December 8, 2023
Farmers Organization and Marathi Literature book review
Home » शेतकरी संघटना अन् मराठी साहित्याचे अनुबंध
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकरी संघटना अन् मराठी साहित्याचे अनुबंध

शेतकरी संघटनेच्या वाटचालीचा आढावा मांडताना संघटनेचे नेतृत्व, संघटनेचा वैचारिक वारसा, आंदोलने, इंडिया विरूद्ध भारत हा सिद्धांत, खुल्या अर्थव्यवस्थेसंबंधी संघटनेचा विचार, संघटनेचे राजकीय धोरण व शोकात्म वाटचाल ह्यासंबंधी महत्त्वाचे विश्लेषण पुस्तकात आहे.

संतोष जगताप लोणविरे

१९८० च्या दशकात शेतकऱ्यांच्या हिताचा विचार घेऊन शेतकरी संघटना उदयास आली. संघटनेचे नेतृत्व शरद जोशी यांनी इंडिया विरूद्ध भारत असा संघर्षाचा सिद्धांत मांडत शेतकऱ्यांचं अर्थशास्त्र उलगडलं. शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळण्यासाठी आंदोलन उभारलं. संघटनेची आंदोलनांची पद्धत, खुल्या अर्थव्यवस्थेसंबंधीचा विचार, राजकीय धोरण इत्यादी मुद्दे गावोगावी पोचले. त्यातून शेतकऱ्यांचं आत्मभान जागृत झालं.

ह्या साऱ्या भोवतालाचा परिणाम मराठी साहित्यनिर्मितीवर होणं स्वाभाविक होतं. म्हणूनच ऐंशीनंतरच्या मराठीतल्या कृषिजन कथा – कविता – कादंबरीत शेतकरी संघटनेचे पडसाद दिसून येतात. ह्यासंबंधीचं प्रा. डॉ. ज्ञानदेव राऊत यांनी केलेलं संशोधन ‘शेतकरी संघटना आणि मराठी साहित्याचे अनुबंध’ ह्या पुस्तकातून आपल्यासमोर येतं.

या पुस्तकातील पहिले प्रकरण हे शेतकरी संघटना : उदय, प्रेरणा व वाटचाल यावर आहे. दुसरे प्रकरण शेतकरी संघटना आणि मराठी कथा, तिसरे प्रकरण शेतकरी संघटना आणि मराठी कविता तर चौथे प्रकरण शेतकरी संघटना आणि मराठी कादंबरी यावर आहे. ह्या चार प्रकरणांतून राऊत यांनी शेतकरी संघटनेचे धोरण व कार्याचा मराठी साहित्यनिर्मितीवर झालेल्या प्रभावाचा परामर्श घेत विश्लेषण केलं आहे.

शेतकरी संघटनेच्या वाटचालीचा आढावा मांडताना संघटनेचे नेतृत्व, संघटनेचा वैचारिक वारसा, आंदोलने, इंडिया विरूद्ध भारत हा सिद्धांत, खुल्या अर्थव्यवस्थेसंबंधी संघटनेचा विचार, संघटनेचे राजकीय धोरण व शोकात्म वाटचाल ह्यासंबंधी महत्त्वाचे विश्लेषण पुस्तकात आहे. संघटनेच्या लढ्यानं तत्कालीन ग्रामीण साहित्यिक अंतर्मुख झाले. त्या प्रभावातून आलेल्या कथा, कविता आणि कादंबरीचा सविस्तर आढावा ह्या पुस्तकात मांडला आहे.

रा. रं. बोराडे, भास्कर चंदनशिव, आसाराम लोमटे इत्यादी लेखकांच्या कथा, विठ्ठल वाघ, फ. म. शहाजिंदे, इंद्रजित भालेराव, श्रीकांत देशमुख, केशव देशमुख, जगदीश कदम, शंकर वाडेवाले, नारायण सुमंत, लक्ष्मण महाडिक, प्रकाश किनगावकर, अशोक कौतिक कोळी, कैलास दौंड, संतोष पद्माकर पवार, एकनाथ पाटील, नामदेव वाबळे, गंगाधर मुटे, बालाजी मदन इंगळे, बबन शिंदे, प्रमोद माने इत्यादी कवींच्या कविता आणि रा. रं. बोराडे, शेषराव मोहिते, सदानंद देशमुख, विश्वास पाटील, भारत काळे, मोहन पाटील, सुरेन्द्र पाटील, भीमराव वाघचौरे इत्यादी लेखकांच्या कादंबऱ्यांविषयी सविस्तर विश्लेषण करत ह्या साहित्यकृती आणि शेतकरी संघटनेचा विचार याचा अनुबंध शोधणारे संशोधन ह्या पुस्तकात आहे.

पुस्तकाला ज्येष्ठ साहित्यिक व शेतकरी संघटनेचे चिंतनशील अभ्यासक डॉ. शेषराव मोहिते यांची प्रस्तावना आहे. त्यांनी प्रस्तावनेत केलेली ” ज्ञानदेव राऊत यांनी पीएच. डी. संशोधनाच्या अनुषंगाने मराठी साहित्यात शेतकरी संघटनेच्या विचारांची बीजं शोधण्याचे काम केले. ज्ञानदेव राऊत यांना शेतकरी चळवळीविषयी खोलवर आस्था आहे. त्यासोबतच संशोधकाकडे असावा लागणारा तटस्थपणा आणि विश्लेषक बुद्धी चांगली आहे. महात्मा फुले ते शरद जोशी हा एक विचारांचा अनुबंध आहे. त्याचा खूप चांगला अन्वयार्थ लावण्याचे काम राऊत यांनी केले आहे. ” ही नोंद ह्या पुस्तकाचं महत्त्व अधोरेखित करते.

पुस्तकाचे नाव – शेतकरी संघटना आणि मराठी साहित्याचे अनुबंध
लेखक – डॉ. ज्ञानदेव राऊत
प्रकाशक – गणगोत प्रकाशन, देगलूर.
मूल्य – २५० रुपये

पुस्तक परिचय आणि परिक्षणासाठी आपणही आपली पुस्तके जरुर पाठवा आम्ही त्याची जरूर दखल घेऊ आणि योग्य ती प्रसिद्धी देऊ…

पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, संपादक, इये मराठीचिये नगरी
श्री अथर्व प्रकाशन, १५७, साळोखेनगर, कोल्हापूर ४१६००७. मोबाईल – ९०११०८७४०६

Related posts

ग्लेशियरमधील चित्तथरारक प्रवास…

वड-पिंपळाच्या वृक्षासारखाच हा संसारवृक्ष

देहूचे शिळा मंदिर भक्तीच्या शक्तीचे केंद्र – नरेंद्र मोदी

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More