भारताला प्रगतीकडे ढकलण्यासाठी ट्रम्प पाहुणे शेवग्याचे झाड तोडायला निघाले आहेत. असे झाले तर भारताला आपला मागासलेपणा सोडून आपल्या पिकांची उत्पादकता वाढवावी लागेल. त्यासाठी जी एम तंत्रज्ञाना सहित इतर प्रगत तंत्रज्ञान स्वीकारावे लागेल. उत्पादनाचा दर्जा आंतरराष्ट्रीय दर्जाचा करावा लागेल.
अनिल घनवट
राष्ट्रीय अध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्या नंतर त्यांनी अमेरिकेला “पुन्हा महान” बनविण्यासाठी “MAGA” कार्यक्रम हाती घेतला. पहिले पाऊल उचलले ते अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांना हाकलण्याचे. दुसरे काम केले ते, ज्या देशांबरोबर अमेरिकेचा व्यापार आहे त्या देशांनी अमेरिकी वस्तूंवर जितके आयात कर लावले तितके त्यांच्या देशातील आयातीवर सुद्धा लादले. रेसीप्रोकल टेरिफ घोषित करण्यात आले. मग काही देशांवर १०० टक्के पेक्षा जास्त आयात कर लावले. चीन सारख्या देशांनी अमेरिकी वस्तूंच्या आयातीवर ही त्या पेक्षा जास्त आयात कर लावले. जगभर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
भारतावर अमेरिकेचा दबाव
भारताबरोबर बोलणी करताना अमेरिकेने काही अटी घातल्या. भारतात आयात होणाऱ्या कृषी उत्पादनांवरील आयात कर घटविणे व अमेरिकेत तयार झालेले जनुक सुधारित (GM) सोयाबीन, मका, गहू भारतात आयात करण्यासाठी व्यापार खुला करावा. तसेच दुग्धजन्य पदार्थ, पोल्ट्री उत्पादने भारतात आयात करण्यास कमी आयात कर लावून स्वीकारण्यास मान्यता द्यावी. या शर्ती मान्य केल्या तर भारतातील शेतकऱ्यांना आपला माल मातीमोल भावाने विकावा लागेल हे निश्चित म्हणून कोणत्याही परिस्थितीत भारताला या अटी मान्य करणे शक्य नाही. भारत असे करण्यास तयार नाही हे लक्षात येताच ट्रम्प यांनी भारताकडून आयात होणाऱ्या मालावर अगोदर २५% व नंतर ५०% आयात कर ठोकला. अशा परिस्थित अमेरिकेतील बाजारात भारतीय माल स्पर्धात्मक राहू शकत नाही व निर्यात ठप्प होणार. याचा सर्वात जास्त परिणाम भारतातून जाणाऱ्या तांदूळ, मासळी आणि कापड उद्योगावर होणार आहे. इतर शेतीमाल आपण फारसा अमेरिकेला निर्यात करत नाही. अमेरिकेतून भारतात येणाऱ्या मालावर सरासरी ३९% आयात कर आकारला जातो व भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या माळावर फक्त ५% आयात कर आहे. यामुळे अमेरिकेचा जवळपास ४५ बिलियन डॉलरचा व्यापारिक घाटा आहे. या बाबतच ट्रम्प साहेबांनी तक्रार आहे. भारत हा जगातील सर्वात जास्त कस्टम ड्युटी करणारा देश आहे म्हणून ट्रम्प भारताला “टेरिफ किंग” म्हटले.
भारताला सुधारण्याची गरज
भारत जे निर्यात करतो ते बहुतेक कच्चा मालच निर्यात करतो. प्रक्रिया केलेल्या वस्तू, मुल्य वर्धित समान आपण निर्यात करत नाही. भारताच्या व्यापारावर जर असे निर्बंध लादले गेले तर आपल्याला नाईलाजाने का होईना सुधारणा करावी लागेल. जगाच्या बाजारपेठेत टिकेल व विकेल असा निर्यातक्षम माल तयार करावा लागेल. या आपत्तीचे इष्टापत्तीत रूपांतर करावे लागले व ते करणे काही अवघड नाही. त्यासाठी मात्र काही सुधारणा कराव्या लागतील. प्रक्रिया उद्योग उभे करणे व्यापार करण्यामध्ये सरकारी दखल कमीत कमी असावी, भ्रष्टाचाराला वाव देणारे कायदे, नियम, अटी रद्द कराव्या लागतील. वायदेबाजारातील हस्तक्षेप बंद करावा लागेल, परकीय गुंतवणूक आकर्षित होईल असे वातावरण तयार करावे लागेल. संरक्षण देऊन सुरू असलेले उद्योगांचे लाड बंद करावे लागतील. जगाच्या बाजारपेठेत खंबीरपणे वावरण्याची तयारी ठेवावी लागेल.
शेवग्याचे झाड तुटणार का?
ही सर्व परिस्थिती पाहता, मुन्शी प्रेमचंद याची एक प्रसिद्ध कथा आठवते. कथा अशी आहे, एका राज घराण्याचे वारसदार असलेले कुटुंब होते. नेहमीच रुबाबात राहण्याची पद्धत व ऐश करण्याची परंपरा असल्या मुळे खर्च मोठा असे. काम करणे म्हणजे कमीपणा मानला जाई म्हणून कोणी काम करत नसे. मग काही पिढ्यात सर्व जमीन जुमला विकला गेला. एक मोठा वाडा, जे त्यांचे घर होते तेव्हढेच शिल्लक राहिले. काहीच उत्पन्न नाही म्हणून त्यांचे खाण्या पिण्याचे वांधे होऊ लागले. मग त्यांच्या परसात एक मोठे शेवग्याचे झाड होते, ते पहाटे लवकर उठून त्या शेवग्याच्या शेंगा तोडून बाजारात पाठवायचे आणि मिळणाऱ्या पैशावर कसाबसा आपला उदरनिर्वाह करायचे.
त्यांच्या वडिलांचे मित्र व नातेवाईक एकदा या कुटुंबाकडे पाहुणे म्हणून काही दिवस राहायला येतात. तेव्हा त्यांच्या लक्षात ही सर्व परिस्थिती लक्षात येते की हे फक्त या शेवग्याच्या शेंगावर जगत आहेत. कोणीच काही काम धंदा करत नाही. एका रात्री सर्व झोपलेले असताना तो पाहूना, ते शेवग्याचे झाड तोडून टाकतो व कोणाला न सांगता निघून जातो.
या कुटुंबाने हे पाहिल्यावर त्या पाहुण्याला खूप शिव्या घालतात, कोसतात. लवकरच या कुटुंबाची उपासमार व्हायला लागते. मग हळू हळू एक एक जण कामाला जाऊ लागतो. घरात पैशाची आवक सुरू होते व काही महिन्यात ते कुटुंब व्यवस्थित जीवन जगायला लागते, व समृद्ध होते. शेवग्याचे झाड तोडणाऱ्या पाहुण्याचे आभार मानू लागते.
स्पर्धेला घाबरून चालणार नाही
भारताला प्रगतीकडे ढकलण्यासाठी ट्रम्प पाहुणे शेवग्याचे झाड तोडायला निघाले आहेत. असे झाले तर भारताला आपला मागासलेपणा सोडून आपल्या पिकांची उत्पादकता वाढवावी लागेल. त्यासाठी जी एम तंत्रज्ञाना सहित इतर प्रगत तंत्रज्ञान स्वीकारावे लागेल. उत्पादनाचा दर्जा आंतरराष्ट्रीय दर्जाचा करावा लागेल. आधारभूत किमतीवर आधारित भारतातील कृषी अर्थव्यवस्था आता फार काळ चालणे शक्य नाही. भारतातील आधारभूत किंमती जागतिक बाजारापेक्षा बऱ्याच जास्त आहेत. आपण स्पर्धा करू शकत नाही व स्वस्त आयातीचा धोकाच जास्त आहे.
ताजे उदाहरण आहे कापूस आयातीवरील शुल्क रद्द करण्याचे. भारत अमेरिकेला कपडापासून निर्मित कापड निर्यात करतो. आता ५०% टेरिफ लावल्यामुळे भारतातून आयात केलेले कपडे, इतर देशांच्या मनाने महाग होणार. भारतातली कापड उद्योगाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. कापड उद्योगाला सावरण्यासाठी आयात शुल्क शून्य करण्यात आले. भारतात कापसाला हमी किंमत आहे ८११०/- रु प्रति क्विंटल त्यापेक्षा चांगल्या दर्जाचा कापूस ६५०० ते ६८०० या दराने जागतिक बाजारात उपलब्ध आहे. कापड उद्योगाला भारतात पिकलेला कापूस विकत घेण्या पेक्षा आयात केलेला कापूस स्वस्त पडतो.
भारतातील शेतकरी ही सक्षम
ही परिस्थिती बदलायची असेल तर ज्या गुणवत्तेचा कापूस आपल्या कापड उद्योगाला हवा आहे तो आपण पिकवला पाहिजे. आपली उत्पादकता इतर देशांच्या बरोबरीने किंवा जास्त असायला हवी. उत्पादन खर्च कमी असायला हवा. हे शक्य आहे जर भारतातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळाले तर ! व्यापाराचे स्वातंत्र्य मिळाले तर! असे धोरण स्वीकारल्यामुळे व्हिएतनाम, फिलिपिन्स, बांगलादेश सारखे देश भारताच्या पुढे निघाले आहेत.
भारतातील शेतकरी या संकटावर सहज मात करू शकतो. आपल्याकडे सुपीक जमीन, मुबलक पाणी, योग्य हवामान, व अधिक सूर्यप्रकाश आहे. कष्ट करणारे शेतकरी आहेत. काही वर्षातच आपण आत्मनिर्भर होऊन जगाला अन्नधान्य पुरवू शकतो इतकी क्षमता आपल्याकडे आहे. द्राक्षाच्या शेतकऱ्यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. जागतिक दर्जाचे द्राक्ष जगभर विकले जात आहेत.
ट्रम्प यांनी अमेरिकेतील बेकायदेशीर नागरिक हाकलून दिल्यामुळे अमेरिकेत शेतात काम करायला मजूर राहिले नाहीत. मजुराच्या तुटवड्यामुळे तेथील शेतकऱ्यांना, आपली तयार झालेली पिके नांगरून शेतात गाडावी लागली आहेत. आपली तरुण लोकसंख्या ही आपली मोठी ताकद आहे. याला संधी मिळायला हवी. ती ट्रम्प पाहुण्याच्या निमित्ताने मिळू शकते. भारताला नाईलाजाने का होईना शेती क्षेत्र खुले करावे लागेल, उत्पादकता वाढवावी लागेल, मालाची गुणवत्ता सुधारावी लागेल. भारतातील शेतकरी जगाच्या बाजारपेठेत स्पर्धा करू शकतो, टिकू शकतो फक्त त्याला नियंत्रण मुक्त करा. १९९१ साली भारतात खुली कारणाचे वारे वाहू लागले तेव्हाच हे शेवग्याचे झाड तुटेल अशी अपेक्षा शेतकरी नेते शरद जोशी यांनी व्यक्त केली होती मात्र शेती क्षेत्रासाठी तेव्हा ते तुटले नाही. आता डोनाल्ड ट्रम्प तात्या हे कार्य करतील अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.