरसेवक नाही. ठाकरे बंधूंना प्रसिध्दी भरपूर मिळत असते पण अपेक्षित मतदान होत नाही. दिल्लीतील भाजपचे हायकमांड मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार अशी भिती दाखवून आणि मराठी जनतेला आता चुकाल तर संपाल असे भावनिक आवाहन करून ठाकरे बंधू मुंबई- ठाणे – नाशिक महापालिकांवर सत्ता काबीज करू शकतील का ? बलाढ्य भाजपला आव्हान देण्याइतपत ठाकरे बंधुंकडे आज मनी पॉवर व मसल पॉवर आहे का ?

मराठीच्या मुद्यावर जुलै २०२५ मधे ठाकरे बंधू प्रथम एकाच मंचावर आले, त्यानंतर गेल्या सहा महिन्यात ते एक डझनवेळा तरी एकमेकांना भेटले. आम्ही एकत्र आलोत ते एकत्र राहण्यासाठी याचा पुनरूच्चार उद्धव ठाकरेंनी संयुक्त पत्रकार परिषदेत केला. मुंबईला कोणी तोडण्यासाठी आले तर त्याचा खात्मा करू असा इशाराही दिला. राज ठाकरे यांनीही कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, याचा पुनरूच्चार केला.

ठाकरे बंधूंनी निवडणुकीसाठी युती झाल्याचे जाहीर केल्यानंतर दोन्ही पक्षातील सैनिकांमधे आनंदाची लाट उसळली. गुलाल उधळला गेला, फटाक्यांची आतषबाजी झाली, एकमेकांना पेढे भरवले गेले, ढोल ताशेंच्या गजरात जल्लोष झाला. उध्दव ठाकरे यांची पत्नी रश्मी, पुत्र आदित्य तसेच राज यांची पत्नी शर्मिला, पुत्र अमित असा सर्व ठाकरे परिवार एकाच मंचावर आला तेव्हा दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते सुखावले. ठाकरे बंधू एकत्र आले, आमचे स्वप्न पूर्ण झाले अशी भावना दिसून आली. युतीची घोषणा झाली तरी ठाकरे बंधूंनी आपले सर्व पत्ते उघड केलेले नाहीत.

आमची युती झाली, एवढीच घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत झाली. कोणत्या महापालिकेत कोणता पक्ष किती जागा लढवणार हे कोणी सांगितले नाही. राज्यात २९ महापालिकांच्या निवडणुका आहेत. पैकी कोणत्या महापालिकेत युती लढणार हेही स्पष्ट केले नाही. महाआाघा़डीचे भविष्य काय ? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ( तुतारी ) व वंचित यांना बरोबर घेणार का ? याचे उत्तर मिळाले नाही. युती कोणत्या मुद्दयावर झाली, अजेंडा काय याचाचा उलगडा झाला नाही. ठाकरे बंधुंची पत्रकार परिषद झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे निवडणूक प्रमुख व क’बिनेटमंत्री आशिष शेलार हे ठाकरें बंधुंवर अक्षरश: तुटून पडले. उद्धव व राज हे दोघे भाऊ एकत्र आले म्हणून आनंद व्यक्त करीत भाजपाच्या या तिनही दिग्गजांनी ठाकरे बंधूंवर हल्ला चढवला.

ठाकरे बंधू एकत्र आल्याने महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही हे भाजपने बजावले आहे. मुंबईचा महापौर हा मराठीच होईल व ठाकरे बंधुंचा असेल असे राज ठाकरे व संजय राऊत यांनी निक्षून सांगितले पण भाजपने मात्र मुंबईचा महापौर मराठीच होईल व महायुतीचा होईल असा पलटवार केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही पक्षाचा विस्तार करताना मुंबईचे केंद्राकडून लचके तोडले जातील अशी अनेकदा भिती घातली होती. मराठी माणूस व मराठी अस्मिता हा शिवसेनाचा तर आधार आहे. आता तेच तेच मुद्दे ठाकरे बंधूंना किती लाभदायक ठरतील ? बावनकुळे यांनी तर घिसीपीटी कॅसेट म्हणून ठाकरे बंधूंची खिल्ली उडवली आहे.

निवडणूक प्रचारात भाजप नेत्यांना उघडे पाडण्यासाठी आपल्याकडे अनेक व्हिडिओ आहेत असे सांगून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ चे संकेत दिले. पण राज यांनी वेळोवेळी बदलेल्या भूमिकेचे अनेक व्हिडिओ आमच्याकडेही आहेत, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे. ठाकरे बंधू यांनी वीस वर्षांनी आपण युती केल्याचे जाहीर केले, पण ते दोघे वेगळे का झाले होते ? मातोश्रीवरील विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे, असे आरोप करून राज यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. चार कारकुनांनी पक्षाचा ताबा घेतला आहे असे राज ठाकरे यांनी तेव्हा म्हटले होते.

मनसे हा संपलेला पक्ष आहे मी त्याविषयी बोलणार नाही, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले होते. वीस वर्षे दोन्ही भावात एवढा मोठा दुरावा होता मग असे काय घडले की दोघांना निवडणुकीसाठी युती करावी लागली ? विधानसभा निवडणुकीत ठाकरे बंधुना मोठे अपयश आले. नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीत अपयशाची मालिका चालूच राहिली. एकीकडे भाजपचा अश्वमेध दौडत आहे व महाआघाडीत कोणी भरंवशाचे मित्र नाहीत अशा वातावरणात आपले व आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकविण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. निदान आपल्या दोन पक्षात तरी मराठी मतांचे विभाजन होऊ नये हा त्यांचा हेतू असावा. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, ठाकरे म्हणजे मुंबई नाही, ठाकरे म्हणजे मराठी नाही. महापालिका निवडणकीत मुंबईकर महायुतीलाच मतदान करतील, यावर आपला पूर्ण विश्वास आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

रात्र वैऱ्याची आहे, जागा हो…

फडणवीसांना नेमके काय हवे आहे ?

डॉ. दीपक टिळक – मित्र आणि मार्गदर्शक : डॉ. सुकृत खांडेकर

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading